Leading International Marathi News Daily
शनिवार, २ मे २००९

एक आंबा ४० रुपयांना हापूस आंब्याचे दर चढेच
जयेश सामंत

आपल्या अवीट गोडीमुळे लहानग्यांपासून मोठय़ांपर्यंत सर्वानाच भुरळ पाडणारा कोकणातील हापूस आंबा यावेळी आपल्या चढय़ा दरांमुळे सर्वसामान्यांना वाकुल्या दाखविण्याच्या बेतात असून गेल्या आठवडय़ाभरापासून मुंबईतील बाजारांमध्ये दमदार पुनरागमन करुनही या फळांच्या राजाचे दर खाली उतरण्यास तयार नसल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. एप्रिलच्या १५ तारखेपासून साधारपणे हापूस आंब्याची मुंबईतील आवक जोर धरु लागते. यावर्षी मात्र यासाठी मे महिना उजाडल्याने आजही चांगल्या दर्जाच्या हापूस आंब्याची एक पेटी एक हजार ते १२०० रुपयांच्या घरात विकली जात आहे.

आधीच प्रायोजकांचा अभाव, त्यात मंदी!
स्नूकर आणि बिलियर्डपटू महिलांच्या पदरी निराशा

प्रसाद रावकर

प्रख्यात बिलियर्डपटू अनुजा ठाकूरने स्नूकर आणि बिलियर्डच्या जगज्जेतेपदावर आपले नाव कोरल्यानंतर भारतातील अनेक मुली या क्रीडाप्रकाराकडे आकर्षित झाल्या. अनेकींनी जगज्जेतेपदाचे स्वप्न उरी बाळगून स्नूकरची स्टीक हाती घेतली. मात्र गेल्या चार-पाच वर्षांपासून स्थानिक पातळीवर महिलांसाठी स्नूकर्स आणि बिलियर्डच्या स्पर्धाच आयोजित करण्यात येत नसल्यामुळे या मुलींच्या पदरी निराशा आली आहे.

मुंबईतील विद्यार्थिनींचा ‘कॉक्रोच कीलर’ अमेरिकेत
नीरज पंडित

मुंबईतील मॉडेल इंग्लिश स्कूलच्या रितिका संगमेश्वरन आणि दिव्या कोठारी या दोन विद्यार्थिनींनी तयार केलेले ‘कॉक्रोच कीलर’ अमेरिकेत १० ते १५ मे दरम्यान पार पडणाऱ्या ‘इंटेल आंतरराष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान’ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. झुरळ मारण्यासाठी वापरण्यात येणारी औषधे माणसाला हानिकारक असतात. यासाठी या दोघींनी नैसर्गिक स्रोतांच्या आधारे एक ‘कॉक्रोच कीलर’ तयार केले आहे.

शाळा निसर्गाची
बिगल सर्वेक्षण जहाजावरून डार्विन दक्षिण अमेरिकेत पोहोचला. तब्बल ६३ दिवसांच्या सागरी प्रवासानंतर.. सभोवतालचे दृश्य बघून त्याचे ऊर आनंदाने भरून आले.. हिरव्यागार वनश्रीने नटलेल्या घनदाट जंगलात एका खोल घळीत चार्लस् उभा होता.. जीवनात चार्लस्ने निसर्गावर भरभरून प्रेम केले.. पशु-पक्षी, वनस्पती व कीटकांवर.. सभोवती झेपावणारे पशू-पक्षी, सळसळणाऱ्या वृक्ष-वनस्पती, चकाकणारे असंख्य कीटक.. अन् आसमंतात मन प्रफुल्लित करणारा सुगंध.. निसर्गाचा थरार चार्लस् प्रत्यक्ष अनुभवत होता.. अंगी उत्साह संचारणारा.. आज जणू तो होता स्वर्गातच.. हा होता डार्विनच्या जीवनातील एक अविस्मरणीय अनुभव.. अशा एकाहून एक सरस ठिकाणांना डार्विन भेटी देणार होता..

टिळकनगर सार्वजनिक मंडळातर्फे सांस्कृतिक वसंतोत्सव
प्रतिनिधी

हिरक महोत्सवी वर्षांनिमित्त टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे सलग दहाव्या वर्षी टिळकनगर शाळेच्या पटांगणात ५ मे पर्यंत ‘वसंतोत्सव २००९’चे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या या शृंखलेत दुसऱ्या पुष्पात शनिवार २ मे रोजी सायंकाळी ७ वाजता सार्थक संस्था डोंबिवलीनिर्मित ‘गीतसंध्या’ हा मराठी गाण्यांचा कार्यक्रम सादर होणार आहे. रविवार ३ मे रोजी सायंकाळी ७ वाजता ‘ख..खलनायिकेचा’ या कार्यक्रमात नीलम शिर्के, सई रानडे व सुप्रिया पाठारे यांच्या मंगला खाडिलकर संवाद साधणार आहेत. सोमवार ४ मे रोजी रात्री ८.३० वाजता ज्येष्ठ प्रसिद्धी माध्यम तज्ज्ञ विश्वास मेहंदळे यांचा ‘पंडितजी ते अटलजी व आता मनमोहनजी’ या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या कारकीर्दीचा आढावा घेण्यात येणार आहे. मंगळवार ५ मे रोजी रात्री ८.३० वाजता प्रसिद्ध कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचे ‘चापेकर बंधू’ या विषयावर कीर्तन होणार आहे.
वसंतोत्सव २००९ मधील सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य आहेत. मर्यादित प्रवेशिकांसाठी मंडळाचे कार्यालय-१, विराट सोसायटी, टिळकनगर शाळेच्या पुढे, टिळकनगर, डोंबिवली (पूर्व) येथे सायंकाळी ७ ते ९ या वेळेत संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी संपर्क- केदार पाध्ये (९२२१५२९००५).

विक्रम सावरकर यांचा ९ मे रोजी जीवनगौरव
प्रतिनिधी

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे शनिवार ९ मे रोजी स्मारकाच्या शिवाजी उद्यान, दादर येथील वास्तूत विक्रमराव सावरकर यांचा जीवनगौरव केला जाणार आहे. ज्येष्ठ राजकीय नेते नितीन गडकरी यावेळी उपस्थित राहणार आहेत. सातत्याने हिंदुत्ववादी भूमिका घेऊन त्यासंदर्भात मागण्यांचा पाठपुरावा करणाऱ्यांमध्ये विक्रमराव सावरकर कायम अग्रस्थानी राहिले. देशात समान नागरी कायदा व्हावा यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी १९८५ मध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली. १९९३ मध्ये ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात तळवली येथे महाराष्ट्र मिलिटरी स्कूलची स्थापना केली. तिथे शेकडो विद्यार्थी निवासी सैनिकी प्रशिक्षण घेत आहेत. या कार्याची नोंद घेऊन त्यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. सर्व हिंदुत्ववादी आणि सावरकरप्रेमींनी या सोहळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

जागतिक अस्थमादिनानिमित्त दमा रुग्णांसाठी मोफत शिबिरे
प्रतिनिधी

अस्थमा आणि ब्राकाँयटिस असोसिएशन ऑफ इंडियातर्फे जागतिक अस्थमादिनानिमित्त रविवार ३ मे रोजी दम्याच्या रुग्णांसाठी गिरगाव ते बोरिवलीपर्यंत आणि डोंबिवलीमध्ये मोफत शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात रुग्णांची मोफत तपासणी करण्यात येणार असून त्यांना सल्लाही देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे दमा आटोक्यात ठेवणे शक्य आहे ही बाब रुग्णांच्या मनावर बिबवण्यात येणार आहे, असे असोसिएशनचे सरचिटणीस डॉ. प्रमोद निफाडकर यांनी सांगितले. यावेळच्या शिबिरात महत्त्वाचा फरक असा आहे की, प्रत्येक रुग्णाच्या फुफ्फुसाची श्वसन क्षमता तपासण्यात येणार असून श्वसन क्षमता कशी विकसित करावी याबाबत त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णांनी या शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. निफाडकर यांनी केले आहे. या शिबिरात डॉ. जयसिंग फडतरे, डॉ. प्रमोद निफाडकर, डॉ. गिरिश जयवंत, डॉ. प्रशांत छाजेड, डॉ. भाविन शाह, डॉ. राजेश शर्मा, डॉ. संध्या कुलकर्णी, डॉ. संजय पवार, डॉ. तेजल शाह रुग्णांना मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्रात ७५ लाख तर मुंबईत १२ लाख लोक दम्याने ग्रस्त आहेत. दम्यामुळे माणसाचे सर्वसामान्य आरोग्य खालावत जाते. अलिकडेच करण्यात आलेल्या संशोधनामुळे दमा नियंत्रीत ठेवण्याच्या नव्या उपचार पद्धती विकसित करण्यात आल्या आहेत. संपर्क-२२६२३२३२, २४१०५६५६.

ज्येष्ठ रंगकर्मी भालचंद्र रणदिवे यांचे निधन
नाटय़ प्रतिनिधी

ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक भालचंद्र रणदिवे यांचे काल ठाणे येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, पुत्र, कन्या व नातवंडे असा परिवार आहे. तब्बल सहा दशके रंगभूमीवर सक्रीय असणाऱ्या भालचंद्र रणदिवे यांनी आचार्य अत्र्यांची ‘कवडीचुंबक’, ‘भ्रमाचा भोपळा’, तसेच ‘राणीचा बाग’, ‘प्रेमा तुझा रंग कसा?’, ‘भावबंधन’ आदी अनेक नाटके दिग्दर्शित केली होती. तसेच अनेक नाटकांतून त्यांनी कामेही केली होती. दामू केंकरे, नंदकुमार रावते, राजा गोसावी, रमेश देव, सीमा, वसंत शिंदे आदी कलावंतांसोबत त्यांनी रंगभूमीवर काम केले. रंगकर्मीच्या दोन-तीन पिढय़ा त्यांच्या हाताखाली घडल्या. त्यात सुधीर दळवी, उज्ज्वला जोग, वैजयंती चिटणीस, अमिता खोपकर आदींचा समावेश होता.

पेडर रोडवरील वाहतूक १५ दिवस बंद !
प्रतिनिधी

महानगरपालिकेने मलनि:स्सारण वाहिन्या बदलण्याचे काम सुरू केल्यामुळे डॉ. गोपाळराव देशमुख मार्ग म्हणजे पेडर रोड उद्या, २ मेपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. साधारण १५ दिवसात म्हणजे १६ मेपर्यंत पेडर रोड पूर्ववत होईल, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. मध्यंतरी पालिकेने हे काम सुरू केले होते. मात्र वाहतुकीची प्रचंड कोंडी झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्याने मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या कामाला स्थगिती दिली होती. आता हे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे. शाळांना सुट्टी लागली आहे. त्यामुळे या कामामुळे वाहतूककोंडी होणार नाही, असा पालिकेचा दावा आहे. २४० मीटर लांबीची मलनि:स्सारण वाहिनी जुनी झाली असून पावसाळ्यापूर्वी ती बदलणे गरजेचे आहे. येत्या १६ मेपर्यंत हे काम चालणार आहे. या काळात पेडर रोडवरील वाहतूक अन्य मार्गावर वळविण्यात आलेली आहे. पेडर रोडवर सुरू होणारा आणि भुलाभाई देसाई मार्गाकडे जाणारा गमाडिया मार्ग एकदिशा करण्यात आला आहे. कॅडबरी जंक्शन येथून भुलाभाई देसाई मार्गाकडे जाणाऱ्या वाहनांना उजवे वळण घेता येणार नाही. मुंबईकरांना हे काम संपेपर्यंत केम्पस कॉर्नर, स्टिफन चर्च ते अमेरिकन अ‍ॅम्बेसी ते कॅडबरी जंक्शन या पर्यायी मार्गाचा वापर करणे सोयीचे आहे. या मार्गनेही वाहतूक मंद गतीने असणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पी. डिमेलो रोड, महर्षी कर्वे मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पालिकेने केले आहे. पालिकेने मध्यंतरी हे काम सुरू केले, तेव्हा एक तासातच वाहतुकीची कोंडी झाली होती. आता अशी कोंडी होणार नाही, असा दावा पालिकेचे अतिरिक्त आयुक्त आर. ए. राजीव यांनी केला आहे.

संस्कार व्याख्यानमाला
प्रतिनिधी

बोरीवली येथील ज्ञानयोग सहनिवासाचे पटांगण, वझिरा नाका येथे १ ते ७ मे दरम्यान दररोज संध्याकाळी ७.३० वाजता संस्कार व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेत शनिवार २ मे रोजी ‘ग्रामीण जीवन-वास्तव आणि साहित्य' याविषयावर डॉ. प्रतिमा इंगोले, रमेश इंगळे उत्रादकर आणि अरूण जाखडे विचार मांडणार आहेत. रविवार ३ मे रोजी ‘ग्रामीण भारतातील वैद्यक संशोधन आणि मी' या विषयावर डॉ. हिम्मतराव बावसकर बोलणार आहेत. सोमवार ४ मे रोजी चार्ल्स डार्विन द्विजन्मशताब्दीनिमित्त ‘वेध उत्क्रांतीचा' याविषयावर डॉ. सिद्धीविनायक बर्वे विचार व्यक्त करणार आहेत. मंगळवार ५ मे रोजी आंतरराष्ट्रीय खगोलवर्षांनिमित्त ‘खगोलशास्त्राचे सुवर्णयुग' याविषयावर प्रा. मोहन आपटे बोलणार आहेत. बुधवार ६ मे रोजी भाषाप्रभू पु.भा. भावे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘साहित्य पुरूषोत्तम' याविषयावर मिलिंद बेडेकर बोलणार आहेत. गुरूवार ७ मे रोजी लुई ब्रेल यांच्या द्विजन्मशताब्दीनिमित्त ‘दृष्टिहीनांच्या डोळस दुनियेत' हा विशेष कार्यक्रम सादर केला जाईल. त्यात गिनीज बुकने दखल घेतलेले अंधांचे समर्पित सेवक स्वागत थोरात आपले अनुभव मांडतील. व्याख्यानमाला सर्वासाठी खुली असून रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले
आहे.