Leading International Marathi News Daily
शनिवार, २ मे २००९
(सविस्तर वृत्त)

मूलपेशी संशोधनात एक पाऊल पुढे
मूलपेशींचा वापर करून काही दुर्धर आजारांवर मात करता येते हे आता सर्वश्रुत आहे, अलिकडेच वैज्ञानिकांनी तीन रूग्णांमध्ये, त्यांच्याच मेदापासून तयार केलेल्या मूलपेशी टोचून मल्टीपल स्क्लेरॉसिस या रोगाची लक्षणे नष्ट केली. आंतरराष्ट्रीय पथकाने या प्रयोगात रूग्णांना मूलपेशी टोचल्या असता मल्टीपल स्क्लेरॉसिसमुळे विपरीत परिणाम झालेल्या उतींची पुन्हा नव्याने वाढ झाली व त्यामुळे या रूग्णांच्या लक्षणांमध्ये सुधारणा दिसून आली. मेंदूविषयक रोगांवर उपचारांसाठी त्यामुळे एक नवे दालन खुले होत आहे. मूलपेशी उपचारानंतर हे रूग्ण व्यवस्थित चालू लागले आहेत, हे या संशोधनाचे महत्त्वाचे

 

फलित आहे.
कॅलिफोर्निया विद्यापीठातील डॉ.बोरिस मिनेव यांनी हे संशोधन करणाऱ्या पथकाचे नेतृत्व केले. मेदापासून मिळविलेल्या या मूलपेशींचा वापर दुर्धर आजारावर उपचारांसाठी प्रथमच करण्यात आला आहे. यात अजून सखोल संशोधनाची गरज आहे. मानवी चेतासंस्थेवरील हल्ला परतवून लावण्यासाठी किंवा विपरीत परिणाम झालेल्या उतींची नव्याने वाढ करण्याची क्षमता कुठल्याही उपचारपद्धतीत नाही, ती मूलपेशी उपचारांमध्ये आहे. ‘जर्नल ऑफ ट्रान्सलेशनल मेडिसिन’ या नियतकालिकात या संशोधनाची माहिती प्रसिद्धीस दिली आहे. या प्रयोगात मल्टीपल स्क्लेरॉसिस झालेल्या एका पन्नास वर्षे वयाच्या रूग्णाला मूलपेशी टोचण्यात आल्या. त्याअगोदर त्याला किमान ६०० वेदनादायी सीझर्स झालेले होते, स्वत:च्याच पेशीतील विकृतीमुळे हे सीझर्स तयार झाले होते. आता मूलपेशी उपचारांमुळे या रूग्णाला व्यवस्थित चालता येते, धावता येते, सायकलही चालविता येते. मल्टीपल स्क्लेरॉसिस हा रोग मानवी मेंदूतील चेतासंस्थेच्या भोवती असलेले मायलिनचे मेदयुक्त आवरण नष्ट झाल्याने होतो. या रूग्णांना लगेच थकवा येतो, चालता येत नाही, बोलता येत नाही. आजपर्यंत या रोगावर कुठलाही उपचार सापडलेला नाही. मल्टीपल स्क्लेरॉसिस सोसायटीच्या प्रवक्तयाच्या मते नियंत्रित वैद्यकीय चाचण्यांमध्ये ही पद्धत कितपत यशस्वी ठरते याकडे आमचे लक्ष आहे. मूलपेशींबाबतच्या दुसऱ्या एका महत्त्वाच्या संशोधनात अमेरिकेतील स्क्रीप्स रीसर्च सेंटरच्या पथकाने प्रौढ पेशींपासून मूलपेशी तयार केल्या आहेत पण केवळ एवढेच त्याचे वेगळेपण नाही तर या पेशी कमी धोकादायक पद्धतीने तयार केल्या आहेत. आतापर्यंत प्रौढ पेशींपासून मूलपेशी तयार करताना एका स्वीचचा वापर केला जात होता. हे स्वीच विषाणूपासून बनवतात, त्यामुळे अशा पद्धतीने बनवलेल्या मूलपेशी मानवी शरीरात वापरल्यास कर्करोगाचा धोका संभवतो. आताच्या
या नव्या पद्धतीत कुठलीही जनुकीय जोडतोड न करता मूलपेशी मिळविल्या आहेत, असा या वैज्ञानिकांचा दावा आहे. ‘सेल स्टेम सेल’ या नियतकालिकात या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. आताच्या संशोधनामुळे एखाद्या रूग्णाला त्याच्याच प्रौढ पेशींपासून तयार केलेल्या मूलपेशी देऊन त्याच्यातील रोगाची लक्षणे कमी करता येतील. जोडउती निर्माण करणाऱ्या फायब्रोब्लास्ट पेशींपासून गर्भपेशींसारख्या मूलपेशी कुठलाही जनुकीय पदार्थ न वापरता तयार करण्यात यश मिळाले आहे. अशा प्रकारे गेल्या अनेक दिवसांचे स्वप्न साकार झाले आहे, असे हे संशोधन करणाऱ्या पथकाचे प्रमुख शेंग िडग यांनी सांगितले. यात वैज्ञानिकांनी विविध सजीवांपासून मिळविलेल्या डीएनएची जोडतोड करून रिकॉम्बिनंट प्रोटिन तयार केले त्याचा वापर करून अशा प्रकारच्या मूलपेशी बनवल्या. फायब्रोब्लास्टपासून बनविलेल्या गर्भाच्या मूलपेशींसारख्या मूलपेशींचे रैणविक व इतर गुणधर्म सारखेच होते. हृदयाचे स्नायू, न्यूरॉन, स्वादुपिंडाच्या पेशी त्यापासून बनवणे शक्य होणार आहे, असे या वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.
राजेंद्र येवलेकर