Leading International Marathi News Daily
शनिवार, २ मे २००९

चारा गुरेढोरे विक्रीला
अकोला, १ मे / प्रतिनिधी
अकोला जिल्ह्य़ात चारा टंचाईचा प्रश्न गंभीर झाला असून, यामुळे पशुपालकांवर गुरे विकण्याची वेळ आली आहे. यासंदर्भातील प्रशासकीय पातळीवरील प्रयत्न प्राथमिक स्तरावरच असल्यामुळे तातडीने चारा उपलब्ध होण्याची शक्यता मावळली आहे.
पाणी टंचाईने जिल्ह्य़ात उग्र स्वरूप धारण केले आहे. या संकटाशी शेतकरी सामना करीत असतानाच, गेल्या काही दिवसांत चारा संकटही निर्माण झाले आहे. गुरांसाठी चारा मिळेनासे झाल्यामुळे शेतकऱ्यांवर गुरे विकण्याची पाळी आली आहे. अकोला जिल्ह्य़ात लहान मोठी गुरांची संख्या सहा लाखाहून अधिक आहे.

टंचाई विहिरीत पडून मृत्यू
आर्वी, १ मे / वार्ताहर

शहरातील तीव्र पाणीटंचाईने आज एका वृद्धाचा बळी घेतला. विहिरीत पाणी बघावयास गेलेल्या किसनचंद भिकचंद बुधवाणी (६०) यांचा तोल जाऊन कोरडय़ा विहिरीत पडल्याने मृत्य झाला. शहरात सर्वत्र तीव्र पाणी टंचाई आहे. जाजूवाडी येथील विहिरीत जलवाहिनीद्वारे लाडेगाव योजनेचे पाणी सोडण्यात येते. परंतु, मागील ४-५ दिवसांपासून ही जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजता बुधवाणी हे त्यांच्या नातवांसोबत घराशेजारच्या या विहिरीवर गेले.

वन्यप्राण्यांची गावांकडे धाव
भंडारा, १ मे / वार्ताहर

जिल्ह्य़ातील जंगलातील पाणवठे कोरडे पडल्याने वन्यप्राणी गावांकडे धाव घेत असून शिकाऱ्यांच्या तावडीत पडत आहेत. जंगलातील पाणवठे कोरडे पडत चालले आहे. जिल्ह्य़ात लहानमोठे तलाव कोरडे पडत आहेत. त्यामुळे वन्यप्राणी गावाकडे धाव घेत आहेत. पाण्यासाठी गावात आलेल्या व वाट चुकलेल्या प्राण्यांना जीव गमवावा लागतो. त्यांची सर्रास शिकार होते. केसलवाडा येथे तलावाच्या काठावर मागील आठवडय़ात एक नीलगाय मृतावस्थेत आढळली.

कथ्थक व मणिपुरी नृत्याची नजाकत
डॉ. सुलभा पंडित

‘स्पीक मॅके’ या सांगीतिक चळवळीने आता नागपूर विदर्भात चांगले स्थान निर्माण केले आहे. अखिल भारतीय कीर्तीच्या अनेक कलावंतांना शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमोर याच एका माध्यमातून आणले जाते. नव्या पिढीपर्यंत शास्त्रीय संगीताचे उत्तम आदर्श या चळवळीद्वारे ठेवले जातात. आश्चर्य म्हणजे, एरवी भरपूर बिदागी मागणारे जानेमाने कलावंत या चळवळीद्वारे मात्र सहजपणे विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होतात.

पाणी घाटंजीत ठणठणाट
घाटंजी, १ मे / वार्ताहर

यावर्षी अत्यल्प पावसामुळे पाण्याची पातळी खोल गेल्याने तसेच नदी व नाले पूर्णत: आटल्याने घाटंजी तालुक्यात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजनांवर २२ ते २३ लाख रुपये मंजूर करण्यात आले. मात्र, अजूनपर्यंत एकाही गावात पाणी टंचाई उपाययोजना अंमलात आलेली नाही.
तालुक्यातील पारवा, कुर्ली, शिवणी, पार्डी (नरकरी), भांबोरा, सायफळ, गोविंदपूर, बिल्लायता, फनारवाडी (पोड), नामापूर (तांडा), घोटी, चिखलवर्धा यासह अनेक गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे, अनेक गावात जलस्रोत आटले असून पाण्याची पातळी खोल गेलेली आहे. काही ठिकाणी तर नदी व नाल्यात खड्डे खोदून नागरिक दूषित पाणी पित असल्याने गॅस्ट्रो व इतर आजार होण्याची भीती व्यक्त होत आहे. घाटंजी तालुक्यात पाणीपुरवठा योजना सुरळीत झालेली नाही. अनेक गावात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई आहे.

आंदोलनाचा इशारा
अकोला, १ मे / प्रतिनिधी

आकोट तालुक्यातील ८४ खेडी पाणीपुरवठा योजना कोलमडल्यामुळे परिसरातील गावांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. ही समस्या न सुटल्यास आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. या आशयाचे निवेदनही उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे. पाणी टंचाईमुळे गावकरी त्रस्त झाले असून, आठ दिवसांत पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. पाणीप्रश्न न सुटल्यास आंदोलन करण्याचा इशाराही गावकऱ्यांनी दिला आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदन सादर केले असून, यासाठी दीपक इंगळे, प्रकाश पुंडकर, शंकर मेहनकर, महादेव इंगळे, मोहन कपले, गणेश ढोरे, महादेव सुरतकार आदींनी पुढाकार घेतला आहे.

नळयोजनेच्या दुरुस्तीसाठी ११ लाख मंजूर
वाशीम, १ मे / वार्ताहर

जिल्ह्य़ातील पाणीटंचाई ग्रस्त ७ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या नळयोजनांच्या ११ लाख २४ हजार ७५५ रुपयांच्या दुरुस्ती करण्याच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिल्याची माहिती जिल्हाधिकारी उदय राठोड यांनी दिली. प्रशासकीय मंजुरी देण्यात आलेल्या सातही गावांना, नळयोजनेच्या विशेष दुरुस्ती कामात विहिरीतील गाळ काढणे, विद्युत पंपाची दुरुस्ती, पॅनल बोर्ड, स्टार्टर, केबल दुरुस्ती, व्हॉल्ह बसवणे, उध्र्वनलिकेच्या गळतीची दुरुस्ती करणे, नवीन जलवाहिनी टाकणे यासह आदी कामांचा समावेश आहे.पाणीटंचाई भासणाऱ्या वाशीम तालुक्यातील काकडदाती येथील नळयोजना विशेष दुरुस्तीसाठी १ लाख ३४ हजार ७०० रुपये, मालेगाव तालुक्यातील शिरसाळा येथील नळयोजना विशेष दुरुस्तीसाठी १ लाख ८३ हजार ३२० रुपये, मानोरा तालुक्यातील शेंदोना येथील १ लाख ४९ हजार ७३५ रुपये, वॉर्डासाठी १ लाख ९५ हजार रुपये, धावंडा येथे १ लाख ६७ हजार रुपये, खेर्डा येथे ३३ हजार रुपये आणि गिर्डा येथील नळयोजनेच्या विशेष दुरुस्तीसाठी २ लाख ६२ हजार रुपये असा एकूण ११ लाख २४ हजार ७५५ रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली असून ही सर्व कामे वाशीम जिल्हा परिषदेमार्फत पूर्ण करण्यात येणार आहेत. प्रशासकीय मंजुरी देताना ही कामे विहीत कालावधीत पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी उदय राठोड यांनी दिले आहेत.

गोंदियात उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम
गोंदिया, १ मे / वार्ताहर

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्यावतीने महाराष्ट्र इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाच्या सहकार्याने मागासवर्ग प्रवर्गातील बेरोजगार युवक-युवती करिता नि:शुल्क उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. युवक-युवती वयोमर्यादा १८ ते ३५ वर्षे आवश्यक असून इच्छुकांनी प्रवेश अर्ज व अधिक माहितीकरिता वाय.आर. वाघमारे (प्रकल्प अधिकारी) किंवा एच.एस. कोटांगले (९४२०३५६९५०) जिल्हा समन्यवक बोपचे चाळ, बालाघाट मार्ग गोंदिया दूरध्वनी ०७१८२-२५०२७४ येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वाढत्या भारनियमनाने नागरिक संतप्त
रिसोड, १ मे / वार्ताहर

शहरामध्ये बुधवारी सकाळी आठ वाजतापासून मध्यरात्री दोन वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित झाल्याकारणाने नागरिक संतप्त झाले. बुधवारी सकाळपासून वीज पुरवठा बंद झाल्याने नागरिकांना असाह्य़ उकाडा सहन करावा लागला. वीज पुरवठा खंडित होणे व भारनियमनाचे कोणतेच वेळापत्रक राहिले नसून तांत्रिक बाबी समोर करून दिवस- रात्री केव्हाही भारनियमन केले जात आहे. दिवसभर कामामुळे थकलेल्यांची यामुळे झोपमोड होत आहे. अठरा तास वीज पुरवठा खंडित राहत असल्याने विजेवर अवलंबून असलेले व्यावसायिक डबघाईस आले आहेत. ऑईल मिल, चित्रपटगृह, पीठ गिरण्या, रसवंती, ज्युस सेंटर, आईस्क्रीम पार्लर, डेअरी इत्यादी व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. तांत्रिक अडचणीचे कारण समोर करून वीज वितरण कंपनीकडून वीज पुरवठा भारनियमनाव्यतिरिक्त खंडित करण्यात येत असल्यानेही नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. शहरात कधी कधी पहाटेपासून वीज जाऊ लागल्याने नागरिकांची दिनचर्या बदलून जात आहे.

रानडुकराची शिकार; तिघांना अटक
भंडारा, १ मे / वार्ताहर

सुकळी नकुल आणि बपेरा रोपवाटिकेत रानडुकरांची शिकार केल्याप्रकरणी बपेरा वनविभागातील अधिकाऱ्यांनी तीन आरोपींना अटक केली. बपेरा आणि सुकळी नकुल गावाच्या घनदाट नर्सरीत तीन शिकाऱ्यांनी मध्यरात्री रानडुकराची शिकार केली. पिशवीत मटन घालून आरोपी गावाकडे परत येत असल्याची माहिती क्षेत्र सहाय्यक सी.जी. पोतुलवार यांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. वनविभागातील बीट वनरक्षक, डी.एच. खंडाते, वनमजूर एम.टी. कुंभरे, हसुले, राने यांनी तयार केलेल्या सापळ्यात शिकारी अडकले.
त्यांनी आरोपीकडून १० किलो रानडुकराचे मांस जप्त केले. वनपरिक्षेत्र अधिकारी ए.एस. मेश्राम यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक पोतुलवार तपास करीत आहेत. या प्रकरणी संतोष शालिक उके (२०), बीरज पेंढारू नान्हे (३०), आशीष भाऊदास मेश्राम (२१) रा. देवरीदेव यांना अटक करण्यात आली.

गुन्ह्य़ांचा शोध लावण्यात पोलीस अपयशी ठरल्याचा आरोप
चिखली,१ मे / वार्ताहर

शहर व तालुक्यात चोऱ्या, घरफोडय़ांसह इतर गुन्ह्य़ांत वाढ झाली असून पोलीस प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष गणेश बरबडे यांनी केले आहे. पोलीस अधीक्षकांना यासंदर्भात दिलेल्या निवेदनात शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. गणपती मंदिर व रामदेवबाबा मंदिरातून चांदीच्या टोपांची झालेली चोरी यासह शहरातील लहानमोठय़ा चोऱ्या व घरफोडीच्या प्रकारापैकी कोणत्याही गुन्हेगारास पकडण्यात पोलिसांना यश मिळाले नसल्याचा आरोपही बरबडे यांनी केला आहे. वाहतूक पोलीस वाहनधारकानंना त्रास देऊन टॅक्सीचालकांवर कोणताही अंकुश ठेवत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. चार दिवसांपूर्वीच तरुणांना भोसकण्याचे प्रकार घडले असून अद्याप एकाही आरोपीला पकडण्यात आले नाही, याबद्दल त्यांनी रोष व्यक्त केला आहे.

सामूहिक सोहोळ्यात १२ जोडपी विवाहबद्ध
गोंदिया, १ मे / वार्ताहर

कुणबी- मराठा सेवा संघ व नवयुवक कुणबी समाज मंडळाच्यावतीने भजेपार येथे नुकत्याच झालेल्या सामुहिक विवाहसोहोळ्यात १२ जोडपी विवाहबद्ध झाली. या सोहोळ्यात भजेपार, र्इी, इसनाटोला, किंडगीपार, दतोरा, कलपाथरी, माल्ही, देवगाव, ठाणा, आवरीटोला या गावातील जोडप्यांनी भाग घेतला. या कार्यक्रमास कुणबी- मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर माहोरे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष दीपक कदम, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष प्रांजली बोरकुटे, भरत बहेकार, बबलु दोनोडे, डॉ. सुरज बहेकार, लीलाधर पाथोडे, प्रा. प्रकाश धोटे, प्रशांत बोरकुटे, रमेश ब्राह्मणकर आदी उपस्थित होते. संचालन रामेश्वर बहेकार यांनी केले. याप्रसंगी दामाजी मेंढे, जयराम चुटे, काशिराम बहेकार, चमरू शिवणकर, तुकाराम मेंढे, रोशन बहेकार, गोमाजी चुटे आदी उपस्थित होते. नवविवाहित जोडप्यांना कुणबी मराठा सेवा संघाच्या जिल्हा शाखेकडून भेट वस्तू व प्रमाणपत्र देण्यात आले.

दारूगोळा कारखान्याची जलवाहिनी फुटली
भंडारा, १ मे / वार्ताहर

दारूगोळा निर्मिती कारखान्याच्या पाणीपुरवठा विभागाची जलवाहिनी कोरंभी येथे तिसऱ्यांदा फुटली. यामुळे या जलवाहिनीतून ३० फूट उंच कारंजे उडू लागले आहेत. कोरंभी ते कारखान्याचे अंतर १२ किलोमीटर एवढे आहे. गोसीखुर्द धरणामुळे जुनी जलवाहिनी कालबाह्य़ होणार आहे. याकरिता नव्याने तीन ते चार किलोमीटर नवीन जलवाहिनी टाकण्यात आली. सालेबर्डी नवीन पुलाच्या वळण रस्त्यावरील जलवाहिनी यापूर्वी ज्या ठिकाणी फुटली होती, तेथेच पुन्हा फुटल्याचे निदर्शनास आले आहे. १५ दिवसांपूर्वी कंपनी महाप्रबंधक यांनी वैनगंगा नदीला भेट देऊन तेथील असलेल्या जलस्त्रोताची पाहणी केली होती. एकीकडे कारखान्याला पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे दीड तासाच्या पाणीपुरवठय़ात कपात करून वसाहतीमध्ये पाणी देण्यात येत आहे. संबंधित विभाग फुटलेल्या जलवाहिनीकडे दुर्लक्ष करीत आहे. कोरंभी ते कारखाना सीमेपर्यंत दोन फूट रुंदीचे असलेले व ९ किलोमीटर अंतराची जलवाहिनीची देखभाल कोरंभी पाणीपुरवठा विभाग करीत आहे. मात्र, याकडे त्यांचे दुर्लक्ष झालेले आहे.

सूर्योदय धरतीपुत्र ज्ञान प्रबोधिनी शाळेचे भूमिपूजन
खामगाव, १ मे / वार्ताहर

श्री सद्गुरू दत्त धार्मिक व पारमार्थिक ट्रस्टच्यावतीने भय्यूजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त सूर्योदय धरतीपुत्र ज्ञान प्रबोधिनी शाळेच्या बांधकामाचे भूमिपूजन ॠषी संकुल येथे करण्यात आले. यावेळी ॠषी संकुल येथे सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशासक एन.टी. देशमुख यांच्या हस्ते कपडय़ांचे वाटप करण्यात आले. वल्लभराव देशमुख यांच्या हस्ते सूर्योदय पारधी समाज आदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला ॠषी संकुलचे प्रशासक एन.टी. देशमुख, बाबुजी थानवी, राजकुमार गोयनका, सतीश राठी, राजेश्वर सरनाईक, अजय देशमुख, संतोष पारशेवार, शशिकांत सुरेका, राजेश देशमुख, अनिल जाधव, अभिजित देशमुख, वल्लभराव देशमुख, रंगराव देशमुख, तेजराव देशमुख, भाऊराव पाटील, शशिकांत देशमुख, नारायण मांडवेकर, सुमित देशमुख, भागवत बुरंगे आदी उपस्थित होते.