Leading International Marathi News Daily

रविवार , ३ मे २००९

प्रादेशिक

कसाब २१ वर्षांचाच!
न्यायालयाचेही शिक्कामोर्तब

मुंबई, २ मे / प्रतिनिधी

अभियोग पक्षाने सादर केलेले परिस्थितीजन्य आणि वैद्यकीय पुरावे विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. एल. टहलियानी यांनी पुरावे कायद्यानुसार ग्राह्य मानून पाकिस्तानी दहशतवादी अजमल अमीर कसाब हा मुंबईवरील हल्ल्याच्या दिवशी २१ वर्षांचाच होता या अभियोग पक्षाच्या दाव्यावर शिक्कामोर्तब केले. त्याचप्रमाणे त्याच्यावरील खटला विशेष न्यायालयातच चालविण्यात येणार असल्याचे स्पष्ट करून त्याच्या वयाबाबत निर्माण झालेल्या वादाला कायमस्वरुपी पूर्णविराम दिला.

लालबाग पुलाचे तोडकाम उद्या मध्यरात्रीपासून
मुंबई, २ मे / प्रतिनिधी

मागील काही महिन्यांपासून लांबणीवर टाकलेल्या लालबाग उड्डाणपुलाचे तोडकाम सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू होणार आहे. हे तोडकाम ३० मेपर्यंत चालणार आहे. त्यासाठी पहिले पाच दिवस, १० मेपर्यंत भारतमाता ते सरदार हॉटेल जंक्शन या दरम्यानची वाहतून पूर्णत: बंद राहणार असून वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. त्यानंतर बेस्ट बसेस नियमित मार्गाने धावणार असल्या तरी अन्य वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. मात्र पेडर रोड येथील मल:निसारण वाहिनीचे काम सुरू असतानाच हेही काम सुरू होणार असल्याने दक्षिण मुंबईतील वाहतुकीचा पहिल्या पाच दिवसांत तरी बोजवारा उडण्याची शक्यता आहे.

‘पेडर रोडवरील काम पालिका पूर्ण करणारच’
मुंबई, २ मे / प्रतिनिधी

डॉ. गोपाळराव देशमुख मार्गावरील(पेडर रोड) मलनि:स्सारण वाहिनी बदलण्याच्या कामामुळे वाहतूक कोंडी होत असल्याची तक्रार कोणी केली तरी आता हे काम पूर्ण करण्यात येईल, असे पालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. आजपासून या कामाची सुरूवात झाली आहे. मध्यंतरी हे काम सुरू होताच तक्रारी आल्यामुळे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या कामाला स्थगिती दिली होती. या कामामुळे आजपासून पेडर रोडवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

सह्याद्री नवरत्न सन्मान पुरस्कार जाहीर
मुंबई, २ मे / प्रतिनिधी

मुंबई दूरदर्शन केंद्राच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘सह्याद्री नवरत्न सन्मान पुरस्कारां’ची आज घोषणा करण्यात आली. पुरस्कारविजेत्यांमध्ये ‘लोकसत्ता’चे संपादक कुमार केतकर (रत्नदर्पण), ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (चित्ररत्न), ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर (नाटय़रत्न), कवी नारायण सुर्वे (साहित्यरत्न), ज्येष्ठ संगीतकार अनिल मोहिले (स्वररत्न), अमरावती जिल्ह्यातील मेळघाट येथील डॉ. रवींद्र कोल्हे व डॉ. स्मिता कोल्हे (सेवारत्न), लोककला अभ्यासक मधुकर नेराळे (कलारत्न), कोल्हापुरमधील स्वयंसिद्धा संस्थेच्या कांचन परुळेकर (रत्नशारदा) आणि बुद्धिबळपटू प्रवीण ठिपसे (रत्नसौरभ) यांचा समावेश आहे. ‘सह्याद्री नवरत्न सन्मान पुरस्कारां’चे हे आठवे वर्ष आहे. पुरस्कार वितरण समारंभ ८ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता मुंबईतील दूरदर्शन केंद्राच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. या समारंभाचे प्रसारण ३१ मे रोजी सायंकाळी ४ वाजता सह्याद्री वाहिनीवरून करण्यात येणार आहे.

डॉ. अनिल काकोडकर यांना एम.एम. चुगनी पुरस्कार
मुंबई, २ मे / प्रतिनिधी

भारतीय अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांना इंडियन फिजिक्स असोसिएशनतर्फे दिला जाणारा ‘एम. एम. चुगनी स्मृती पुरस्कार’ जाहीर झाला आहे. मानपत्र, सुवर्णपदक आणि एक लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. राष्ट्रीय तंत्रज्ञानदिनाचे औचित्य साधून ११ मे रोजी काकोडकर यांना नेहरू सेंटर येथे सायं.४.३० वाजता आयोजित करण्यात आलेल्या समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

मानवेंद्रनाथ रॉय यांच्या पुतळ्याचे अनावरण हा एका क्रांतिकारक
विचारवंताचा बहुमान - कुमार केतकर

मुंबई, २ मे / प्रतिनिधी
विचारशक्ती आणि संकल्पनासामथ्र्य हे माणसाचे विशेष लक्षण आहे. ज्ञान आणि विज्ञान हे माणसाच्या सांस्कृतिक प्रगल्भतेचे माध्यम आहे. परंतु जेव्हा धर्मवाद आणि परंपरावाद समाजाच्या मानसिकतेचा कब्जा घेतात तेव्हा एक प्रकारची निर्बुद्धता आणि अविवेक सार्वत्रिकपणे प्रकट होऊ लागतो. अशा स्थितीतच फॅसिझम किंवा अतिरेकी प्रवृत्ती बळावल्या जातात. तो धोका टाळण्यासाठी स्वतंत्र, चिकित्सक आणि बुद्धिप्रामाण्यवादी विचाराची कास धरण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन ‘लोकसत्ता’चे संपादक कुमार केतकर यांनी शुक्रवारी मानवेंद्रनाथ रॉय यांच्या पुतळ्याचे अनावरण करताना केले. हा पुतळा वांद्रे (पू.) येथील ‘एम. एन. रॉय ह्यूमन डेव्हलपमेंट कॅम्पस’ येथे बसविण्यात आला आहे. ‘सेंटर फॉर द स्टडी ऑफ सोशल चेंज’ आणि इंडियन रेनेसाँ इन्स्टिटय़ूट यांच्या संयुक्त विद्यमाने रॉय यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम आणि परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

सुशीलकुमार शिंदे आणि अरुण दाते यांना
‘नवशक्ति जीवन गौरव’ पुरस्कार जाहीर
मुंबई, २ मे / प्रतिनिधी
केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे आणि प्रसिद्ध गायक अरुण दाते यांना यंदाचा ‘नवशक्ति जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. येत्या शनिवारी (९ मे) सायंकाळी सहा वाजता दीनानाथ नाटय़गृहात संपन्न होणाऱ्या समारंभात मुख्यमंत्री अशोक चव्हाण व उपमुख्यमंत्री छगन भुजबळ तसेच ऊर्जामंत्री सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

लेआऊटची गायब झालेली कागदपत्रे अखेर सापडली!
मुंबई, २ मे / प्रतिनिधी

दहिसर येथील चुनाभट्टी या म्हाडा वसाहतीच्या लेआऊटची कागदपत्रे वास्तुरचनाकार विभागातून गहाळ झाल्याची गंभीर बाब उघडकीस आल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी ही कागदपत्रे सापडल्याचा चमत्कार घडला आहे. आता म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य अधिकारी गौतम चॅटर्जी यांनीच या गायब झालेल्या कागदपत्रांप्रकरणी संबंधित वास्तुरचनाकाराचे स्पष्टिकरण मागविले आहे. त्यासाठी आता कनिष्ठ वास्तुरचनाकाराचा बळी देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

राखीशी स्वयंवरासाठी १४ हजार उपवरांनी बांधले बाशिंग
मुंबई, २ मे / प्रतिनिधी
राखी सावंतने स्वयंवराची घोषणा करताच, राखीचा अजून एक पब्लिसिटी स्टंट म्हणून कोणी दुर्लक्ष केले तर काहींनी, हिच्याशी कोण लग्न करणार, असा प्रश्न उपस्थित केला. पण तिच्याशी लग्न करण्यास भारतातील तब्बल १४ हजार तरूण बाशिंग बांधून तयार आहेत. मुंबई, दिल्ली, पाटणा, नागपूर, इंदूर, अहमदाबाद, चंदीगड, कोलकाता या सर्वच ठिकाणांहून त्यासाठी अर्ज पाठविण्यात आले आहेत. राखी सावंतच्या स्वयंवराला मिळालेला प्रतिसाद गेल्या तेवीस दिवसातील आहे. या प्रकाराबद्दल प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया काहीही असल्या तरी तिच्या स्वयंवराला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर ती म्हणाली की, माझे स्वयंवर आणि लग्न ही चेष्टा नाही. या स्वयंवरासाठी अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख ५ मे आहे. या अर्जामधून १५ जणांची निवड ‘राखी का स्वयंवर’ या रिअ‍ॅलिटी शोसाठी करण्यात येणार आहे. ‘एनडीटीव्ही इमॅजिन’ या वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या ‘रिअ‍ॅलिटी शो’च्या माध्यमातून राखी सावंत आपल्या पतीची निवड करणार आहे.

मीरा रोड येथे हल्ला करून दागिने लुटणाऱ्या दुकलीला अटक
मुंबई, २ मे / प्रतिनिधी
अंधेरी पोलिसांनी संशयावरून अटक केलेल्या दोघा इसमांनी मीरा रोड येथे चार दिवसांपूर्वी झालेल्या पाच लाखांच्या जबरी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. या दोघांकडून चोरीचा सारा ऐवजही पोलिसांनी हस्तगत केला आहे. अंधेरी पूर्व परिसरात दोन संशयित चोरीचा ऐवज विकण्यासाठी मोटरसायकलवरून येणार असल्याची माहिती उपनिरीक्षक आनंद भोईर यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचून अरुण मिठालाल जैन (२२) व राजू नरपथसिंग राजपूत (२०) या दोघांना ताब्यात घेतले. तेव्हा त्यांच्या झडतीमध्ये चार लाख ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने पोलिसांच्या हाती लागले. वरिष्ठ निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी केलेल्या चौकशीत या दोघांनी मीरा रोड येथे चार दिवसांपूर्वी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. ऑर्डरप्रमाणे दागिने तयार करून देणाऱ्या इसमावर चाकूने आणि दगडाने हल्ला करून त्याच्याकडील पाच लाखांचे दागिने लुटून या दोघांनी पोबारा केला होता.

अंगणवाडी कर्मचारी महिलांचे उपोषण
मुंबई, २ मे / प्रतिनिधी

राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून मानधन देण्यात आलेले नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची उपसामार होत असल्याची तक्रार महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने केली आहे. या कर्मचाऱ्यांना थकित रक्कमेसह मानधन त्वरीत मिळाले, या मागणीसाठी येत्या १२ मेपासून मंत्रालयावर बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय संघाने घेतला आहे.

भाई सावंत यांचा अमृतमहोत्सवी सत्कार
मुंबई, २ मे / प्रतिनिधी

कोकणातील सामान्य कुटुंबात जन्म घेऊन शून्यातून उद्योगपतीपर्यंत झेप घेणाऱ्या माजी आमदार नीळकंठ ऊर्फ भाई सावंत यांचा अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त ५ मे रोजी सायंकाळी ४ वाजता दादरच्या शिवाजी मंदिरात सत्कार करण्यात येणार आहे. सुनील तटकरे, उज्ज्वल निकम, आ. जयंत पाटील, विवेक पाटील, माजी मंत्री मीनाक्षी पाटील आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत. जे. बी. इंजिनिअिरग या जगप्रसिद्ध कंपनीची स्थापना भाई सावंत यांनी ऐन तारुण्यात केली आणि त्याचा झपाटय़ाने विस्तार केला. मध्य कोकण क्षत्रिय मराठा को-ऑप. सोसायटी, प्रबोधन-गोरेगाव, शिवाजी मंदिर, अ. भा. मराठा महासंघ आदी संस्थांमध्ये ते कायम सक्रिय राहिले. अनेक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध आहे.

कर्करोगग्रस्त तरुणीसाठी आवाहन
मुंबई, २ मे / प्रतिनिधी

माहिम येथे राहणारी मयुरी लहू भिवंडकर ही १८ वर्षांंची तरुणी रक्ताच्या कर्करोगाने आजारी असून तिच्यावर टाटा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिच्यावरील उपचाराचा खर्च आठ लाख रुपयांच्या घरात असून त्यामुळे ती संपूर्ण बरी होऊ शकणार आहे. आठ वर्षांंपूर्वी बंद पडलेल्या टाटा आईल मिलमध्ये काम करणाऱ्या तिच्या वडिलांना आर्थिक परिस्थितीमुळे ते शक्य नाही. त्यामुळे त्यांनी तिला होमिओपथी उपचार सुरू केले होते. परंतु तिच्या तरुण वयामुळे ती बरी होऊ शकत असल्यामुळे आता टाटा रुग्णालयातील डॉक्टरांनीच पुढाकार घेतला आहे. मयुरीला मदत करू इच्छिणाऱ्यांनी आपले धनादेश ‘टाटा मेमोरियल हॉस्पिटल सीई ६६४’ या नावे टाटा रुग्णालय, परळ येथे पाठवावेत. रुग्णालयाकडूनच दात्यांना पावती पाठविली जाणार आहे.