Leading International Marathi News Daily
शनिवार, २ मे २००९
त्रिकालवेध

आपल्या अस्तित्वाचा शोध घेणे सुरू आहे

अवधूत परळकर यांनी ‘मन आणि मेंदू’ या त्रिकालवेध मधील लेखावर प्रतिक्रिया व्यक्त करताना, मन म्हणजेच मेंदू अशी व्याख्या करून अथांगतेला विशिष्ट चौकटीत

 

बसवायचा प्रयत्न केला आहे. आपले विज्ञानच असे मानते की, केवळ मेंदूच नव्हे शरीराच्या रोमारोमामध्ये चैतन्याचा, स्मृतीचा आणि बौध्दिकतेचा अंश असतो. म्हणूनच आजचे वैज्ञानिक हे मेंदूच्या पलीकडे जाऊन अवघ्या शरीरशास्त्राचा वेध घेतात.

माणसाचं मन अथांग आणि स्वभाव अनाकलनीय, म्हणूनच माणसाच्या कायम कुतुहलाचे हे विषय. ‘त्रिकालवेध’मधल्या या विषयाच्या उहापोहावर असंख्य वाचकांनाही आपले मानस व्यक्त करावेसे वाटले, प्रतिक्रिया द्याव्याशा वाटल्या. त्यातल्याच काही निवडक प्रतिक्रिया.

‘विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेचि झाले देहब्रह्म’ असे १३ व्या शतकात लिहिणाऱ्या संत ज्ञानेश्वरांना मनाच्या अमूर्त अस्तित्वाची जाणीव झाली होती. आध्यात्मिक अर्थाने ते भौतिक इहलोकापलीकडे पोहोचले होते, असे मानले तरी त्या अथांग, अपरिमित आणि अनादी अशा विश्वब्रह्माची आर्त ‘जाणीव’ त्यांना ‘सदेह’ झाली होती. ‘मेंदूच्या’ स्वतंत्र जैविक अस्तित्वाची जाणीव ज्ञानेश्वरांना असणे शक्य नव्हते; कारण मनाचे प्रकटीकरण मेंदूद्वारे होते, असा वैद्यकशास्त्रातला विचार ज्ञानेश्वरानंतर पुढे बऱ्याच काळाने प्रसृत झाला. सतराव्या शतकाच्या अखेरीस (१६७५) ‘थॉमस विलीस’ या शास्त्रज्ञाने मेंदूवर जे सखोल संशोधन केले, ते आजही ‘न्यूरोसायन्स’चा पाया मानले जाते.
‘थॉमस विलीस’ला मनाद्वारे होणाऱ्या संवेदनांची व जाणिवांची कल्पना होती. त्याला शोध घ्यायचा होता आत्म्याचा. त्याला वाटले आत्म्याचे तीन भाग असावेत- ‘अत्यावश्यक’, ‘तार्किक’ व ‘अमर्त्य!’ बहुधा त्या ‘अमर्त्य’मध्ये त्याला ज्ञानेश्वरांची अमूर्तताही अभिप्रेत असावी; परंतु त्या आत्म्याचा शोध घेण्यासाठी विलीसला शरीरविज्ञान शास्त्र व मेंदूचा अभ्यास अपरिहार्य वाटत होता. विलीसने लहान कीटकांपासून ते बकरीसारख्या सस्तन प्राण्यांच्या मेंदूचा सखोल अभ्यास केला होता व त्याचे असे ठाम मत होते, की माणसाचा मेंदू कित्येक पटींनी भौतिकदृष्टय़ादेखील अधिक प्रगत आहे व ‘शिकण्याची व समजण्याची प्रक्रिया’ माणसाच्या मेंदूत विलक्षण वेगाने होते. कित्येक मानसिक आजारांचे मूळ हे मेंदूतल्या बिघाडात आहे, असे महत्त्वाचे प्रतिपादन त्याने केले. १७ व्या शतकाच्या काळात हा विचार मांडणे हे अत्यंत क्रांतिकारीच होते; परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट ही, की त्याने मन व मेंदूमधला भौतिक संबंध प्रस्थापित केला होता आणि तरीही त्याला असे वाटत होते, की फक्त मानवातच त्या ‘अमर्त्य’ आत्म्याचा अंश आहे, त्याचा पूर्ण थांग त्याला लागलेला नव्हता. जाणिवांच्या अस्तित्वासाठीची शेवटाची पायरी ‘स्मृतीत’ आहे, असे मात्र त्याला वाटत होते.
परंतु विलीसप्रमाणेच आपल्या जाणिवेच्या गाभाऱ्यातून निर्माण होणाऱ्या कुतूहलास भौतिक आधार असणे आवश्यक वाटणारे कमी नव्हते. ज्ञानेश्वरांच्या वैश्विक जाणिवेची हाक त्या अर्थाने खरोखरच वैश्विक होती. पिंडापासून ब्रह्मांडाचा शोध घेणाऱ्या साहसी वीरांची एक मालिकाच १६ व्या शतकांपासून सुरू झाली, त्याचा पाया कोपर्निकस (१४७२-१५४३) ने रचला होता. विश्वाच्या स्थिती व गतीबरोबरच व त्याच्या नियमांना ताणणे हे त्यांना महत्त्वाचे वाटत होते; परंतु विशिष्ट पद्धतीने ‘वागणं विश्व’ ‘जाणणे’ हे मनाद्वारेच शक्य होते. त्याचा विलक्षण अन्योन्य संबंध ‘गणितातल्या’ समीकरणांशी व सूत्राशी जोडला जात होता. म्हणजे नियमात बसणारे ‘अचपळ’ मन (किंवा मेंदू) विश्वाचा भाग होते व ते अथांग विश्व मात्र विशिष्ट नियमानुसार वागत होते. तसे प्रयोगांद्वारे, निरीक्षणांद्वारे सिद्ध केले जात होते. कोपर्निकसनंतर आलेल्या गॅलिलिओ (१५६४-१६४२) व न्यूटनने (१६४२-१७२७) ने आधुनिक विज्ञानाचा पाया रचला होता. म्हटले तर गॅलिलिओ, न्यूटन आणि विलीसची क्षेत्रे वेगळे होती, पण सूत्र एकच होते- जाणिवांचा आणि अस्तित्वाचा शोध, ज्याचे मूळ त्यांच्या ‘मनात’ होते!
परंतु ज्याला आपण ‘जाणीव’ म्हणतो, तशी जाणीव फक्त माणसांनाच असते असे नाही तर समुद्रातल्या आदिम हायड्रिलापासून ते आकाशात झेपावणाऱ्या गरुडापर्यंत आणि वारुळात सरपटणाऱ्या सापापासून ते वारूळ बनविणाऱ्या मुंग्यांनाही ती असतेच! किंबहुना ‘मुंग्यांचे वारूळ’ हा आधुनिक विज्ञानासाठीचा सर्वात मोठा अभ्यासाचा विषय आहे. अत्यंत सुबक व शिस्तबद्ध पद्धतीने बनविलेले वारूळ हा स्थापत्य शास्त्रातला एक उत्तम नमुना आहे. त्या वारूळाचे व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सैनिक मुंग्या, वारूळाच्या मुख्य असणाऱ्या राणीमुंग्या यातली गणिती व्यवस्था माणसांना लाजवेल, अशी आहे. माणसांच्या सिव्हिलायझेशनला समांतर असे अत्यंत प्रगल्भ ‘सिव्हिलायझेशन’ या पृथ्वीतलावावर असणाऱ्या एकूण जैविक वस्तुमानाच्या (इ्रें२२) तब्बल दहा टक्के आहे. आता प्रश्न असा उरतो, की मुंग्यांना माणसाप्रमाणे गणिताचे ज्ञान नाही, माणसांप्रमाणे प्रगल्भ ‘मेंदू’ नाही; तरीही अत्यंत जटील अशा जीवन साखळीत व जीवन प्रवाहात त्या खलाश्या चैतन्याने आपले ‘अस्तित्व’ समर्थपणे टिकवून ठेवले आहे. (माणसांना त्या ‘अस्तित्वाची’ जाणीव मुंगी करकचून चावल्यावर होते; परंतु तरीही मुंगी माणसाला चावून स्वत:चा ‘आत्मघात’ का करते, हे एक गूढच आहे.) निश्चितपणे त्या प्रवासाच्या ‘स्मृती’ मुंग्यांच्या पेशीत साठून राहिलेल्या असल्या पाहिजेत!
१९ व्या शतकाच्या सुरुवातीला जन्माला आलेल्या चार्लस डार्विनला सर्व सजीवांच्या त्या खडतर प्रवासात एक समान सूत्र दिसत होते. अस्तित्वाची लढाई व लढाईतून बदलत गेलेले अस्तित्व व पुन्हा लढाई असे ते सूत्र होते. त्या लढाईची ‘स्मृतिचित्रे’ सजीवाच्या प्रत्येक पेशीत कोरली जात होती. लढाईतून होणाऱ्या बदलातून नवीन जीव आकार घेतो, हे त्यातूनच सिद्ध झाले आणि ‘ओरिजिन ऑफ स्पिसिज’ जगमान्य पावला. विश्वाचे नियम, सजिवांचे अस्तित्व आणि मेंदू व मनातला संबंधला डार्विनच्या सिद्धान्ताने अशा तऱ्हेने वेगळे वळण लागले होते. वरवर त्याचा परस्पर संबंध नसतानाही!
परंतु माणसांच्या पेशीत व अस्तित्वातल्या स्मृतिचित्रांचा महत्त्वाचा अध्याय लिहिला गेला. १९५० मध्ये लागलेल्या ‘डीएनए’च्या शोधामुळे. डीएनए किंवा ‘जैविक अणू’ म्हणजे सजिवांच्या हजारो वर्षांच्या भौतिक अस्तित्वाचा एक सारांशच आहे. सजिवांचा जैविक मसावी, स्मृतिचित्रांचा मागोवा आणि अस्तित्वाचा नकाशा!
अस्तित्वाच्या निरंतर लढाईत सतत ‘म्युटेड’ होणाऱ्या डीएनएमुळेच एड्सवर वा मलेरियावर औषध सापडलेले नाही! एका अर्थाने डीएनएच्या सिद्धान्ताने सर्वच सजीव एकमेकांचे ‘नातलग’ आहेत हे सिद्ध झाले. ज्ञानेश्वरांना वाटणाऱ्या वैश्विक जाणिवेला असाही जैविक अर्थ आहे, हे विज्ञानाने सिद्ध केले.
डीएनएच्या शोधाने जीवविज्ञान एका विशिष्ट टप्प्यावर आले होते; परंतु विलीसने सुरू केलेल्या मेंदूचा व मनाचा शोध आणि न्यूटननी उभारलेली आधुनिक विज्ञानाची गुढी यांनीसुद्धा विलक्षण प्रगती केली होती. मनाच्या प्रगटीकरणातून होणाऱ्या वेगळ्या समस्यांचा शोध ‘सिग्मंड फ्रॉइड’ या मानसशास्त्रज्ञाने घ्यायला सुरुवात केली होती आणि २० वे शतक उजाडता उजाडताच जणू विज्ञान र्सवकष निष्कर्षांप्रती आलेले आहे, यावर जागतिक विचारवंतांचे जणू एकमत झाले होते. जाणिवचे अंतरंग अजूनही गूढ असले, तरी तो एक सुटलेला धागा होता, असे शास्त्रज्ञांना वाटू लागलेले असतानाच आइनस्टाइन व ‘क्वान्टम’ थिअरीने जगपटलावर जन्म घेतला. वेळ ही सापेक्ष असते आणि आपल्या समोर दिसणारे वा वाटणारे सत्य हे आपल्या विशिष्ट निरीक्षणातूनच ‘तयार’ होत असते. हा सिद्धांत अक्षरश: झोप उडविणारा होता व आजही त्याचा पुरेसा थांग लागलेला नाही. परंतु त्या सिद्धांताने एक गोष्ट मात्र केली, की वरवर वेगवेगळ्या वाटणाऱ्या विज्ञानाच्या सर्व शाखांमध्ये एक समान सूत्र असले पाहिजे व मेंदूच्या भौतिक अस्तित्वापलीकडे ‘कॉन्शसनेस्’ ऊर्फ मनाचे अस्तित्व असू शकेल व त्याला प्रस्थापित विज्ञानांच्या निकषात बसविता येणार नाही. यावर भौतिकशास्त्राच्या आघाडीच्या काही शास्त्रज्ञांनी आता विचार करायला सुरुवात केली आहे. विलक्षण योगायोगाची गोष्ट म्हणजे, सर्व विज्ञानाचा प्रवास हा स्थुलाकडून सूक्ष्माकडे झालेला आहे व सूक्ष्मातून स्थुलाचा वेध घेणे सुरू आहे!
कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीत ‘मेंदू वा जाणीव’ या विभागाचे प्रमुख असणाऱ्या ‘व्ही. रामचंद्रन’ यांच्या मध्ये विज्ञानापुढचे सध्याचे आव्हान ‘कॉन्शसनेस’ म्हणजे काय, हे जाणणे हेच आहे. कला, संस्कृती, संगीताचा उगम, त्याला मूर्तस्वरूप देणारा मेंदू आणि त्याला असणारे भावनांचे व स्मृतींचे कोंदण या गोष्टी इतक्या विलक्षण गुंतागुंतीने एकमेकांत गुंफल्या गेल्या आहेत, की त्याचा स्वतंत्र माग घेणे ही कर्मकठीण गोष्ट आहे. माणसाच्या ‘मनाचे’ प्रगटीकरण ‘मेंदू’त होत असले तरी, माणसाच्या हजारो वर्षांतल्या प्रवासाचे स्पष्टीकरण केवळ ‘मेंदूच्या’ शरीर विज्ञानाच्या माध्यमातून देता येणार नाही, तसे त्यांचे मत आहे. ‘मेंदू’ हा माणसांच्या प्रत्येक पेशीत साठवलेल्या स्मृतिचित्रांचा सूत्रधार असतो, तरीही ‘करुणा, प्रेम, नाणी, जाणीव, लय, सूर अशा भावनिक व मानसिक अंगांचे स्पष्टीकरण देण्यासाठी विज्ञानाला अजून ‘मना’चा शोध घ्यायला लागणार आहे, असे त्यांचे मत आहे. तर प्रसिद्ध भौतिक शास्त्रज्ञ ‘रॉनर पेनरोज’ यांच्या मते त्या अथांग, अपरिमित व गणिती सूत्रातल्या विश्वाची जाणीव माणसाच्या मनाला कशी होते व त्यातून ‘स्व’ अस्तित्वाचा अर्थ कसा लागतो, याचा शोध घेणे म्हणजे मनाचा शोध घेणे. प्रस्थापित वैज्ञानिक पद्धतीत तो केवळ अशक्य आहे, असे ते म्हणतात. म्हणूनच मेंदू, मन व स्मृती या गोष्टी आपल्याला वापरता येणार नाहीत. माणसाच्या मेंदूला असा हजारो वर्षांचा ‘इतिहास’ असल्याने व स्मृतींना मनाची झालर असल्याने, आपल्याच अस्तित्वाचा शोध विज्ञानाने नुकताच सुरू केला आहे.
ज्ञानेश्वरांना या इहलोकात व भौतिक अस्तित्वातच त्या वैश्विक आर्ततेची व एकसंधतेची ‘जाणीव’ झाली होती. म्हणूनच ‘अवघेचि झाले देहब्रह्म’ असे ते म्हणू शकले.
चिन्मय बोरकर,
अंधेरी, मुंबई
Chinmay.borkar@gmail.com

स्व-भाव आणि स्व-धर्म

‘धर्म’ म्हणजे ‘धर’ अधिक ‘म’. ‘धर’ हा उपसर्गघटीत शब्द ‘धरणीमाते’शी तर ‘म’ हा प्रत्ययघटीत शब्द ‘अखिल मानवजाती’शी निगडित आहे. अर्थात या भूतलावर राहणाऱ्या प्रत्येक माणसाचा केवळ एक व एकच ‘स्वधर्म’ आहे.
‘स्वधर्म’ म्हणजे ‘स्व’चा ‘धर्म’ करणे. ‘स्वधर्मा’चा ‘स्वत:चा धर्म’ असा संकुचित अर्थ मुळीच नाही. कारण ‘स्व’ एक आद्य व परमतत्व असून, त्याचे ठायी नाना सुप्त कलागुण विराजमान आहेत. ‘स्व’पासूनच आध्यात्मिक तसेच वैज्ञानिक भावविश्वाची निर्मिती झाली आहे. ‘स्व’चा ‘स्वर’ व्हावा ‘स्वैर’ नाही.
केवळ निजस्वार्थाने माणूस स्वधर्माला विशिष्ट नामसंबोधनांनी लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न करतो, परंतु तसा तो वागत नाही. त्यामुळे आमच्या धर्माच्या कार्यप्रणाली सदोष आहेत. आम्ही सत्ययुगाकडून कलियुगाकडे वाटचाल केली आहे. ‘धर्मा’च्या मार्गाने ‘धर्माध’ न होता ‘धर्म मुक्त’ व्हा व ‘स्वधर्म’ पाळा, हीच काळाची गरज होय. कोणताही ‘धर्म’ श्रेष्ठ वा कनिष्ठ नाही. कोणत्याही धर्माच्या मार्गाने आमचा खरा ‘स्वधर्म’ कोणता हे कळायला हवे. चैतन्य स्वरूप ऊर्जाशक्ती म्हणजे आत्मा हेच ते काय वैज्ञानिक सत्य! या आत्म्याचे अस्तित्व म्हणजे मानवी स्वभाव, ‘स्व’पासून सदभाव मुक्त करण्याचा कोणताही आत्म्याचा धर्म (दान) म्हणजे ‘प्रेम व माणुसकी’ होय. अशा प्रेमात मानवी शरीराला कोणतेही मूल्य उरत नाही.
आमचे ‘स्वभाव’ विभिन्न आहेत, खरे पाहता ही निसर्गाची मानवाला लाभलेली फार मोठी देणगी होय. यामुळे आमची या मानव समाजात एक विशिष्ट ओळख आहे. जे धर्मसंस्थापकांचा देहावसनानंतर वा दुरावासात घडले, ते पुन्हा घडू नये याकरिता आम्ही ‘सावधान’ असायला हवे. प्रत्येक धर्माचे केवळ एक व एकाच ‘स्व’ अंशात विसर्जन करावे लागणार, मग ‘सर्वधर्मसमभावा’सारखी दुटप्पी वृत्ती बाळगण्याचे कोणतेही प्रयोजन उरणार नाही. ही दुटप्पी, धूर्त व लबाड लोकांची धार्मिक, सामाजिक वा राजकीय खेळी होय. ज्याला आपला खरा स्वधर्म कोणता हे कळले तो घरात एक धर्म, बाहेर येताच सर्वधर्मसमभाव व वैश्विक पातळीवर ‘मानव धर्म’ असा भावनिक खेळखंडोबा करणार नाही. वास्तविक अशाच जातीधर्मातील भेदाभेदामुळे आमची मानसिक, शारीरिक व आर्थिक ओढाताण होत आहे.
‘स्वत्व’ हीच ‘देवत्व’ व ‘पूर्णत्व’ दर्शनाची कसोटी होय. स्वर्ग, मोक्ष, निर्वाण, जन्नत, पॅराडाइज या सर्व मानवनिर्मित वा कपोलकल्पित संकल्पना होत. त्या वैज्ञानिक कसोटीवर कधीही खऱ्या उतरल्या नाहीत. ‘अदि’ अधिक ‘आत्मा’ ते ‘अध्यात्म’ म्हटले जाते. याचा सरळ सोपा अर्थ एवढाच, की आम्हाला आत्म्याच्या पलीकडे जाऊन विवेकपूर्ण संशोधन करायचे आहे तरच आम्ही सुखी व समाधानी होऊ शकतो.
पूजाअर्चा, कर्मकांड, व्रतवैकल्ये, नवसबळी म्हणजे धर्माचा उपहास असून, आध्यात्मिक मार्गाने विज्ञानाची कास धरणे हाच हे मानवजीवन सार्थक करण्याचा आत्मजागरणाचा मार्ग होय यासाठी गरज आहे. सर्व धर्माना एकाच अंशात विसर्जित करून ‘स्व’वर लक्ष केंद्रित करण्याने आम्ही जगाला काय देऊ शकतो, याचा विचार व्हायला हवा. जगाने काय दिले याचा विचार जे लोक करतात ते कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. मग त्याच्या पदरात यश वा अपयश कधीच पडणार नाही. ज्याला आपले जीवन घडवायचे असते तो ‘निर्णय’ घेतो आणि आम्हालाही तसा निर्णय घ्यायचा आहे. आमचे सर्वच धर्मसंस्थापक ‘स्वधर्माचे प्रणेते’ म्हणजेच धर्ममुक्त स्वामी होते. त्याला कोणताही विशिष्ट नाम धर्म नव्हता. त्यामुळे त्यांची या मानव समाजात एक विशिष्ट ओळख निर्माण झाली होती. त्याचा काही स्वार्थाध ‘धर्मोपदेशक वा धर्मोपासक मंडळीं’नी दुरुपयोग केला. त्यांना त्यांची जागा जरूर दाखवा. तरच आम्हाला आमचा एक व एकच असा खरा स्वधर्म प्रस्थापित करता येईल.
‘स्व’शिवाय कोणतीही स्वयंअनुभूती कोणालाही होणे शक्य नाही. म्हणून ‘स्व’ठायी असलेला सदगुण व अवगुणाचे पृथ्थकरण करून ‘स्व-सशक्तीकरण’ वा आत्मोन्नती कशी साध्य करता येईल, यावर सर्वच स्तरातून सार्थ विचारमंथन व्हायला हवे. तरच आमचा भारत देश स्वतंत्र होईल.
प्रा. जगदीशचंद्र बोडाखे,
वाशीम

मनोज्ञ दर्शन

‘एक चेहरे पे कई चेहरे’ (२५ एप्रिल) हा लेख प्रत्येकाला आत्ममग्न करायला लावणारा आहे. प्रतिष्ठा हा सध्याचा परवलीचा शब्द झाला आहे. समाजातील प्रत्येकजण या प्रतिष्ठेच्या मोहात अडकलेला दिसतो. आपल्याच प्रतिमेच्या मोहात पडलेले अनेकजण आजूबाजूला दिसतात. राजकारण्यांपासून ते अभिनेत्यांपर्यंत आणि लेखकांपासून ते उद्योगपतींपर्यंत सगळेचजण आपापली एक प्रतिमा तयार करतात आणि मग त्यांचा नार्सिसस होतो. अशा आत्ममग्न व्यक्तींपासून सावध राहायचे ठरवले तरीही खरे खोटे समजणे अवघड जाते. आपण ज्या समाजघटकात किंवा स्तरात जीवन जगत असतो, त्याच्यापेक्षा वरच्या श्रेणीत जाण्याची सगळ्यांची धडपड असते. ही धडपड किती वृथा असते, याचे मनोज्ञ दर्शनच या लेखातून पाहायला मिळते. शेवटी जगण्याचा दर्जा ‘स्टेट्स’ ठरवते की मनाच्या आतली भावना, हा प्रश्न खरोखरच विचार करण्यास प्रवृत्त करणारा आहे.
एखाद्या गहन विषयावर इतक्या सोप्या शैलीत विचार व्यक्त करणे कुणाही समाजशास्त्रज्ञाला का बरे जमत नाही, असा प्रश्न ‘त्रिकालवेध’ हे सदर सुरू झाल्यापासूनच पडतो आहे.
रणजित पाटील,
कोल्हापूर