Leading International Marathi News Daily
शनिवार, २ मे २००९

एसटीच्या मनमानीचा ज्येष्ठ नागरिकांना फटका
पनवेल/प्रतिनिधी :
ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या प्रवासी भाडय़ात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वीच घेतला. राज्यभरातील लाखो ज्येष्ठ नागरिकांना या सवलतीचा लाभ होत असला, तरी काही प्रमुख आगारांतून सुटणाऱ्या गाडय़ांमध्ये ही सवलत मिळत नसल्याच्या तक्रारी अनेक ज्येष्ठ नागरिक करीत आहेत. पनवेल प्रवासी संघाने याबाबत एसटीच्या महाव्यवस्थापकांकडे आत्तापर्यंत दोन वेळा तक्रार करूनही त्यास प्रतिसाद मिळालेला नाही.
एसटीची मुंबई महानगर प्रादेशिक क्षेत्रातील वाहतूक ही शहरी बससेवा असल्याचे सांगत ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के भाडेसवलत नाकारली जाते. यामध्ये मुख्यत्वे परळ आगारातून सुटणाऱ्या गाडय़ांचा समावेश आहे. या आगारातून अलिबाग अथवा रायगड जिल्ह्यात जाणाऱ्या गाडय़ांतील ज्येष्ठ नागरिकांनी भाडे सवलतीची मागणी केली, तर या गाडय़ा शहरी बससेवेअंतर्गत येत असल्याचे कारण वाहकांकडून सांगितले जाते. मात्र त्याचवेळी शासनाला देण्यात येणाऱ्या प्रवासी करासाठी मात्र वेगळा निकष लावून शासनाचा महसूल अप्रत्यक्षपणे बुडवायचा, असा एसटी व्यवस्थापनाचा दुटप्पी कारभार असल्याचा आरोप, प्रवासी संघाच्या एसटी विभागाचे अध्यक्ष विनायक नाझरे यांनी केला आहे. व्यवस्थापनाच्या या मनमानीचा फटका ज्येष्ठ नागरिकांसह त्यांच्या कर्मचाऱ्यांनाही बसत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
या बससेवेला शहरी दर्जा दिल्याने चालक आणि वाहकांना तुलनेने कमी वेतनदरात जास्त वेळ काम करावे लागते, त्यामुळे एसटी व्यवस्थापनाच्या या मनमानीमुळे एकाच वेळी ज्येष्ठ नागरिक, महामंडळाचे कर्मचारी आणि राज्य सरकारची फसवणूक होत आहे, असे ते म्हणाले. याबाबत दोनवेळा लेखी तक्रारी करूनही एसटी व्यवस्थापनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने लाखो ज्येष्ठ नागरिकांना भर्दंड सोसावा लागत आहे. टोल आकारणीतून एसटीला वगळल्यास प्रभासी भाडय़ात कपात होऊ शकेल, हे लक्षात घेऊन एसटीकडून टोल आकारणी करू नये, अशी मागणीही प्रवासी संघाने राज्य सरकारकडे केली आहे.