Leading International Marathi News Daily
शनिवार, २ मे २००९
(सविस्तर वृत्त)

शाळा निसर्गाची
बिगल सर्वेक्षण जहाजावरून डार्विन दक्षिण अमेरिकेत पोहोचला. तब्बल ६३ दिवसांच्या सागरी प्रवासानंतर..
सभोवतालचे दृश्य बघून त्याचे ऊर आनंदाने भरून आले.. हिरव्यागार वनश्रीने नटलेल्या घनदाट जंगलात एका खोल घळीत चार्लस् उभा होता.. जीवनात चार्लस्ने निसर्गावर भरभरून प्रेम केले.. पशु-पक्षी, वनस्पती व कीटकांवर.. सभोवती झेपावणारे पशू-पक्षी, सळसळणाऱ्या वृक्ष-वनस्पती, चकाकणारे असंख्य कीटक.. अन् आसमंतात मन प्रफुल्लित करणारा सुगंध.. निसर्गाचा थरार चार्लस् प्रत्यक्ष अनुभवत होता.. अंगी उत्साह संचारणारा.. आज जणू तो होता स्वर्गातच.. हा होता डार्विनच्या जीवनातील एक अविस्मरणीय अनुभव..

 

अशा एकाहून एक सरस ठिकाणांना डार्विन भेटी देणार होता..
सफरीतील पहिला पडाव होता सॅल्व्हाडोरनजीकच्या ब्राझीलमधील बहिया येथील उष्णकटीबंधीय जंगलात.. ब्राझीलच्या किनाऱ्यालगत प्रवास करीत डार्विन पोहोचला रिओ द जानेरो येथे.. ब्राझीलमध्ये चार्लस्ने पाहिला व्यथित करणारा गुलामांचा व्यापार.. पुढे अर्जेटिनातील ब्युनॉस आयरेस.. नंतर दक्षिण अमेरिकेचं टोक असलेलं तिएरा देल फ्युगो.. तिथल्या हिंस्त्र ‘रानटी’ वाटणाऱ्या आदिवासी टोळ्या.. अन् पुढे मॅगेलॉनच्या सामुद्रधुनीतून केप हॉर्न इथे..
बिगल जहाजाच्या जीवशास्त्रीय सर्वेक्षणानिमित्त दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्यालगत अशा येरझाऱ्या सुरू असताना डार्विन अनेक दिवस.. कधी-कधी तर अनेक आठवडे किनाऱ्यावर घालवीत असे.. निरीक्षण अन् नमुने गोळा करीत.. वर होते आकाश अन् खाली धरिणी.. डार्विन अश्वारोहण व शिकारीत तरबेज होता.. डार्विनच्या नेमबाजीतील कौशल्यामुळे शिकारीसाठी डार्विन एक उपयुक्त सदस्य होता.. साहसी जीवनाची आवड असल्यामुळे डार्विनची कृतिशीलता वाढली.. तो अधिक काटक बनला..
माँटेव्हिडीओत कप्तान फिट्झरॉयकडे तिथले बंड मोडून काढण्यासाठी स्थानिक लोकांनी मदत मागितली.. तेव्हा इतर खलाशांसोबत हाती शस्त्र घेऊन डार्विनने चक्क रस्त्यात संचलन केले.. अर्जेटिनातील बहिया ब्लाका गावाजवळील पुन्टा अल्टा हे ठिकाण.. या ठिकाणी डार्विनला पहिला जीवाष्म आढळला.. हे सांगाडे महाप्रचंड होते.. डार्विन म्हणतो की, पृथ्वीतलावरून अस्तंगत झालेल्या महाकाय सजीव प्रजातींची ती दफनभूमी होती.. राक्षसी दफनभूमी.. इथल्या दफनभूमीत डार्विनने हाडाचा पहिला जीवाष्म पाहिला तो स्लोथसारख्या मेगॅथेरियम प्राण्याचा.. याच ठिकाणी दुसरा महाकाय जीवाष्म आढळला मेगॅलोनिक्स या विशाल प्राण्याचा.. नंतर सापडला आर्मिडिलोशी साम्य असणाऱ्या गेंडय़ाच्या आकाराचा स्केलिडोथेरियमचा अजस्त्र जीवाष्म.. याच महाकाय थडग्यात आढळला टॉक्सोडॉन नावाचा कॅपिबारा जातीच्या उंदराशी साम्य असलेला पण चक्क हत्तीएवढय़ा अजस्त्र प्राण्याचा सांगाडा.. अन् इथेच आढळून आला घोडय़ाचा जीवाष्म.. चक्रावून टाकणारा.. कारण स्पॅनिश टोळ्यांनी इ.स. १५०० मध्ये सर्वप्रथम घोडा हा प्राणी दक्षिण अमेरिकेत आणला तर मग त्याआधी जीवाष्म म्हणून आढळलेला घोडा इथे कुठून आला?.. दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्यावरून उत्तरेकडे प्रवास करीत असता निसर्गाच्या प्रचंड सामर्थ्यांचा डार्विनला प्रत्यय आला.. निसर्ग काय करामत करू शकतो याची झलक डार्विनला दिसली.. अँडीज पर्वतराजीत निर्जन डोंगरमाथ्यावर त्याला अश्मिभूत शिंपले आढळून आले..
चिलीच्या किनाऱ्यावर बिगल नांगरून पडले असता चार्लस्ने रात्रीच्या वेळी ज्वालामुखीचा उद्रेक होताना बघितला.. तर कॉन्सेप्सिऑन येथील वाल्डिविया येथे त्याला भयंकर भूकंपाचा सामना करावा लागला.. पायाखालची जमीनच जणू सरकत होती..
सँटीअ‍ॅगो येथील केप व्हर्डे बेटावरील पोर्ट प्राया बंदरानजीकच्या किनारपट्टीवर डार्विनने जे पाहिले ते थक्क करणारे होते.. सागरी पातळीपासून ३० फूट उंच प्रस्तरांवर कालवे लटकत होती.. जाणवत होते की, एक वेळ हे प्रस्तर पाण्याखाली असावेत.. डार्विनला चार्लस् लायल यांच्या भूगर्भशास्त्राच्या पुस्तकातील ओळी आठवल्या.. पृथ्वीचा पृष्ठभाग सतत बदलत असतो याची प्रचीती आली..
सफरीदरम्यान बिगल पेरू येथे पोहोचले.. आता जहाजाने दिशा बदलली व वायव्येकडे प्रयाण केले. विषुववृत्तावरील गलापगॉस बेटांकडे..
डार्विन काळजीपूर्वक निरीक्षणे करून व्यवस्थित टिपणे घेत असे.. डार्विन शिकत होता प्रत्यक्ष निसर्गाच्या शाळेत..
आज नामशेष झालेल्या पण स्लोथ जातीच्या प्राण्याशी साम्य असलेल्या हत्तीच्या आकाराचा मेगाथेरियम प्राण्याचा महाप्रचंड सांगाडा राक्षसी दफनभूमीत आढळला.. या प्राण्याचे प्रचंड धूड पेलणारी हाडं किती मजबूत असतील याचा मी विचार करू लागलो.. चार्लस् डार्विन