Leading International Marathi News Daily
शनिवार, २ मे २००९

उकाडय़ापासून थोडा दिलासा..
प्रतिनिधी / नाशिक

साधारणत: चार ते पाच दिवसांपासून उष्णतेच्या लाटेत अक्षरश: भाजून निघालेल्या उत्तर महाराष्ट्रातील तापमानाचा पारा हळुहळू खाली उतरू लागल्याने उकाडय़ाने हैराण झालेल्या सर्वसामान्यांना काहिसा दिलासा मिळाला आहे. गत दोन दिवसांच्या तुलनेत शुक्रवारी नाशिकसह उत्तर महाराष्ट्राच्या बहुतांश भागात तापमापकातील पारा सरासरी दोन अंशाने खाली आला. नाशिकचे आकाश निरभ्र असले तरी वाऱ्याचा वेग काहिसा वाढल्याने व जळगावी दिवसभर वातावरण ढगाळ राहिल्याने तापमानात घट झाल्याचे सांगण्यात येते. गेल्या दोन दिवसांत सर्वाधिक तापमानाची नोंद झालेल्या भुसावळ व धुळे परिसरातही तापमानात एक ते दीड अंशाने घट झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

..पण वीजेचा खेळखंडोबा
प्रतिनिधी / नाशिक

शहरी भागासह ग्रामीण भागातही भारनियमनाच्या नियोजित वेळेव्यतिरिक्त वेळी-अवेळी वीज पुरवठा खंडित होवू लागल्याने अगोदरच रणरणत्या उन्हामुळे हैराण असलेले सामान्यजन पुरते जेरीस आले आहेत. भारनियमनाचा कालावधी कमी झाल्याचा दावा वीज कंपनीने केला असला तरी अचानक खंडित होणाऱ्या वीज पुरवठय़ामुळे उकाडय़ाचा सामना करणे अवघड बनत आहे. ग्रामीण भागातील स्थिती तर अधिकच बिकट आहे. दरम्यान, नाशिक शहरात भारनियमनाचा कालावधी दररोज केवळ दोन तास असून तांत्रिक कारणास्तव काही भागात अपवादात्मक परिस्थितीत अडचणी येवू शकतात, असे स्पष्टीकरण वीज कंपनीने दिले आहे.

शिवसेना -मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री
प्रतिनिधी / नाशिक

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने झालेली धुसफूस आणि भाऊबंदकीच्या वादातून वाडिवऱ्हे येथील गोंदे दुमाला गावात शिवसेना व मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या जोरदार धुमश्चक्रीत १३ जण गंभीर जखमी झाले. गुरुवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे गावातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. या प्रकरणी वाडिवऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शिवसेनेचे इगतपुरी तालुकाध्यक्ष राजाभाऊ नाठे व मनसेचे हिरामण नाठे यांच्यात भाऊबंदकीतून असणाऱ्या जुन्या वादात लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने अधिकच भर पडली. प्रचारावेळी दोन्ही गटात चाललेली धुसफूस गुरूवारी रात्री उफाळून आली.

युवकांचा ज्ञानकोश समृद्ध करण्यासाठी ‘ऊर्जा’चा पुढाकार
प्रतिनिधी / नाशिक

शिव खेरा, सिद्धू, अच्युत गोडबोले, किरण बेदी करणार मार्गदर्शन शिव खेरा, विठ्ठल कामत, नवज्योतसिंग सिद्धू, अच्युत गोडबोले, कर्नल प्रदीप ब्राह्मणकर, सुहास गोपीनाथ, विवेक वेलणकर, किरण बेदी.. प्रभुती येत्या २८ ते ३१ मे दरम्यान युवकांना करिअरच्या नवनवीन संधींबाबत मार्गदर्शन करण्यासाठी नाशिक मुक्कामी येणार आहेत. ऊर्जा युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ‘ज्ञानकोश २००९’ या उपक्रमांतर्गत ही मंडळी येथे येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष व उपमहापौर अजय बोरस्ते यांनी दिली. कॉलेजरोड येथील डॉन बॉस्को शाळेच्या प्रांगणात हे कार्यक्रम होतील.

सुविधांमुळे खेळाचा दर्जा उंचावतो -कचोळे
नाशिक / प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय क्रीडा सुविधा खेळाडूंना प्राथमिक स्तरावरच उपलब्ध करून दिल्यास खेळाडूंच्या दर्जा उंचावतो, असे मत ज्येष्ठ टेबल टेनिस प्रशिक्षक व मार्गदर्शक मिलींद कचोळे यांनी व्यक्त केले. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित क्रीडा प्रबोधनी व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने आयोजित वासंतिक प्रशिक्षण शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे सचिव उदय शेवतेकर होते. नाशिक प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष महेश दाबक, जु. स. रुंग्टा हायस्कुलचे मुख्याध्यापक अरूण गायकवाड, नितीन काळे व मोहिनी देवी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मंगला गोविंद आदी यावेळी प्रमुख पाहुणे होते. प्रशिक्षण शिबीर १२ ते ३० एप्रिल दरम्यान घेण्यात आले. शिबिराचा समारोप जु. स. रुंग्टा हायस्कूलच्या सभागृहात झाला. शिबिरात सुमारे १२५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यात त्यांना व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो, टेबल टेनिस, कॅरम, बुद्धीबळ या खेळांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरार्थीना जु. स. रुंग्टा, पुष्पावती रुंग्टा व मोहिनी देवी प्राथमिक विद्यामंदीर यांच्या पालक शिक्षक संघाच्या वतीने अल्पोपहार देण्यात आला. त्याचप्रमाणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
शिबीरार्थीच्या वतीने आदित्य देवरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक संजय पाटील यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सुचिता कुकडे यांनी करून दिला सूत्रसंचलन प्रशांत भाबड यांनी केले. आभार कल्पेश चव्हाण यांनी मानले. शिबीर यशस्वीतेसाठी शैलेजा जैन, जयश्री उदार, हरीष गवळी आदींनी परिश्रम घेतले.

पालकांसाठी कार्यशाळा
नाशिक / प्रतिनिधी

बालकांच्या सर्वागिण विकासासाठी येत्या मंगळवारपासून खास पालकांसाठी कार्यशाळेचे आयोजन कॅनडा कॉर्नर परिसरातील विराज कॉर्नर येथे करण्यात आले आहे. मंगळवारपासून दर आठवडय़ाला सायंकाळी तीन तास ही कार्यशाळा होईल. आठ वर्षांपर्यंतच्या मुलांचा योग्य विकास व्हावा हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश असल्याचे संयोजिका निता अरोरा यांनी सांगितले. कार्यशाळेत पालकांना गर्भधारणेपासून बालकांची प्रगती व वाढ कशी करायची, मुलांचे संगोपन व त्याची शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक, बौद्धिक व अध्यात्मिक याबद्दल मार्गदर्शन केले जाईल. कार्यशाळेत आई-वडील दोघेही अथवा एक जण सहभागी होवू शकतो. पालकांनी मुलांशी कसे वागावे याविषयीही माहिती दिली जाणार आहे. अधिक माहितीसाठी दू. क्र. ९३७३९-२९११९ वर संपर्क साधावा.

योगम् शरणम् संस्थेतर्फे विशेष साधना वर्ग
प्रतिनिधी / नाशिक

बिहार योग विद्यापीठाशी संलग्न असलेल्या योगम् शरणम् संस्थेतर्फे येत्या ४ मे पासून नाशिकमध्ये विशेष साधना वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिकरोडच्या सेंट फिलोमिना हायस्कूलसमोरील कलानगर येथे असणाऱ्या योगम् शरणम् केंद्रात तसेच अशोक स्तभांवरील सत्यानंद योग केंद्रात दररोज सकाळी ५.३० ते ७.०० या वेळेत हे वर्ग होणार आहेत. या शिबिरात विविध प्रकारच्या यौगिक क्रियांबाबत सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. विशेष साधना वर्गात अंतर्मान, अजपाजप, योगनिद्रा, चक्रशुद्धी या विषयांवर प्रत्येकी एका आठवडय़ाचे प्रशिक्षण दण्यात येणार आहे. प्रत्येक विषयासाठी त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहेत. वेगवेगळ्या विकारांवर या योग क्रिया उपयुक्त असून त्याच्या नित्य आचरणाने अनेक व्याधींपासून दूर राहणे शक्य होणार आहे. बिहार योग विद्यालयात प्रशिक्षित झालेले अनुभवी शिक्षक या वर्गाना मार्गदर्शन करणार आहेत. अधिक माहिती व नांव नोंदणीसाठी संपर्क : ९९२२२०००१५.

व्ही. डी. निकम सेवानिवृत्त
नाशिक / प्रतिनिधी

नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक शिक्षण संस्था संचलीत खेडगाव येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. डी. निकम यांचा सेवानिवृत्तीनिमित्त संस्थेचे सरचिटणीस आ. डॉ. वसंतराव पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अरविंद कारे होते. निकम यांच्या पत्नी कुसुम निकम यांचाही यावेळी गौरव केला. या समारंभास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीराम शेटे, दिंडोरी पंचायत समितीचे सभापती भास्करराव भगरे, अ‍ॅड. नितीन ठाकरे उपस्थित होते. विद्यार्थी मोनाली झोटींग, प्रतिक ठाकरे व प्रतिक्षा गांगुर्डे यांची भाषणे झाली. शाळेचे पर्यवेक्षक डी. पी. बोरसे यांनी प्रास्तविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन एस. जे. सूर्यवंशी यांनी केले. शालेय समितीचे अध्यक्ष तसेच खेडगावचे सरपंच दत्तात्रय पाटील यांनी आभार मानले.