Leading International Marathi News Daily
शनिवार, २ मे २००९
(सविस्तर वृत्त)

भारतात दरवर्षी २० लाख लोकांचा हृदयविकाराने मृत्यू
खास प्रतिनिधी

भारतात दिवसेंदिवस हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या वाढत असून आजघडीला भारतात सुमारे साडेपाच कोटी हृदयविकाराचे रुग्ण आहेत तर दरवर्षी हृदयविकाराने २० लाख लोकांचा मृत्यू होतो. मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉलची वाढ आणि जीवनशैलीतील

 

बदलामुळे निर्माण होणारा ताणतणाव यातून हृदयविकाराचे रुग्ण वाढत असून नियमित व्यायाम व खाण्यापिण्याच्या सवयींमधील बदलामुळे हृदयविकाराला दूर ठेवणे शक्य असल्याचे गुडगाव येथील आर्टेमिस रुग्णालयातील विख्यात हृदयविकार तज्ज्ञ डॉ. मधुकर शाही यांनी सांगितले.
गोवा येथील ‘हॉलीडे इन रिसॉर्ट’मध्ये हेल्थ रायटर्स असोसिएशन (हिल) आणि पेप्सिको कंपनी यांनी आयोजित केलेल्या कार्यशाळेत हृदयाचे आरोग्य आणि खाण्यापिण्याच्या सवयी’ या विषयावर बोलताना डॉ. शाही म्हणाले की, हृदयविकाराच्या कारणांची योग्य माहिती घेतल्यास अर्धी लढाई जिंकता येईल. हृदयविकार का व कशामुळे होतो याची नेमकी कारणे कळल्यास जीवनशैलीतील बदल व खाण्याच्या योग्य सवयींची काळजी घेतली जाईल, असे डॉ. शाही यांनी सांगितले. या कार्यशाळेत देशभरातील आरोग्य विषयावर लिखाण करणाऱ्या प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. वजन नियंत्रणात आणणे, नियमित चालण्याचा व्यायाम करून मधुमेह नियंत्रणात ठेवणे, वेळच्यावेळी व आरोग्यदायी खाणे, कोलेस्ट्रोल नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे.थोडीशीही शंका आल्यास हृदयविकाराच्या चाचण्या करून योग्य ते उपचार घेतल्यास हृदयविकाराला दूर ठेवता येऊ शकेल. धुम्रपान तसेच अतिरिक्त मद्यपान टाळणे हेही अत्यंत महत्त्वाचे असून भारतात याबाबत योग्य काळजी न घेतल्यास २०१० साली जगभारातील हृद्रुग्णांपैकी ६० टक्के रुग्ण हे भारतातील असतील अशी भीतीही डॉ. शाही यांनी व्यक्त केली. २०१५ साली २३६ अब्ज डॉलर्स हृदयविकारावरील उपचारासाठी खर्च करावे लागतील, असेही ते म्हणाले.
पेप्सिको कंपनीचे डॉ. टी. एस. आर. मुरली यांच्या म्हणण्याप्रमाणे पुरेशी झोप, संतुलित आहारा व योग्य व्यायाम केल्यास हृदयविकाराला दूर ठेवता येऊ शकते. खाण्यात तंतुमय पदार्थाचा वापर आवश्यक असून पेप्सिको कंपनीच्या ‘क्वेकर ओटस्’चा खाण्यातील वापर वाढविल्यास हृदयविकारासाठी ते उपयुक्त ठरू शकते असा दावा त्यांनी केला आहे. खाण्यात ओटस्चा वापर मोठय़ा प्रमाणात होणे आवश्यक असून आजघडीला जम्मू-काश्मिर आणि हिमाचल प्रदेश येथे ओटस्चे उत्पादन केले जाते. देशातील अन्य राज्यातही ओटस्च्या उत्पादनासाठी आम्ही प्रयत्नशील असून याचा प्रमुख्याने खाण्यात वापर होतो तो दक्षिणेतील राज्यात असेही डॉ. मुरली यांनी सांगितले.