Leading International Marathi News Daily

रविवार , ३ मे २००९

अतिक्रमणांवर फिरला बुलडोझर
आचारसंहिता संपताच चिकलठाणा भागातील १३६ जणांवर कारवाई

औरंगाबाद, २ मे/प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता काही प्रमाणात शिथिल होताच महानगरपालिका प्रशासनाने तडाखेबंद कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे. चिकलठाणा भागातील सरकारी जमिनीवर उभ्या राहिलेल्या पक्क्य़ा अतिक्रमणांना आज तोडण्यात आले. सात एकर परिसरावर १३६ पक्क्य़ा अतिक्रमणांना आज प्रशासनाने कडक पोलीस बंदोबस्तात पाडण्याची कारवाई केली. चिकलठाणाभागात सात एकर सरकारी गायरान जमीन असून गेल्या काही वर्षांपासून त्यावर मोठय़ा प्रमाणावर अतिक्रमण झाले होते.

पाऊल अडते कुठे?
मराठी माणूस. त्याच्या ‘व्यवसाय-प्रियते’बद्दल एक विनोद प्रसिद्ध आहे. मराठी माणूस विजयादशमीला व्यवसाय सुरू करून सीमोल्लंघन करतो आणि शिमग्याला त्याच्या दुकानाला टाळे लागलेले असते. उद्योग-धंद्यामध्ये मराठी माणसाला असलेला ‘रस’, मराठी माणसाची उद्योजकीय मनोवृत्ती, ‘देश’ सोडून ‘परप्रांता’मध्ये स्थिरावण्याची त्याची इच्छा..या साऱ्याबद्दल खूप काही लिहून झाले आहे. बोलून झाले आहे. आणि ऐकूनही. चर्चासत्रे, परिसंवाद, व्याख्याने, शिबिरे असेही बरेच काही झाले, चालू आहे आणि होत राहीलही.

कायम विनाअनुदानित शाळांतील कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न निकाली
शिक्षण विभागामार्फत पगार करण्याची सूचना

औरंगाबाद, २ मे/खास प्रतिनिधी

राज्यात कायम विनाअनुदान तत्त्वावरील शाळा, महाविद्यालये आणि व्यावसायिक शैक्षणिक संस्था फोफावल्या आहेत. या शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार दिले जात नाही. या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एन. व्ही. दाभोळकर आणि न्या. ए. व्ही. पोतदार यांनी न्यायिक दखल घेतली आहे.

भाजप कार्यकर्त्यांच्या वाडय़ावर छापा टाकून गव्हाचा अवैध साठा पकडला
गंगाखेड, २ मे/वार्ताहर

जिल्हा पुरवठा प्रशासनाने १ मे रोजी शहरातील एका ज्येष्ठ भाजप कार्यकर्त्यांच्या वाडय़ावर छापा टाकीत सुमारे अडीच लाख रुपये किमतीची स्वस्त धान्य दुकानातील ५०० पोती हस्तगत केली. मात्र कारवाईचा मोठा बडगा करणाऱ्या जिल्हा प्रशासनाने केवळ पोती हस्तगत करीत मुख्य आरोपी व यामागचे सूत्रधार यांच्यावर कडक कारवाई न करता त्यांना रान मोकळे सोडल्याने या कारवाईच्या गंभीरतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.

तरुण महिलेचा उष्माघाताने मृत्यू
सिल्लोड, २ मे/वार्ताहर

शेतात काम करीत असताना उन्हाचा फटका बसल्याने रंजना राजीव गोरे (वय २७) या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उन्हाची तीव्रता वाढल्याने मृत्यू झाल्याची तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे. अंधारी (ता. सिल्लोड )येथील रंजना गोरे ही नेहमीप्रमाणे आपल्या शेतात काम करीत होती. दुपारी १२ च्या सुमारास तिला चक्कर येऊन उलटय़ा झाल्या. उपचारासाठी अंधारी येथील रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू असताना औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.

वरठाण शिवारात मेंढपाळ वस्तीवर दरोडा
सोयगाव, २ मे/वार्ताहर

तालुक्यातील वरठाण येथे एका शेतावर मेंढपाळाच्या वस्तीवर शनिवारी पहाटे ३ च्या सुमारास १६ ते १७ दरोडेखोरांनी मेंढपाळ कुटुंबांना बांधून १७ हजारांची लूट केली.
वरठाण येथील विक्रम गंगाराम महाजन यांच्या शेतात रामभाऊ ओंकार गुंजाळ यांच्या मेंढय़ांचा कळप तीन दिवसांपासून होता. शनिवारी पहाटे ३ च्या सुमारास १६-१७ हाफ चड्डी, बनियन घातलेल्या दरोडेखोरांनी वस्तीवर हल्ला केला. रामभाऊ व त्यांच्या पत्नी तसेच इतर दोन महिला, पुरुषांना झाडाला बांधून ठेवले व बेदम मारहाण केली. प्रचंड दहशत निर्माण झाल्याने या मेंढपाळांनी स्वत:जवळील दागिने व रोख रक्कम दरोडेखोरांच्या हवाली केली. विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्य़ात मेंढपाळाच्या वस्तीवर दरोडय़ाच्या घटा घडल्या. वरठाण हे गावही जळगावच्या सीमारेषेवर आहे. या घटनेची माहिती मिळताच फौजदाज अरुण सोळंके घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची नोंद सोयगाव पोलीस ठाण्याला झाली आहे.

परभणी आकाशवाणी केंद्राला प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार
परभणी, २ मे/वार्ताहर

तांत्रिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल परभणी येथील आकाशवाणी केंद्रास राष्ट्रीय स्तरावरील प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. आकाशवाणीचे वार्षिक कार्य पुरस्कार नुकतेच जाहीरझाले आहेत. २००८ मध्ये तांत्रिक क्षेत्रातील प्रथम पुरस्कार परभणी आकाशवाणीस जाहीर झाला आहे. आकाशवाणी परभणी केंद्राचे प्रसारण टाकळी कुंभकर्ण येथील प्रक्षेपकाद्वारे करण्यात येते. याच आवारात नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण करून त्या ठिकाणी ट्रान्समीटर प्रक्षेपकाची फेरबांधणी करण्यात आली. या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल केंद्रास हा पुरस्कार जाहीर झाला आहे. आकाशवाणीच्या अभियांत्रिकी विभागाने अतिशय कमी वेळात हे काम पूर्ण केले. प्रक्षेपकाची कार्यक्षमता वाढवून दर्जा सुधारल्यामुळे प्रक्षेपण अधिक अंतरापर्यंत सुस्पष्टरित्या होत आहे, असे केंद्र अभियंता व्ही. राजेश्वर यांनी सांगितले.

हिंगोलीत कृषिदिंडीचे उद्घाटन
हिंगोली, २ मे/वार्ताहर

नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांनी कमी खर्चात अधिक धान्य उत्पादन करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन व्हावे यासाठी जिल्ह्य़ात कृषी दिंडी कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती मधुकर पन्हाळे यांनी दिली. जिल्हा कृषी विभागाच्या वतीने शुक्रवारी खरीप हंगाम दृष्टी समोर ठेवून, कृषीदिंडीचे आयोजन केले होते. या निमित्ताने जिल्हाभर फिरणाऱ्या माहितीच्या रथाचे उद्घाटन श्री. पन्हाळे यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. पी. एस. बार्दाळे या वेळी उपस्थित होते. खरीप हंगामात बियाणे खरेदी, खते खरेदी, पेरणी, सुधारित जातीचा वापर, रासायनिक खतांचा वापर, बीज प्रक्रिया, सेंद्रीय शेती, जनावरांची संख्या वाढविणे, कीटकनाशकांचा वापर, पीक संरक्षण या विषयीची माहिती कृषी रथाद्वारे गावोगाव शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. प्रास्ताविक ए. जी. वाघमारे यांनी केले.

लोकवर्गणी व श्रमदानातून बेलगावकरांची भागतेय तहान!
चाकूर, २ मे/वार्ताहर

एप्रिलअखेरीसच पाण्याची पातळी खालवल्यामुळे तालुक्यातील बेलगावच्या जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी कोसो दूर भटकंती करावी लागत होती. पुढारी व निर्ढावलेल्या प्रशासनाकडून कुठल्याच प्रकारची उपाययोजना होत नसल्यामुळे बेलगावकरांनी लोकवर्गणी व श्रमदानातून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून आदर्श निर्माण केला आहे. बेलगाव येथे पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था नसल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी तब्बल चार-चार किलोमीटर पायपीट करून पाणी आणावे लागते. याबाबत पुढारी व प्रशासनाकडे वर्षांनुवर्षे खेटे मारूनसुद्धा पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था केली जात नव्हती. गावऱ्यांनीनी बैठक घेऊन मोहन सूर्यवंशी या शेतकऱ्याच्या शेतातून पाईपलाईनद्वारे गावात पाणी आणून पिण्याच्या पाण्याची सोय करण्याचे ठरवले. यासाठी पाइपलाईनचा खर्च लोकवर्गणीद्वारे जमा करून श्रमदानातून पाण्याची व्यवस्था केली.

उन्हाळी मशागतीस सुरुवात
परतूर, २ मे/वार्ताहर

परतूर तालुक्यात खरीप हंगामाची जय्यत तयारी सुरू झाली असून शेतकरी खरीपपूर्व मशागतीच्या कामात सध्या व्यस्त आहेत. ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहे, असे शेतकरी कापूस लागवडीच्या तयारीत आहेत. परिसरातील शेतकरी संध्या खरीपपूर्व मशागतीच्या कामात व्यग्र आहेत. शेताची नांगरणी, वखरणी, पाणी घालणे, इतर कामे जोमात सुरू आहेत. पाणी उपलब्ध असणारे शेतकरी कापूस लागवडीच्या तयारीत आहेत. येत्या हंगामात चांगला पाऊस पडेल या आशेवर शेतकरी उन्हाळी मशागतीच्या कामात सध्या व्यग्रआहे.

संकेत मोटर्सला भीषण आग
औरंगाबाद, २ मे/प्रतिनिधी

सिडको एन-१ भागातील संकेत मोटर्समध्ये शनिवारी पहाटे शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. यात सुमारे २० लाखांचे नुकसान झाले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे.
पहाटे ५ च्या सुमारास संकेत मोटर्समधून मोठा आवाज येऊन परिसर दणाणला. आवाज कशाचा झाला हे पाहण्यासाठी नागरिक घराबाहेर पडले. संकेतमध्ये बघता बघता आग लागली. आगीत इंडिका कार (क्र. एमएच-२०-बी-१११) भस्मसात झाली, तर एमएच-२०-एजी-३१००, एमएच-२२-एस-३३३, एमएच-३३-ए-७८४, एमएच-१-आर-८७५० व एमएच-२०-एजी-७९६३ या चार चाकी गाडय़ांना आगीची झळ बसली. या आगीवर अग्निशमन दलाने तब्बल दोन तास झटून नियंत्रण मिळविले. आगीमुळे दुरुस्तीसाठी आलेल्या गाडय़ा तसेच सामग्री असे २० लाखांचे नुकसान झाले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे.

श्रीधर फडके यांचा ‘बाबूजी आणि मी’ कार्यक्रम आज
औरंगाबाद, २ मे/खास प्रतिनिधी

जुनी मराठी गाणी आजही श्रवणीय आहे, कारण ही गाणी प्रासादिक आहे, त्यांना ऱ्हिदम आहे, त्यात अर्थपूर्ण काव्य आहे. त्यामुळेच ही गाणी आजही रसिकांना ऐकाविशी वाटतात, असे मत प्रसिद्ध गायक श्रीधर फडके यांनी व्यक्त केले. सुधीर फडके यांचे ते चिरंजीव होत. ‘बाबूजी आणि मी’ हा कार्यक्रम मीडिया केअरच्या वतीने औरंगाबाद शहरात रविवारी, संत एकनाथ मंदिरात रात्री साडेआठ वाजता होणार आहे. ‘बाबूजी आणि मी’ या कार्यक्रमाद्वारे सुधीर फडके यांनी गायिलेली गाणी श्रीधर फडके गाणार आहेत. तसेच श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध आणि स्वरबद्ध केलेली गाणीही या कार्यक्रमात ऐकावयास मिळणार आहे. सुधीर फडके ऊर्फ बाबूजींनी सादर केलेल्या विविध गाण्यांबद्दलच्या आठवणी यावेळी सांगण्यात येईल. गाणी सादर करताना त्यांचा शब्दोच्चार, गाण्याला चाल कशी लावायची अथवा एखाद्या गाण्याबद्दलची विशेष माहिती या कार्यक्रमाद्वारे दिली जाणार आहे. अशी पाखरे येती, प्रिया आज माझी नसे साथ द्यावया, सखी मंद झाल्या तारका, स्वर आले दुरुनी ही बाबूजींची सुश्राव्य गीते सादर केली जाणार आहेत. औरंगाबाद शहरात संगीतावर कार्यशाळा घेण्याची इच्छा श्रीधर फडके यांनी यावेळी बोलून दाखविली. पुण्यामध्ये अशी कार्यशाळा घेण्यात आली होती. शिबिरार्थीकडून १२ ते १४ गाणी आपण बसवून घेतल्याची माहितीही श्रीधर फडके यांनी दिली. यावेळी कार्यक्रमाच्या निवेदिका धनश्री लेले, उद्योजक प्रसाद कोकिळ, सुधीर शिरडकर आणि मीडिया केअरचे संचालक दत्ता जोशी आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र दिनी शासकीय ध्वजारोहणास अधिकारी अनुपस्थित
चौकशीची मागणी, चाकूर, २ मे/वार्ताहर

महाराष्ट्र दिनी तहसील कार्यालयात होणाऱ्या मुख्य शासकीय ध्वजारोहणास तालुक्याच्या अनेक विभागाचे अधिकारी अनुपस्थित होते. त्यामुळे याची चौकशी करण्याची मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुभाष काटे यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
प्रत्येक वर्षी स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिन, मराठवाडा मुक्ती संग्रामदिन व महाराष्ट्र दिनाचे मुख्य शासकीय ध्वजारोहण तहसील कार्यालयाच्या प्रांगणात होते. या ध्वजारोहणात तालुका कार्यालयाचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित राहतात. शुक्रवारी (१ मे) मुख्य शासकीय ध्वजारोहण तहसील कार्यालयाच्या प्रांगणात झाले. मात्र या वेळी बहुतांश अधिकारी अनुपस्थित होते. महाराष्ट्रदिनाच्या या कार्यक्रमास अनुपस्थित राहून, हलगर्जीपणा दाखविणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कार्यवाही करावी व पंचायत समितीच्या महिला सभापतींना डावलून उपसभापतीच्या हस्ते ध्वजारोहण करणाऱ्या गटविकास अधिकाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणीही काटे यांनी केली आहे.