Leading International Marathi News Daily
शनिवार, २ मे २००९

धुळे जिल्ह्य़ात ‘रोहयो’चा बोजवारा
वार्ताहर / धुळे

रोजगार हमी योजनेंतर्गत काम मिळविण्यासाठी अर्ज भरून देण्याचे आवाहन करण्यात आले असताना ग्रामसेवक अर्ज भरून घेण्यास स्पष्ट नकार देत आहेत. ज्यांनी एक-दीड महिन्यापूर्वीच अर्ज भरून दिले आहेत त्यांनाही अद्याप काम उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. शिवाय कामगारांना बेकारभत्ताही नाही. यामुळे जिल्ह्य़ात रोजगार हमी योजनेचा बोजवारा उडाल्याचे उघड झाले आहे. न्यायविधी प्राधिकरण समितीने या योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात स्पष्ट सूचना देऊनही यंत्रणा हलायला तयार नाही.

' कृषीदिंडीतून आधुनिक शेती तंत्रज्ञान तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल '
कृषी दिंडीचे शानदार उद्घाटन

धुळे / वार्ताहर

कृषी दिंडी आयोजनातून आधुनिक शेती पद्धतीचे तंत्रज्ञान तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी निश्चितच उपयोग होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी प्राजक्ता लवंगारे यांनी ‘कृषी दिंडी २००९’ च्या उद्घाटन प्रसंगी केले. याप्रसंगी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य बाबुराव लाड, उपविभागीय अधिकारी गोपीचंद कदम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगडे, सामाजिक वनीकरणाचे डी. आर. सोनार, कृषी विकास अधिकारी एस. डी. मालपुरे, उपविभागीय कृषी अधिकारी अरूण पटेल आदी उपस्थित होते.

जळगाव पालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम गतिमान
वार्ताहर / जळगाव

पंधरवडय़ाच्या खंडानंतर महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम पुन्हा सुरू झाली आहे. परिणामी अतिक्रमण धारकांची तारांबळ उडाली असून पालिकेच्या पथकाने शिवाजी नगर, टॉवर चौक, सानेगुरूजी चौक, घाणेकर चौक व सेंट्रल फुले मार्केट संकुलातील बहुतांश अतिक्रमणे हटविल्याने रस्ते व चौक पुन्हा एकदा प्रशस्त वाटू लागले आहेत. शहरातील वाहतूक समस्येकडे शहर, वाहतूक, पोलीस शाखेचे दुर्लक्ष असतानाच मोठय़ा प्रमाणात वाढलेल्या अतिक्रमणांमुळे शहरातून वाहन चालविणेच नव्हे तर पायी चालणे सुद्धा मुश्किल ठरले होते. वाढती टीका व भ्रष्टाचाराचा आरोप आल्यानंतर महापालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे शहरातील रस्ते, चौक व व्यापारी संकुले अतिक्रमण मुक्त करण्यात आल्याने सर्व काही प्रशस्त वाटायला लागले होते व त्यामुळे वाहतूक समस्या सुद्धा संपल्यात जमा होती. नागरिकांनी या मोहिमेचे जोरदार स्वागत केले होते. तथापि, मध्यंतरी मोहीम अचानकपणे थंडावल्याने सारी स्थिती जैसे थे झाल्याने महापालिका कारवाईत काहींच्या हातगाडय़ा व टपऱ्या जप्त करण्यात आल्या. आता ही मोहीम कायम स्वरुपी प्रभावीपणे राबविण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच नव्याने अतिक्रमण हटविलेल्या चौकात सुशोभिकरण करण्याचीही मागणी होत आहे.

शेतकऱ्यांच्या क्रेट्स खरेदी अनुदानास मंजुरी
लासलगाव / वार्ताहर

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या क्रेट्स खरेदी अनुदान योजनेंतर्गत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने पाठविलेल्या कार्यक्षेत्रातील ४३३ फळे उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रस्तावास मंडळाने नुकतीच तत्वता मंजुरी दिली असल्याची माहिती बाजार समितीचे प्रभारी सभापती राजेंद्र डोखळे यांनी दिली. राज्यातील द्राक्षे, आंबा, डाळींब, केळी, संत्री, मोसंबी, चिक्कु, आवळा, सीताफळ व पपई या फळांच्या उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात उत्पादीत केलेल्या फळांची काढणी, हाताळणी, वाहतूक आणि साठवणूक करण्यासाठी प्लॅस्टिक क्रेट्स खरेदीवर अनुदान देण्याची योजना मंडळाने राबविण्याचे ठरविले आहे. या योजनेंतर्गत लासलगाव बाजार समितीच्या कार्यक्षत्रातील फळे उत्पादक शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांकडून बाजार समितीने प्रस्ताव मागविले होते. मंडळाने एकूण ४३३ शेतकऱ्यांच्या प्रस्तावांना तत्वता मान्यता दिली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांस आय. एस. ओ. प्रमाणीकरण असलेल्या कंपन्यांकडून खरेदी केलेल्या प्रती क्रेट्सला ५० रुपये किंवा खरेदी दराच्या २५ टक्के यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून देण्यात येणार आहे. या संदर्भातील विहीत नमुन्यातील अर्ज लाभार्थी शेतकऱ्यांना बाजार समिती घरपोच पाठविणार आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी त्यातील अटी-शर्तीची पूर्तता करून लवकर बाजार समितीकडे तीन प्रतीत प्रस्ताव सादर करावयाचे आहे, असे डोखळे यांनी सांगितले.

हृदयरोग चिकित्सा शिबीर
मनमाड / वार्ताहर

मुरलीधर व लक्ष्मीबाई धात्रक यांच्या स्मरणार्थ माजी आमदार जगन्नाथराव धात्रक व नगराध्यक्ष गणेश धात्रक यांच्यातर्फे येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात मोफत हृदयरोग चिकित्सा शिबीर आयोजित करण्यात आहे होते. शिबिरात दोनशेहून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली. उद्घाटनप्रसंगी मुंबईच्या सायन हॉस्पीटलचे एन्जोप्लास्टी सर्जन डॉ. अजय महाजन, डॉ. उदय जाधव, डॉ. गिरीष सबनीस, डॉ. सतीश खडसे, डॉ. सैय्यद साजिद उपस्थित होते. सायन हॉस्पीटलच्या समाजसेवा शाखेचे शांताराम माने यांनी योजनांची माहिती दिली. समाजसेवक बबन दराडे, विलास कटारे, रवींद्र घोडेस्वार, डॉ. अनिल चव्हाण यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला.