Leading International Marathi News Daily
शनिवार, २ मे २००९
(सविस्तर वृत्त)

वेध काळाचा
असे म्हणतात की काळ हा अनादि-अनंत आहे. म्हणजे तो कधी सुरू झाला ते माहीत नाही; कळणे शक्य नाही, संपणार कधी तेही सांगता येणार नाही. पण खगोलतज्ज्ञांनी काळाला मोजण्याचा प्रयत्न केला! सूर्य ४।। अब्ज वर्षांपासून अस्तित्वात आहे (आकाशाशी नाते- डॉ. जयंत नारळीकर. पृ. २७१.) अब्ज म्हणजे एकावर ९ शून्ये. तेव्हा ४.५ अब्ज वर्षे म्हणजे ४५०००००००० वर्षे. सूर्य आकाशगंगेत (Milky Way) आहे. ही आकाशगंगा आणि तिच्यासारखी अनेक

 

तारकाविश्वे (Galaxies) एका महास्फोटातून (Big Bang) निर्माण झाली, असे बरेचसे खगोलतज्ज्ञ मानतात. सुविख्यात शास्त्रज्ञ आईनस्टाईनच्या मते हा महास्फोट ९ ते १३ अब्ज वर्षांपूर्वी झाला. तर हॉईल आणि फाउलर यांच्या मते आकशगंगेचे वयच १० ते १५ अब्ज वर्षे आहे (आ. ना. पृ. २७१.) तेव्हा ज्यातून ही तारकाविश्वे निर्माण झाली त्या ब्रह्माण्डाचे वय तर त्याहूनही जास्त असणार!
इतक्या प्रचंड काळाचा आवाका समोर आल्यावर सामान्य माणसाने कळाला अनादि-अनंत म्हणणे स्वाभाविक आहे. परंतु तज्ज्ञांना प्रश्न पडतात; काळ खरोखरच अथांग आहे का? असल्यास का? नसल्यास का?
काळ आणि गती
खगोलविज्ञानाची पुस्तके वाचल्यावर असे वाटते की काळ हे गतीचेच दुसरे अंग आहे. गती डोळ्यांना दिसते; काळ दिसत नाही! एवढाच फरक! सोने, चांदी हे धातू डोळ्यांना दिसत असतात; परंतु त्यांचे मूल्य काय ते डोळ्यांना दिसत नसते. ते कल्पनेनेच जाणावे लागते. तसेच नाते गती आणि काळ यांचे असावे. गती दिसते! काळ जाणावा लगतो! गतीच्या आधाराने समजून घ्यावा लागतो.
सगळ्या कालगणना म्हणजे निरनिराळ्या गतींच्या तुलना आहेत.
सूर्य स्थिर! आणि पृथ्वी त्याच्यासमोर स्वत:भोवती फिरते; या तुलनेतून दिन व रात्र ही काळ मोजण्याची साधने मिळतात. दिन व रात्र, दोन्ही मिळून बनते ते अहोरात्र! अहोरात्र सरासरी २४ तासांचे असते. पृथ्वीच्या गतीची तुलना सूर्याऐवजी आकाशातल्या एखाद्या ताऱ्याशी केली; तर त्या संदर्भात पृथ्वीला स्वत:भोवती एक फेरी पूर्ण करण्यास २३ तास ५६ मिनिटे ४.०९९ सेकंद लागतात. या काळाला नाक्षत्रदिवस (Sidereal day) म्हणतात.
पृथ्वी सूर्याभोवती एक प्रदक्षिणा करते ते वर्ष! यापुढची पायरी म्हणजे मनुष्य, पृथ्वीची दैनंदिन गती व वार्षिक गती यांचा मेळ घालू लागला. त्यातून वर्षांत अहोरात्रे किती होतात ते पाहिले गेले. संपातावर आधारित वर्षांची (Tropical year) अहोरात्रे ३६५.२४२२ होतात. इंग्रजी जानेवारी ते डिसेंबर महिन्यांचे वर्ष व शासकीय राष्ट्रीय वर्ष या प्रकारची आहेत. नक्षत्रांवर आधारित नक्षत्रवर्ष (Sidereal year) ३६५.२५६३ अहोरात्रांचे आहे. आणखी एक मेख आहे! वर्षांत अहोरात्रे ३६५ होत असली तरी पृथ्वीची परिवलने (स्वत:भोवती फेऱ्या) मात्र ३६६ होतात. तिचे एक ज्यादा परिवलन आपल्या लक्षात येत नाही. कारण परिवलन करीत असताना पुढे सरकत पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमणही करीत असते.
वर्ष चंद्राच्या कलांच्या (आकाराच्या) आधारानेही मोजले जाते. या पद्धतीत चंद्र, सूर्य व पृथ्वी या तिघांच्या गतीचा विचार होतो. ही खास हिंदू भारतीय पद्धत! ही जगात इतरत्र कुठेही नाही. चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. सूर्य पृथ्वीभोवती नक्षत्रांमधून फिरतो असे मानले जाते. सूर्याला सर्व नक्षत्रांतून फिरण्यास वर्ष लागते. म्हणजे ३६५ अहोरात्रे. त्यापेक्षा कमी म्हणजे सुमारे ३५४ अहोरात्रांत चंद्राचे अमावास्या ते अमावास्या असे १२ मास होतात. याचा अर्थ चांद्रवर्ष हे नक्षत्रवर्षांपेक्षा सुमारे ११ अहोरात्रांनी लहान आहे. ते भरून काढण्यास मग अधिक महिना आणला जातो. तो केव्हा आणायचा त्याचे काही नियम आहेत. पद्धत कोणतीही असो! शेवटी कालगणना ही गतींच्या तुलनेतून जन्माला येते. सूर्याची गती, पृथ्वीची गती, चंद्राची गती, दैनंदिन गती, वार्षिक गती, नक्षत्रांतली गती, आकाशांतली अंशात्मक गती, अहोरात्रांचे तासतासची मिनिटे-मिनिटाचे सेकंद- त्यावर घडय़ाळाची गती असे हे आताआतापर्यंत होते.
अणू आधारित गती
पण आता सेकंदाची व्याख्या बदलली आहे. विख्यात विज्ञान व खगोल लेखक श्री. मोहन आपटे त्यांच्या ‘कालगणना’ या पुस्तकात पृष्ठ २०८ वर लिहितात- ‘सीझीयम १३३ या मूलद्रव्याच्या अणुकेंद्रात बाह्य़ ऊर्जेने बदल घडवला की शेवटच्या कक्षेतला विजाणू (Electron) कक्षा बदलतो आणि ९,१९२,६३१,७७० कंपनसंख्या असलेली लहर उत्सर्जित करून आपल्या मूळ अवस्थेत परत फिरतो. त्याची तेवढी स्पंदने म्हणजे आता एक सेकंद! (पृ. २०७) १९५५ साली पहिले आण्विक घडय़ाळ बनले.
इथे सेकंद व खलोगविज्ञान यांचा संबंध संपला, पण काळाचा आणि गतीचा संपला नाही; असे म्हणता येईल. कारण विजाणू कक्षा बदलून पुन्हा मूळ अवस्थेत येतो तेवढय़ा काळात स्पंदने घडतात. म्हणजे त्याच्या गतीमधला दिशेचा बदल हेच काळाचे कारण आहे.
हे शास्त्र आता इतके प्रगत आहे की, ‘‘३२ अब्ज वर्षांत फार तर एका सेकंदाची चूक होईल अशी घडय़ाळे व्यवहारात येतील’ असे आपटे म्हणतात! (पृ. २०९) धन्य, धन्य ते शास्त्रज्ञ!
आणखी एक लक्षात घ्यायला हवे. अणुअधिष्ठित विज्ञानाने फक्त सेकंदाची व्याख्या ठरवलेली आहे, वर्षांची नाही! व्यवहारात वर्षांच्या बाबतीत आपण अजूनही संपातवर्ष किंवा नक्षत्रवर्ष हा खगोलीय आधारच पकडतो आहोत. एखाद्या वर्षांत आण्विक सेकंदांची संख्या जास्त भरेल, तर एखाद्या वर्षांत कमी! १९०० साल संदर्भ मानले तर त्या वर्षांचा ३१५५६९२५.९७४७ वा भाग म्हणजे एक सेकंद (पृ. २०८)
अवकाश आणि काळ
समजा पृथ्वी, सूर्य, चंद्र नसते तरी आकाशात अनंत तारे (म्हणजेच दुसरे सूर्य) आहेतच. आकाशगंगा, तारकाविश्वे, अभ्रिका, तेजोमेघ, स्पंदक (ढ४’२ं१), क्वेसार असे कितीतरी प्रकार अधांतरी तरंगत आहेत. एकमेकांच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्यांना अनेक हालचाली आहेत, गती आहेत. त्यावरून माणसाने काळाचा वेध घेतला असताच. (अशा जगात मनुष्य असेल असे मानू)!
गती नसती तर काळ नसता! या विश्वाच्या अनंत पसाऱ्यात गतीच नाही अशी स्थिती होती का? ब्रह्मांडाची उत्पत्ती किंवा निर्माण महास्फोटांतून झाले असे मानले तर होती! या स्फोटाचा आवाज झाला नसावा! कारण आवाज होण्यासाठी आवश्यक ती हवाच अस्तित्वात नव्हती. तेव्हा स्फोट म्हणजे नुसतीच गती निर्माण झाली असे म्हणायला हवे. काहीतरी अमूर्त होते ते चैतन्यमय झाले. त्यात हालचाल निर्माण झाली. तारकाविश्वे अस्तित्वात आली. मग काळ हा अनादि नसून ब्रह्मांडाच्या उत्पत्तीपाशी त्याचा आरंभ आहे, असे मानावे लागेल. (पृ. १४२ वर आपटेही असे म्हणतात)! मग असेही म्हणता येईल की गती संपली की
काळ संपेल!
महास्फोटाआधी काय होते? ज्ञानेश्वरीत ज्ञानेशांचा एक सुंदर शब्द आलाय ‘पैस’! इंग्रजीत Space! अर्थही तोच, उच्चारही तसाच! Space Time Continuaus हा सिद्धान्त आधुनिक विज्ञानाने मांडलेला आहे. ‘स्थलकाल एकात्मता’ असे त्याचे मराठी भाषांतर पुण्याचे ज्येष्ठ व श्रेष्ठ अभ्यासक डॉ. प. वि. वर्तक यांनी केलेले आहे. (पुस्तक वेदविज्ञान) पैस (अवकाश, Space) व काळ यांचे जवळचे नाते आहेच. काळाच्या आधी ‘पैस’ असेल तर त्या स्थितीचे वर्णन नासदीय सूक्तांत आहे. (ऋग्वेद १०वे मण्डल, १२९वे सूक्त. संदर्भ वर्तक पृ. ५९) या संपूर्ण संस्कृत सूक्ताचे फार सुंदर मराठी भाषांतर डॉ. वर्तकांनी केलेले आहे. त्यातला फक्त पहिला श्लोक उद्धृत करून हा लेख संपवतो.
‘नव्हते असत, नव्हते सत्, तेव्हा कधी काळी
नव्हते रज, आकाशही, वा नव्हते अन्य काही
कशाने झाकले? कुठे? कुणाच्या सुखासाठी?
ते ‘अंभ’ काय आहे, गहन आणि गंभीर?’
रवींद्र खडपेकर
raviplusindra@hotmail.com