Leading International Marathi News Daily

रविवार , ३ मे २००९

झळा ज्या लागल्या जीवा..
राम भाकरे

गेल्या ५० वर्षांत प्रथमच यावर्षी सलग चार दिवस ४७ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान विदर्भवासी अनुभवत असले तरी वयाच्या सत्तरी गाठलेल्या अनेक ज्येष्ठ नागरिकांना हा अनुभव नाही. आज प्रखर उन्हं असले की, रस्ते सामसुम होतात. अनेकजण घरी कुलर लावून आराम करीत असतात. मात्र, या सत्तरी गाठलेल्या अनेक वयोवृद्ध नागरिकांनी अशाच ४७ अंश सेल्सिअस तापमानात उन्हात कामे केली आहेत.

होरपळ! सगळीच!
सोनार कोलारकर-सोनार

वैदर्भीय जनतेला अनेकदा अनेक ठिकाणी ‘आळशी’ म्हणून हिणवले जाते. इतर वेळी त्याचं काही फारसं वाईट वाटण्याचं कारण नाही! परंतु, ‘आळशी’ म्हणून शिक्का मारणाऱ्यांनी विदर्भाच्या उन्हाळ्यात यावं आणि वैदर्भीय जनता जी काही कामं या भाजक्या, होरपळणाऱ्या उन्हात करतात त्यातील एखादं तरी काम करून दाखवावं, असे पोटातून (आणि सातत्याने) वाटत राहतं. प्रचंड पाऊस झाला म्हणून मुंबईकरांना सुटी मिळते, खूप बर्फ पडला म्हणून थंडगार शहरांना सुटी जाहीर होते.

हिंस्त्र उन्हाळा
प्रवीण बर्दापूरकर

१९८१ साली विदर्भात येण्याच्या तीन-चार वर्षे आधी पत्रकारितेला सुरुवात झालेली होती. त्याआधी कार्यकर्ता म्हणूनही वृत्तपत्रांच्या दैनंदिन कामाचा परिचय होता. उन्हाळी नियोजन, उन्हाळी खाद्य, उन्हाळी पेय, उन्हाळी कामे असे काही उन्हाळी प्रकार माहीत होते. नागपुरात आल्यावर त्या यादीत आणखी एकाची भर पडली ती म्हणजे उन्हाळी पत्रकारिता! तेव्हा म्हणजे २९-३० वर्षांपूर्वी नागपूरच्या पत्रकारितेत आजच्यासारखी तीव्र स्पर्धा नव्हती. वृत्तपत्रात काम करणाऱ्या पत्रकारांचे परस्परांशी जीवाभावाचे मैत्र होते.

कामगारांनी संघटित होण्याची गरज -अब्दुल रशीद
नागपूर, २ मे/ प्रतिनिधी

कामगारांनी अविरत संघर्षांतून मिळवलेले न्याय हक्क हिरावून घेऊन त्यांना देशोधडीला लावण्याचे षडयंत्र सरकारने रचले असल्याचा आरोप करीत, कामगारांना हक्क रक्षणासाठी संघटित होऊन लढा देण्याची गरज, असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ कामगार नेते अब्दुल रशीद यांनी केले. कामगार दिनानिमित्त विदर्भ असंघटित श्रमिक पंचायतच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कष्टकरी महिला मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कावळापेठ येथील बुद्ध विहाराच्या प्रांगणात मेळावा झाला. अध्यक्षस्थानी संघटनेच्या अध्यक्ष विमल बुलबुले होत्या.

गेटवेल हॉस्पिटलमध्ये ‘रिजनल अ‍ॅनेस्थेशिया’वर चर्चा
नागपूर, २ मे / प्रतिनिधी

इंडियन सोसायटी ऑफ अ‍ॅनेस्थेशियॉलॉजिस्टच्या नागपूर शाखेने गेटवेल हॉस्पिटलमध्ये ‘रिजनल अ‍ॅनेस्थेशिया’ या विषयावर एक चर्चासत्र आयोजित केले होते. चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रतिभा देशमुख होत्या. गेटवेल हॉस्पीटलचे भूलतज्ज्ञ सल्लागार डॉ. भाऊ राजूरकर यांनी छातीच्या मणक्यातून सुईद्वारे बधिरीकरण व डॉ. नरेंद्र ताम्हणे यांनी, बालकांमध्ये माकड हाडातून क्षेत्रीय बधिरीकरण यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. के. पवार यांनी केले. डॉ. हेमांगी अभ्यंकर यांनी आभार मानले.

तहसील कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित; दूरध्वनी सेवाही बंद
नरखेड, २ मे / वार्ताहर

थकित वीज देयकामुळे वीज वितरण कंपनीने नरखेड तहसील कार्यालयातील वीजपुरवठा खंडित केल्यामुळे कर्मचारी लाभार्थी व विद्यार्थी यांची उन्हाळ्यात चांगलीच परवड होत असून येथील दूरध्वनी सेवाही खंडित झाली आहे. याबाबत तहसीलदार एस.के. अवघड यांना विचारणा केली असता संबंधित विभागाकडून निधी मिळत नसल्यामुळे नरखेड तहसील कार्यालयावर हा प्रसंग ओढवला असल्यामुळे त्यांनी आजच्या घडीला कार्यालयावर वीज देयकाचे ३३,७७० रुपये थकित असून दूरध्वनीचे बिलही थकित असल्याने दूरध्वनी सेवा खंडित झाली आहे. त्यामुळे खाजगी भ्रमणध्वनीवरून वरिष्ठांशी संपर्क साधावा लागतो, असेही ते म्हणाले. कार्यालयाच्या वार्षिक अंदाजपत्रकानुसार वीज देयक १ लक्ष, दूरध्वनी देयक १ लक्ष, पेट्रोल, डिझेल १५ हजार, जीप दुरुस्ती ५० हजार, स्टेशनरी ५० हजार, मजुरी १५ हजार, झेरॉक्स व इतर खर्चासाठी ७५ हजार, पालिका कर ३५,९३० रुपयांची मागणी करूनही पूर्ण रक्कम मिळाली नाही. कार्यालयीन खर्चासाठी ७२ हजार, मजुरी ४,७५० व पालिका कर ३४५० रुपये कार्यालयाला प्राप्त झाले असल्याचे कळते.

पटनोंदणी मोहिमेला सुरुवात
नागपूर, २ मे / प्रतिनिधी

बालहक्क अभियानाच्यावतीने नुकतीच पटनोंदणी मोहिमेची सुरुवात करण्यात आली. यावेळी भीमरत्ननगर व नोगा फॅक्टरी, मोतीबाग येथून मुले व पालकांच्या सोबत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत मुलांनी शिक्षणाविषयी जनजागृती करणारे घोषवाक्यांचे फलक दाखवत ‘राष्ट्रपती की बेटी हो या चपराशी की हो संतान सबको शिक्षा एक समान’, ‘समान शिक्षा का अधिकार- हर बच्चे की यही पुकार’, ‘प्रत्येक बालक शाळेत गेलेच पाहिजे- गेलेच पाहिजे’ अशा घोषणा दिल्या. मिरवणुकीत १०० च्या वर मुलामुलींनी भाग घेतला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष विनायक नंदेश्वर, मुख्य मार्गदर्शक नरेश डोंगरे, कविता गणवीर, संगीता गणवीर आणि स्थानिक कार्यकर्ते सहभागी होते. कार्यक्रमासाठी गौतम रत्नदीप मासुरकर, शशिकांत, किरण खांडेकर, चंद्रकला डोंगरे, आकांक्षा, सोनू भोयर, इमरान, शहना अफरीन आणि बालहक्क अभियानाचे कार्यकर्ते अनिल जांभुळकर, पंकज वंजारी, अविनाश गाडगे, स्नेहल चांदेकर, नंदिनी गायकवाड, शीतल वाघमारे, मेघा गोडघाटे यावेळी बोलत होते.

प्रतिनियुक्त अधीक्षकावर रुग्णालयाचा कारभार
नरखेड, २ मे / वार्ताहर

स्थानिक ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांना अतिदक्ष सेवेसाठी नागपूर गाठावे लागत आहे.येथील रुग्णालयाचा कारभार प्रतिनियुक्तीवर असणारे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक व दोन वैद्यकीय अधिकारीच सांभाळत आहेत. या रुग्णालयात अनेक वर्षांपासून वैद्यकीय अधीक्षकांची जागा रिक्त आहे. रुग्णालय स्थापनेपासून दोनच वैद्यकीय अधीक्षकांचे दर्शन नरखेडवासीयांना झाले. तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची या रुग्णालयात आवश्यकता असूनही कधी दोन तर कधी एक अशा वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत येथील कारभार चालवून शासनाने रुग्णांच्या जीवाचा खेळखंडोबा केल्याची प्रतिक्रिया सर्वत्र व्यक्त होत आहे.

उन्हाळ्यात शालेय पोषण आहार देण्यास शिक्षक संघटनांचा विरोध
नागपूर, २ मे/ प्रतिनिधी

उन्हाळ्यामध्ये शालेय पोषण आहार देण्याच्या शासन निर्णयाला शिक्षक संघटनांनी विरोध दर्शवला आहे. शासनाने टंचाईग्रस्त भागात तेथील शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरवण्याचा निर्णय घेतला. उन्हाळी सुट्टय़ांमध्ये टंचाईग्रस्त गावामध्ये पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना शाळांमधून पोषण आहार देण्याचा आदेश काढण्यात आला. कामठी गावातील ५० टक्के गावे तर कुही, उमरेड तालुक्यातील १०० टक्के गावे यामध्ये समाविष्ट असून शिक्षकांना उन्हाळी सुट्टय़ांमध्येही मुख्यालयी राहून शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना देण्याच्या आदेशाचा मात्र राज्य पदवीधर व प्राथमिक शिक्षक संघटनेने त्याचा विरोध दर्शवला आहे. त्यांच्या मते, अनेक वर्षांपासून शाळा, महाविद्यालयात व न्यायालयांना उन्हाळी सुट्टय़ा देण्याची परंपरा आहे. परंतु शासन परंपरांना बगल देऊन अशाप्रकारे शिक्षकांच्या अधिकारावर गदा आणत आहे. शालेय पोषण आहार योजना स्वयंसेवा संस्था किंवा महिला बचत गटांकडे सोपवून शिक्षण विभागाऐवजी महसूल विभागाच्या नियंत्रणात राबवावी, अशा मागणीही शिक्षकांच्या संघटनांने केली आहे.

गीतांजली एक्स्प्रेसच्या वातानुकूलित डब्यातून दोन लाखांचा ऐवज पळवला
नागपूर, २ मे/ प्रतिनिधी

गीतांजली एक्स्प्रेसच्या वातानुकूलित डब्यातून मुंबईहून मूर्तीजापूरला येत असलेल्या एका प्रवाशाची सुमारे दोन लाख पंधरा हजार रुपयांचा ऐवज असलेली बॅग चोरटय़ांनी पळवली.
डॉ. ताहेर अली हे (२८५९) मुंबई- हावडा गीतांजली एक्स्प्रेमध्ये बुधवारी छत्रपती शिवाजी टर्मिनसहून बसले. एससी टू टायरमधून ते प्रवास करत होते. ते झोपेत असताना त्यांची बॅग अज्ञान इसमाने पळवली. त्यात एक लॅपटॉप, एक डीव्हडी प्लेअर, डिजिटल कॅमेरा, नोकिया मोबाईल हँडसेट असा सुमारे दोन लाख पंधरा हजार रुपयांचा ऐवज होता.
रेल्वेच्या वातानुकूलित डब्यात साधारणपणे प्रवाशांशिवाय कोणालाही प्रवेश नसतो. खिडक्या बंद असतात, तसेच खाद्यपदार्थ विक्रेते किंवा अन्य कोणीही एसी डब्याकडे भटकत नाहीत. येथे केवळ प्रवासी आणि रेल्वेने नियुक्त केलेले ‘अटेंडन्ट’ असतात. असे असतानाही एसी डब्यातही सामान सुरक्षित नसल्याचे या घटनेवरून दिसून येते. यात सहप्रवाशी व अटेंडन्टवरच संशय असल्याचे सूत्रांनी सांगितले. या घटनेचा तपास हवालदार यादव करत आहेत.