Leading International Marathi News Daily
शनिवार, २ मे २००९प्रॉपर्टी प्रदर्शनाचे दिमाखात उद्घाटन
पहिल्याच दिवशी ग्राहकांची झुंबड

ठाणे/ प्रतिनिधी

महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग फेडरेशन ठाणे यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या प्रॉपर्टी प्रदर्शनाचे आज शानदार उद्घाटन झाले. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी एक हजारांहून अधिक नागरिकांनी प्रदर्शनाला भेट दिली. घोडबंदर रोडवरील दोस्ती मॉल, मानपाडा सिग्नलजवळ सुरू झालेले हे प्रदर्शन ४ मेपर्यंत खुले राहणार आहे. एक लाख चौरस फूट जागेवर पसरलेल्या या प्रदर्शनात ठाणे, मुंबई परिसरातील १०० प्रकल्पांची माहिती एकाच छताखाली ग्राहकांना मिळणार आहे.

भिवंडीत पाणी आंदोलन पेटणार, सर्वत्र संताप!
भिवंडी/वार्ताहर:
भिवंडी तालुक्यात दरवर्षीप्रमाणे भीषण पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षी असमाधानकारक पाऊस पडल्याने मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ापासून पिण्याच्या पाण्याची टंचाईने उग्र स्वरूप धारण केले. साहजिकच पाण्यासाठी अहोरात्र वणवण फिरणाऱ्या महिलांचा आक्रोश वाढू लागल्याने भिवंडी तालुक्यात पाणी आंदोलन पेटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेचा प्रशासन विभाग असमर्थ ठरल्याने आता शासनाने वेळीच लक्ष घालावे, अशी मागणी भिवंडीकरांकडून केली जात आहे.

मतदानाने युतीच्या अपेक्षा उंचावल्या!
पालघर/प्रतिनिधी

पालघर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत चुरस निर्माण करणाऱ्या बहुजन विकास आघाडीने वसई ते बोईसर या शहरीपट्टय़ातून किमान ५५ ते ६० टक्के एवढे मतदान करवून घेऊ, हा मतदानापूर्वी केलेला दावा फोल ठरला आहे. त्यामुळे या भागातून कमी झालेल्या मतदानाचा फायदा युतीच्या उमेदवाराला होण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त केली जात आहे. मुंबई व ठाणे जिल्ह्यातील सर्व मिळून लोकसभेच्या १० मतदारसंघांत झालेल्या मतदानात सर्वाधिक मतदानाची टक्केवारी पालघर (४८.७९) मतदारसंघाची आहे

बदललेला कल अन् सट्टेबाजारात उलटापालट
ठाणे/प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निर्माण केलेल्या आव्हानांमुळे ठाणे जिल्ह्यातील नागर वस्तीतील मतदानात वाढ झाली आणि ठाणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघांत टक्केवारी ४०.९३ पर्यंत पोहचली. नेहमीप्रमाणे आदिवासीपट्टा, म्हणजे पालघर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक ४८.७९ टक्के मतदान झाले, तर सर्वात कमी ३४.३३ टक्के मतदान कल्याण लोकसभा मतदारसंघातील आहे. मतदारांचा बदललेला कल पाहून सट्टेबाजारात उलटापालट झाली आहे.

राज्यस्तरीय गणित परीक्षेत ‘सरस्वती’चे घवघवीत यश
ठाणे/प्रतिनिधी

गणित अध्यापक मंडळाच्या राज्यस्तरीय परीक्षेत येथील सरस्वती सेकंडरी स्कूलने घवघवीत यश मिळवले आहे. मराठी व इंग्रजी भाषेत घेण्यात येणाऱ्या या परीक्षा मालिकेला संपूर्ण राज्यात तीनही बोर्डाचे विद्यार्थी बसतात. सुरुवातीच्या संबोध व प्रावीण्य या परीक्षांत उत्तीर्ण होणारे निवडक २००० विद्यार्थी प्रज्ञा स्पर्धेला बसतात. त्यातून पहिल्या ५० क्रमांकांच्या विद्यार्थ्यांना प्रज्ञा शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. यावर्षी सरस्वती शाळेच्या अरुष आनंद भावे व चिन्मय संदीप नाईक या दोन विद्यार्थ्यांनी ही शिष्यवृत्ती व सुवर्णपदक पटकावले आहे. या दोघांनाही ठाणे जिल्हा गणित अध्यापक मंडळाने आयोजित केलेल्या समारंभात मुंबई विद्यापीठाच्या गणित विभागाचे प्रपाठक डॉ. राजेंद्र पावले यांच्या हस्ते सन्मानपत्र देण्यात आले. सरस्वती शाळेच्या अथर्व मुसळे, साकेत ओझरकर, श्रीकांत गोखले, चैतन्य शिंदे, अर्पिता वागुळदे, शिवानी मगदूम व वरदा गोडबोले या सात विद्यार्थ्यांनी रजत पदके पटकावली. या मुलांमधून पुढे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडसाठी उत्तम स्पर्धक तयार व्हावेत, यासाठी पालक-शिक्षकांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन गणित अध्यापक मंडळाच्या दि. पु. यादव यांनी याप्रसंगी केले. सेंट जॉन शाळेच्या सभागृहात हा बक्षीस समारंभ पार पडला.

‘समूहगान’ कार्यशाळेस चांगला प्रतिसाद
ठाणे/प्रतिनिधी

संस्कार भारती ठाणे समिती संगीत विभागातर्फे ‘समूहगान’ कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत सहा ते ६५ वयोगटातील २५ कलाकारांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. या कार्यशाळेत संस्कृत, कोकणी गीते, देशभक्तीपर गीते, स्वागत गीत, ईशस्तवन, संपूर्ण वंदे मातरम् असे विविध समूहगीत गायन प्रकार शिकविले गेले. यासाठी संस्कार भारती केंद्रीय संगीत विद्या सदस्या उमाताई केळकर यांनी मार्गदर्शन केले. संगीत विभागप्रमुख प्रा. कीर्ती आगाशे यांनी अशा प्रकारच्या कार्यशाळेचे नियमितपणे आयोजित करून समूहगीत गायन आणि संगीतातील उत्तम रचना अनेक रसिकांपर्यंत पोहोचविण्याचा मानस व्यक्त केला. या कार्यशाळेत भाग घेतलेल्या कलाकारांची निवडक गीते संस्कार भारतीच्या वर्षभरातील विविध कार्यक्रमांच्या वेळी सादर केली जाणार आहेत. या कार्यशाळेस संस्कार भारती अखिल भारतीय उपाध्यक्षा वर्षां तळवेलकर यांची विशेष उपस्थिती लाभली.

‘आश्रमशाळेतील टँकर घोटाळ्याची चौकशी करा’
वाडा/वार्ताहर

विक्रमगड तालुक्यातील कावळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना पिण्यासाठी व अंघोळीसाठी सप्टेंबर २००७ ते जून २००८ या दरम्यान टँकरने पाणीपुरवठा केला होता. या शाळेचे मुख्याध्यापक एन. डी. जाधव यांनी पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरच्या जास्त फेऱ्या दाखवून हजारो रुपयांची बोगस बिले काढल्याचा आरोप येथील ओजीवायएस या संघटनेने केला असून, या टँकर घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. दहा महिन्याच्या कालावधीत या ठिकाणी निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे या आश्रमशाळेसाठी खासगी ठेकेदाराकडून टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. संबंधित ठेकेदाराकडून आठवडय़ात एक ते दोन फेऱ्या टँकरने पाणी पुरविले जात असताना येथील मुख्याध्यापक जाधव यांनी दररोज टँकरने एक फेरी पाणी पुरविल्याची बोगस देयके मंजूर करून घेऊन हजारो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप संघटनेने अप्पर आयुक्त आदिवासी विभाग ठाणे यांच्याकडे पाठविलेल्या निवेदनात केला आहे.

अप्पर पोलीस आयुक्त बुरडे यांच्यासह पाच जणांना महासंचालक पदक
ठाणे/प्रतिनिधी

पोलीस खात्यातील सलग १५ वर्षांच्या उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण कामगिरीमुळे ठाण्याचे अप्पर आयुक्त (गुन्हे) प्रशांत बुरडे, कल्याणचे उपायुक्त दत्ता कराळे यांच्यासह ठाणे पोलीस आयुक्तालयातील पाच जणांना आज महाराष्ट्रदिनी पोलीस महासंचालकांचे पदक प्रदान करून गौरविण्यात आले. महाराष्ट्रदिनी आज दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहात परेड झाली. पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर पोलीस, होमगार्ड, अग्निशमन दलाच्या जवानांनी सलामी दिली. यावेळी जिल्हाधिकारी आबासाहेब जऱ्हाड, पोलीस आयुक्त अनिल ढेरे यांच्या उपस्थितीत पालकमंत्री नाईक यांच्या हस्ते पोलीस महासंचालकांचे पदक प्रदान करण्यात आले. राबोडीतील दंगलीत चोख कामगिरी बजावणारे अप्पर पोलीस आयुक्त प्रशातं बुरडे, कल्याण परिमंडळाचे उपायुक्त दत्ता कराळे, कल्याण वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त जुईकर, उल्हासनगरमधील हेडकॉन्स्टेबल जाधव, मुख्यालयातील पोलीस नाईक मुल्लाखान तडवी यांना पोलीस महासंचालकांचे उल्लेखनीय व गुणवत्ता सेवेबद्दल पदक देऊन गौरविण्यात आले. मात्र पोलिसांच्या चांगल्या कामगिरीबद्दलची माहिती ठेवण्याचे सौजन्य पोलीस नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्यांनी ठेवले नाही.

गौरव महाराष्ट्राचा’मध्ये शनिवारी विविध प्रांतातील गाणी..
आजपासून सुरू होत असलेल्या ‘गौरव महाराष्ट्राचा’ या ई टीव्ही मराठीवरील रिअ‍ॅलिटी शोचा पहिलाच भाग महाराष्ट्र दिन विशेष म्हणून सादर होत असून मराठवाडा-खान्देश, पुणे-पश्चिम महाराष्ट्र, मुंबई-कोकण, विदर्भ अशा चारही विभागांतून निवडले गेलेले १६ स्पर्धक आपापल्या भागांतील वैशिष्टय़ असलेली गाणी सादर करणार आहेत. झी मराठीवरील कार्यक्रमाबरोबरच ई टीव्ही मराठीने सुरू केलेल्या या कार्यक्रमामुळे आता मराठी प्रेक्षकांना महाराष्ट्रातील आणखी अनेक गानहिऱ्यांचे सूर दर शुक्रवार व शनिवारी रात्री ९ ते १०.३० असे तब्बल दीड तास ऐकायला मिळणार आहेत. आजच्या पहिल्या भागात सर्व स्पर्धकांची सूत्रसंचालक अमेय दाते ओळख करून देणार आहेच, पण स्पर्धकही आपल्या मातीतील गाणी गाऊन स्वरांचा नजराणा सादर करतील. पारंपरिक पोषाख परिधान करून विदर्भातून आलेले स्पर्धक मराठी साहित्यातील निवडक रचना सादर करतील तर पश्चिम महाराष्ट्र व पुण्याचे स्पर्धक संत वाड्मयातील रचना, मराठवाडा-खान्देशचे स्पर्धक शिवरायांची गाणी तर मुंबई-कोकणचे प्रतिनिधीत्व करणारे स्पर्धक शौर्यगीते सादर करणार आहेत. या टॅलेण्ट हंट शोमध्ये पहिल्या भागात गाण्याबरोबरच नृत्याविष्कारही सादर होतील, असे ई टीव्ही मराठी वाहिनीकडून सांगण्यात आले.
प्रतिनिधी

निसर्ग साहस शिबीर
ठाणे:
ट्रेकिंग, रॅपलिंग, व्हॅली क्रॉसिंग, रॉक क्लायम्बिंग, आकाश निरीक्षण, सर्पज्ञान, कॅम्प फायर, विविध खेळ इत्यादी उपक्रम ब्ल्यू व्हेल नेचर असोसिएशनतर्फे १४ ते १८ मेदरम्यान आयोजित निसर्ग साहस शिबिरात करण्यात येणार आहेत. १२ ते २१ वयोगटातील मुला-मुलींसाठी हे शिबीर आहे. संपर्क - श्रीराम कोळी - ९८९२९०३८६३.