Leading International Marathi News Daily
शनिवार, २ मे २००९
राज्य

सोलापूर महापालिका; वय वर्षे ४४
सोलापूर, १ मे/प्रतिनिधी

गिरणगाव किंवा एक मोठे खेडे म्हणून राज्यभर हेटाळणी सहन कराव्या लागणाऱ्या सोलापूर शहराने स्थानिक वस्त्रोद्योगाची वाताहत झाल्यानंतर आणखी मागासलेपण पत्करावे लागणार की काय, अशी भीती वाटत असतानाच अलीकडे सुदैवाने सोलापूर महापालिकेच्या माध्यमातून होत असलेला विकासाचा प्रयत्न शहराला भावी दिशा मिळण्यासाठी ललामभूत ठरणारा आहे. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी विकास योजना या शहरासाठी लागू करण्याच्या प्रयत्नांची पूर्तता होणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कलिंगडांची लाली-गोडी आता दुर्मिळ
.बालाजी ढोबळे, परतूर, १ मे
पावसाचे अत्यल्प प्रमाण व वाळूचा बेसुमार वाढलेला उपसा या दोन प्रमुख कारणांमुळे शहराजवळून वाहणाऱ्या दुधना नदीच्या पात्रातील टरबूज-खरबुजांची लागवड आता पूर्णपणे थांबली आहे. नदीपात्रातील लालेलाल व टपोऱ्या गावरान अस्सल कलिंगडांची गोडीही कालौघात लुप्त झाली आहे. पूर्वी या भागात पावसाचे प्रमाण चांगले होते. त्या काळात एवढी वृक्षतोड झाली नव्हती. पाऊस बऱ्यापैकी पडायचा. ओढे-नाले व दुधना नदीला वर्षभर वाहते पाणी असायचे. पाणीप्रश्न त्या काळी नव्हताच.

भुदरगड पतसंस्था अध्यक्षांसह चौघांना तीन वर्षे साधी कैद
जिल्हा ग्राहक न्यायालयाचा निकाल
सोलापूर, १ मे/प्रतिनिधी
ठेवीची रक्कम तत्काळ देण्याचा आदेश देऊनही ती देण्यास असमर्थता दाखवल्यानंतर भुदरगड नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सीताराम ठाकूर, व्यवस्थापक भास्कर ठाकूर, संचालक बस्त्याव बारदेस्कर आणि संभाजी पाटील यांना जिल्हा ग्राहक न्यायालायने तीन वर्षे साध्या कै देची शिक्षा ठोठावली.

एड्सशी हिमतीने लढा देणाऱ्या वैशाली शिंदेंना आस्था पुरस्कार
सोलापूर, १ मे/प्रतिनिधी
फसवून झालेल्या लग्नानंतर नवऱ्यापासून स्वतला एड्स होऊनदेखील नशिबाला दोष न देता समाजात हिंमतीने एड्स जनजागृतीचे कार्य करणाऱ्या सातारा जिल्ह्य़ातील बेलवडे बुद्रुकच्या वैशाली शिंदे यांना सोलापूरच्या आस्था फाऊंडेशनचा समाजगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.येत्या शनिवारी सायंकाळी सहा वाजता हुतात्मा स्मृतिमंदिरात जिल्हाधिकारी डॉ. जगदीश पाटील यांच्या हस्ते या पुरस्काराचे समारंभपूर्वक वितरण करण्यात येणार आहे.

कार्यालयाच्या शोधात नागरिकांची दमछाक!
तुकाराम झाडे, हिंगोली, १ मे
प्रशासकीय इमारतीचा ताबा मतदानयंत्रांनी घेतल्याने येथील सर्व कार्यालये इतरत्र हलविण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय उपविभागीय कार्यालयात थाटले असले, तरी महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या बसण्याची व्यवस्था नसल्याने अनेक कर्मचारी केवळ इकडून तिकडे असा वेळ घालवीत आहेत. संबंधित विभागातील कामानिमित्त कार्यालयाच्या शोधात नागरिकांची दमछाक होत आहे.

जळगाव येथे केळी उत्पादकांचा मेळावा
जळगाव, १ मे / वार्ताहर

जैन इरिगेशन सिस्टीम्सने खान्देशातील केळी उत्पादकांसाठी सुक्ष्म सिंचन आणि पर्यावरण पूरक असा ‘क्लिन डेव्हलपमेंट मेकॅनिझम’ (सीडीएम) प्रकल्प विकसित करण्याचे निश्चित केले असून त्या अनुषंगाने केळी उत्पादक तसेच संबंधित घटकांकरिता २० मे रोजी जाहीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

पोलिसांच्या बेडीतून लग्नाच्या बेडीत!
नगर, १ मे /प्रतिनिधी

एकतर्फी प्रेमाने आंधळे झालेल्या पारनेर तालुक्यातील जवळे येथील एका तरुणाने लग्नास नकार देणाऱ्या तरुणीच्या अंगावर अ‍ॅसिड टाकून तिला मारण्याचा प्रयत्न केला. नंतर त्याला वर्षभर तुरुंगात खितपत पडावे लागले. मात्र, आता त्याच्या आई-वडिलांनी संबंधित तरुणीच्या पालकांसमोर पदर पसरून झाले गेले माफ करून तिला सून म्हणून पाठवा अशी गळ घातली आहे. न्यायालयानेही सामाजिक दृष्टिकोनातून लग्नासाठी या तरुणाला १५ दिवसांचा तात्पुरता जामीन दिला आहे.

वाढीव १० टक्के कमी करून जकातीची निविदा प्रसिद्ध
नगर, १ मे / प्रतिनिधी
वाढीव १० टक्के कमी करून महापालिका प्रशासनाने अखेर जकातीची ४८ कोटी ११ हजारांचीच निविदा प्रसिद्ध केली. नव्या प्रशासकीय इमारतीचा १ कोटी ४० लाख खर्चाचा तिसरा मजला बांधून देण्याची अट मात्र निविदेत कायम आहे.

अन् शिक्षक व विद्यार्थ्यांचाही घोर दूर झाला..!
नाशिक, १ एप्रिल / खास प्रतिनिधी

कायद्याने लाच घेणे वा देणे असे दोन्ही अपराध या संज्ञेत मोडतात. पण, ‘वरच्या साहेबाला द्यावे लागतात’ म्हणून थेट शिक्षकांकडे लाच मागणे अन् ती मुदतीत मिळत नाही असे लक्षात आल्यावर शेकडो विद्यार्थ्यांचे निकाल एक वा दोन दिवस नव्हे तर तब्बल आठवडाभर तांत्रिक कारणांच्या सबबी पुढे करीत अडकवून ठेवण्याची एक वेगळीच शक्कल शिक्षण खात्याने अंगीकारल्याची धक्कादायक बाब महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर प्राथमिक व माध्यमिक शाळांचे निकाल जाहीर होताना उजेडात आली आहे.

श्री स्वामी समर्थ पालखी ६ मे रोजी जळगावला
जळगाव, १ मे / वार्ताहर

श्री क्षेत्र अक्कलकोट येथून श्री स्वामी समर्थाची पालखी व पादुकांचे जळगावला ६ मे रोजी आगमन होणार आहे. ७ मे च्या दुपार पर्यंत पालखी येथेच मुक्कामी राहणार आहे. त्यानिमित्त धार्मिक कार्यक्रम आयोजिले आहेत. श्री स्वामी समर्थ भक्तांना दर्शनाचा लाभ व्हावा तसेच अक्कलकोट क्षेत्री बांधण्यात येत असलेल्या भक्त निवास, महाप्रसादालय व प्रतीक्षा हॉलसाठी निधी उपलब्ध होण्याच्या उद्देशातून श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातर्फे पालखी परीक्रमेचे आयोजन करण्यात येते. यंदा ६ मे च्या दुपारी पालखीचे जळगाव येथे आगमन होईल. देवस्थानाच्या हत्तीसह शोभा यात्रा चिमुकले राम मंदीर, छत्रपती शिवाजी चौक, टॉवर चौक, सुभाष चौक मार्गे गणेशवाडी येथे येईल. ७ मे रोजी दुपापर्यंत पालखी येथेच मुक्कामी राहील. यावेळी महाआरती व पादुकांचा महाअभिषेक संपन्न होईल. भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन दत्तात्रेय शिरसाळे यांनी केले आहे.

सप्रेम परिवारातर्फे हुतात्म्यांना अभिवादन
नाशिक, १ मे / प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांचा प्रारंभ हुतात्म्यांना अभिवादन करून व्हावा, या उद्देशाने सप्रेम परिवारातर्फे येथील हुतात्मा स्मारकात आज सकाळी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी ‘मराठी अस्मिता व आत्मविश्वास अभियान’ या विषयी सप्रेम परिवारचे प्रवर्तक सतीश बोरा यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच अधिकाधिक मराठी पुस्तकांचे अन्य भाषांत भाषांतर, मराठी चित्रपट अन्य भाषांमध्ये डब करणे आणि २०१२ हे कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचे जन्मशताब्दी वर्ष ‘मराठी भाषा वर्ष’ म्हणून साजरे करण्याचा संकल्पही यावेळी सोडण्यात आला. हा उपक्रम स्तुत्य असून त्यामुळे मराठीची प्रतिमा निश्चितच उंचावेल, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमास प्रा. भास्कर गिरीधारी, पालिका स्थायी समितीचे अध्यक्ष संजय चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. जी. वाघ, अरूण सोनार, गुरुमित बग्गा, शिवदास डागा, अण्णा पाटील, डॉ. दिनेश बच्छाव आदि उपस्थित होते.

गोदापात्रात बुडालेल्या विद्यार्थ्यांचा मृतदेह सापडला
नाशिक, १ मे / प्रतिनिधी

गुरूवारी गोदावरी नदीपात्रात बुडालेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृतदेह आज दुपारी अग्नीशमन विभागाच्या हाती लागला. मविप्र शिक्षण संस्थेच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्यांचे नाव अरूण देवीदास वैदकर (२६, रा. भुसावळ) असे आहे. गुरूवारी दुपारी तो आपल्या मित्रांसह गोदावरी नदीवर पोहोण्यासाठी गेला होता. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला. त्यानंतर अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेवून शोध घेण्याचा प्रयत्न केला. तथापि, पहिल्या दिवशी तो सापडू शकला नाही. शुक्रवारी शोधकार्य पुन्हा सुरू केल्यानंतर दुपारी या विद्यार्थ्यांचा मृतदेह जवानांच्या हाती लागला.