Leading International Marathi News Daily
शनिवार, २ मे २००९
(सविस्तर वृत्त)

प्रॉपर्टी प्रदर्शनाचे दिमाखात उद्घाटन पहिल्याच दिवशी ग्राहकांची झुंबड
प्रतिनिधी

महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग फेडरेशन ठाणे यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या प्रॉपर्टी प्रदर्शनाचे शानदार उद्घाटन झाले. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी एक हजारावर

 

नागरिकांनी प्रदर्शनाला भेट दिली.
घोडबंदर रोडवरील दोस्ती मॉल, मानपाडा सिग्नलजवळ सुरू झालेले हे प्रदर्शन ४ मे पर्यंत खुले राहणार आहे. एक लाख चौरस फुट जागेवर पसरलेल्या या प्रदर्शनात ठाणे, मुंबई परिसरातील १०० प्रकल्पांची माहिती एकाच छताखाली ग्राहकांना मिळणार आहे. घराचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या बजेटनुसार घरे पाहता येणार आहेत. ७५ विकासकांची विविध ठिकाणी सुरू असलेली कामे येथे पाहता येणार आहेत. प्रदर्शन पूर्णत: वातानुकुलित आहे. एक मे रोजी सकाळी प्रदर्शनाचे उद्घाटन ठाण्याचे आयुक्त नंदकुमार जंत्रे व पोलीस आयुक्त अनिल ढेरे यांच्या हस्ते करण्यात आले. राज्य गुप्तचर विभागाचे प्रमुख डी. शिवानंदन, मुंबई एमसीएचआयचे अध्यक्ष प्रवीण दोशी, सिक्वेरा कॅपीटलचे व्यवस्थापकीय संचालक राजीव सब्रवाल, एचडीएफसी बँकेचे के.जी. कृष्णमूर्ती, राहुल मलिक, एमसीएचआय ठाणेचे अध्यक्ष चैतन्य पारेख, माजी अध्यक्ष मुकेश सावला, सचिव शैलेश पुराणिक, खजिनदार सुरज परमार यांच्यासह एमसीएचआयचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. राजन बांदेलकर यांनी प्रास्ताविकात प्रॉपर्टी प्रदर्शनाची संकल्पना विषद केली. अध्यक्ष चैतन्य पारेख यानी ठाण्याचे वाढते महत्व आणि ग्राहकांची ठाण्याला असलेली पसंती यामुळे व्यावसायीकांनीही छोटी नॅनो घरे बांधायला सुरूवात केल्याने ग्राहकांचा प्रतिसाद वाढला असल्याचे सांगितले. पोलीस आयुक्त अनिल ढेरे यांनी अन्न, वस्त्र व निवारा या मानवाच्या मुलभुत गरजा असून एमसीएचआयच्या प्रदर्शनामुळे ग्राहकांची निवाऱ्याची गरज भागेल असे सांगितले. यावेळी व्यासपीठावर उपस्थितांची भाषणे झाली.
जागतिक मंदी असली तरी, लोकांना त्याना परवडणाऱ्या किंमतीत घरे मिळाली तर, ते घेणार हे लक्षात घेऊन प्रदर्शनात ठाणे परिसरात सुरू असलेली बांधकामे ग्राहकांना पाहता येणार आहेत. वनबीएचके पासून रो हाऊसेस, तसेच वीकएन्ड होम्स, घरासाठी लागणारे फर्निचर, सामान सारे काही प्रदर्शनात मांडण्यात आले आहे.
प्रदर्शनासाठी प्रवेश फी २० रूपये ठेवण्यात आली असून ठाण्याच्या अनेक भागातून प्रदर्शनस्थळी जाण्यासाठी मोफत वाहनाची सोय करण्यात आली आहे. सकाळी १०.३० ते रात्री ८.३० पर्यंत प्रदर्शन खुले राहणार आहे. विविध बँका, तसेच गृहकर्ज पुरवणाऱ्या संस्थांनी प्रदर्शनानिमित्त कर्जावर विशेष सवलत जाहीर केली आहे. प्रदर्शनाचे यंदाचे नववे वर्ष आहे.