Leading International Marathi News Daily
शनिवार, २ मे २००९

जय महाराष्ट्र!
नागपूर, १ मे / प्रतिनिधी

गेल्या पाच दशकात महाराष्ट्राने विविध क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली असून प्रगतिशील व पुरोमी राज्य म्हणून देशात नावलौकिक मिळवला, आहे असे गौरवोद्गार नागपूर जिल्ह्य़ाचे पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले. महाराष्ट्र दिनानिमित्त येथील कस्तूरचंद पार्क मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या मुख्य कार्यक्रमात ते बोलत होते. थोरात यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर पोलिस, रेल्वे पोलीस आणि होमगार्डसह इतरही पथकांचे यावेळी पथसंचलन झाले.

महाराष्ट्रात परप्रांतीयांचा लोंढा ४० लाखांहून अधिक
मनोज जोशी, नागपूर, १ मे

राज्यात परप्रांतीयांची संख्या वाढत असल्याची ओरड होत असताना त्या पाश्र्वभूमीवर, महाराष्ट्रात रोजगाराच्या व इतर कारणांसाठी इतर राज्यांतून आलेल्यांची संख्या ४० लाखांहून अधिक असल्याचे अधिकृत आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. गेल्या २० वर्षांत परप्रांतीयांचा लोंढा जास्त वाढला असून त्यात उत्तरप्रदेशातील स्थलांतरितांची संख्या सर्वात जास्त आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या २००१ च्या जनगणनेनुसार ९ कोटी ६९ लाख इतकी होती. यापैकी ३.३४ टक्के, म्हणजे ३२ लाख ३२ हजार लोक देशाच्या इतर राज्यातून आलेले होते. याशिवाय, ४८ हजार लोक १९९१ ते २००१ या काळात इतर देशांमधून आलेले होते.

‘रोलिंग बॅग’चा हमालांना फटका
अध्यक्षांच्या आजारपणाने कामगार दिनाचा उत्साह हरपला

नागपूर, १ मे/ प्रतिनिधी

‘रोलिंग बॅग’चा वापर वाढल्याने गेले पाच वर्षांत गाडय़ांची आणि प्रवाशांची संख्या दुपटीने वाढून देखील हमालांच्या उत्पन्नात मात्र कमालीची घट झाली आहे. जागतिक कामगार दिनाच्या पाश्र्वभूमीवर आज नागपूर रेल्वे स्थानकावरील हमालांची स्थिती ‘लोकसत्ता’ने जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता उन्हाळ्यातील सुटीच्या दिवसात दुपटीने उत्पन्न होण्याऐवजी घट झाल्याची माहिती हाती आली. नागपूर रेल्वे स्थानकावर ११८ हमाल आहेत. त्यात एका महिलेचा समावेश आहेत.

विदेशी प्रवाशांची आजपासून विमानतळावर वैद्यकीय तपासणी
‘स्वाईन फ्लू’चा प्रकोप

नागपूर, १ मे / प्रतिनिधी

‘स्वाईन फ्लू’ या नव्या विषाणूंचा फैलाव जगातील अनेक देशांमध्ये झपाटय़ाने होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर भारत सरकारने ‘स्वाईन फ्लू’ पीडित देशांमधून येणाऱ्या विदेशी प्रवाशांची विमानतळावर वैद्यकीय चाचणी उद्यापासून अनिवार्य केली आहे. त्यामुळे नागपूर विमानतळावरही केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेतील यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून शहरातून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू झाल्यामुळे परदेशी प्रवाश्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.

अनेक शाळा संगणकाविना
नागपूर, १ मे / प्रतिनिधी

सध्या शालेय शिक्षणापासून महाविद्यालयापर्यंत विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाचे धडे देण्याची सक्ती केली तरी आज शहरांसोबत ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये संगणक खरेदी करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना बाहेरच्या संगणक इन्स्टिटय़ूटमध्ये संगणक शिक्षण घेण्याची वेळ आली आहे. सर्वशिक्षा अभियानात शाळांचा व विद्यार्थ्यांचा विकास करण्याच्या उद्देशाने शिक्षण विभागाने योजना सुरू केल्या आहेत. त्यात विद्यार्थ्यांना संगणकाचे शिक्षण देण्यात यावे म्हणून सरकाने शाळांना त्यासाठी विशेष अनुदान दिले आहे पण, अजूनही अनेक शाळांनी संगणक खरेदी केलेले नाही.

कनिष्ठ पदापासूनच बिंदूनामावली घोटाळा
ज्योती तिरपुडे, नागपूर, १ मे

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील सदोष बिंदूनामावलीमुळे (रोस्टर) विद्यापीठात प्रचंड अनियमितता असून विद्यापीठातील कनिष्ठ पदापासून ते सर्वोच्च पदापर्यंत गैरव्यवहाराची कीड लागल्याचे उघडकीस आले आहे. शासनाच्या अध्यादेशानुसार सदोष बिंदूनामावली हा ‘क्रिमिनल ऑफेन्स’ समजला जातो.

राज्याचे मुख्य न्यायाधीश आज नागपुरात
नागपूर, १ मे / प्रतिनिधी

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. स्वतंत्रकुमार हे उद्या उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात ‘फुल बेंच’मध्ये कामकाज करणार असून इतरही दिवाणी याचिकांची सुनावणी करणार आहेत. न्या. स्वतंत्रकुमार, न्या. ए.पी. लवांदे व न्या. वासंती नाईक यांचे पूर्णपीठ राजेश्वर मोहुर्ले विरुद्ध राज्य सरकार या फौजदारी अपिलाची सुनावणी करणार आहेत. पोलीस पाटील हा पोलीस अधिकारी आहे काय, या मुद्यावर हे पीठ सुनावणी करणार आहे. ‘फुल बेंच’च्या कामकाजानंतर, न्या. स्वतंत्रकुमार व न्या. वासंती नाईक यांचे खंडपीठ दिवाणी याचिकांची सुनावणी करणार आहे. यामध्ये अंतिम सुनावणीसाठी ठेवण्यात आलेल्या काही प्रकरणांचा समावेश आहे.

कळमना रेल्वे स्थानकावर रेल्वे इंजिनला आग
नागपूर, १ मे/ प्रतिनिधी

खापरखेडा वीज प्रकल्पात कोळसा टाकून परत येणाऱ्या एका मालगाडीच्या जोड इंजिनला कळमना रेल्वे यार्डात सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास आग लागली. सुमारे एका तासाने ही आग विझवण्यात यश आले. छत्तीसगड येथून खापरखेडा वीज निर्मिती केंद्राला कोळसा पुरविला जातो. आज सकाळी एका मालगाडीने हा कोळसा खापरखेडय़ाला पोहोचविण्यात आला. या गाडीवर चालक एम.एस. भौमिक, सहाय्यक चालक शशीकुमार होते. कोळसा टाकून परत येत असताना कळमना रेल्वे यार्डाच्या परिसरात सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास इंजिनमध्ये अचानक आगीचा भडका उडाला. इंजिनमधील अग्निशामक यंत्राच्या साहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, आग मोठी असल्याने ती विझली नाही. शेवटी आगीचे बम्ब बोलावण्यात आले आणि तब्बल एका तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. तोपर्यंत इंजिनचे बरेच नुकसान झाले. ही आग शार्ट सर्किटमुळे लागली असावी, असा प्रथामिक अंदाज आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. खापरखेडय़ाहून दोन इंजिन (मल्टिइंजिन) कळमना यार्डात येत असताना ही आग लागली. यार्डात असल्याने आग आटोक्यात लवकर आली. या घटनेमुळे प्रवाशांना इजा झाली नाही. तसेच वाहतुकीलाही अडथळा झालेला नाही, अशी माहिती दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक प्रदीपकुमार यांनी दिली.

साईबाबा प्रगटदिनानिमित्त कलशयात्रा
नागपूर, १ मे/प्रतिनिधी

साईबाबा देवस्थान पारशिवनीच्या वतीने साईबाबा प्रगटदिन महोत्सव उत्साहात पार पडला. कलश स्थापनेने महोत्सवाला सुरुवात झाली. संध्याकाळी पालीवाल महिला मंडळाच्या वतीने हनुमान चालिसा व सुंदर कांडपाठ करण्यात आले. यानंतर वारकरी भजन मंडळ, रामाकोना यांनी हरिपाठ सादर केला आणि ह.भ.प. उमेश भिवंडे महाराज यांचे कीर्तन झाले. रात्री वारकरी भजन मंडळ केशस्वामी देवस्थान पारशिवनी, दादाजी धुनिवाले भजन मंडळ आमगाव, साईबाबा संगीत मंडळ भागीमहारी, माहुली भजन मंडळ, भागीमहारी ताजमेहंदी भजन मंडळ, तामसवाडी राष्ट्रीय भजन मंडळ पारशिवनी यांच्या भजनाचा कार्यक्रम पार पडला. महोत्सवाचा समारोप कलशयात्रा व साईबाबांच्या पालखी मिरवणुकीने करण्यात आला. या मिरवणुकीत मुक्ताबाई भजन भागीमहारी, गुरुदेव भजन मंडळ इटगाव, शारदा भजन मंडळ, वारकी भजन मंडळ, दिगलवाडी, वारकरी भजन मंडळ सोनेगाव आदी सहभागी झाले होते. कलशयात्रा व पालखी मिरवणुकीच्या मार्गावर तोरण, पताका लावण्यात आले होते तसेच, रांगोळीने ठिकठिकाणी मार्ग सजवण्यात आला होता. भाविकांतर्फे ठिकठिकाणी पाणी व सरबताची व्यवस्था करण्यात आली होती. महोत्सवाकरता साईबाबा देवस्थान, सवरेदय शिक्षण मंडळ तसेच, भाविकांनी सहकार्य केले.

उद्या रामधाम येथे सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहोळा
नागपूर, १ मे/ प्रतिनिधी

मनसरनजिकच्या रामधाम येथे सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहोळा रविवारी, ३ मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठान, ग्रामीण आदिवासी युवक स्वयंरोजगार व औद्योगिक प्रशिक्षण संस्था, समाजकल्याण विभाग आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहोळा होत आहे. हा विवाह सोहोळा रविवारी दुपारी ४ वाजता रामधामच्या चौकसे लॉनमध्ये होईल. गेल्या वर्षी झालेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात ५१ जोडप्यांनी भाग घेतला होता. त्यावेळी सुमारे १५ हजार लोक उपस्थित होते. त्यावेळी बौद्ध समाजाचे २०, आदिवासी समाजाचे २२, आंतरजातीय ५ आणि ओबीसींचे ४ जोडपे विवाहबंधनात बांधले गेले. वरवधूंना आशीर्वाद देण्यासाठी सर्व जनतेने यावे, अशी विनंती प्रतिष्ठानचे सरचिटणीस पी.टी. रघुवंशी यांनी केली आहे.

विदर्भवाद्यांची निषेध सभा
जनता दल (सेक्युलर) नागपूर

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून विदर्भावर गेल्या वर्षांनुवर्ष सुरू असलेल्या अन्यायाविरुद्ध निषेध व्यक्त करण्यासाठी बच्छराज व्यास चौकात निषेध सभा घेण्यात आली. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते तिलकराज वीज, डॉ. नंदकिशोर माहेश्वरी, बाबासाहेब समर्थ, मनीष तायडे उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी वेगळ्या विदर्भाबाबत उपस्थितांना माहिती दिली. आणि काँग्रेस आणि भाजपने मतांसाठी विदर्भाचा वापर केल्याची टीका सभेत करण्यात आली. त्यामळे पक्षातील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन याविरुद्ध लढा उभारण्याचे आवाहन केले.
विदर्भ मोर्चा महाराष्ट्र दिनानिमित्त विदर्भ मोर्चा संघटनेतर्फे स्वतंत्र्य विदर्भाच्या मागणीसाठी राजभवनापुढे निदर्शने करण्यात आली.

प्रत्यक्ष कर पद्धतीवर आज राष्ट्रीय परिषद
नागपूर, १ मे / प्रतिनिधी

इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊन्टट्स ऑफ इंडियाच्या नागपूर शाखेतर्फे उद्या, शनिवारी ९.३० वाजता हॉटेल सेंटर पॉईंट येथे प्रत्यक्ष कर पद्धतीवर राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. परिषदेला इन्स्टिटय़ूटचे राष्ट्रीय अध्यक्ष उत्तम प्रकाश अग्रवाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष कर विषयावर तांत्रिक सत्र आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये पहिल्या सत्रात मुंबईचे चार्टर्ड अकाऊन्टट् रिपाल ट्राल्शवाला टीडीएस कर प्रकारात असलेल्या कायदेशीर तरतुदींची माहिती देणार आहेत. दुसऱ्या सत्रात मुंबईचेच सीए चेतन कारिया २७१ कलमाअंतर्गत प्रत्यक्ष कर पद्धतीमध्ये असलेल्या विविध तरतुदींची माहिती देतील. याच सत्रात राजकोट येथील महेश सारडा ‘बिझनेस एक्सपेंडिचर करंट डेव्हलपमेंटस’ या विषयावर माहिती देतील. यात टीडीएस, व्याज यांच्यासह इतर तरतुदींचा समावेश आहे. यावेळी इन्स्टिटय़ूटचे सेंट्रल कौन्सिल सदस्य जयदीप शहा, रिजनल कौन्सिल सदस्य मकरंद जोशी, नागपूर शाखेचे अध्यक्ष मिलींद पटेल आणि सचिव सतीश सारडा यांच्यासह इतर सदस्य उपस्थित राहतील.

श्री. आयुर्वेद महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा मेळावा
नागपूर, १ मे / प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आयुर्वेद मेडिकोज असोसिएशनतर्फे श्री. आयुर्वेद महाविद्यालयात आजी-माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. आंबेडकर विचारचे विभाग प्रमुख डॉ. प्रदीप आगलावे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे डॉ. हरीश भिवगडे व डॉ. प्रकाश खापर्डे उपस्थित होते. यावेळी डॉ. आगलावे यांनी आंबेडकराच्या विचारांचे विद्यार्थी जीवनात काय महत्त्व आहे याबाबत माहिती दिली. डॉ. खापर्डे यांनी शैक्षणिक प्रगतीचे महत्त्व सांगून संघटित होण्याचे आवाहन केले. डॉ. साधना वाईकर यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचा उद्देश सांगून डॉक्टरांना सामाजिक जबाबदारीची जाणीव करून दिली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. संकेत पाटील यांनी केले. डॉ. नितीन भालेराव यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. गिरीश मानेराव, डॉ. विक्की तिरपुडे, डॉ. प्रशांत मांडवे, डॉ. मितेश बोरकर, डॉ. निलिमा सोळंके, डॉ. प्रभाकर डोंगरवार, डॉ. श्रावण शिंगणे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला डॉ. माया कांबळे, डॉ. विनोद रामटेके, डॉ. अमोल उके, डॉ. राजू कोसे, डॉ. मिलिंद जीवने उपस्थित होते.

विदर्भ साहित्य संघातर्फे नाना जोग यांना आदरांजली
नागपूर, १ मे / प्रतिनिधी

गणेश शिवराम ऊर्फ नाना जोग यांच्या स्मृतीदिनानिमित्त विदर्भ साहित्य संघाच्या कार्यालयात त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. विदर्भ साहित्य संघाच्या कार्यालयातील नाना जोग यांच्या अर्धपुतळ्यास संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांनी हार घालून आदरांजली वाहिली. प्रकाश एदलाबादकर यांनी नाना जोग यांच्या आठवणीना उजाळा दिला. यावेळी विदर्भ साहित्य संघाचे उपाध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, सरचिटणीस शोभा उबगडे, डॉ. विलास चिंतामण देशपांडे, योगेश बऱ्हानपुरे, जयंत देवधर, डॉ. अविनाश रोडे उपस्थित होते.

बावणे कुणबी समाजाच्या सोहोळ्यात ११ जोडपी विवाहबद्ध
नागपूर, १ एप्रिल / प्रतिनिधी

बावणे कुणबी समाजातर्फे रामनगरातील समाजभवनात अक्षय्यतृतीयेच्या दिवशी सामूहिक विवाह सोहोळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या विवाह सोहोळ्यात अकरा जोडपी विवाहबद्ध झाली. कार्यक्रमाच्या प्रांरभी समाजाचे अध्यक्ष अॅड. जी.डी. वैद्य यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी माजी आमदार मोहन मते, नगरसेवक परिणय फुके, विजय बाभरे, शरद बान्ते, रमन ठवकर, मनिष तितरमारे, भोजरान बान्ते, भगवान कानतोडे, बळीराम झंझाड, ममता भोयर, शेषराव सार्वे उपस्थित होते. कुणबी समाजात सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण व्हावी व पोटजातीचे बंधने तोडून सर्व शाखीय कुणबी व मराठी बांधवाना या सोहोळ्यात सहभागी करून घेण्यात आले आहे. यावेळी प्रमुख पाहुण्याच्या हस्ते वधू-वरांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. वधू-वरांना भेटवस्तू देण्यात आल्या. हा सोहोळा यशस्वी करण्यासाठी विलास रेहपाडे, मदन शेंडे, सुनिल कुकडे, देवेंद्र भुते, अजय तितरमारे, रामदास ठवकर, अमित शेंडे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

अंबाझरी लेडीज क्लबचा वर्धापन दिन उत्साहात
नागपूर, १ एप्रिल / प्रतिनिधी

अंबाझरी लेडीज क्लबचा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला अतिरिक्त पोलीस आयुक्त बाबासाहेब कंगाले उपस्थित होते. यावेळी बाबासाहेब कंगाले यांनी क्लबतर्फे राबवण्यात येत असलेल्या उपक्रमांची प्रशंसा करून महिलांना भुरटय़ा चोरांपासून सावध राहण्याचे आवाहन केले. क्लबच्या कार्याला त्यांनी शुभेच्छा दिल्या.
निलिमा हारोडे यांनी क्लबतर्फे राबवण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती देऊन महिलांनी सामाजिक दायित्व म्हणून संस्थेच्या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन केले. यावेळी निलिमा हारोडे यांची क्लबच्या अध्यक्षपदी पुर्ननियुक्ती करण्यात आली. नगरसेविका विनया फडणवीस यावेळी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेखा देशमुख, गौरी सावरकर, जयश्री गाडगे, प्राजक्ता नांदेडकर यांनी परिश्रम घेतले.

पोलीस वाहन चालकाचा मृतदेह मिळाला
नागपूर, १ मे/ प्रतिनिधी

पोलीस प्रशिक्षण केंद्रातील वाहन चालक संजयसिंग रामधरणसिंग (३८) याचा आज सकाळी ६ वाजता पी.एन.टी. कॉलनीत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली.
मृतदेहाशेजारी त्याची टी.व्ही.एस. एमएच ४०-बी-१२१४ क्रमांकाची मोटारसायकल होती. गुरुवारी रात्री केव्हा तरी, प्रशिक्षण केंद्रातून गोपालनगरातील घरी जाण्यासाठी निघाला असता प्रकृती बिघडल्याने तो मोटारसायकल रस्त्यावर उभी करून थांबला असावा. त्यानंतर लगेच त्याचा मृत्यू झाला असावा, असे बोलले जात आहे. घटनेची माहिती मिळताच प्रतापनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी मेडिकलला पाठवला. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. शवविच्छेदन अहवालानंतरच संजयसिंगच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार असल्याचे प्रतापनगर पोलिसांनी सांगितले.

महाराष्ट्र दिनानिमित्त मेडिकलमध्ये ध्वजारोहण
नागपूर, १ मे / प्रतिनिधी

मेडिकलच्या सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यास संस्थेचा तर उत्कर्ष होईलच, सोबत महाराष्ट्राचीही प्रगती होईल, अशी आशा अधिष्ठाता डॉ. दीप्ती डोणगांवकर यांनी व्यक्त केली. मेडिकलच्या एनसीसी परेड ग्राऊंडवर महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी डॉ. डोणगावकर बोलत होत्या. कार्यक्रमाला उपअधिष्ठाता डॉ. श्रीकांत मतकरी, न्याय वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप दीक्षित, सुपर हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी डॉ. सुधीर गुप्ता, मुख्य प्रशासकीय अधिकारी सुभाष दुसाने, जनसंपर्क अधिकारी डॉ. शांतीदास लुंगे, मेट्रन किशोरी पिंपळकर यांच्यासह विभागप्रमुख, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, अधिव्याख्याता, परिचारिका, विद्यार्थी व कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.