Leading International Marathi News Daily
रविवार , ३ मे २००९
(सविस्तर वृत्त)

जळगावमध्ये डुकरे, शेळ्या, कोंबडय़ांचा संशयास्पद मृत्यू
जळगाव, २ मे / वार्ताहर

जिल्ह्य़ाच्या अमळनेर, भडगाव व चाळीसगाव तालुक्यातील अनेक डुकरे, शेळ्या आणि

 

कोंबडय़ांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. जगभर सुरु असलेल्या ‘स्वाइन फ्लू’च्या चर्चेच्या पाश्र्वभूमीवर हा प्रकार उघडकीस आल्याने प्रशासन कार्यप्रवण झाले असले तरी सदरचे मृत्यू हे कडाक्याच्या उन्हामुळे झाले असावेत असा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर वर्तविला आहे. दरम्यान, बोरखेड येथील ५० शेळ्यांचा मृत्यू विषबाधेने झाल्याचा संशय आहे.
अमळनेर तालुक्यातील दहिवद परिसरातील सुमारे हजार पाळीव डुकरे व १५० शेळ्या गेल्या पंधरवडय़ात अज्ञात रोगाने मरण पावल्या होत्या. भडगाव तालुक्यातील खेडगाव परिसरातही गेल्या दहा ते बारा दिवसात पाचशेहून अधिक कोंबडय़ा दगावल्या आहेत. सध्या जगात अनेक ठिकाणी ‘स्वाइन फ्लू’चे रुग्ण आढळून येत असल्याच्या पाश्र्वभूमीवर या प्रकाराकडे गांभिर्याने पाहिले जात आहे. त्यामुळे उपरोक्त ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी भेटी देवून परिस्थितीची पाहणी केली असता हा प्रकार प्रथमदर्शनी तरी स्वाइन फ्लूशी संबंधीत नसल्याचा दावा करण्यात येत आहे. दहिवद परिसरात डुकरे व शेळ्यांचा झालेल्या मृत्यू हा कडाक्याचे उन व ताप यामुळे झाला असावा तसेच खेडगावातील कोंबडय़ांच्या मृत्युला मानमोडीचा रोग हे कारण असावे असा तर्क आहे. बोरखेड येथे शेळ्यांचा झालेल्या मृत्युस ज्वारीच्या शेतातील विषारी पदार्थ मिश्रित दाणे कारणीभूत असावेत असा प्राथमिक अंदाज जळगावचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एम. एल. साळवे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केला.