Leading International Marathi News Daily
शनिवार, २ मे २००९
(सविस्तर वृत्त)

प्राचीन स्थापत्यकलेचा दस्तावेज
एखाद्या मराठी गॅझेटिअरची पाच वर्षांत दुसरी आवृत्ती निघावी ही एक आश्चर्यकारक गोष्ट आहे, पण ते सत्य आहे. २००२ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘स्थापत्य व कला’ या गॅझेटिअरची आता दुसरी आवृत्ती येत आहे.
लेणी आणि मंदिरे ही प्राचीन महाराष्ट्राची सांस्कृतिक वैशिष्टय़े आहेत. जनसामान्यांना ती आपलीशी वाटतात, पण अगम्य भासतात. त्यांच्या भोवती अनेक कथागीतांची कोंदणं असतात. आपल्याला त्याचा अभिमान असतो, पण त्याची सार्थता सिद्ध करता येत नाही. या साऱ्या विषयी माहिती उपलब्ध नसते. इतिहासतज्ज्ञ त्यांचे काम करीत असतात. जनसामान्यांना या कामाची काहीच कल्पना नसते. या दोन्हींचा मेळ घालण्याचा एक यशस्वी प्रयत्न या पुस्तकाने केला आहे.
मराठीमध्ये मुळातच ‘सापत्य व कला’ या विषयावर संदर्भग्रंथ म्हणावे तसे नाहीत आणि

 

सर्वसमावेशक तर नाहीतच. म्हणूनच या संदर्भातील हा एकमेवाद्वितीय ग्रंथ आहे, असे म्हणावे लागेल. या ग्रंथात एकूण चार प्रकरणे आहेत. ती अनुक्रमे लेणी, बांधीव मंदिरे, शिल्प आणि चित्रकला आणि लौकिक स्थापत्य अशी आहेत. यात प्रामुख्याने त्यांचा उगम, विकास, वर्गीकरण, पाश्र्वभूमी, आधारग्रंथ, शिलालेख अशा एक ना दोन अनेक विषयांवर लिखाण केले आहे. ही माहिती तांत्रिक वाटत नाही. वाचताना सुटसुटीत आणि समजण्यास सोपी आहे. निश्चितच हे ललित लेखन नाही. कारण या ग्रंथाचे ते प्रयोजनच नाही. मात्र ज्या हेतूने हा ग्रंथ लिहिला गेला आहे तो हेतू पूर्णपणे सफल झालेला दिसतो. नुसतेच सामान्यजन नव्हे तर इतिहास विषयाचे शिक्षक, विद्यार्थी, कलासमीक्षक या साऱ्यांनाच हा ग्रंथ मार्गदर्शक आहे. या लेखनाला पूरक अशी ५० आरेखने आणि ७० हून अधिक छायाचित्रे देण्यात आलेली आहेत.
लयन स्थापत्याच्या प्रकरणाची सुरुवात या स्थापत्य प्रकाराच्या उगमापासूनच होते. आतापर्यंत विद्वानांनी मांडलेले तर्क, त्यावरील खंडने यांची चर्चा प्रथम येते. याच बरोबर महाराष्ट्रात नागरीकरण कसे झाले, बौद्ध धर्माचा प्रसार कसा झाला. युद्धपूर्व आणि त्याच्या समकालीन वाङ्मयात महाराष्ट्राचे उल्लेख
कसे येतात याच्या आधारे लयन स्थापत्याच्या उगमाची पाश्र्वभूमी मांडलेली दिसते. चत्य आणि विहार या लयन स्थापत्याबरोबरच या ग्रंथात प्रथमच सभागृह, भोजनगृह, स्मशाने, न्हाणपोढी (आंघोळीच्या पाण्याची टाकी), पाणपोढी (पिण्याच्या पाण्याची टाकी), पूजेचे कोनाडे, विश्रांतीची बाके अशा अनेक बौद्ध लयन स्थापत्य प्रकाराची चर्चा केली गेली आहे. प्रथम बौद्ध चैत्य (प्रार्थनास्थळ) लेण्यांचा कालक्रम आणि प्रकार देऊन त्याविषयी विस्तृत चर्चा केली आहे. यासाठी गेल्या १२५ वर्षांत या विषयावर लिहिल्या गेलेल्या अनेक ग्रंथांचा आधार घेतला आहे. यानंतर विहार (बौद्ध भिक्षूंच्या राहण्याच्या खोल्या) स्थापत्याचे वर्गीकरण आणि विकास दिला आहे. १९८१ मध्ये प्रथमच डॉ. नागराजू या विद्वानाने हिनयान विहार स्थापत्याच्या अध्ययनाची आणि वर्गीकरणाची एक नवी पद्धत मांडली. ‘स्थापत्य व कला’ या मराठी ग्रंथात अशा प्रकारचे वर्गीकरण प्रथमच येत आहे. विहारांचा कालक्रम महायान आणि हिनयान बौद्ध विहार स्थापत्यातील मूलभूत फरक, त्याची कारणे आणि जगाच्या कानाकोपऱ्यात या विषयावर इंग्रजीतून झालेले लिखाण या प्रकरणात सारांशरूपाने आले आहे.
डॉ. म. न. देशपांडे यांनी साधारण २५ वर्षांपूर्वी विदर्भ संशोधक मंडळामध्ये ‘वज्रयान बौद्धधर्म आणि महाराष्ट्र’ या संदर्भात काही व्याख्याने दिली होती. या नंतर मराठीत अशा प्रकारचा एक लेखही लिहिला गेला नाही. या ग्रंथात पन्हाळे काझी, कान्हेरी, महाकाली (कोंदिवटे) आणि माहीमचा काम्य स्तूप या आधारे महाराष्ट्रातील व्रजयान स्थापत्याची चर्चा केली आहे. याच्याच बरोबर बौद्ध धर्म आणि बौद्ध लयन स्थापत्याचा लय यावरही प्रकाश टाकलेला दिसतो.
या पुढचा भाग हा ब्राह्मणी लयन स्थापत्याचा आहे. १८८० मध्ये बर्जेस या विद्वानाने प्रथम या ब्राह्मणी लेण्यांचे वर्गीकरण करून कालक्रम ठरवला. या नंतर साधारण ५० वर्षांपूर्वी डॉ. सुंदरराजन यांनी त्यात मोलाची भर टाकली. मात्र हे सर्व काम इंग्रजी भाषेतले असून सामान्य वाचकांपासून वंचित राहिलेले आहे. डॉ. अ. प्र. जामखेडकरांनी प्रथमच हे सर्व साहित्य सारांश रूपाने का होईना पण मराठीत आणले. बर्जेस आणि सुंदरराजन यांच्या कार्याचा थोडक्यात परिचय करून दिला आणि नव्याने उजेडात आलेल्या पुराव्याआधारे त्यात काही सुधारणाही केल्या. येथे ब्राह्मणी लेण्यांचा कालक्रम, राजाश्रय आणि वर्णन आपल्याला वाचायला मिळते. यात शैव, वैष्णव आणि शाक्त अशा सर्व लेण्यांचा समावेश केलेला आहे. या प्रकरणाच्या शेवटच्या भागात महाराष्ट्रातील जैन लेणी, त्यांचे महत्त्व आणि वर्णन आले आहे. याच बरोबरीने या स्थापत्य शैलीचे नंतर काय झाले आणि त्याची कारणमीमांसाही या प्रकरणात केलेली दिसून येते.
या ग्रंथातील दुसरे प्रकरण हे बांधीव मंदिरांवर लिहिलेले आहे. आजपर्यंत विद्वानांनी मंदिरांचे विविध प्रकारे वर्गीकरण केलेले आहे. ते क्लिष्ट आणि बरेचदा कलेच्या विद्यार्थ्यांनाही अनाकलनीय वाटते. या विषयाची वेगळ्या प्रकारची मांडणी हे या ग्रंथाचे आणखी एक वैशिष्टय़ आहे. भारतीय स्थापत्याला आधारभूत ठरलेली अशी स्थापत्यविषयक ग्रंथ परंपरा फार प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. प्रथमच मराठीत अशा प्रकारच्या परंपरेवर आधारित केलेले साधे, सोपे आणि मुख्यत: सामान्य लोकांना आकलनीय असे वर्गीकरण आणि कालक्रम या ग्रंथात दिला आहे. येथे विविध राजघराण्यांच्या आश्रयाखाली बांधली गेलेली विटांची मंदिरे, प्रस्तर मंदिरे तसेच विटांचे शिखर असलेली प्रस्तर मंदिरांविषयी चर्चा केली आहे. अर्थातच या साऱ्याची सुरुवात मंदिर स्थापत्याचा उगम, विकास, त्याबद्दल वापरात असलेली विविध नावे, त्यांची कारणमीमांसा अशा विषयातून होते. या प्रकरणात प्राचीन महाराष्ट्रातील विविध मंदिरांची तोंडओळख, त्यांचे वर्णन, त्यांचे स्थापत्य प्रकार, स्थापत्याचे विविध भाग आणि त्यांच्यात होणारा कालपरत्वे बदल या साऱ्या विषयांना स्पर्श केला आहे. या प्रकरणाच्या शेवटच्या काही पानांत शिखर पूर्णत: पडून गेलेल्या मंदिरांविषयी चर्चा केली आहे.
तिसऱ्या प्रकरणामध्ये महाराष्ट्रातील शिल्पकला व चित्रकला यांचा आढावा घेतला आहे. पहिल्या भागात इतिहासपूर्व काळापासून सुरुवात करून पुरातत्त्वीय उत्खननात सापडलेल्या काही मृण्मूर्ती आणि धातूमूर्ती यांची चर्चा केली आहे. यात इ.स. पूर्व आठव्या शतकापासून ते इ.स. पूर्व दुसऱ्या शतकापर्यंतच्या काळातील पुरातत्त्वीय पुराव्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. यानंतर भाजे, कोंडाणे, पितळखोरे यांसारख्या बौद्ध लेण्यांतील शिल्पवैभवाची चर्चा केली आहे.
यात मूर्तीचे थोडक्यात वर्णन, काळानुरूप आलेली वैशिष्टय़े आणि
त्यांचे विषय यांचा आढावा घेतला आहे. यानंतर पवनी, तेर,
भोकरदन येथील पुरातत्त्वीय उत्खननातून सापडलेल्या मूर्तीचा विषय कौशल्याने हाताळला आहे. पुढे वाकाटककालीन शिल्प, इ.स.च्या सहाव्या शतकातील अपरांतातील शिल्प वैभव, राष्ट्रकूट शिल्पकला, उत्तर चालुक्य आणि शिलाहार शिल्पशैली अशा विविध अंगांना
स्पर्श करून हे प्रकरण पुढे जाते. त्यात या शिल्पांचे नुसतेच वर्णन नसून त्यातील स्थलकालपरत्वे येणारी वैशिष्टय़ेही नमूद केली आहेत. यापुढे ११ ते १४ व्या शतकातील शिल्पसंपदा चर्चिली आहे. यात मुख्यत्वे कोल्हापूर परिसरातील खिद्रापूर, महालक्ष्मी
अशा मंदिर- शिल्पांचा समावेश होतो. या प्रकरणात ब्राह्मणी, बौद्ध आणि जैन या सर्व मूर्तींचा लोकदेवतांच्या मूर्तींबरोबरच समावेश होतो.
या प्रकरणाच्या दुसऱ्या भागात महाराष्ट्रातील रंग- चित्रकला या विषयावर लेखन आहे. यात विविध चित्रशैली, त्यांचे आधारग्रंथ, साहित्य प्रकार आणि उगम व विकास यांविषयी चर्चा केलेली दिसते.
या तीनही प्रकरणांचे लेखन डॉ. अ. प्र. जामखेडकर यांनी केलेले आहे. ते २० वर्षे महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय विभागाचे संचालक होते. ते कलास्थापत्य, पुरातत्त्व, इतिहास, संस्कृत-प्राकृत भाषा, तत्त्वज्ञान अशा अनेक विषयांतील जगप्रसिद्ध तज्ज्ञ आहेत. त्यांच्या सिद्धहस्त लेखणीने त्यांचा चतुरस्र मेधावी विशेष सिद्ध केला आहे. लेणी, मंदिर आणि शिल्प- चित्रकला या सर्व विषयांचा सर्वांगीण विचार लेखकाने केलेला दिसतो. हे धाडस शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे. जे लेखकाने लीलया केलेले आहे. या ग्रंथाचे लिखाण हीच त्यांची ओळख व्हावी असा हा ग्रंथ आहे.
या ग्रंथाचे शेवटचे प्रकरण डॉ. अरुणचंद्र शं. पाठक यांनी लिहिले आहे. ते महाराष्ट्र शासनाच्या दार्शनिका विभागाचे कार्यकारी संपादक व सचिव आहेत. यांनी प्राचीन स्थापत्याचा एक दुर्लक्षित पैलू उजेडात आणला आहे. तो म्हणजे ‘लौकिक स्थापत्य’ या प्रकरणात नगररचना, जलाशय, मानस्तंभ, स्मारकाशिळा, मठ, बारव स्थापत्य आणि बारव जलमांडवी या सर्व प्रकारच्या स्थापत्याविषयी चर्चा केली आहे. डॉ. अ. प्र. जामखेडकर यांच्याप्रमाणे डॉ. अ. शं. पाठकांचाही भर पुरातत्त्वीय आणि वाङ्मयीन साधने वापरून प्राचीन महाराष्ट्राचे स्थापत्य व कला यांचा आढावा घेण्यावर दिसतो. लौकिक स्थापत्याची कारणमीमांसा, प्रकार आणि उपयुक्ततावादी दृष्टिकोन यांचाही विचार केलेला दिसतो.
या दोन्ही लेखकांचे एक वैशिष्टय़ आपल्याला या ग्रंथात पाहायला मिळते. या दोन्ही लेखकांनी या ग्रंथात ज्या ज्या स्थळांविषयी, मंदिर- लेण्यांविषयी लिहिले आहे ती स्वत: पाहिली आहेत. यात फक्त संकलन केलेले नसून आतापर्यंतच्या संशोधनात सुसूत्रता आणून नवीन विचार मांडण्याचा यशस्वी प्रयत्न दिसतो. या बरोबरच मूळ प्राचीन ग्रंथांचे अध्ययन आणि त्यातून येणारी विषयाची सर्वांगीण जाण दिसते. हा ग्रंथराज खऱ्या अर्थाने आजपर्यंत मराठीतून महाराष्ट्रातील ‘स्थापत्य व कला’ या विषयावर लिहिलेल्या सर्व ग्रंथांत उत्कृष्ट आहे. हा सामान्यांसाठीच नव्हे तर अभ्यासकांनीही वाचावा व संग्रही ठेवावा असा आहे. अवघ्या २७० पृष्ठांत मांडलेली ही प्राचीन महाराष्ट्राच्या भौतीक संस्कृतीची गाथा आहे.
ग्रंथाचे नाव : महाराष्ट्र : इतिहास-प्राचीन काळ
(खंड १ भाग २) स्थापत्य व कला
लेखक : डॉ. अ. प्र. जामखेडकर
संपादक : डॉ. अ. शं. पाठक
प्रकाशक : दार्शनिका विभाग, मुंबई
डॉ. सूरज पंडित