Leading International Marathi News Daily
शनिवार, २ मे २००९
क्रीडा

नाइट रायडर्सची वाईट कामगिरी
मुंबई इंडियन्स ९ धावांनी विजयी

ईस्ट लंडन, १ मे / वृत्तसंस्था

जीन-पॉल (जे. पी.) डय़ुमिनीच्या अष्टपैलू खेळाच्या बळावर मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा ९ धावांनी पराभव केला आणि इंडियन्स प्रीमिअर लीग क्रिकेट साखळीत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. सहापैकी तीन सामने जिंकून मुंबईने सात गुणांसह हा क्रमांक पटकाविला आहे. डेक्कन चार्जर्स आणि दिल्ली डेअर डेव्हिल्स यांनी प्रत्येकी ४-४ विजयांसह पहिले दोन क्रमांक राखले आहे. डय़ुमिनीच्या ३७ चेंडूंतील ५२ धावांच्या नाबाद खेळीमुळे मुंबईने २० षटकांत ६ बाद १४८ धावसंख्येपर्यंत मजल मारली. ब्रॅड हॉजच्या ६० चेंडूतील ७३ धावांच्या खेळीने मुंबईचा विजय जवळजवळ हिरावून घेतला होता; पण डय़ुमिनीच्या लॉग ऑनवरील चपळ क्षेत्ररक्षण आणि यष्टीरक्षक पिनल शहाकडे केलेल्या अचूक चेंडूफेकीमुळे सामन्याचे चित्र पालटले. मलिंगाच्या अखेरच्या षटकातील व १९ व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर ब्रॅड हॉज धावचीत झाला. त्या वेळी अखेरच्या षटकात कोलकाता संघाला विजयासाठी १७ धावांचे आवश्यकता होती.

डेक्कन चार्जर्स पुन्हा मुसंडी मारणार!
पोर्ट एलिझाबेथ, १ मे / पीटीआय
इंडियन प्रीमियर लीग ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेच्या दुसऱ्या हंगामात पहिल्या पराभवाचे दान पदरी पडलेला गुणतक्त्यातील आघाडीवीर डेक्कन चार्जर्स हैदराबादचा संघ पुन्हा मुसंडी मारण्याच्या इराद्यानेच उद्या राजस्थान रॉयल्स या ‘अनिश्चिततेचा बादशाह’ अशी बिरुदावली मिरविणाऱ्या संघाशी भिडणार आहे. आयपीएलच्या दुसऱ्या हंगामात सलग चार विजयांनिशी अपराजित राहण्याची किमया साधणाऱ्या डेक्कन चार्जर्सची अश्वमेध घोडदौड दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने गुरुवारी रोखली.

चेन्नई-दिल्ली पुन्हा आमने-सामने
जोहान्सबर्ग, १ मे / वृत्तसंस्था
राजस्थान रॉयलकडून पराभूत झाल्यानंतर इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वात तगडय़ा डेक्कन चार्जर्सला खडे चारणाऱ्या दिल्ली डेअरडेव्हिल्सचा संघ पुन्हा एकदा नव्या जोमाने कामगिरी करण्याच्या तयारीत आहे आणि उद्या त्यांची गाठ महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जशी पडणार आहे. या सामन्यात विजय मिळवून आपल्या सहाव्या विजयाची नोंद करण्याची संधी त्यांना साधायची आहे. वीरेंद्र सेहवागचा दिल्ली संघ आठ गुणांसह गुणतक्त्यात डेक्कन चार्जर्सपाठोपाठ दुसऱ्या स्थानावर आहे.

जोस ब्रासा भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक
भोपाळ, १ मे / पीटीआय

भारतीय पुरुष हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी स्पेनचे प्रशिक्षक जोस ब्रासा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ब्रासा लवकरच मुख्य प्रशिक्षक म्हणून भारतीय हॉकी संघाची धुरा सांभाळतील, अशी माहिती केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचे संयुक्त सचिव प्राविर कृष्णा यांनी सांगितले. कृष्णा पुढे म्हणाले की, ब्रासा यांच्याशी दोन वर्षांचा करार करण्यात आला असून, २०१२च्या लंडन ऑलिम्पिकपर्यंत हा करार वाढविण्याची शक्यता आहे. भारत सरकार आणि ब्रासा यांच्यात दोन वर्षांच्या करारपत्रावर नुकत्याच स्वाक्षऱ्या झाल्या असून, २०११च्या एशियाडपर्यंत ते भारताला मार्गदर्शन करतील, असे कृष्णा म्हणाले.

संघ विकणे नाही - शाहरुख
मुंबई, १ मे / क्री. प्र.

इंडियन प्रीमियर लीगच्या दुसऱ्या टप्प्यात सातत्याने होत असलेल्या खराब कामगिरीमुळे वैतागून शाहरुख खान पुढील वर्षी आपला कोलकाता नाइट रायडर्स हा संघ विकणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर शाहरुखने त्याचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला आहे. शाहरुखने सांगितले की, माझी या संघासोबत खूप मोठी भावनिक गुंतवणूक आहे आणि तो विकण्याचा विचार मी करीतही नाही. किंबहुना, कुणालाही हा संघ विकत घेणे परवडणार नाही.

‘ट्वेण्टी-२०’ विश्वचषक स्पध्रेसाठी श्रीकांतकडून मनधरणी
सचिन, प्लीज खेळशील का?

विनायक दळवी, मुंबई, १ मे

दक्षिण आफ्रिकेमध्ये सध्या इंडियन प्रीमिअर लीग सुरू आहे. या क्रिकेट साखळी दरम्यान, विश्वचषक भारतीय क्रिकेट संघाच्या जडणघडणीविषयी चर्चा सुरू आहे. या जडणघडणीतील महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे सचिन तेंडुलकरचे मन वळविण्याचे प्रयत्न जोरात सुरू आहेत. ‘ट्वेण्टी-२०’ क्रिकेटमध्ये भारतीय संघातर्फे न खेळण्याचा निर्णय सचिन तेंडुलकरने याआधीच जाहीर केला होता. मात्र आयपीएलमधील सचिनचा सध्याचा फॉर्म आणि सेहवाग, गंभीर, उथप्पा आदी संभाव्य सलामीवीरांना सूर गवसत नसल्याने राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष श्रीकांत यांनी सचिनला पुनरागमन करण्याची गळ घातली आहे.

लंडन ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत सुवर्णपदक मिळविण्याचा निश्चय
पुणे, १ मे/प्रतिनिधी

सुशीलकुमारने बीजिंग ऑलिंम्पिकमध्ये मिळविलेल्या ब्रॉन्झपदकामुळे कुस्ती क्षेत्रात पुन्हा चैतन्य निर्माण झाले असून त्याचा फायदा घेत लंडन येथे होणाऱ्या ऑलिंम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविण्याचा निश्चय आज येथे हिंदकेसरी दारासिंग, सतपालसिंह यांच्यासह अनेक ज्येष्ठ कुस्तीगिरांनी व्यक्त केला.

पालघर-डहाणू आणि काऊंटी क्रिकेट क्लब अंतिम फेरीत
मुंबई, १ मे / क्री. प्र.

यजमान काऊंटी क्रिकेट क्लबने अ‍ॅग्रेसिव्ह स्पोर्ट्स क्लबचा केवळ एका धावेने पराभव करून डॉ. मुन्शी स्मृती टी-२० (१४ वर्षांखालील) स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. त्यांच्यात आणि पालघर-डहाणू यांच्यादरम्यान, आता विजेतेपदाची लढत होईल. भवन्स कॉलेज (अंधेरी) मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेमध्ये पालघर-डहाणू संघाने सर क्रिकेट क्लबचा चार गडी राखून पराभव केला.

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत युक्रेनच्या मिरोशनीची विजयी सलामी
मुंबई, १ मे / क्री. प्र.

गोरेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या मुंबई महापौर चषक आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत युक्रेनचा ग्रॅण्डमास्टर मिरोशनी चेन्को याने विजयी सलामी दिली. दुसऱ्या लढतीतही युक्रेनच्या अरेचेन्को अ‍ॅलेक्झांडर याने विजय मिळवून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

भूपती व नोल्स उपान्त्य फेरीत
रोम, १ मे/पीटीआय
भारताच्या महेश भूपती याने मार्क नॉलेसच्या साथीत बीएनएल एटीपी टेनिस स्पर्धेत आज दुहेरीच्या उपान्त्य फेरी गाठली. भूपती व नॉलेस यांनी पोलंडच्या मेरिझ फिस्र्टेनबर्ग व मार्सिन मॅटकोवस्की यांचा ६-३, ६-४ असा पराभव केला. पहिल्या सेटमध्ये भूपतीने ब्रेकपॉईन्ट वाचविला एवढेच नव्हे तर एक सव्‍‌र्हिस ब्रेक घेत सेट जिंकण्यात महत्वाचा वाटा उचलला. दुसऱ्या सेटमध्ये या जोडीने दोन वेळा सव्‍‌र्हिस ब्रेक मिळविला. जेफ कोझी व जॉर्डन कॅरी यांची डॅनियल नेस्तॉर व नेनॉदी झिमोंजिक यांच्याशी गाठ पडणार असून त्यांच्यातील विजेत्यांशी भूपती व नॉलेस यांचा सामना होईल.

कामरान खानची गोलंदाजीची शैली अडचणीत
प्रिटोरिया, १ मे / वृत्तसंस्था

राजस्थान रॉयल्सचा युवा आणि तडफदार गोलंदाज कामरान खान गोलंदाजीच्या वादग्रस्त शैलीमुळे अडचणीत सापडला आहे. त्याची तक्रार संघव्यवस्थापन व इंडियन प्रीमियर लीगच्या तांत्रिक समितीकडे करण्यात आली आहे. राजस्थान रॉयल्सच्या चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यानंतर पंच रुडी कत्र्झन व गॅरी बॅक्स्टर यांनी कामरानच्या काही चेंडूंवर आक्षेप घेतला. सामना संपल्यानंतर कामरानच्या गोलंदाजीची पाहणी तिन्ही पंचांनी केली. ही पाहणी केल्यावर क्रिकेटच्या २४/३ या नियमानुसार गोलंदाजीवर कारवाई करण्याची गरज असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. हा मुद्दा आता राजस्थानच्या संघव्यवस्थापनाला कळविण्यात आला असून आयपीएलच्या तांत्रिक समितीकडेही सोपविण्यात आला आहे. आयपीएलचे प्रमुख ललित मोदी यांनी सांगितले की, या सामन्यातील सर्व पंचांची स्वाक्षरी असलेला अहवाल मला मिळाला असून त्यासोबत कामरानचे व्हिडिओ फूटेजही देण्यात आले आहे. राजस्थानचे संघव्यवस्थापन व तांत्रिक समिती आता या अहवालाची पाहणी करेल आणि नंतर कारवाईचा निर्णय घेण्यात येईल.