Leading International Marathi News Daily
शनिवार, २ मे २००९
विविध

कामगार दिनानिमित्त धनबाद येथील श्रमिक चौकातील कोळसा खाणकामगाराच्या पुतळ्याला पुष्पहार घालताना खाणकामगार.

३५ शीख कुटुंबाचे पाकिस्तानमधून पलायन
नवी दिल्ली, १ मे / पीटीआय
तालिबानिंनी जिझियाकर वसूल करण्यास सुरूवात केल्याने पाकिस्तानातील ओराकझाई भागात राहणाऱ्या ३५ शीख कुटुंबियांनी स्थलांतर केले असून भारताने हा विषय पाकिस्तानकडे मांडला आहे. पाकिस्तानातील शीख या अल्पसंख्यांक समाजाचा तालिबानींकडून छळ होत आहे. त्यांच्या जीवीत व वित्ताच्या रक्षणाछ्या नावाखाली जिझिया कर वसूल केला जात आहे याकडे भारताने पाकिस्तानचे लक्ष वेधले असल्याचे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते विष्णु प्रकाश यांनी दिल्लीत सांगितले.

‘रिसॅट’ने पाठविली छायाचित्रे!
कोलकाता, १ मे/पीटीआय
‘रिसॅट’ (रडार इमेजिंग सॅटेलाईट) या भारताच्या उपग्रहाकडून गेल्या दोन दिवसांपासून छायाचित्रे मिळू लागल्याचे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे (इस्रो) अध्यक्ष जी. माधवन नायर यांनी आज सांगितले. रिसॅटच्या कार्याची घडी महिनाभरात व्यवस्थित बसेल, असेही ते म्हणाले.

नवी पेन्शन योजना
नवी दिल्ली १ मे/पीटीआय

वृद्धापकाळात सामान्य नागरिक आर्थिकदृष्टय़ा सुरक्षित रहावा हा हेतूने केंद्र सरकारने आजच्या कामगार दिनापासून नागरी पेन्शन योजना लागू केली आहे. ही योजना ऐच्छिक आहे. या आर्थिक वर्षांच्या सुरूवातीलाच ही योजना सुरू करण्यात येणार होती पण निवडणूक आचारसंहितेमुळे ती लांबणीवर टाकण्यात आली होती.

आजपासून विमानतळांवर होणार वैद्यकीय तपासणी
स्वाईन फ्लू रोखण्यासाठी खबरदारी
नवी दिल्ली, १ मे / पीटीआय
स्वाईन फ्लू या नव्या विषाणूंचा फैलाव जगातील अनेक देशांमध्ये झपाटय़ाने होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर भारत सरकारने स्वाईन फ्लू पीडित देशांमधून येणाऱ्या विदेशी प्रवाशांची विमानतळावर वैद्यकीय चाचणी उद्यापासून अनिवार्य केली आहे. देशातील सर्वच विमानतळावर वैद्यकीय तपासणी केंद्रे उभारण्यात आली आहेत. भारतात स्वाईन फ्लू चा एकही रुग्ण नसल्याचे भारत सरकारने काल जाहीर केले होते. मात्र, जगभरात अचानक या नव्या विषाणूचा फैलाव झाला आहे. याचे नवीन नामकरण एच१एन१ असे करण्यात आले आहे.

मोदी यांच्या विरोधातील याचिकेची पुढील आठवडय़ात सुनावणी
नवी दिल्ली, १ मे/पीटीआय
गोध्रा जळित प्रकरणानंतर गुजरातमध्ये उसळलेल्या जातीय दंगलीप्रकरणी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी व अन्य काही जणांची चौकशी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यासंदर्भात मोदी यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेमुळे न्यायालयाचा अवमान झाल्याचा आक्षेप घेणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेची सुनावणी पुढील आठवडय़ात होईल.

पाकिस्तानात ६० तालिबानी ठार
इस्लामाबाद १ मे/पीटीआय
पाकिस्तानातील बुनेर जिल्ह्य़ात लष्कराने गेल्या २४ तासांत केलेल्या कारवाईत ६० तालिबानी दहशतवादी ठार झाले. चिलखती गाडय़ातून सैनिक अंबेला खिंड ओलांडून या प्रदेशात गेले व कमांडोंच्या मदतीने बुनेरमधील डागर हे शहर ताब्यात घेतले. तालिबान्यांनीही प्रतिकार करीत फ्रंटियर कॉर्पसच्या दीर येथील मुख्यालयावर हल्ला केला त्यात त्यांनी दहा सैनिकांच्या रायफली हिसकावून घेतल्या. त्यांनी ५२ जवानांना ओलिस ठेवले होते त्यांचे काय झाले ते समजू शकले नाही. पाकिस्तानी लष्कराच्या ‘ब्लॅक थंडर’ या मोहिमेचा आजचा तिसरा दिवस होता.

माकपची तक्रार
नवी दिल्ली १ मे/पीटीआय
केंद्र सरकारने कामगार दिनाचे औचित्य साधून नवीन पेन्शन योजनेच्या ज्या जाहिराती केल्या आहेत त्याबाबत माकपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. काही वृत्तापत्रातून पेन्शन योजनेच्या या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात माकपच्या पॉलिट ब्युरो सदस्य वृंदा करात यांनी म्हटले आहे की, पेन्शन योजनेच्या या जाहिराती म्हणजे निवडणूक आचारसंहितेचे स्पष्ट उल्लंघन आहे. सरकारने नवीन पेन्शन योजना जाहीर केली असून तिची अंमलबजावणी आजपासून सुरू करण्यात आली.