Leading International Marathi News Daily
रविवार , ३ मे २००९

चेन्नईकडून पराभवाची परतफेड
दिल्लीवर १८ धावांनी मात
जोहान्सबर्ग , २ मे / वृत्तसंस्था
इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्जला पराभूत करणाऱ्या दिल्ली डेअरडेव्हिल्सला आज या पराभवाची परतफेड चेन्नईने केली. शादाब जकातीने २४ धावांत घेतलेले ४ बळी व त्याला त्यागी (१८-२) , मुरलीधरन (२२-१) , मॉर्केल (३२-१) यांनी दिलेली तोलामोलाची साथ यामुळे चेन्नईने दिल्लीला १८ धावांनी पराभूत केले. या विजयासह चेन्नईने चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना एस. बद्रिनाथ (३२) , हेडन (३०) रैना (३२) यांच्या फलंदाजीच्या जोरावर १६३ धावापर्यंत मजल मारली. गोलंदाजीतही त्यांनी सुरुवातीला यशाची चव अगदी लवकर चाखली. त्यागीने गौतम गंभीर (१३) व डिव्हिलियर्स (०) यांना माघारी परतविले. पण वीरेंद्र सेहवागऐवजी सलामीला आलेल्या डेव्हिड वॉर्नर (५१) व दिनेश कार्तिक (५२) यांनी चौथ्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी करून दिल्लीला विजयाची आशा दाखविली. मात्र ही जोडी फुटल्यावर अवघ्या १८ धावांत दिल्लीचे चार फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले आणि त्यांचे आव्हान संपुष्टात आले. दिल्लीला ८ बाद १४५ अशी मजल मारता आली. दिल्लीच्या वॉर्नर , कार्तिक , दिलशान अशा प्रमुख फलंदाजांना माघारी धाडणाऱ्या जकातीलाच सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचे पारितोषिक मिळाले.

सहा रुग्णांची स्वाईन फ्लू
चाचणी निगेटिव्ह

नवी दिल्ली २ मे/पीटीआय

‘स्वाईन फ्लू’ या रोगाचा संसर्ग होऊ नये याची खबरदारी घेण्याचे निर्देश अंधेरी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार त्यांनी तोंडावर ‘मास्क’ वापरणे सुरू केले आहे. गेल्या काही दिवसांत परदेशातून भारतात आलेल्या सहा व्यक्तींची तपासणी करण्यात आली असता त्यांची स्वाईन फ्लू चाचणी नकारात्मक आली आहे, त्यांना स्वाईन फ्लू झाल्याचा संशय होता. अजून एका व्यक्तीला देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. स्वाईन फ्लू एच१ एन१ या विषाणूची जी चाचणी घेण्यात आली त्यात या सहाही जणांचे नमुने निगेटिव्ह आले. त्यांच्यात स्वाईन फ्लू रोगासारखी लक्षणे दिसली होती.

वांद्रे-वरळी सेतूवर बसविणार ‘बुद्धिमान कॅमेरे’
सलील उरूणकर, पुणे, २ मे
तापमान वाढल्यामुळे कॉँक्रीटच्या रस्त्यावर वाहनांचे टायर फुटून अपघात झाल्याचे आपल्या निदर्शनास नेहमीच येते. मात्र आता सेन्सर्सच्या मदतीने, वाढत्या तापमानाचा वेध घेऊन वाहनचालकांना कमाल व किमान वेगमर्यादेबाबत सूचना देण्याची यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. ‘बांद्रा-वरळी सी-लिंक’ या लक्षवेधी प्रकल्पांतर्गत ‘एफकॉन इंडिया’ या कंपनीतर्फे ही यंत्रणा त्या मार्गावर बसविण्यात येणार आहे. यासह, टेहळणी व सुरक्षिततेसाठी पाचशे मीटरच्या अंतरावर उच्चदर्जाचे कॅमेरे आणि टोल-चोरी रोखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उपाययोजनेचा समावेश या यंत्रणेत करण्यात आला आहे.

भिवंडीतील अग्निकांडात दोघांचा मृत्यू
भिवंडी, २ मे/वार्ताहर

सरवली येथील एमआयडीसीमधील बॉम्बे लिम्पस प्रा. लि. या डाईंग कंपनीला सकाळी अचानकपणे लागलेल्या भीषण आगीत दोन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला, तर तीन कामगार जखमी झाले. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. विनोद छत्रपाल यांच्या मालकीच्या कापडावर प्रक्रिया करणाऱ्या या कंपनीत २०० ते २५० कामगार काम करीत आहेत. सकाळी ९.१५ वाजण्याच्या सुमारास आपापले नेमून दिलेले काम करण्यासाठी कामगार गेले असता अचानकपणे आग लागली. या आगीत अडीच लाख मीटर कापड जळून खाक झाले. कापडाने पेट घेतल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. आग लागताच डाईंगच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या कामगारांनी आपली सुटका करून घेण्यासाठी छताचे पत्रे तोडून उडय़ा मारून आपला जीव वाचवला. मात्र आगीच्या कचाटय़ात सापडल्याने मच्छींद्र लोटन परदेशी (४२) आणि प्रकाश मनोहर पाटील (४५) यांचा होरपळून मृत्यू झाला, तर दीपक विनोद सिंग, मुन्ना तिवारी, नित्यानंद हे तिघे जखमी झाल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

जळगावमध्ये डुकरे, शेळ्या, कोंबडय़ांचा संशयास्पद मृत्यू
जळगाव, २ मे / वार्ताहर

जिल्ह्य़ाच्या अमळनेर, भडगाव व चाळीसगाव तालुक्यातील अनेक डुकरे, शेळ्या आणि कोंबडय़ांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. जगभर सुरु असलेल्या ‘स्वाइन फ्लू’च्या चर्चेच्या पाश्र्वभूमीवर हा प्रकार उघडकीस आल्याने प्रशासन कार्यप्रवण झाले असले तरी सदरचे मृत्यू हे कडाक्याच्या उन्हामुळे झाले असावेत असा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर वर्तविला आहे. दरम्यान, बोरखेड येथील ५० शेळ्यांचा मृत्यू विषबाधेने झाल्याचा संशय आहे.

नेत्यांची ‘टुरटूर’
मुंबई, २ मे/प्रतिनिधी

उष्म्याचा उच्चांक आणि लोकसभा निवडणुकीचा दमछाक करणारा प्रचार संपवून वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे प्रमुख नेते विदेश दौऱ्याला रवाना झाले आहेत किंवा बॅगा भरत आहेत. १६ मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वी ‘नेत्यांची टुरटूर’ संपेल आणि मग पंतप्रधानपदाकरिता छोटय़ा पक्षाच्या ‘नेत्यांची टुरटूर’ राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांना सहन करावी लागेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कडवे आव्हान आणि युतीमधील तणाव यामुळे कावलेल्या शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी लंडनच्या दिशेने प्रयाण केले आहे. लंडनमध्ये ठाकरे यांचे निवासस्थान असून तेथे त्यांचे वास्तव्य असेल. आयपीएलकरिता पोलीस सुरक्षा पुरविणे अशक्य झाल्याने ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत गेल्याने काही राजकीय नेते अस्वस्थ झाले होते. मतदानाची धामधूम संपताच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे आयपीएलचे सामने पाहण्याकरिता दक्षिण आफ्रिकेला गेल्याचे समजते.

‘जोशींवरील आक्षेप अन्यायकारक’
मुंबई, २ मे/प्रतिनिधी

दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात मनोहर जोशी यांनी मनापासून काम केले असून त्यांचेवरील आक्षेप पूर्णपणे निराधान, कपोलकल्पित आणि अन्यायकारक असल्याचे मत शिवसेना उमेदवार सुरेश गंभीर व विभागप्रमुख मिलिंद वैद्य यांनी व्यक्त केले आहे. ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘शिवसेनाप्रमुखांच्या अष्टप्रधानांपैकी दोघांवर कारवाई करण्याचे उद्धव यांच्यापुढे आव्हान’ या वृत्ताबद्दल उभयतांनी म्हटले आहे की, जोशी यांनी युतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा, जाहीर सभा, प्रचारफेरी आणि मतदानाच्या दिवशी प्रमुख कार्यालयांना भेटी हे कार्यक्रम करून शिवसैनिकांना उत्तेजन दिले.

मुंबईतील दोन बुथवर सोमवारी फेरमतदान
मुंबई, २ मे / प्रतिनिधी

मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातील कालिना येथील १८३ आणि १८५ क्रमांकाच्या बुथवर फेरमतदान घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले असून त्यानुसार येत्या सोमवारी तेथे मतदान घेण्यात येणार आहे. या बुथवरील मतदान यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचा अहवाल निवडणूक आयोगाच्या निरीक्षकांनी दिला होता. या मतदारसंघात काँग्रेसच्या प्रिया दत्त, भाजप-शिवसेना युतीचे अ‍ॅड. महेश जेठमलानी आणि मनसेच्या शिल्पा सरपोतदार यांच्यात प्रमुख लढत होत आहे.

 

इंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.प्रत्येक शुक्रवारी