Leading International Marathi News Daily

रविवार , ३ मे २००९

राज्य

लोकसभेच्या निकालानंतरच ‘स्थायी’ची निवड?
नगर, २ मे/प्रतिनिधी

महापालिकेचा जकात निविदेचा तिढा सुटला असला, तरी स्थायी समिती सदस्य व अन्य पदांच्या निवडीचा पेच मात्र अद्याप कायम आहे. मनपाचे बरेचसे काम, विशेषत स्थायी समितीने मंजुरी द्यायची मोठी कामे त्यामुळे अडली आहेत. स्थायी समितीसह विरोधी पक्षनेता, सभागृहनेता व स्थायीचे, तसेच महिला बालकल्याण समितीचे सदस्य व प्रामुख्याने स्वीकृत सदस्य या सर्वच पदांना राजकारण चिकटल्याने त्यांची निवड रखडली आहे. ही सर्व घटनात्मक पदे आहेत. मनपाच्या निवडणुकीनंतर नव्या सभागृहात लगेचच त्यांची निवड होणे अपेक्षित आहे.

परीक्षेत नापास झाल्याच्या धास्तीने
दोन अल्पवयीन मुलींची आत्महत्या

सांगली, २ मे / प्रतिनिधी

परीक्षेत नापास झाल्याच्या धास्तीने दोन अल्पवयीन मुलींनी सांगली मिरज रस्त्यावरील काळया खणीत उडी घेऊन आत्महत्याची केल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. अश्विनी अशोक वडर (वय १३) व रुपाली दिलीप वडर (वय १४) अशी त्यांची नावे असून त्या दोघीही शुक्रवारपासून बेपत्ता होत्या. शाळेच्या हलगर्जीपणामुळेच या मुलींनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.

तिसऱ्या जगाचे आर्थिक नेतृत्व भारताकडेच - विखे
नगर, २ मे/प्रतिनिधी
पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी मागच्या पाच वर्षांत जागतिक अर्थकारण देशात सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवले. सध्या आर्थिक मंदीचेच वातावरण असले, तरी तिसऱ्या जगाचे आर्थिक नेतृत्व भारताकडेच आहे, असा दावा खासदार बाळासाहेब विखे यांनी केला.

अकोल्यात भाजप पदाधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू
अकोला, २ मे / प्रतिनिधी

भाजपचे अकोला शहर सचिव श्याम गुरबानी (३५) यांचा शनिवारी संशयास्पद मृत्यू झाला. हिंगणा फाटय़ाजवळ कारमध्ये गुरबानी मृतावस्थेत आढळले. त्यांचा घातपाताने मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबातील सदस्यांनी केला असून या घटनेमुळे अकोला शहरात खळबळ उडाली आहे.

माळीझाप परिसरात बिबटय़ा जेरबंद
अकोले, २ मे/वार्ताहर

माळीझाप परिसरात धुमाकूळ घालणारा बिबटय़ाचा बछडा आज पहाटे वन खात्याने लावलेल्या पिंजऱ्यात अडकला. सुमारे दोन वर्षे वयाचा हा बछडा नर जातीचा आहे. या परिसरात अजूनही एक बिबटय़ा वास्तव्यास असल्याचा कयास असून, त्याला पकडण्यासाठी नदीच्या बाजूला अजून एक पिंजरा लावण्यात आला आहे. माळीझाप शिवारातील प्रवरा नदीकाठी असलेल्या गोठय़ातून दूध काढून घराकडे परतत असताना बिबटय़ाने बाळासाहेब थोरात यांच्या दुचाकीवर हल्ला चढविला होता. या हल्ल्यात त्यांच्यासह दुचाकीवर मागे बसलेली त्यांची पत्नीही जखमी झाली होती. सुमारे दहा दिवसांपूर्वी ही घटना घडली. या घटनेनंतर बिबटय़ाला पकडण्यासाठी वन खात्याने दोन पिंजरे माळीझाप शिवारात लावले. गावकऱ्यांच्या आग्रहामुळे एक पिंजरा हल्ला ज्या ठिकाणी झाला, त्या रस्त्यावरच लावला होता.

कार ट्रकवर आदळून तीन ठार, ७ जखमी
कारंजा (घाडगे), २ मे / वार्ताहर
तालुक्यातील राजनी शिवारात शनिवारी सकाळी भरधाव कार ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात ३ ठार तर ७ जखमी झाले. अपघातात कारमधील एकाचा घटनास्थळीच तर दोघांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. जखमींना नागपुरातील ‘क्रिम्स’ रुग्णालयात दाखल केले आहे.