Leading International Marathi News Daily
शनिवार, २ मे २००९

मनात क्रोधभावना ठेवू नका. वैरभाव विसरा व आपल्या शत्रूलाही प्रेमाने जिंका.
हा बौद्ध जीवनमार्ग आहे. क्रोधाग्नी शमन करा.
तो मला अपशब्द बोलला, त्याने मला वाईट रीतीने वागविले, त्याने माझ्यावर कुरघोडी

 

केली, मला लुबाडले असे विचार ज्याच्या मनात वावरत असतात, त्याचा क्रोधविकार कधीही शमत नाही.
ज्याच्या मनात असे विचार उठत नाहीत, त्याचा क्रोध शांत झालेला असतो.
शत्रू शत्रूच्या वाईटावर, द्वेष्टा द्वेष्टाच्या वाईटावर टपलेला असतो.
माणसाने अक्रोधाने क्रोधाला जिंकावे, असाधुत्वाला जिंकावे.
खरे बोलावे, रागावू नये. मागितल्यानंतर थोडे तरी द्यावे.
क्रोध सोडावा, अभिमानाचा त्याग करावा. सर्व बंधनांवर जय मिळवावा- येणेप्रमाणे जो नामरुपाविषयी अनासक्त असतो असा अपरिग्रही दु:ख भोगत नाही.
वाढत्या क्रोधाला जो बहकलेल्या रथाप्रमाणे थांबवून धरतो, त्यालाच मी खरा सारथी म्हणतो. बाकीचे नुसते लगाम धरणारेच आहेत.
ज्यामुळे वैर वाढते, पराजित मनुष्य दु:खात मग्न होऊन बसतो; परंतु ज्याने जयापजयाच्या कल्पनेचाच त्याग केला आहे असा शांत पुरुष सुखाने झोप घेतो.
कामाग्नीसारखा अग्नी नाही आणि द्वेषासारखे दुर्दैव नाही. उपादान स्कंधासारखे दु:ख नाही. निर्वाणापेक्षा मोठे सुख नाही. वैराने वैर कधीही शांत होत नाही. अवैरानेच ते शांत होते; हा सनातन धर्म आहे.
मन घडविते तसा मनुष्य होतो.
जो सत् आहे त्याचा शोध मनाला करायला लावणे, हा संस्कार पुण्यमार्गातील पहिले पाऊल होय.
बौद्ध जीवनमार्गाची ही मुख्य शिकवणूक आहे.
मनुष्याच्या सर्व व्यवहाराचे उगमस्थान मन आहे. त्याचे सर्व व्यवहार मन:प्रधान आहेत.
मनुष्य जर दुष्ट चित्ताने बोलेल किंवा वागेल तर चालत्या बैलगाडीचे चाक बैलाच्या पायाचा पाठलाग करते, त्याप्रमाणे दु:ख अशा दुष्ट चित्ताने वागणाऱ्या मनुष्याच्या मागे लागते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर (बुद्ध आणि त्यांचा धम्म)

ग्रहांची युती होते म्हणजे काय होते? अंतर्युती व बहिर्युती हे काय प्रकार आहेत? ग्रहांची प्रतियुती म्हणजे काय?
अंतग्र्रह म्हणजेच बुध व शुक्र सूर्याला प्रदक्षिणा घालताना काही वेळेस सूर्य व पृथ्वी यांना जोडणाऱ्या रेषेत येतात. या वेळी पृथ्वीवरील निरीक्षकाच्या दृष्टीने सूर्य आणि अंतग्र्रह एकत्र आलेले दिसतात. या घटनेला ‘युती’ असे म्हणतात. युतीच्या वेळेस रेषेत ग्रह सूर्यापलीकडे असेल तर त्याला बहिर्युती म्हणतात. जर अंतग्र्रह सूर्य-पृथ्वी रेषेवर या दोघांच्या दरम्यान असेल तर या युतीला अंतर्युती असे म्हणतात. अंतर्युती किंवा बहिर्युतीच्या वेळेस सूर्याच्या तेजामुळे काही काळ अंतग्र्रह आपल्याला दिसू शकत नाही. ग्रहाच्या सूर्यतेजात लुप्त होण्याला ‘ग्रहाचा अस्त होणे’ असे म्हटले जाते. सूर्यतेजातून पुरेसा बाहेर पडल्याने ग्रह परत दिसू लागतो. याला त्या ग्रहाचा ‘उदय’ झाला असे म्हटले जाते. बहिग्र्रहांची (मंगळ व पुढील सर्व ग्रह) कक्षा ही पृथ्वीपेक्षा जास्त असल्याने कक्षेत भ्रमण करताना जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि बहिग्र्रह एका रेषेत येतात तेव्हा तो ग्रह एकतर सूर्याच्या पलीकडे असतो किंवा (सूर्य-पृथ्वी रेषेत) पृथ्वीच्या मागे असतो. ज्या वेळेस पृथ्वीवरील निरीक्षकाच्या दृष्टीने ग्रह व सूर्य एकत्र असतील, त्या वेळेस त्या ग्रहाची सूर्याशी युती झाली असे म्हटले जाते. बहिग्र्रह सूर्य व पृथ्वी या दरम्यान येऊ शकत नसल्याने बहिग्र्रहांची अंतर्युती होणे शक्य नाही. जेव्हा बहिग्र्रह सूर्य व पृथ्वी यांना जोडणाऱ्या रेषेवर परंतु सूर्याच्या विरुद्ध बाजूस असेल तेव्हा ग्रहाच्या या स्थितीला प्रतियुती असे म्हटले जाते. प्रतियुतीच्या दरम्यान काही दिवस बहिग्र्रह हा संध्याकाळी उगवून सकाळी मावळत असल्यामुळे आकाशात रात्रभर दिसू शकतो.
मृणालिनी नायक
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

अवाढव्य रशियन समाजाच्या साम्राज्याची घडी बसवणारी सम्राज्ञी म्हणून रशियाच्या इतिहासात कॅथरीन द ग्रेटचे नाव आदराने घेतले जाते. तशी ती मूळची जर्मन होती. पण मूळ रशियन लोकांपेक्षाही ती अधिक कट्टर रशियन होती. तिचे खरे नाव सोफिया ऑगस्टा फ्रेडरिका. जन्म पोलंडमधील स्टेटीन प्रांतात २ मे १७२९ रोजी झाला. तिचा विवाह रशियाचा राजा तिसरा पीटर याच्याशी झाला. पीटर व्यसनी आणि विलासी असल्याने जनतेचे हित पाहात नव्हता. परिणामी, रशियन नसूनही रशियाचे हित पाहणाऱ्या कॅथरीनच्या मागे राजकीय मुत्सद्दी उभे राहिल्याने पीटरला कैदेत टाकून कॅथरीनने राज्यकारभार हाती घेतला. हा पीटर पुढे तुरुंगातच मरण पावला. सन १७६२ ते १७९६ हा कालखंड रशियाच्या इतिहासात कॅथरीन युगच समजला जातो. या काळात तिने रशियाचे साम्राज्य काळय़ा समुद्रापर्यंत वाढवले. तुर्कस्थानचा पराभव केला. पोलंडचा मोठा भूभाग गिळंकृत केला आणि पोलंडची फाळणी केली. याशिवाय प्रशासनातही मोठय़ा सुधारणा केल्या. शाळा, महाविद्यालये, रुग्णालये उभारली. स्थानिक स्वराज्य संस्थांची मुहूर्तमेढ रोवली. वैद्यकीय सेवा, उद्योगधंद्यांना प्रोत्साहन दिले. त्या स्वत: लेखिका असल्याने कलासाहित्याला त्यांनी चालना दिली. उंची, कलात्मक, विशेषत: जुन्या वस्तू गोळा करण्याच्या छंदातून त्यांनी ‘हर्मिटेज’सारखी वास्तू उभारली. कॅथरीनची शेवट मात्र दु:खदायक झाला. ऐन तारुण्यात पती वारल्याने तिचे अनेक प्रियकर होते. शिवाय आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ती कोणत्याही थराला जात. तिच्या नातीचा विवाह स्वीडनच्या राजाशी होणार होता, पण काही कारणाने हे लग्न्न मोडले. याचा जबर धक्का तिच्या मनावर बसला. परिणामी ती खचली आणि त्यातच १० नोव्हेंबर १७९६ रोजी तिचे निधन झाले. लग्नानंतर रशियात ती ‘कॅथरीन द्वितीय’ म्हणून ओळखली जायची. पण आपल्या कर्तृत्वाने ‘कॅथरीन द ग्रेट’ या नावाने जगाच्या इतिहासात अमर झाली.
संजय शा. वझरेकर

एका माणसाने खूप श्रमांनी दारासमोर मोठा खड्डा खणला. त्यात पालापाचोळा, खतमाती घातले आणि बी पेरले. त्यातून चिमुकले रोप आले. माणसाने रोपाला सावली केली. त्याची निगा राखली. त्याला नियमितपणे खत घातले. पाणी दिले. काही वर्षांतच कडुलिंबाचे हिरव्यागार पानांचे सुरेख भव्य झाड तिथे डोलू लागले. माणसाने झाडाची मोठय़ा श्रद्धेने पूजा केली. निरांजन लावले. धूप जाळला. उदबत्ती पेटवली आणि हात जोडून तो झाडासमोर पाय दुमडून बसला आणि प्रार्थना करू लागला.
‘हे महान वृक्षा, तू सावली देतोस. तू गारवा देतोस. तुझे किती उपकार आहेत आमच्यावर. आणखी एक प्रार्थना तुला नम्र भावाने करतो. मला मधुर, टपोरे आणि रसरशीत आंबे दे. मी तुला नैवेद्य दाखवेन. तुझी पूजाअर्चा करेन. वृक्षा, माझ्यावर कृपावंत होऊन मला भरपूर सुमधुर आंबे दे.’
वृक्षाला लिंबोण्याच लटकत होत्या. रसरशीत पिवळय़ाधमक रंगाच्या टपोऱ्या, पण कडवट वासाच्या लिंबोण्या त्याच्या चारी अंगांना लगडलेल्या होत्या.
जर या माणसाला मधुर फळे हवी होती, आंबे हवे होते, तर त्याने आंब्याची कोय लावायला हवी होती. आंब्याची कोय जमिनीत लावून जर त्याने त्याची निगा राखली असती, काळजी घेतली असती, त्याला नियमाने खतपाणी घातले असते तर त्या कोयीतून भलाथोरला आंब्याचा वृक्ष वाढला असता. आंब्यांनी बहरला असता. कडू बी पेरून गोड फळे कशी बरे मिळणार? त्याने आंब्यांची इच्छा मनात धरून जर कोयच लावली असती तर त्याला झाडापुढे गुडघे टेकून आंबे दे म्हणून झाडाची याचना करण्याची गरजच उरली नसती. कोय लावल्यामुळे त्याला आंबेच मिळाले असते.
वाईट विचार, वाईट कृत्ये, दुसऱ्याचे वाईट चिंतणे भवितव्याच्या वाटेवर लाखो अडचणी उभ्या करतात. चांगले विचार आणि चांगली कृत्ये आपल्याला सामथ्र्य देतात. आपल्यात जो चांगुलपणा आहे, जी सात्त्विकता आहे, जे काही उच्च प्रतीचे आहे, जे उदात्त आणि मंगलमय आहे, ते आयुष्याच्या वाटेवर पेरत गेले तर त्याची फळे तशीच मिळतील, याची खात्री असू द्या.
आजचा संकल्प - मी वाईट कृत्ये आणि वाईट विचारांना दूर ठेवेन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com