Leading International Marathi News Daily
शनिवार, २ मे २००९
(सविस्तर वृत्त)

संगणकीय मराठीचे पाऊल पडते पुढे..
‘एसगांगल’ फॉन्ट
प्रतिनिधी

संकेतस्थळांपासून अनेक संगणकीय कामकाजांमध्ये मराठी भाषेचा वापर वाढू लागला आहे. ती आजच्या काळाची गरजही आहे. त्यासाठी विविध मराठी फॉन्टची निर्मिती करण्यात आली आहे. हे फॉन्ट वापरण्यासाठी एखाद्या सॉफ्टवेअरची अर्थात अ‍ॅप्लिकेशनची गरज भासते. ही या सर्व फॉन्टमधील त्रुटी आहे. नेमकी हीच त्रुटी दूर करत शुभानन गांगल

 

यांनी ‘एसगांगल’ २ॠंल्लॠं’ हा फॉन्ट तयार केला आहे. हा फॉन्ट वापरण्यासाठी कोणत्याही बाहेरच्या अ‍ॅप्लिकेशन अथवा सॉफ्टवेअरची गरज नाही. त्यामुळे एमएस ऑफिस, पेजमेकर, फोटोशॉप, ई-मेल इत्यादी सर्व सॉफ्टवेअरमध्ये हा फॉन्ट सहजपणे वापरता येतो.
याबाबत अधिक माहिती देताना शुभानन गांगल यांनी सांगितले की, आतापर्यंत वापरले जाणारे सर्व फॉन्ट्स अ‍ॅक्टिव्हेट होण्यासाठी एक ‘एक्झिक्युटेबल फाईल’ ‘रन’ करावी लागते. ‘युनिकोड’ही त्याला अपवाद नाही. केवळ फॉन्ट इन्स्टॉल करून तो वापरता येऊ शकत नाही. ‘एसगांगल’ फॉन्टसाठी अशा कोणत्याही बाह्य अ‍ॅप्लिकेशनची गरज नाही. केवळ फॉन्ट फोल्डरमध्ये हा फॉन्ट इन्स्टॉल केला की तो अ‍ॅक्टिव्हेट होतो. फॉन्ट वापरासाठी कीबोर्ड लेआऊट हा एक महत्त्वाचा भाग असतो. सध्या तो फोनेटिक रचनेवर आधारलेला आहे. त्यासाठी कीबोर्डवरील ९४ चाव्यांचा (key) वापर करण्यात आला आहे, पण हा ‘एसगांगल’ फॉन्ट कोणत्याही कीबोर्ड लेआऊटमध्ये बसविता येऊ शकतो, असे गांगल यांनी सांगितले. हा फॉन्ट शब्दातील प्रत्येक अक्षर वेगळे करून दाखवतो. त्यामुळे एखाद्या शब्दाचा उच्चार कसा करावा हे कोणालाही सहज कळू शकते. या फॉन्टसाठी ‘एक्झिक्युटेबल फाइल’ची आवश्यकता नसल्याने ‘संगणकामध्ये फॉन्ट नको पण व्हायरस आवर’, अशी परिस्थिती उद्भवणार नाही.
शुभानन गांगल गेली बरीच वर्षे मराठी भाषा आणि लिपी याबाबत काम करत आहेत. १९७० सालापासून ते संगणक वापरत आहेत. त्यामुळे संगणकामध्ये झालेले स्थित्यंतर त्यांनी पाहिले आणि अनुभवले आहे. संगणक आणि भाषा यांचा अभ्यास करून त्यांनी या फॉन्टची निर्मिती केली आहे. मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या लिपीबद्दल गांगल सांगतात की, मराठीने देवनागरी ही लिपी आचरणात आणण्याची आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे ऱ्हस्व, दीर्घ अशी वेगवेगळी चिन्हे वापरण्याचीही गरज नाही. सध्या वापरात असलेली मराठी लिपी १९५० सालानंतर अस्तित्त्वात आली आहे. गेली ५९ वर्षे तीच लिपी वापरत असल्याने तीच योग्य, असा सर्वाचा समज झाला आहे. प्रत्यक्षात १९५० पूर्वी ऱ्हस्व आणि दीर्घ अशी दोन चिन्हे अस्तित्वात नव्हती. अगदी समर्थ रामदासांनी आपल्या श्लोकांमध्ये ‘विचार’ हा शब्द ‘वीचार’ असा लिहिल्याचे शुभानन गांगल यांनी सांगितले. गांगल यांनी तयार केलेला फॉन्ट हा प्रचलित लिपीप्रमाणेच आहे.
‘एसगांगल’ हा फॉन्ट आणि कीबोर्ड लेआऊट http://shubhanangangal.wetpaint.com या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येऊ शकतो. या फॉन्टबद्दल आणि त्यांच्या नवीन सिद्धांताबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी gangals1234@gmail.com या ईमेल अ‍ॅड्रेसवर संपर्क साधावा.