Leading International Marathi News Daily

रविवार , ३ मे २००९

नगर शहरातही पाणीटंचाई
नगर, २ मे/प्रतिनिधी

उन्हाच्या तीव्रतेबरोबरच पाणीटंचाईही जाणवू लागल्याने शहराच्या अनेक भागात टँकरची मागणी होऊ लागली आहे. वीजकपातीमुळे पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करण्यास महापालिकेला अडचणी येऊ लागल्याने टंचाईची तीव्रता वाढत आहे. प्रामुख्याने केडगाव, सिद्धार्थनगर, नाथनगर, सिव्हील हडको भागातून टँकरची मागणी होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून वैशाख वणव्याने जनजीवन चांगलेच होरपळून निघाले आहे. उपलब्ध पाणीसाठेही झपाटय़ाने आटू लागले आहेत. विजेचा खेळखंडोबा, अपुरा पाणीपुरवठा यामुळे शहरातील जनतेत आंदोलनाची भावना बळावत चालली आहे. मुळा धरणातील विहिरीतून शहराला पाणीपुरवठा केला जातो.

टँकर मंजुरीचे अधिकार आता तहसीलदारांकडे
नगर, २ एप्रिल/प्रतिनिधी

पाणीटंचाईची तीव्रता सर्वत्र वाढू लागल्याने राज्य सरकारने पाणीपुरवठय़ासाठी टँकर मंजुरीचे अधिकार आता तालुका पातळीवरील तहसीलदारांकडे सोपविले आहेत. जिल्ह्य़ात सध्या २१ टँकरमार्फत ५२ गावांना पाणीपुरवठा सुरू आहे. त्यातील काही टँकर नगर, श्रीगोंदे व पारनेर तालुक्यांत दूषित उद्भवामुळे सुरू आहेत. पाणीटंचाईची तीव्रता जिल्ह्य़ाच्या दक्षिण भागात अधिक तीव्र आहे. टंचाई जाणवू लागल्याने पिण्याच्या पाण्यासाठी टँकर मंजुरीतील दिरंगाई टाळून मागणीनुसार त्वरित अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने जिल्हाधिकाऱ्यांकडील अधिकार काही दिवसांपूर्वी प्रांताधिकाऱ्यांकडे सोपविले होते.

अक्षरायण
ब्राम्हणे बाळबोध अक्षर। घडसुनी करावे सुंदर।
जे देखतांचि चतुर। समाधान पावती।।
समर्थ रामदासस्वामींच्या
दासबोधातील या ओव्या
खूपच अर्थपूर्ण अन् बोलक्या
कॉम्प्युटर वा टाईपरायटरच्या
छापी सुंदर अक्षरांपेक्षा
असे बाळबोध अक्षर
जे घडवून घडसून सुंदर झाले.
अशा वळणदार अक्षराने
अत्यंत चतुर अन् हुशार
लोकही समाधान पावतात.
कारण यामध्ये लेखन करणाऱ्याने
आपले प्राण ओतलेले असतात.

विद्यार्थ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी शाळांमध्ये समुपदेशक नेमणार - विखे
कोचिंग क्लासेसनाही नियमावली

राहाता, २ मे/वार्ताहर

शालेय विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या थांबविण्यासाठी प्रत्येक शाळेत समुपदेशकाची नेमणूक करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना शाळांमध्ये देण्यात येणाऱ्या शिक्षेबाबतही भविष्यात कायद्याची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली. गेल्या काही दिवसांत शालेय विद्यार्थिनींनी अनुत्तीर्ण झाल्याच्या कारणाने केलेल्या आत्महत्या, तसेच शाळेतील शिक्षकांनी केलेल्या शिक्षेमुळे विद्यार्थ्यांना झालेला शारीरिक-मानसिक त्रास या पाश्र्वभूमीवर मंत्री विखे यांनी सरकारची भूमिका पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केली.

शेतक ऱ्यांच्या प्रश्नांसाठी उद्या कर्जतमध्ये मोर्चा
कर्जत, २ मे/वार्ताहर

तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ४ मे रोजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गुंड यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ११ वाजता सर्वपक्षीय मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात येणार आहे. तालुक्यातील रुईगव्हाण, कुळधरण, शिंदे, कोपर्डी, नांदगाव, दूरगाव, पिंपळवाडी, धालवडी, बारडगाव, येसवडी, करमनवाडी, राक्षसवाडी, अंबीजळगाव, कुंभेफळ, बेनवडी, थेरवडी, चिलवडी, धांडेवाडी, देशमुखवाडी आदी गावांना कुकडीचे उन्हाळी आवर्तन अद्याप मिळालेले नाही. मध्यंतरी करमाळा तालुक्यात नेण्यात आले. मात्र, या तालुक्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्यात आले. शेतकऱ्यांनी कुकडीच्या पाण्यासाठी अर्ज व पैसेदेखील भरले आहेत. त्याचप्रमाणे जीवन प्राधिकरण विभागाकडील आखोणी, निमगाव गांगर्डा प्रादेशिक पाणीयोजना बंद आहेत. या गावांना पाणीटंचाई जाणवत आहे. मात्र, पाणीयोजना कागदोपत्री सुरू असल्याने टँकर मिळत नाही. तेव्हा या दोन्ही योजना तातडीने सुरू कराव्यात, अशीही मागणी आहे.

गोरक्षनाथ गडावर गंगापूजन सोहळा
नगर, २ मे/वार्ताहर

तालुक्यातील मांजरसुंबे येथील गोरक्षनाथ गडावर गंगासप्तमीनिमित्त गंगापूजन करण्यात आले. सुनील आहेर यांच्या हस्ते होमहवन व गंगापूजन करण्यात आले. १ मे रोजी झालेल्या या कार्यक्रमाचे पौरोहित्य कुलकर्णी यांनी केले. होमहवन, तसेच धार्मिक कार्यक्रमास संस्थानचे अध्यक्ष शंकर कदम, सावित्राराम कदम, विलास भुतकर, तसेच सीताराम तांबे, माधुरी वाघ, इंदुबाई तिवारी, श्याम ठाणगे आदी उपस्थित होते. गडावर ५० लाख रुपये खर्चाच्या अन्नदान कक्षाची उभारणी सुरू आहे. तसेच मंदिरावर पिण्याच्या पाण्यासाठी ९ लाख रुपये खर्चाची योजना पूर्ण झाली आहे. ही योजना पूर्ण करण्यासाठी व पाणी उपलब्धतेसाठी सुनील आहेर यांनी एक विंधनविहीर घेतली आहे. त्या पाण्याचेही यावेळी पूजन करण्यात आले.

र्मचट्स बँकेच्या शाखेचे मंगळवारी जामखेडला उद्घाटन
जामखेड, २ मे/वार्ताहर

अहमदनगर मर्चंटस् बँकेच्या जामखेड शाखेचे उद्घाटन मंगळवारी (दि. ५) रोजी सायंकाळी ६ वाजता माजी मंत्री सुरेश जैन यांच्या हस्ते होत आहे. पुण्याच्या कॉसमॉस को-आपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष मुकुंद अभ्यंकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमास आमदार सदाशिव लोखंडे, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रजनीकांत आरोळे यांच्यासह बँकेचे अध्यक्ष आनंदराम मुनोत, उपाध्यक्ष संजय बोरा, मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश पितळे, ज्येष्ठ संचालक हस्तीमल मुनोत आदी उपस्थित राहणार आहेत. नगर अर्बन बँकेनंतर दुसरी मोठी मर्चंस् बँकेची शाखा जामखेडला होत असल्याने शहरातील व्यापाऱ्यांना अधिकाधिक चांगली सेवा मिळणार आहे.

रेल्वेखाली सापडून वृद्धेचा मृत्यू
श्रीरामपूर, २ मे/प्रतिनिधी

रेल्वे क्रॉसिंग करीत असताना सुभेदारवस्ती भागातील जैनुबी सरदार पिंजारी या वृद्धेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू झाला. नेहरू भाजी मार्केटमध्ये टरबूज खरेदी करून जैनुबी रेल्वे रूळावरून घरी जात्य होत्या. भरधाव रेल्वेचा आवाज न आल्याने रेल्वेखाली सापडून त्या मरण पावल्या. रेल्वे पोलिसांनी गुन्ह्य़ाची नोंद केली. मोटरसायकलची चोरी पढेगाव येथील राहत्या घरासमोरून शरद लक्ष्मण बनकर (वय ६२) यांच्या मालकीची एमएच १७ व्ही. ६६०७ या क्रमांकाची मोटरसायकल चोरीस गेली. तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

साडेपाच वर्षांनतर कोपरगावला सर्कस
कोपरगाव, २ मे/वार्ताहर

तब्बल साडेपाच वर्षांच्या अंतराने शहरात एशियन मून लाईट सर्कसचे आगमन झाले. सर्कसचा प्रारंभ उद्या (रविवारी) सायंकाळी ५ वाजता तहसीलदार एस. एस. सोनवणे यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती सर्कसचे मालक ए. खान यांनी दिली.
नगराध्यक्ष मंगेश पाटील, मुख्याधिकारी मुकुंद गुजर या वेळी उपस्थित राहणार आहेत. सर्कशीत ४ हत्ती, ४ घोडे, १२ कुत्रे, १० मकाऊ व काकाकुवा पक्षी, तसेच मोटरसायकल जम्प, जीप जम्प, मृत्यूगोल, ७ विदूषक व ८० कलाकार आहेत. ३२ मालमोटारी भरून सामानसह ही सर्कस लासलगावहून कोपरगावी आली. अनेक वर्षांनंतर सर्कस पाहण्याचा आनंद कोपरगावकरांना घेता येणार आहे. हरिभाऊ पाटील सर्कसचे व्यवस्थापक आहेत.

पैसे भरूनही शिक्षण नाही; ‘सिद्धकला’च्या विद्यार्थ्यांचे उपोषणसंगमनेर,
२ मे/वार्ताहर

भरमसाठ शुल्क भरून प्रवेश घेतले. मात्र, शिक्षकच नसल्याने वर्षभरात काहीच शिकलो नसताना आता परीक्षेस सामोरे जायचे कसे? अनुत्तीर्ण झाल्यास आई-वडिलांना तोंड दाखवायचे कसे? असे अनेक प्रश्न उपस्थित करत येथील सिद्धकला इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या २० विद्यार्थ्यांनी आजपासून उपोषण सुरू केले. याबाबत संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी जाहीर नोटीस काढली असून, त्यात उपस्थित केलेले प्रश्न प्रत्येक पालकांच्या हृदयाला भिडणारे आहेत. शहरातील नेहरू चौकात हे महाविद्यालय चालते. हॉटेल मॅनेजमेंट प्रशिक्षणासाठी ४५ हजार रुपये भरून विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. शिवाय महाविद्यालयाने वेळोवेळी मागितलेल्या इतर खर्चाच्या रकमाही चुकत्या केल्या. अभ्यासक्रमासाठी असलेल्या सहा विषयांना वर्षभरात एकही शिक्षक संस्थेने दिला नाही.आम्हाला काही शिकविलेच नाही, असा विद्यार्थ्यांचा प्रमुख आरोप आहे. वर्षभरात प्रात्यक्षिकही झाले नाही. जे झाले त्याला पुरेशी साधनसामग्री नव्हती. मागणी केली तर आश्वासनांशिवाय काही मिळाले नाही. पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे महिनाभरापूर्वीच केलेल्या तक्रारीची दखल घेतली नाही.

भिंगारजवळ प्रवाशांना लुटले
नगर, २ मे/प्रतिनिधी

चोरटय़ांनी कारमधील चौघांना मारहाण करीत एकाच्या गळ्यातील २५ हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी चोरून नेली. भिंगार पोलिसांनी या प्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. हा प्रकार काल मध्यरात्री नगर-पाथर्डी रस्त्यावर भिंगारमधील आलमगीर फाटय़ाजवळ घडला. या प्रकरणी राजेंद्र विठ्ठल मरकड (रा. मढी, ता. पाथर्डी) यांनी फिर्याद दिली. मरकड हे कुटुंबासह मढीला कारमधून चालले होते. आलमगीर फाटय़ाजवळ दोघेजण मोटरसायकलवर चालले होते. त्यामुळे मरकड यांच्या चालकाने हॉर्न वाजविला. त्याचा राग येऊन मोटरसायकलस्वारांनी कारमधील मरकड, त्यांचा चालक भाचा, बहिणीची मुलगी, पुतण्या यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. हा प्रकार सुरू असताना मरकड यांनी मोबाईलवरून नातलगांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, भामटय़ांनी फटका मारून मोबाईल खाली पाडला. त्या वेळी मरकड यांच्या गळ्यातील २५ हजारांची सोन्याची साखळी घेऊन चोरटे पसार झाले. तपास उपनिरीक्षक ओटवणेकर करीत आहेत.

सुकृती ग्रुपच्या वतीने उद्यापासून वाचन संस्कार शिबिर
नगर, २ मे/प्रतिनिधी

सुकृती ग्रुपच्या वतीने मुलांमध्ये पुस्तकांविषयी अभिरुची निर्माण व्हावी, यासाठी सोमवारपासून वाचन संस्कृती शिबिर आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती माधुरी यादवाडकर यांनी दिली. सायंकाळी साडेचार ते साडेसहा या वेळेत हे शिबिर गुलमोहर रस्त्यावरील खानविलकर यांच्या हॉस्पिटलमध्ये होईल. ७ ते १२ वयोगटातील मुलांना या शिबिरात प्रवेश देण्यात येणार आहे. ३० मेपर्यंत हे शिबिर चालेल. नावनोंदणीसाठी २४२२१८९ किंवा ९९२३०३२७७१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

नगरसेवक थोरात यांचे आंदोलन मागे
संगमनेर, २ मे/वार्ताहर

येत्या पंधरा दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करतानाच इतर प्रश्नही सोडविण्यात येतील, असे लेखी आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिल्यानंतर नगरसेवक अविनाश थोरात यांनी ठिय्या आणि उपोषण आज पाचव्या दिवशी मागे घेतले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दादा कळमकर यांनी मध्यस्ती केली. शहरातील, विशेषत आपल्या प्रभागातील पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. नदीला पाणी असूनही नागरिकांना पाणी मिळत नाही, म्हणून नगरसेवक थोरात यांनी २८ एप्रिलपासून मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. तीन दिवस या आंदोलनाची पालिका प्रशासनाने दखल न घेतल्याने थोरात यांनी तेथेच उपोषणाला सुरुवात केली होती.

पाच दरोडेखोरांना पारनेरमध्ये पकडले
पारनेर, २ मे/वार्ताहर

दरोडा घालण्याच्या तयारीत असणाऱ्या पाचजणांच्या टोळीला पोलिसांनी शुक्रवारी रात्री तालुक्यातील देवीभोयरे शिवारात अटक केली. या टोळीकडून धारदार शस्त्रे ताब्यात घेण्यात आली असून, तालुक्यातील सराईत गुन्हेगारांनी एकत्र येऊन टोळी तयार केली असल्याचे स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी रात्री पोलीस निरीक्षक राजेंद्र ससाणे, पोलीस कर्मचारी बाळासाहेब मुळीक, बापू नेटके, एस. व्ही. पालवे, एस. एस. साबळे, किशोर पालवे, गंगाराम माने आदी देवीभोयरे, लोणी मावळे, वडझिरे, अळकुटी परिसरात गस्त घालत होते. या पथकाला देवीभोयरे शिवारातून दोन मोटरसायकलींवरून पाच तरुण संशयास्पदरित्या जाताना आढळले. राहुल विनायक जाधव (देवीभोयरे), अमोल रामचंद्र पवार (पिंपरी जलसेन), उत्तम रामू घुले (शिरसुले), अशोक रामचंद्र बर्डे (हंगे), सोमनाथ पुजारी (पारनेर) हे सर्व आरोपी २० ते २२ वयोगटातील असून, सराईत गुन्हेगार आहेत.