Leading International Marathi News Daily
रविवार , ३ मे २००९
(सविस्तर वृत्त)

वांद्रे-वरळी सेतूवर बसविणार ‘बुद्धिमान कॅमेरे’
सलील उरूणकर, पुणे, २ मे

तापमान वाढल्यामुळे कॉँक्रीटच्या रस्त्यावर वाहनांचे टायर फुटून अपघात झाल्याचे आपल्या निदर्शनास नेहमीच येते. मात्र आता सेन्सर्सच्या मदतीने, वाढत्या तापमानाचा वेध

 

घेऊन वाहनचालकांना कमाल व किमान वेगमर्यादेबाबत सूचना देण्याची यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. ‘बांद्रा-वरळी सी-लिंक’ या लक्षवेधी प्रकल्पांतर्गत ‘एफकॉन इंडिया’ या कंपनीतर्फे ही यंत्रणा त्या मार्गावर बसविण्यात येणार आहे. यासह, टेहळणी व सुरक्षिततेसाठी पाचशे मीटरच्या अंतरावर उच्चदर्जाचे कॅमेरे आणि टोल-चोरी रोखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उपाययोजनेचा समावेश या यंत्रणेत करण्यात आला आहे.
‘‘पुलावरील कॅमेरे तसेच ‘पुश-टू-टॉक’ प्रकारच्या दूरध्वनींचा नियंत्रण कक्षाशी संपर्क ठेवण्यासाठी ‘फायबर ऑप्टिक’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. सध्या चालू असलेल्या पुलाच्या बांधकामादरम्यानच या फायबर ऑप्टिक केबल टाकण्यात येत आहेत. ‘इंटलिजिंट ब्रीज सिस्टिम’ असे या योजनेचे नाव आहे,’’ अशी माहिती कंपनीच्या विपणन व्यवस्थापक शीतल शानबाग यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. ‘‘कॉँक्रीटचा रस्ता असल्याने उन्हाळ्यात टायर फुटून आणि पावसाळ्यात दृष्यमानता कमी होण्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. सेन्सर्सद्वारे केलेल्या हवामानाच्या नोंदीवरून पुलावर लावण्यात येणाऱ्या ‘साईन बोर्डस’वर वाहनाचा कमाल आणि किमान वेग दर्शविण्यात येईल. या योजनेमुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल,’’ अशी माहिती कंपनीतर्फे या प्रकल्पाच्या सहायक व्यवस्थापक (डिझाईन) म्हणून काम करणाऱ्या शुभदा कुलकर्णी यांनी दिली. ‘संपूर्ण पूल हा सुमारे ५.८ किलोमीटरचा असून त्यावर पाचशे मीटरच्या अंतरावर एक उच्चदर्जाचा कॅमेरा बसविण्यात येणार आहे. पुलावर एखाद्या वाहनाला अपघात झाल्यास या कॅमेऱ्यांद्वारे त्या परिस्थितीची पाहणी करून पोलीस, रुग्णवाहिका व अन्य तातडीच्या सेवा पुरविणे सोपे जाणार आहे. वाहनात बिघाड निर्माण झाल्यास पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाप्रमाणेच पुलावर ठिकठिकाणी दूरध्वनी केंद्र बसविण्यात आली आहेत. ‘पुश-टू-टॉक’ या पद्धतीचे हे दूरध्वनी असून त्याचा वापर करणाऱ्या वाहनचालकाला पैसे टाकावे लागत नाहीत. अशा कोणत्याही केंद्रावरून दूरध्वनी गेल्यास, नियंत्रण कक्षात बसलेल्या कर्मचाऱ्याला त्या ठिकाणाची माहिती कॅमेऱ्याद्वारे मिळू शकते. त्यामुळे, त्रास देण्याच्या उद्देशाने कोणी दूरध्वनी केल्यास पोलीस किंवा रुग्णवाहिका सेवा पुरविणाऱ्यांची होणारी धावपळ टाळता येऊ शकते,’ असेही कुलकर्णी यांनी सांगितले. टोलनाक्यावर होणारी टोल-चोरी रोखण्यासाठी फायबर ऑप्टिक तसेच ‘लोड सेन्सर्स’चा वापर करण्यात येणार आहे. टोलनाक्यावर आलेले वाहन कोणत्या प्रकारचे आहे हे या तंत्रज्ञानामार्फत समजू शकेल. या माहितीमध्ये आणि नाक्यावरील कर्मचाऱ्याने नोंदविलेले वाहनप्रकार व आकारलेल्या शुल्कात तफावत आढळल्यास टोल-चोरी उघडकीस येईल. तफावत आढळल्यानंतर संबंधित वाहनाचे छायाचित्र काढण्याची सोयही करण्यात येणार आहे.