Leading International Marathi News Daily
रविवार, ३ मे २००९

यंदाच्या निवडणूक निकालांचे चित्र सर्वानाच अनाकलनीय वाटत आहे. कोण सत्तेवर येणार, कोण पंतप्रधान बनणार, याचा स्पष्ट अंदाज भल्याभल्यांना लागलेला नाही. फलज्योतिष हे शास्त्र आहे की नाही, हा वादाचा विषय आहे. पण जेव्हा निवडणूकविषयक कुतूहल राजकीय अंदाजांनुसार शमू शकत नाही, तेव्हा राजकीय भविष्यवेत्त्या काही ज्योतिषांना त्यांची भाकिते वर्तवण्याचे आवाहन आम्ही केले. आता आपली मते मतपेटीत बंदिस्त झाल्यानंतर निकालांची उत्सुकता फारच शिगेला पोहोचली असताना, हा ताण हलका करणारी, विविध पक्ष आणि नेते यांच्या कुंडलीतील ग्रहमानानुसार निवडणूक भाकिते जाणून घेण्यातली ही गंमत..

धक्कादायक निकालांचे तडाखे
श्रीराम भट

आपल्या देशाची स्वातंत्र्यदिनाची कुंडली आणि प्रजासत्ताकदिनाची कुंडली इ. स. २००८ पासून ग्रहणांच्या तडाख्यातच सापडली आहे. देशाची राजकीय अस्थिरता आणि देशाच्या सुरक्षेला असलेला धोका ऑगस्ट २००८ नंतर उत्तरोत्तर वाढतच

 

गेला. अणुकराराचा मुद्दा, जागतिक मंदी आणि नोव्हेंबर २००८ मधील आर्थिक राजधानी मुंबईवरील अतिरेकी हल्ला इ. घटना परिस्थितीतून आपला देश अतिशय नाजूक अवस्थेतून चालला आहे. अनेक गंभीर प्रश्न भेडसावत असताना या वेळची लोकसभा निवडणूक कोणत्याही मुद्यांविनाच लढली जात आहे. याला कारण मकर राशीतून जाणारा सध्याचा राहू. टॉलेमीने भारतीय उपखंडाला लागून असणाऱ्या भूभागाचीच रास मकर सांगितली आहे. त्यात भारत, पाकिस्तान , श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, ब्रह्मदेश, चीन आणि थायलंड इ. देशांचा अंतर्भाव होतो. सध्या या शेजारी राष्ट्रांची स्थितीही अतिशय बिकट आहे. त्यामुळेच मकर राशीतील ग्रहणांचा हा कालखंड १५ जानेवारी २०१० च्या मकरसंक्रांतीच्या सूर्यग्रहणापर्यंत एकूणच आशिया खंडाला अतिशय खराब आहे.
आपल्या देशात राष्ट्रवाद कधीच रुजला नाही. त्याला कारण वाईट मुहूर्तावर भारत-पाकिस्तान ही जुळी बालके जन्माला आली. आश्लेषा या सर्पनक्षत्रावर रवि-शनिला घेऊन चतुग्र्रही होत असताना धमार्ंधतेची एक विषारी आनुवंशिकता घेऊन ही जुळी बाळे शेजारी राष्ट्रे म्हणून नांदू लागली. धर्माधतेच्या तत्त्वावरच पाकिस्तानची निर्मिती झाली. एकीकडे भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून जगण्याचा आव आणत असतानाच काश्मीर या घटकराज्याला धर्माधता पाळण्यासाठी एका बाजूने मुभा देण्यात आली. बाकी उरलेल्या घटकराज्यांना धर्मनिरपेक्षतेचे धडे देण्यात आले आणि अजूनही ते देण्यात येतात.
धर्मनिरपेक्ष शक्ती आणि सांप्रदायिक शक्ती हे दोन शब्द निवडणुकांच्या काळात असंख्य वेळेला उच्चारले जातात की जे जगात इतक्या वेळा कोठेही उच्चारले जात नाहीत. जातीपातीचे आरक्षण देण्यात पुढाकार घेणारे आपले राजकारण जात, पात, धर्म यांचे निकष लावून उमेदवार उभे करत असते; मग ते अस्सल गुन्हेगार का असेनात. मतदारांना दरवेळेस खरोखरच प्रश्न पडतो की, प्रत्यक्षात खऱ्या जातीयवादी किंवा धर्माध शक्ती कोणत्या? उद्या दहशतवादी शक्तींच्या विरोधात उभी राहणारी व्यक्तीसुद्धा धर्माध ठरेल आणि हा खरा आपल्या देशाचा दैवदुर्विलास आहे आणि हा दैवदुर्विलास आश्लेषा नक्षत्रातील कुयोगावर जन्मलेल्या या जुळ्या राष्ट्रांच्या भाऊबंदकीचा आहे. डिसेंबर २००९ मध्ये आश्लेषा नक्षत्रात मंगळ वक्री होत आहे. या वक्री मंगळाच्या काळातच १५ जानेवारी २०१० रोजी मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्यग्रहण होत आहे. भारत-पाकिस्तान या जुळ्या महान बालकांच्या संदर्भातून डिसेंबर ०९, जानेवरी १० हे महिने भारत धर्मनिरपेक्ष हिंदू राष्ट्र होणार की ते धर्मनिरपेक्ष मुस्लिम राष्ट्र होणार हे ठरवतील.
मतदानाच्या सुरुवातीच्या वेळेत गुरू-नेपच्यून योग दशमबिंदूत राहील. त्यामुळेच एकंदरीत मतदारांचा शहरी भागातून निरुत्साह राहील. शिवाय मतदार ठरवूनही मतदानाला गेले तरी ऐनवेळी आपले मत कोणाला टाकतील याचा पत्ताच लागणार नाही, असा गुरू- नेपच्यूनचा कुंभेतील विचित्र योग आगामी तीन महिने राहणार आहे. निकालानंतर कोणाच्या जोडय़ा जमतील किंवा कोणाला जोडे मिळतील, याची अजिबात कल्पना येणार नाही. मात्र कुंभ रास बलवान होत असल्याने किंवा कुंभेतील गुरू डाव्या पक्षांना अनुकूल असल्याने त्यांचे डावपेचच आगामी सरकारची जडघडण ठरवेल. मतदानाच्या काळातील गुरू-नेपच्यून योगाचा प्रभाव भाजप आणि काँग्रेस यांच्या जागा तीस टक्क्य़ांपर्यंत कमी करेल.
मतदानाच्या सर्व तारखा मायावतींना जबरदस्त अनुकूल आहेत. मीन राशीतील मंगळ- शुक्र- हर्षल योगाचा प्रभाव पडून बसपाच्या जागा ५० ते ६० टक्क्य़ांनी वाढतील. डाव्यांवर कुरघोडी फक्त मायावतीच करू शकतात. गुरू-नेपच्यून योगाचा सर्वात मोठा फटका समाजवादी पक्षाला बसणार आहे. त्यामुळे मुलायमसिंगांना डाव्यांची जबरदस्ती मान्य करावी लागेल. डावे पक्ष लालुप्रसाद यादवांशी अतिशय सावध आणि काही प्रसंगी अतिशय गूढ वागतील. या वेळी दक्षिणेकडचे लहान लहान पक्ष सरकार बनवण्यात महत्त्वाची भूमिका निभावणार आहेत. त्यात नवीन पटनाईक आघाडीवर राहतील. या वेळी डाव्या पक्षांचे संख्याबळ पश्चिम बंगालमध्ये थोडे कमी होईल. परंतु त्याची भरपाई दक्षिणेकडून होईल. लालुप्रसाद यादवांचा पक्ष काही महत्त्वाच्या जागा गमावणार आहे, परंतु अनेकांना लालुप्रसाद यादवांचे उपद्रव मूल्य राहणार आहे.
पंतप्रधान कोण?
ज्योतिषशास्त्रात निवडणुकांचे भविष्य वर्तविताना व्यक्तिगत भविष्याला तसा थारा नाही. कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही, हे भविष्य होऊ शकते. कोण पंतप्रधान होणार हे मेदितीय भविष्यात सांगणे; त्यातून भारतासारख्या देशात सांगणे, हे शास्त्रमर्यादा सोडून होईल. परंतु पंतप्रधान डावे पक्ष ठरवतील, हे भविष्यच होय. शनिच्या मूलत्रिकोण राशीत गुरू-नेपच्यून असताना निकाल बॉर्डरवरचे येतील. त्यामुळे पंतप्रधान दलित असण्याची दाट शक्यता. एखादी स्त्री पंतप्रधान होऊ शकते किंवा पंतप्रधान ठरवू शकते. पंतप्रधान ठरवण्यात दक्षिणेकडील लहान लहान पक्ष निर्णायक ठरू शकतील. मीनेतील मंगळ, शुक्र, हर्षल योगामुळे दक्षिणेकडील पंतप्रधान होऊ शकतो. डावे पक्ष डावपेच खेळून मायावतींची वाट मोकळी करू शकतात. लालूप्रसाद यादवांची खेळी मायावतींच्या पथ्यावरच पडेल. पंतप्रधान पदासाठी शरद पवार किंवा पी. चिदंबरम हा अखेरचा पर्याय ठरू शकतो.
महाराष्ट्रात अतिशय धक्कादायक निकाल
मतदानाच्या काळात मीन राशीतील मंगळ, शुक्र, हर्षल यांचे अस्तित्व आणि निकालांच्या दिवसांत सिंह राशीत स्तंभी असलेला शनी महाराष्ट्रात मोठे धक्कादायक निकाल लावील. मोठे दिग्गज पराभूत होतील. मुंबईत शिवसेना धमाल उडवेल. मनसेला तीन ते पाच जागा मिळतील. मुंबईत काँग्रेसला एका जागेवरच समाधान मानावे लागेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून महाराष्ट्रात त्या पक्षांना निम्म्यापेक्षा थोडय़ा कमी जागा मिळतील. काही ठिकाणी तिहेरी लढतींचा फायदा भाजपला मिळेल. तिहेरी लढतीमुळे राष्ट्रवादीच्या काही जागा कमी होतील.
मोठय़ा राजकीय हत्या
२९ डिसेंबर २००९ रोजी मंगळ कर्क राशीत आश्लेषा नक्षत्रात वक्री होत आहे. हा मंगळ २० मार्च २०१० पर्यंत कर्क राशीत वक्री राहील. या दरम्यान १५ जानेवारी २०१० रोजी होणारे सूर्यग्रहण भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांना वाईट आहे. या काळात दोन्ही राष्ट्रांत मोठे नैसर्गिक तसेच राजकीय उत्पात घडू शकतात. या काळात भारतात तसेच आशिया खंडात राजकीय हत्यां घडतील. याच काळात भारतात मंदीचा भर राहील. मुंबईत २०१० ची सुरुवात अतिशय प्रतिकूल होईल. मुंबईत सतत मोठय़ा दुर्घटना घडतील. तालिबानी काश्मीरमध्ये घुसतील.

काँग्रेस आघाडीचे अल्पजीवी सरकार
आप्पा पुंडलीक

या निवडणुकीत खरी लढत आहे ती- काँग्रेस + राष्ट्रवादी काँग्रेस यांना मदत करणारे इतर लहान-मोठे पक्ष विरुद्ध भा.ज.प. + शिवसेना + अन्य मित्रपक्ष. या दोन आघाडय़ांना टक्कर देण्यासाठी निर्माण झाली आहे तिसरी आघाडी. याही आघाडीतले महत्त्वाचे पक्ष म्हणजे- मार्क्सवादी + ब. स. पा. + तेलुगु देसम + अण्णा द्रविड मुन्न्ोत्र कळघम आणि इतर. आता आपण एकेका पक्षाचा विचार करू.
काँग्रेस (पंजा) :
काँग्रेसची पत्रिका मीन लग्नाची आहे. १६ मे’ला मतमोजणी आहे. त्यावेळी काँग्रेसच्या पत्रिकेत असे ग्रह आलेले असतील-
(१) रवि ६ व्या घराचा स्वामी, तर गुरू १० व्या आणि १ ल्या घराचा स्वामी.. या दोघांत पूर्ण अंशांत केंद्रयोग झालेला. रविपासून १० व्या घरात गुरू आहे. या योगाला मी महत्त्व देणार आहे. कारण (अ) कुंडलीमधल्या १० व्या घराचा संबंध सत्ता, राज्यकारभार यांच्याशी आहे. (ब) ६ व्या घराचा संबंध संरक्षण खाते, सरकारमध्ये काम करणारे- थोडक्यात : साहेबांच्या आज्ञा पाळणारे लोक. (क) १० व्या घरात धनू रास असून, या १० व्या घरापासून रवि ६ व्या घरात भयंकर बलवान आहे. परत रवि पराक्रम स्थानात १० व्या घराचा स्वामी गुरूच्या केंद्रयोगात आहे. संघर्ष जरूर आहे, पण त्याचबरोबर यशही आहेच.
(२) रवी + हर्षल यांच्यात लाभयोग आहे. अधिकारीवर्ग व राजसत्ता यांना हा योग फार शुभ आहे. देशातील शास्त्रज्ञ, संशोधक यांना सरकारतर्फे अनुदान मिळून त्यांच्या हातून नवनवीन शोध लागतील.
(३) पंचमेश चंद्राच्या लाभात भाग्येश मंगळ आहे. सैन्य, आरमार यांची स्थिती चांगली राहील. नोकरीच्या नवनवीन संधी निर्माण होऊन बेकारांना बऱ्यापैकी कामधंदा मिळेल.
(४) चंद्राच्या लाभात उच्च राशीतला शुक्र आहे. आपले कलाकार, खेळाडू जागतिक पातळीवर फार चांगली कामगिरी करतील. भारताचे नाव उज्ज्वल करतील.
या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यावर या अटीतटीच्या निवडणुकीत काँग्रेसचा जरूर विजय होईल. अगदी दणदणीत नाही, तरी पोटापुरती मते जरूर पदरात पडतील.
साधारण अंदाजे १४७ ते १५३ जागा मिळाव्यात.
राष्ट्रवादी काँग्रेस (घडय़ाळ) :
राष्ट्रवादी काँग्रेसचे पाय फक्त महाराष्ट्रातच वळवळतात. इतर प्रांतांतून त्यांचा वेल फारसा वाढीस लागलेला दिसत नाही.
(१) राष्ट्रवादीच्या कुंडलीमध्ये चंद्र हा लोकमताचा कारक ग्रह आहे तोच मुळी दुबळ्या राशीत अत्यंत अशुभ अशा ६ व्या स्थानात. तोही राहूच्या सहवास-योगात सापडलेला आहे. त्यामुळे लोकांच्या मनात शरद पवार यांच्याबद्दल संशयाचे वातावरण राहील.
(२) कुंडलीच्या १० व्या घरात लग्नेश रवी शुभ आहे. पण तो मारकेश व नाशकेश बुधाच्या सहवासामुळे बिघडलेला आहे. परत या रविवर शनीची १० वी, तर राहूची ९ वी दृष्टी आलेली असल्यामुळे तोंडाशी आलेला घास पोटात जाणे कठीण वाटते.
(३) या कुंडलीमधील भाग्याचा स्वामी मंगळ त्याच्या घरापासून १२ व्या घरात, कुंडलीच्या अष्टम स्थानात अशुभ आहे.
या सर्व गोष्टींचा विचार करता आणि खासकरून शरद पवारांच्या दबावतंत्राला कंटाळलेली जनता त्यांच्या बाजूने किती मतदान करेल, हे समजणे कठीण आहे. कारण जनतेचा कारक चंद्र मकर या दुबळ्या राशीत राहूच्या सहवासात ६ व्या घरात अशुभ आहेच.
त्यामुळे राष्ट्रवादीला कमीत कमी ८ आणि जास्तीत जास्त १२ जागांवर समाधान मानावे लागेल. पवार कधी रंग बदलतील ते सांगता येणार नाही.
भारतीय जनता पक्ष
कुंडलीच्या ४ थ्या घराचा संबंध हा त्या पक्षाच्या अंतर्गत व्यवहाराशी आहे. या महत्त्वाच्या घरात (१) मंगळ अग्नी तत्त्वाचा (२) शुक्र जल तत्त्वाचा (३) हर्षल अत्यंत लहरी- असे ग्रह एकत्र आलेले आहेत. हे सगळे अशुभ योग आहेत. त्यांच्या आपापसातल्या लाथाळ्याच त्यांच्या यशाचा भाग कमी करतील. त्यातच प्रवीण महाजन यांनी केलेली जाहीर टीका जनतेच्या काळजाला जाऊन भिडली आहे. त्याचाही वाईट परिणाम मतदानावर होईल. आणि नेमक्यायाच गोष्टीचा फायदा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस उठवल्याशिवाय राहणार नाहीत. प्रवीण महाजन यांच्या आरोपांचे पडसाद साऱ्या भारतात उमटले आहेत. हे हलाहल पचविण्याची ताकद भाजपाच्या सध्याच्या संधिसाधू नेत्यांच्या अंगात नाही. जे कोणी निवडून येतील ते स्वत:च्या पुण्याईवर व कर्तृत्वावर निवडून येतील. त्यात पक्षाची पुण्याई थोडीच असेल.
दुसरा महत्त्वाचा मुद्दा गुजरातमधून प्रचारासाठी आयात केलेले नरेंद्र मोदी आणि त्यांनी उधळलेली विषारी मुक्ताफळे. महाराष्ट्राचा गुजरात करण्याची भाषा मराठी माणसांना कधीही रुचणार नाही. पचणार तर नाहीच नाही. १०५ हुतात्म्यांचे आत्मे परत अवतार घेतील आणि मोदींना कडाडून विरोध करतील. महाराष्ट्रापुरती तरी भाजपची प्रतिमा चांगलीच डागाळली गेली आहे.
त्यामुळे देशभरात भाजपाचे कमीत कमी ८५ व जास्तीत जास्त १०३ पर्यंत उमेदवार निवडून येतील असा रंग दिसतोय.
समाजवादी पार्टी :
समाजवादी पार्टीची पत्रिका माझ्याजवळ नाही. मात्र एक तर्क असा- ज्या वेळी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यावर बहुमत सिद्ध करण्याचा कठीण प्रसंग आला होता, त्या वेळी या पार्टीच्या खासदारांनी डॉ. मनमोहनसिंग यांना आपल्या हातांचा आधार देऊन संपूर्ण सरकार आपल्या हातांवर तोलून धरले होते. नेमकी याचीच परतफेड यावेळी अपेक्षित आहे. याही वेळी काँग्रेसला समाजवादी पार्टी जरूर हात देईल आणि ही युती मायावतींच्या हत्तीच्या चालीला पायबंद घालेल असे चित्र आहे. असे झाले तर समाजवादी पार्टीला ३६ ते ४२ जागांवर विजय मिळवणे सहज शक्य होईल.
बहुजन समाज पार्टी :
मुख्यत: उत्तर प्रदेशातली जरी ही पार्टी असली तरीही इतर राज्यांतही तिची वाढ व्हायला लागली आहे. परंतु प्रत्यक्ष उत्तर प्रदेशमध्ये मात्र या पक्षाला मार खावा लागण्याची शक्यता आहे. तथापि इतर राज्यांतून त्यांचे एक वा दोन उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे बहुजन समाज पक्षाला २० ते २४ जागा मिळाव्यात.
सर्वसाधारण अंदाज :
आज तरी काँग्रेस + राष्ट्रवादी काँग्रेस + समाजवादी आणि इतर पक्षांची जी संयुक्त लोकशाही आघाडी आहे, तिला या निवडणुकीत २६० ते २७५ जागा जिंकता येतील असा अंदाज आहे. तर भा. ज. प. + शिवसेना यांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला १५० ते १६४ जागांवर समाधान मानावं लागेल.
या निवडणुकीत आणखी एक आघाडी पुढे आलेली आहे- तिसरी आघाडी. ‘तीन तिघाडा, काम बिघाडा’ या म्हणीचा प्रत्यय ही तिसरी आघाडी सर्वाना आणून देईल, असे चित्र सध्या तरी दिसते आहे. या तिसऱ्या आघाडीतील महत्त्वाचे पक्ष म्हणजे- (१) मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (२) ब. स. पा. (३) तेलगु देसम (४) अद्रमु कळघम (५) बीजेडी आणि इतर. तिसऱ्या आघाडीतील प्रत्येक पक्षांना पुढीलप्रमाणे जागा मिळण्याची शक्यता आहे :
(१) ब. स. पा. = २० ते २४
(२) मार्क्स कम्युनिस्ट = १७ ते २१
(३) तेलगु देसम = १५ ते २०
(४) अद्रमु कळघम = १२ ते १५
(५) बीजेडी = ११ ते १४
एकूण = ९४
बाकीचे लहान लहान पक्ष- १०
सर्व मिळून एकूण.... १०४
परिणामी लोकसभेचे सर्वसाधारण चित्र असे राहील :
संयुक्त लो. आ. राष्ट्रीय लो. आ. तिसरी आघाडी
२७५ १६४ १०४
सर्वसाधारणपणे अंदाज-
(१) कोणालाही स्पष्टपणे बहुमत मिळणार नाही. (२) सरकार बनविण्याची सर्वात जास्त संधी काँग्रेसला असेल. (आपापसातल्या लाथाळ्या टाळल्या तर!) (३) काँग्रेसने निवडणुकीपूर्वी वाटलेल्या अनुदानांच्या खिरापतीची कटु फळे त्यांनाच चाखावी लागतील. शेतकऱ्यांच्या केलेल्या कर्जमाफीचा भस्मासुर बूमरँगसारखा त्यांच्यावरच उलटणार आहे. (४) पुढे येणाऱ्या प्रत्येक सरकारला हा भस्मासुर अस्तनीमधला निखारा ठरणार आहे. (५) सर्व जीवनावश्यक वस्तूंचे भाव आकाशाला जाऊन भिडतील. त्यामुळे सर्वसामान्यांना जगणं कठीण होईल. (६) या वाटलेल्या खिरापतीचा पैसा सर्वसामान्य जनतेच्या खिशातूनच बळजबरीने वसूल केला जाईल. (७) या सर्वाचा वाईट परिणाम सरकारवर आर्थिक संकट कोसळेल; ज्यात गरीब जनता भरडली जाईल. अनेक बँका डबघाईला येतील. आर्थिक व्यवहारातले अनेक घोटाळे जनतेसमोर येतील. जनतेचा सरकारवरचा विश्वास उडायला लागेल.
महाराष्ट्र :
महाराष्ट्रामधली खरी लढत ही काँग्रेस + राष्ट्रवादी काँग्रेस एका बाजूला, तर शिवसेना + भा.ज.प. दुसऱ्या बाजूला! महत्त्वाचे म्हणजे या दोघांनाही हादरा देणारा राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा नवा पक्ष आता निर्माण झालेला आहे. राज ठाकरे यांचा प्रचाराचा झपाटा पाहिल्यावर असे वाटते की, सेनेची तसेच भा. ज. प.चीही काही मते फोडण्यात ते सहजगत्या यशस्वी होतील. स्पष्टच बोलायचे झाले तर राज ठाकरे यांच्या झंझावाताला गवसणी घालण्याची ताकद सध्यातरी शिवसेनेत कोणातही नाही. ना ती भाजपमध्येही आहे. त्यामुळे त्यांनी ज्या- ज्या ठिकाणी उमेदवार उभे केलेले आहेत, त्या- त्या ठिकाणी एक तर तर ते निवडून येतील किंवा भा. ज. प. + सेना युतीच्या उमेदवारांची मते तरी पळवतील. याचा फायदा मात्र तिसऱ्यालाच होईल.
महाराष्ट्रात एकूण जागा ४८ आहेत. त्यापैकी-
काँग्रेसला २६ पैकी १५ मिळतील.
राष्ट्रवादी काँग्रेसला २२ पैकी १० मिळाव्यात.
शिवसेना- ८ मिळाव्यात.
भा. ज. प. - ७ मिळाव्यात.
म. न. से.- ४ मिळाव्यात.
स्वतंत्र वा इतर- ४ मिळाव्यात.
पंतप्रधानपदाच्या शर्यतीतील प्रमुख उमेदवार- (१) लालकृष्ण आडवाणी (२) मायावती (३) शरद पवार (४) डॉ. मनमोहनसिंग.
लालकृष्ण आडवाणी :
निवडणुका जाहीरही झाल्या नव्हत्या त्याच्या आधीपासूनच लालकृष्ण आडवाणी हे आपणच पंतप्रधान झालेलो आहोत, अशा थाटात वावरत आहेत. आता घोडामैदान जवळ आहे. बघू या नशीब त्यांना किती साथ देतेय ते.
जन्मकुंडली
जन्मतारीख- ८- ११- १९२७
जन्मस्थळ- हैदराबाद (पाकिस्तान)
जन्मवेळ- सकाळी ९ वा. २७ मि.
(१) जन्माच्या वेळीच त्यांच्या कुंडलीमधील १० व्या घराचा स्वामी बुध हा वक्री असून त्याचा अस्त आहे. सरकार बनविण्याची वेळ आलीच, तर त्याही वेळी या बुधाचा अस्त असेल आणि बुध वक्री असेल. (२) धनू लग्नाचा, अत्यंत अशुभ ग्रह शनी हा सिंह राशीत, तसेच भाग्य स्थानात शनी अशुभ आहे. (३) लग्नेश (गुरू) कुंभ राशीत तृतीय या अशुभ स्थानात आलेला आहे. थोडक्यात- कुठेतरी माशी शिंकण्याची आणि अपशकुन घडण्याचीच जास्त शक्यता आहे.
मायावती :
‘यू. पी. हुई हमारी। अब दिल्ली की है बारी।’ अशी डरकाळी फोडत मायावतींचा हत्ती दिल्लीच्या वाटेला लागलाय, असे चित्र सध्या तरी दिसत आहे. त्यांची पत्रिका माझ्याजवळ नाही. नावावरून आणि एकंदर आवेशावरून रास सिंह आणि नक्षत्र मघा वाटते आहे. सध्या शनिदेवांचा मुक्काम सिंह राशीतच आहे. साडेसाती चालू आहे. फार मोठी झेप घेणे या हत्तीला परवडणारे नाही. मानवणार पण नाही.
शरद पवार :
जन्मकुंडली
जन्मतारीख- १२- १२- १९४०
जन्मस्थळ- बारामती
जन्मवेळ- सकाळी ७ वाजता.
मूळ कुंडलीत चंद्र बलवान आहे. ही या कुंडलीची खासियत आहे.
(१) वृश्चिक लग्नाला शनी हा अशुभ ग्रह आहे. असा शनी सिंह राशीत १० व्या घरात शुभ नाही. शनीसमोर मारक गुरू अत्यंत अशुभयोग होतो. (२) दुसरा महत्त्वाचा ग्रह गुरू हा कुंभ राशीत ४ थ्या घरात आलेला आहे. त्यांच्या पक्षातूनच त्यांच्या नावाला उघड उघड विरोध आहे. तेव्हा या शर्यतीत ते फार काळ टिकतील असे वाटत नाही.
डॉ. मनमोहन सिंग :
जन्मकुंडली
(१) मूळ कुंडलीत भाग्येश रवी भाग्य स्थानात आहे. (२) गुरू कर्क या उच्च राशीत आहे. (३) गुरू + चंद्र यांच्यात अनन्ययोग झालेला आहे. (४) षष्ठेश शुक्रावर द्वादशेश मंगळाची पूर्ण दृष्टी- हा विपरीत राजयोग होतो आहे. (५) दशमेश बुध लग्नेश व उच्चीच्या गुरूबरोबर. (६) सध्याचा शनी भाग्य स्थानात भाग्येश रवीबरोबर. (७) त्यातच लग्नेश गुरू कुंभ राशीतून भाग्यस्थानाला भाग्येश रवीला आणि पराक्रमेश शनीला पाहतो आहे. पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची माळ गळ्यात पडावी असे ग्रहमान आहे. सोनिया गांधी यांच्या धक्कातंत्राप्रमाणे ऐनवेळी त्या काय पवित्रा घेतील, हे सांगणे जरा कठीणच आहे. त्यांच्या डोक्यात पी. चिदंबरम किंवा प्रणव मुखर्जी ही दोन नावे असावीत. तरीही पहिला नंबर मात्र डॉ. मनमोहनसिंग यांचा लागेल असे वाटते.
राजकीय भवितव्य :
लालकृष्ण आडवाणी- २००४ साली केलेल्या चुकांचे आज कुऱ्हाडी खिळे बनलेले आहेत. आलेले नैराश्य लपवता येणार नाही. ‘दूध का दूध, पानी का पानी’ असे म्हणत हात चोळत बसावे लागेल असे वाटते.
मायावती- ‘असून अडचण आणि नसून खोळंबा’ या उक्तीला अनुसरून स्वत:चं वजन (दोन्ही बाजूंनी) वाढवून घेतील. थोडाफार प्रभाव जरूर वाढेल.
शरद पवार- आहे त्यापेक्षा मोठय़ा जागेवर जातील. दोन्ही डगरींवर हात ठेवून म्हणतील- ‘उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक.’
लालूप्रसाद यादव- यांचा डबा सरकारच्या गाडीला जोडला जाईल. वजनदार खाते मिळावे.
मुलायमसिंह- मानाची खुर्ची आणि लाल दिवा असलेली पांढरी गाडी मिळेल. दिल्लीतच जास्त वेळ मुक्काम राहील.
जयललिता- समाचार एन इल्ला. वातावरण फारसे लाभ देणारे नाही. घुसमट जास्त होईल असे वाटते.
राहुल गांधी- प्रतिमा उजळून निघेल. जनतेचा विश्वास आणि प्रेम वाढीला लागेल. जबाबदारी वाढेल. भविष्यात मोठी भरारी घेता येईल.
भारताची पत्रिका
भारताच्या पत्रिकेत लग्नाचा स्वामी आणि धन स्थानाचा स्वामी शनी सिंह राशीत ८ व्या घरात भयंकर अशुभ आहे. ९ सप्टेंबर २००९ पर्यंत माणसाला जगण्यासाठी ज्या अत्यंत आवश्यक वस्तू लागतात, त्यांच्या किमती पार आकाशाला जाऊन भिडतील. प्रत्येक घटक सरकारकडे मदत मागेल- ज्यामुळे आर्थिक समस्या अति उग्र रूप धारण करतील. ५ ऑक्टोबर २००९ ला सकाळी ९ वाजता मंगळ भारताच्या कुंडलीत ७ व्या घरात कर्क या त्याच्या नीच राशीत येतो आहे. इथले वातावरण मंगळाला अजिबात मानवणारे नाही. मंगळाचा इथला मुक्काम ८ महिने राहणार आहे. या कालावधीत ३१ डिसेंबर २००९ या दिवशी खंडग्रास चंद्रग्रहण ७ व्या घरातच होते आहे. आपल्या भारताचे उघड शत्रू म्हणजे पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्या सीमांवर चकमकी झडतील. लष्कराची मदत घेऊन त्यांचा बीमोड करावा लागेल. अंतर्गत शांतता व सुव्यवस्था कोलमडून पडेल. विरोधक प्रबळ बनून सत्ताधारी पक्षाला बहुमत सिद्ध करायला भाग पाडतील. यातूनही सरकार वाचलेच तर १५ जानेवारी २०१० ला होणारे खंडग्रास सूर्यग्रहण भारताच्या कुंडलीत पहिल्या घरात होत आहे. जनताच चालू सरकारला खाली ओढायला तयार होईल.
निवडणूक निकाल अंदाज :
(१) कोणत्याही एका पक्षाला २७२ जागांच्या वर हक्क सांगता येणार नाही. मग ती काँग्रेस आघाडी असो वा भाजपप्रणीत आघाडी असो. सरकार-स्थापनेसाठी दुसऱ्या पक्षांची मदत दोघांनाही घ्यावीच लागेल. (२) येणारे सरकार अल्पजीवी ठरण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे सर्वच पक्षांना, तसेच जनतेलाही धडा मिळेल. (३) लष्कराची मदत वारंवार घ्यावी लागेल. दोन्ही सीमांवर जवान शहीद होतील. (४) ‘दहशतवाद! दहशतवाद!’ हा नुसताच वाद न राहता प्रत्येकाला स्वत:च्या संरक्षणासाठी हातात काठीही घ्यावीच लागेल. (५) गुरू+ नेपच्यून ही जोडी धन स्थानात अत्यंत अशुभ आहे. फसवेगिरीचे अनेक प्रकार उघडकीस येतील. चांगल्या स्थितीत असणाऱ्या बँका डबघाईला येतील. शेतकऱ्यांना वाटायला दिलेल्या पैशांचे अनेक घोटाळे बाहेर येतील. सरकारच्या वसुलीत प्रचंड घट होईल. त्यामुळे शास्त्रज्ञांच्या कामास पैसा मिळणार नाही.
असे जरी असले तरीही ९ सप्टेंबर २००९ रोजी शनी कन्या या त्याच्या लाडक्या राशीत भारताच्या भाग्यस्थानात प्रवेश करेल. यावेळी त्याचा अस्त असेल. २ ऑक्टोबर २००९ ला त्याचा उदय होत आहे. ४ ऑक्टोबर २००९ ला बुध स्वत:च्या कन्या राशीत येतो आहे. भारताचा तो भाग्येश आहे. ८ ऑक्टोबर २००९ ला लग्नेश शनी आणि भाग्येश बुध यांची युती कन्या राशीत भाग्यस्थानात होत आहे. त्यानंतर वातावरण हळूहळू बदलण्यास सुरुवात होईल. सरकारची पावले स्थिर होतील.

काँग्रेस व तिसऱ्या आघाडीचे संयुक्त सरकार!
सिद्धेश्वर मारटकर
२००४ च्या निवडणुकीत अनपेक्षित निकाल लागले. भाजपची मोठी पीछेहाट झाली. सत्तांतर झाले. प्रत्यक्षात भाजप व काँग्रेस यांच्यात जागांच्या बाबतीत जास्त फरक नव्हता. परंतु मित्रपक्षांच्या अपयशामुळे भाजप आघाडी १८६ जागांवर अडली, तर काँग्रेस आघाडीला २१९ जागा मिळाल्या. ‘धर्मनिरपेक्षते’च्या मुद्दय़ावर कम्युनिस्ट व अन्य पक्षांच्या मदतीने काँग्रेस आघाडीचे सरकार स्थापन झाले. यावेळी धर्मनिरपेक्षतेच्याच मुद्दय़ावर भाजपचे मित्रपक्ष दुरावलेले आहेत. त्यामुळे भाजपसाठी ‘सत्ता’ हा विषय त्यांच्यासाठी दुरावत चालला आहे. यापुढे साध्या बहुमतासाठीच्या २७२ जागा मिळविणे कोणत्याही एका पक्षाला शक्य नाही. हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर भाजप ही संख्या गाठू शकणार नाही, हे वास्तव त्यांनी स्वीकारायला हवे. त्यातच वाजपेयींची निवृत्ती, प्रमोद महाजनांची अनुपस्थिती, जेटलींसारखे नाराज नेते यामुळे भाजप अडचणीत आला आहे. चंद्राबाबू नायडूंसारखे नेते भाजपच्या हातात हात घालायला तयार नाहीत. त्यामुळे भाजपच्या काही जागा वाढल्या तरी सत्तेपर्यंत पोहोचणे अवघड आहे.
सध्याचे राजकारण हे एका विचित्र वळणावर आले असून स्थानिक पक्षांचा वाढता प्रभाव राष्ट्रीय पक्षांना हानीकारक ठरत आहे. या पक्षांमध्ये परस्परांत कुरबुरी आहेतच, पण यातले काही पक्ष जिकडे सत्ता- तिकडे जाण्याच्या विचारात आहेत, तर काही पक्षांनी मिळून तिसरी आघाडी स्थापन केली आहे, तर काही पक्ष तटस्थ आहेत. २००४ च्या निवडणुकीत २२० पक्षांनी निवडणूक लढविली होती. ज्योतिषशास्त्रदृष्टय़ा एवढय़ा पत्रिकांचा विचार होत नाही. तिसऱ्या आघाडीकडे सध्याच्या लोकसभेत ९१ खासदारांचे बळ आहे. यावेळी या आघाडीत नऊ पक्षांचा समावेश असून, निवडणुकीनंतर (बसपा- मायावती) व बिजू जनता दल (नवीन पटनाईक) हे पक्ष या आघाडीत सामील होऊ शकतात. या आघाडीने अजून तरी आपला संभाव्य पंतप्रधान कोण असेल, हे जाहीर करण्याचे टाळले आहे. मात्र, मायावती पंतप्रधानपदावर हक्क सांगण्याची जास्त शक्यता आहे. कारण आघाडीतील सर्वात मोठा पक्ष म्हणून मायावती या पदावर हक्क सांगू शकतात.
याचा अर्थ भाजप सत्तेपासून दूर राहणार, हे गृहीत धरले तर काँग्रेस आघाडी वा तिसरी आघाडी यांच्यापैकी एका आघाडीचे सरकार स्थापन होऊन यातील एक आघाडी दुसऱ्या आघाडीला पाठिंबा देण्याची शक्यता जास्त आहे. हा मुद्दा लक्षात घेऊन पत्रिकांचा विचार करावा लागणार आहे.
मायावती : कर्क लग्न, मकर रवीच्या पत्रिकेत गुरू, राहूचे मकर राशीतील भ्रमण अनुकूल आहे. मात्र रवीच्या अष्टमातील शनीचे भ्रमण प्रतिकूल आहे. तिसऱ्या आघाडीमध्ये सामील झाल्यास पंतप्रधानपदासाठी मायावतींना मोठा विरोध होऊ शकतो. परंतु मूळ पत्रिका बलवान असल्यामुळे भविष्यात काही काळाकरिता देशाचे नेतृत्व करण्याची संधी त्यांना मिळू शकते. त्यांच्या वाढत्या प्रभावामुळे काँग्रेसला काही जागांवर नुकसान होऊ शकते व त्याचा फायदा भाजप किंवा इतर विरोधी पक्षांना होऊ शकतो. बसपचे मागील वेळेला १९ खासदार निवडून आले होते. यावेळी त्यात वाढ होणार असून, तिसऱ्या आघाडीतील मोठा पक्ष म्हणून त्या पंतप्रधानपदावर हक्क सांगण्याची शक्यता आहे.
शरद पवार : वृश्चिक लग्न व वृश्चिक रवीची पत्रिका असून, तृतीयातील राहूचे व चतुर्थात होणारे गुरूचे भ्रमण अनुकूल आहे. त्यामुळे पूर्वीच्या जागांमध्ये निश्चितपणे वाढ होईल. २००४ मध्ये राष्ट्रवादीला ९ जागा मिळाल्या होत्या. त्यामध्ये वाढ झाल्याने काँग्रेस किंवा तिसऱ्या आघाडीपैकी कोणाचेही सरकार स्थापन झाले तरी सत्तेत सहभाग राहील. मायावतींना विरोध झाल्यास ज्येष्ठतेच्या मुद्दय़ावर पंतप्रधानपदासाठी पवारांचा विचार होऊ शकतो.
शिवसेना : मिथुन लग्न व मिथुन रवीच्या पत्रिकेत धन अष्टम स्थानातून ग्रहण होत आहे. मात्र, भाग्यातील गुरूचे व दशमातील शुक्राचे भ्रमण अनुकूल असल्याने पूर्वीच्या संख्येइतक्या जागा मिळू शकतील. २००४ मध्ये शिवसेनेचे १२ खासदार निवडून आले होते. वेळ पडल्यास शिवसेना निवडणुकीनंतर तिसऱ्या आघाडीला पाठिंबा देऊ शकते. (शरद पवारांना पंतप्रधानपदासाठी संधी मिळाल्यास शिवसेनेची भूमिका पवारांना पाठिंबा देण्याची राहील.)
एकूण विचार करता भाजपवगळता दोन आघाडय़ांपैकी काँग्रेस आघाडी किंवा तिसरी आघाडी यांना सत्तास्थापनेची संधी मिळेल. मात्र, कोणतीही एक आघाडी बहुमत प्राप्त करणे शक्य नसल्याने या दोन आघाडय़ांचे संयुक्त सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न होईल. अशावेळी पंतप्रधानपदासाठी मोठा गोंधळ निर्माण होऊन नवीन सरकार गोंधळातूनच तयार होईल असे वाटते. तथापि मनमोहनसिंग यांच्याऐवजी दुसऱ्या नेत्याला पंतप्रधानपद मिळण्याची शक्यता जास्त वाटते.

काँग्रेस आघाडीचेच सरकार
पं. विजय श्रीकृष्ण जकातदार

ज्योतिषशास्त्रदृष्टय़ा शास्त्राच्या मर्यादेत राहून भावी पंतप्रधान आणि संभाव्य लोकसभेचा आढावा घ्यायचा झाल्यास निवडणुकीच्या काळातील परिस्थिती- विशेषत: मकर राशीतील राहू व निवडणुकीच्या सुरुवातीलाच मीन राशीत प्रवेश करणारा रवि हे एकमेकांच्या केंद्रयोगात येत असून, त्याच्या परिणामी बहुतेक राजकीय पक्षांना अंतर्गत फसवणुकीला तोंड द्यावे लागेल. भारताच्या कुंडलीत दशमस्थानी होणारी शुक्र-मंगळ-हर्षल युती निवडणुकीत राजकीय पक्षांकडून प्रचंड खर्च व उधळपट्टी होण्याची शक्यता दर्शवीत आहे. निवडणुकीच्या एकंदरीत पाच टप्प्यांचा विचार करता पहिला टप्पा संमिश्र असून, ‘काँग्रेस आय’ला अनुकूल जाईल. दुसरा टप्पा भाजप व बसपा यांना अनुकूल, तर तिसरा टप्पा ‘राष्ट्रवादी’, ‘काँग्रेस आय’ आणि ‘भाजप’ यांना अनुकूल असून, या काळात ‘तरंगती’ मते या पक्षांना मिळतील. चौथ्या व शेवटच्या टप्प्याचा काळ कोणत्याच पक्षाला अनुकूल नसून, संमिश्र परिस्थिती दिसेल.
निवडणुकीनंतर केंद्रातील प्रमुख पक्षांचे बलाबल असे असेल :
काँग्रेस आय- १६५ ते १७० जागा
भाजप- ११० ते ११५ जागा
शिवसेना- १० ते १२ जागा
राष्ट्रवादी काँग्रेस- १५ ते १६ जागा
ब.स.पा.- ५५ ते ६० जागा
नव्या प्रादेशिक पक्षांना चांगल्या जागा मिळतील. त्यामुळे काँग्रेस आपल्या मित्रपक्षांबरोबर सरकार स्थापन करत असताना ब.स.पा. सरकारमध्ये सामील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काँग्रेस आयला सर्वात जास्त जागा मिळाल्यामुळे पंतप्रधान त्या पक्षाचाच होईल. मनमोहनसिंग हे पंतप्रधानपदाचे प्रमुख दावेदार असतील. दुसऱ्या क्रमांकाच्या प्रमुख नेत्यासाठी पुन्हा उपपंतप्रधानपद निर्माण होण्याची शक्यता आहे.
लालकृष्ण अडवाणी, मायावती, शरद पवार, लालूप्रसाद यादव, मुलायमसिंग यादव, जयललिता, राहुल गांधी यांचे भवितव्य निवडणुकीत सकारात्मक असले तरी रवि-राहू केंद्रयोग असल्यामुळे त्यांचे मताधिक्य घटलेले दिसेल. राहुल गांधी यांचा सरकार-प्रवेश २०१३ नंतर संभवतो.
डाव्या पक्षांच्या बलाबलाचा विचार करता मागच्या निवडणुकीत मिळालेल्या जागांपेक्षा (६०) या वेळेस कमी- म्हणजे सुमारे ३५ ते ४५ जागांवर त्यांना समाधान मानावे लागेल.
महाराष्ट्रातील पक्षीय बलाबलाचा विचार करता कुठल्याच पक्षाला १२ पेक्षा जास्त जागा मिळतील असे दिसत नाही. अपक्ष आणि प्रादेशिक पक्ष महत्त्वाची भूमिका बजावतील. सर्वसाधारणपणे सर्व प्रमुख पक्ष- राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, भाजप यांना १० ते ११ जागा प्रत्येकी असण्याची शक्यता आहे.
भारताच्या आर्थिक भवितव्याचा विचार करताना आतापर्यंत देशाला तीन ते चार वेळा मंदीचा धक्का बसला आहे. अजूनही सव्वा वर्षे मंदीचा परिणाम राहील. त्यानंतर आर्थिक परिस्थिती सुधारलेली दिसेल.
भारताला दहशतवादापासून निवडणुकीच्या काळात तिसऱ्या व शेवटच्या टप्प्यात धोका संभवतो. क्वचित या काळातील निवडणुकाही पुढे ढकलाव्या लागतील.
एकंदरीत सर्व ग्रहमानाचा विचार करता येणारे सरकार अल्पकाळासाठी दिसत असून, १।। ते २ वर्षांचा कालावधी जेमतेम पुरा करू शकेल असे वाटते.

काँग्रेसमध्ये गेले तरच शरद पवार पंतप्रधान होतील!
वि. शं. आष्टेकर
भारताच्या कुंडलीत गुरू, मंगळ वगळता सर्व ग्रह कर्क राशीत असून गोचरीचा केतू कर्क राशीतच रेंगाळलेला असल्याने १५ व्या लोकसभेचे भवितव्य अधांतरी असल्याचे दिसते. लोकशाहीचा प्रवास अस्थैर्याकडून अस्थैर्याकडेच सुरू राहणार आहे.
काँग्रेसचे नेतृत्व सोनिया गांधींच्या हाती असल्यासारखे वाटत असले तरी ते अर्धसत्य आहे. काँग्रेस पक्षात निष्ठावंतांची कमी नाही. मनमोहन सिंगांनाही ध्यानीमनी नसताना पंतप्रधान होता आले ते त्यांच्या प्रामाणिकपणामुळे व निष्ठेसोबत असलेल्या अनुभवामुळेच. चिंदबरमही पंतप्रधान बनू शकतात. ते जर पंतप्रधान झाले तर मग महाराष्ट्रातही जयंत पाटील मुख्यमंत्री बनू शकतील. प्रणव मुखर्जी हेही पंतप्रधानपदासाठी कणखर व योग्य उमेदवार असून, त्यांचे नावही उद्या चर्चेत येऊ शकते. तसेच सर्वाना विसर पडला असला, तरी ग्रहरूपी जनार्दनाने नारायणदत्त तिवारींनाही या स्पर्धेत आणले तर नवल वाटू नये.
मनमोहनसिंग यांची जन्मपत्रिका विचारात घेता सध्यातरी त्यांचे ग्रहमान इतके वाईट नाही. सांप्रत गुरू महादशेतील गुरूची अंतर्दशा सुरू असून ती १८ नोव्हेंबर २००९ पर्यंत असेल. गुरू सिंह राशीत असताना २५ मे २००४ ला त्यांना पंतप्रधान होता आले. आता गुरू सप्तमात असून जन्मस्थ राहूवरून भ्रमण करणार असल्याने पुन्हा पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर बसण्याची शक्यता फक्त ५० टक्के गृहीत धरता येईल. फार तर ते नाइट वॉचमनची भूमिका बजावू शकतील.
काँग्रेस पक्षाची धनु लग्नाची कुंडली विचारात घेता गुरू सध्या ग्रहणयोगात म्हणजे राहूसोबत आहे. १ मेपासून तो कुंभ राशीत जात असून, मेष राशी लाभात येत असल्याने मित्रपक्षांबरोबर परत एकदा सरकार स्थापन करण्यात हा पक्ष यशस्वी ठरू शकेल.
प्रतिस्पर्धी भाजपचे लालकृष्ण आडवाणी यांचे ग्रहमान पाहता फार मोठे भव्यदिव्य यश सूचित होत नाही.
शरद पवार यांना त्यांची सध्याची ग्रहदशा पंतप्रधान बनवू शकते, असा आमचा होरा आहे. त्यांच्या कुंडलीतील जमेची बाजू म्हणजे शनी-गुरूयुती व या समयी गुरू त्यांच्या राशीला अकरावा होत आहे. काँग्रेसचीही मेष राशी आहे. समजा- उद्या काळाची गरज म्हणून पाच-पन्नास खासदारांना घेऊन शरद पवार काँग्रेसमध्ये परत गेले व त्यांनी सोनिया गांधींशी जमवून घेतले तर तेही पंतप्रधान होऊ शकतात. बसपचा हत्ती सत्तेच्या गजगामिनीमागे कितीही वेगाने पळत गेला तरी या घटकेला दिल्ली गाठू शकत नाही. मायावती यांची जन्मपत्रिका कर्क लग्नाची आहे. त्यांची जन्मपत्रिका सध्या गोचर राहू-केतूमुळे जाम झाली आहे. कारण मनमोहन सिंगांची कर्क राशी जशी केतूमुळे अडकली आहे, तशीच मायावतींची मकर राशी (मकरेत चंद्र- रवि- बुध) ग्रहणामुळे निस्तेज झाली आहे.
कांशीराम यांच्या ध्येयधोरणांना या महामायेने आकार-उकार दिला आणि उत्तर प्रदेश सर करून आता दिल्ली काबीज करण्याचा घाट त्यांनी घातला आहे. राहूची अंतर्दशा सुरू आहे. राहू म्हणजे मायनॉरिटी. खरंच, जर मायनॉरिटींनी (आझमभाई व तेथील अन्य नेते) मायावती यांना मोठय़ा प्रमाणात खासदार निवडून दिले तर त्या पंतप्रधानपदी तिसऱ्या आघाडीसह निश्चितपणे पोहोचू शकतात.