Leading International Marathi News Daily
रविवार , ३ मे २००९
(सविस्तर वृत्त)

सहा रुग्णांची स्वाईन फ्लू
चाचणी निगेटिव्ह
नवी दिल्ली २ मे/पीटीआय

‘स्वाईन फ्लू’ या रोगाचा संसर्ग होऊ नये याची खबरदारी घेण्याचे निर्देश अंधेरी येथील

 

आंतरराष्ट्रीय विमानतळ कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार त्यांनी तोंडावर ‘मास्क’ वापरणे सुरू केले आहे.
गेल्या काही दिवसांत परदेशातून भारतात आलेल्या सहा व्यक्तींची तपासणी करण्यात आली असता त्यांची स्वाईन फ्लू चाचणी नकारात्मक आली आहे, त्यांना स्वाईन फ्लू झाल्याचा संशय होता. अजून एका व्यक्तीला देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. स्वाईन फ्लू एच१ एन१ या विषाणूची जी चाचणी घेण्यात आली त्यात या सहाही जणांचे नमुने निगेटिव्ह आले. त्यांच्यात स्वाईन फ्लू रोगासारखी लक्षणे दिसली होती. त्यांच्या रक्ताचे नमुने नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ कम्युनिकेबल डिसिजेस या संस्थेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यातील सहा जणांचे नमुने निगेटिव्ह आले, असे या संस्थेचे संचालक शिवलाल यांनी सांगितले.
या नमुन्यांची इनफ्लुएंझा ए या विषाणूसाठी झटपट चाचणी घेण्यात आली असता ती निगेटिव्ह आली त्यामुळे पुढे आणखी तपासण्या करण्याची गरज भासली नाही कारण इनफ्लुएंझा ए या विषाणूमुळेच स्वाईन फ्लूची लागण होते त्यानंतर एच१एन१ फ्लूसाठीच्या इतर चाचण्या करण्याची गरज भासली नाही. सहा नमुने राम मनोहर लोहिया रुग्णालयातून तपासणीसाठी या संस्थेकडे पाठवण्यात आले होते. एक नमुना चाचणीसाठी हैदराबादहून पाठवण्यात आला होता. राम मनोहर लोहिया रुग्णालयात एका अनिवासी भारतीयाला दाखल केले असून तो लंडनचा रहिवासी आहे. त्याच्या चाचणीचे निष्कर्ष अजून आलेले नाहीत. इतर पाच जणांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. गेल्या २४ तासांत पाच जणांना राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. टेक्सासहून अलिकडेच गाझियाबादला परतलेल्या एका इसमाने वृत्तपत्रातील बातम्या वाचल्या व तो स्वत:हून रुग्णालयात दाखल झाला.