Leading International Marathi News Daily
रविवार , ३ मे २००९
(सविस्तर वृत्त)

नेत्यांची ‘टुरटूर’
मुंबई, २ मे/प्रतिनिधी

उष्म्याचा उच्चांक आणि लोकसभा निवडणुकीचा दमछाक करणारा प्रचार संपवून

 

वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे प्रमुख नेते विदेश दौऱ्याला रवाना झाले आहेत किंवा बॅगा भरत आहेत. १६ मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वी ‘नेत्यांची टुरटूर’ संपेल आणि मग पंतप्रधानपदाकरिता छोटय़ा पक्षाच्या ‘नेत्यांची टुरटूर’ राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांना सहन करावी लागेल.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कडवे आव्हान आणि युतीमधील तणाव यामुळे कावलेल्या शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी लंडनच्या दिशेने प्रयाण केले आहे. लंडनमध्ये ठाकरे यांचे निवासस्थान असून तेथे त्यांचे वास्तव्य असेल. आयपीएलकरिता पोलीस सुरक्षा पुरविणे अशक्य झाल्याने ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत गेल्याने काही राजकीय नेते अस्वस्थ झाले होते. मतदानाची धामधूम संपताच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे आयपीएलचे सामने पाहण्याकरिता दक्षिण आफ्रिकेला गेल्याचे समजते. १६ तारखेनंतर शरद पवार यांच्याकरिता ‘पीएम’ पदाचा सामना रंगण्याची शक्यता असल्याने त्या सामन्यातील डावपेच निश्चित करण्याकरिता दक्षिण आफ्रिकेतील गारवा अधिक लाभदायक असल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. उद्योगमंत्री नारायण राणे यांचा ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड दौरा ठरला होता. परंतु अचानक राणे कुटुंबियांनी येथेच राहून कोकणातील हापूसचा आस्वाद घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोकणच्या लाल मातीत राणे यांच्याशी जोरदार संघर्ष केलेले ज्येष्ठ पत्रकार व खासदार संजय राऊत स्वित्र्झलंड, पॅरीस, लंडन येथे ‘ठंडा ठंडा कूल कूल’ होण्याकरिता रवाना झाले आहेत. शिवसेना नेते सुभाष देसाई हे सिंगापूरमध्ये डेरेदाखल झाले आहेत.
मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या डोक्यात सुट्टी टाकून बाहेरगावी जाण्याचा विचार घोळत असला तरी अजून त्यांनी तो प्रत्यक्षात आणलेला नाही. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व पंतप्रधान मनमोहन सिंग हे राजस्थानच्या उन्हातान्हात प्रचार करीत असताना आपण विदेशात मजा मारायला जाणे हा उघड उघड पक्षशिस्तभंग असल्याची बहुतेक काँग्रेसजनांची भावना असल्याने त्यांनी एकतर राजस्थानमध्ये प्रचारात सामील होणे पसंत केले आहे किंवा जवळपासच्या पर्यटनस्थळी जाणे पसंत केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील पुन्हा मंत्रालयाचा सहावा मजला गाठण्याकरिता तिरुपतीला साकडे घालायला गेले आहेत. तर छगन भुजबळ विदेश दौऱ्यावर निवांत असल्याचे कळते.
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे हेही राजस्थानमध्ये प्रचार करीत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुंबईतच ठाण मांडून मनसेच्या संभाव्य मतांचा कानोसा घेत आहेत. १६ मे रोजी निवडणूक निकालानंतर उद्धव ठाकरे यांचे नाक कापण्याचे स्वप्न मनसे उमेदवारांनी दिलसे पूर्ण केले तर उद्धव यांना वणव्यात सोडून राज विदेशात रवाना होतील आणि स्वप्न भंगले तर न चाललेल्या इंजिनचा विचार करीत विमानतळ गाठतील, अशी शक्यता आहे..