Leading International Marathi News Daily
शनिवार, २ मे २००९
(सविस्तर वृत्त)

शिक्षण मंडळ मदतनीस घोटाळ्यात अधिकाऱ्यांभोवती चौकशीचा फास
संजय बापट

ठाणे महापालिका शिक्षण मंडळातील मदतनीस भरती घोटाळ्याच्या चौकशीची व्याप्ती

 

दिवसेंदिवस वाढत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत सुरू असलेल्या या चौकशीचा फास आता अधिकाऱ्यांभोवती आवळला जाऊ लागला असून, शनिवारपासून काही अधिकाऱ्यांची मॅरेथॉन चौकशी सुरू होणार असल्याने त्यांचे धाबे दणाणले आहे. ठाणे महापालिका शिक्षण मंडळात कंत्राटी सुरक्षारक्षक- मदतनीस नेमण्याच्या कामात मोठय़ाप्रमाणात गैरव्यवहार झाल्याची बाब उघडकीस आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि पालिका यांच्यामार्फत स्वतंत्ररित्या या घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. त्यात प्राथमिक चौकशीत ठपका ठेवून लेखापाल ललिता जाधव आणि क्लार्क विजय कुंभार यास यापूर्वीच निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईस जाधव यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र दोनच दिवसांपूर्वी न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली, तर ठाणे न्यायालयाने या घोटाळयांच्या सखोल तपासाचे आदेश नौपाडा पोलिसांना यापूर्वीच दिले आहेत.
ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेही आता या घोटाळयाची जलदगतीने चौकशी सुरू केली आहे. शिक्षण मंडळात विविध शाळांमध्ये प्रत्यक्षात १०० मदतनीस काम करीत असताना १५० ची नोंद दाखवून लाखो रुपये हडप करण्यात आले असून, मदतनीसांच्या उपस्थितीचे अहवाल पाठवताना कर्तव्यात हयगय केल्याप्रकरणी ५० हून अधिक मुख्याध्यापकांची चौकशी नुकतीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे चौकशी अधिकाऱ्यांनी आपला मोर्चा आता शिक्षण मंडळातील अधिकाऱ्यांकडे वळविला आहे. अ‍ॅन्टी करप्शन विभागाने शिक्षण मंडळातील या गटअधिकाऱ्यांना चौकशीला उपस्थित राहण्याचे फर्मान बजावले आहे. रघुनाथ बेलदार, संगीता बामणे, लीना सहस्त्रबुद्धे, अलका मोने, मंगल भोईर, नारायण तळकटकर, वृषाली चव्हाण आणि हेमा बिवलकर अशी या गटअधिकाऱ्यांची नावे असून, उद्यापासून ५ मेपर्यंत त्यांची मॅरेथॉन चौकशी होणार आहे. सुरक्षा रक्षक भरती संदर्भात ऑगस्ट २००३ ते जून २००७ या कालावधीचे आवक-जावक रजिस्टर, टपालवही व त्यासंबंधातील इतर दस्तऐवजासह चौकशीसाठी अ‍ॅन्टी करप्शनच्या कार्यालयात उपस्थित राहवे, असे या अधिकाऱ्यांना कळविण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.