Leading International Marathi News Daily

रविवार , ३ मे २००९

इतिहास जागरण..
सुधीर जोगळेकर

इतिहासाच्या अभ्यासाचं वेड कसं कुणाला झपाटून टाकील ते सांगणं अवघड आहे. इतिहासात रममाण होणारी अशी व्यक्ती दुर्गप्रेमी तर असतेच; तिला पुराणवस्तूंचं आकर्षण असतंच, पण क्वचित कुणी पुरातत्त्व खात्याच्या उत्खननातही रस घेणारा असतो.. मकरंद खटावकर अशापैकीच एक. खटावकर तसे सर्वसामान्य मध्यमवर्गीय संस्कृतीत वाढलेले. त्यांचे आई-वडील शिक्षक. त्यांनी शिकविलेल्या आणि वाचावयास दिलेल्या माहितीतून खटावकरांना इतिहासाची गोडी लागली.

‘शिंदी’ कत्तलीकडे सरकारचे दुर्लक्ष
नंदन कलबाग

लॅण्डस्केपिंगसाठी सुंदर दिसते म्हणून आणि त्याला मागणी असल्याने निसर्गत:च वाढत असणारी ‘शिंदी’ची झाडे उपटण्याची सर्रास बेकायदेशीर प्रक्रिया वाढत चालली आहे. इतकेच नव्हे तर त्याला बेकायदेशीरपणे पुनर्लागवड करण्याच्या प्रयत्नात अनेक ‘शिंदी’ची झाडे नष्ट झाल्याने सरकारी यंत्रणेने त्वरेने पावले उचलून कारवाई केली नाही तर ही नैसर्गिकरीत्या वाढलेली झाडे नामशेष होण्याची वेळ आल्याचे चित्र दिसले.

१० वीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना अनावृत्त पत्र
प्रिय,

मेघना, संध्या, स्वाती, दीपक, संजय.. वगैरे वगैरे.. सर्वाना, ज्यांची मुलं आता नववी पास करून दहावीला प्रवेश घेत आहेत.. त्या सर्व प्रिय मित्रांना,
घरोघरी दहावीचा जो बागुलबोवा उभा केला जातो तो बघून, बघणाऱ्याच्या उरात धडकी भरते. या संदर्भात मला आपलं बालपण आठवतं, आपण गावी जातो, तिथे प्रचंड फांद्यांचा पसारा असलेली झाडे असतात. संध्याकाळ सरून अंधार पसरू लागतो आणि त्या झाडांच्या सावल्या विविध आकार धारण करू लागतात, आपल्याला घाबरवू लागतात.

गल्लीतलाच काल्पनिक गोंधळ
सुनील डिंगणकर

या चित्रपटाची कथा काल्पनिक आहे. कथेतील पात्रांचा किंवा प्रसंगांचा वास्तवातील व्यक्तींशी किंवा घटनांशी तीळमात्रही संबंध नाही, अशा प्रकारची सूचना चित्रपटाच्या सुरुवातीलाच दाखविण्यात येते. असे असले तरी चित्रपटातील पात्रे आणि घटना वास्तवाच्या जवळ गेल्या तर प्रेक्षक त्या चित्रपटाशी अधिक जोडला जातो. किंवा ‘या चित्रपटात जे दाखविण्यात आले आहे तसे वास्तवात घडले तर खूप मजा येईल’, असे प्रेक्षकाला वाटल्यास चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचला असे समजावे.

एक स्ट्रीट-स्मार्ट नाटक!
‘प्रेम नाम है मेरा.. प्रेम चोप्रा’

पुरुषजातीला स्त्रीबद्दल वाटणारं आकर्षण हा विषय तसा आदिम, सनातन अन् चिरंतन विषय! वय, मानसिकता, जातपात, आर्थिक-सामाजिक स्तर, शिक्षण, नोकरी-व्यवसाय असे कुठलेच अडसर त्याला आड येत नाहीत. म्हणूनच अनेकदा सकृतद्दर्शनी विजोड वाटणारी जोडपीही सुखेनैव संसार करताना दिसतात. त्यातही अलीकडच्या व्यक्तिकेंद्री युगात तर विवाहपूर्व आणि विवाहबाह्य संबंधांत प्रचंड वाढ झाली आहे. अशा संबंधांत कुणालाच काही गैर वाटेनासं झालं आहे. हल्ली अशा ‘प्रकरणां’चं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. लफडेखोर पुरुषांच्या दृष्टीनं तर विवाहित स्त्री ही ‘प्रेम’ प्रकरणात सगळ्यात ‘सेफ’ मानली जाते. एकतर ती सर्वच बाबतींत अनुभवी असते.

निसर्गसंपन्न कोस्टारिका
भाग १

कोस्टारिका म्हणजे रिच कोस्ट. अर्थात संपन्न, समृद्ध किनारा. १५०२ साली ख्रिस्तोफर कोलंबस जेव्हा इंडियाच्या शोधात निघाला असता वाटेत वादळाने त्याचे जहाज भरकटले गेले आणि तो द्वीप समूहावर आला. त्याला वाटले आपण इंडियात आलो, पण त्याला कळले की तो इंडिया नव्हताच. त्या द्वीप समूहाला वेस्ट इंडिज नाव दिले हे सर्वश्रुतच आहे. तसेच पुढे गेल्यावर त्याला एका किनाऱ्यार स्थानीय लोक अंगावर मौल्यवान अलंकार घालून नाचत समारंभ साजरा करताना दिसले.

अंदमान पदौक
किंग्ज सर्कलहून शीवकडे जाताना उड्डाणपुलाच्या साधारण मध्यावर डावीकडच्या पदपथावर (अरोरा सिनेमाच्या समोर) दोन अजस्र महाकाय वृक्ष दृष्टीस पडतात. त्याचा भव्यपणा पुलावरून येताना किंवा रस्त्यावरून, पण जरा दुरूनच नजरेत भरतो. कारण अगदी जवळून हे वृक्ष एका नजरेत मावूच शकत नाहीत इतके भव्य आहेत. ७०-८० फूट उंचीचे व सहा-सात फूट बुंधा असलेले हे महाकाय वृक्ष आहेत अंदमान पदौकचे. शास्त्रीय नाव Pterocarpus indicus. त्यांना अंदमान रेडवूड किंवा बर्मीज रोजवूड असंही म्हणतात.

संगीतातील महापाटील
'जो तपस्वी स्वरांची साधना करतो त्याचे आयुष्य हे एक सुंदर गाणे होते, पं. शिवानंद पाटील यांचे आयुष्य हे असे स्वरसुंदर आयुष्य आहे, त्यांच्या आयुष्यातले एक नवे वर्ष म्हणजे स्वरांचा एक नवा साक्षात्कार आहे'.. 'शिवानंद हा संगीतातला महापाटील आहे, ही पाटीलकी त्याने खूप छान पेलली आहे'.. 'तानपुरा पूर्णपणे स्वरात जुळल्यानंतर त्याच्या खर्जाच्या षडजातून गंधार अनुध्वनित होतो, तो गंधार बुवांच्या गळ्यात आहे, गायनात आहे, त्या शिवगंधाराला माझे अभिवादन'.. हे उद्गार आहेत अनुक्रमे कविवर्य मंगेश पाडगावकर, मोहन वाघ आणि अनिल मोहिले यांचे..

शाहीर साबळे यांचा सत्कार
प्रतिनिधी

संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांतील पदार्पणानिमित्त ३ मे रोजी रात्री ८.३० वाजता विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात आयोजित करण्यात आलेल्या समारंभात शाहीर साबळे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. शाहीर साबळे यांनी गायलेल्या ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताचे संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच ‘भेटी लागी जीवा’ हा श्रीनिवास खळे यांच्या गीतांचा कार्यक्रमही होणार आहे. अजित परब, सोनाली कर्णिक, मंदार आपटे आणि अर्चना गोरे आदी गायक या कार्यक्रमात गीते सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे संगीत संयोजन अप्पा वढावकर करतील, तर कार्यक्रमाचे संयोजन ‘जीवनगाणी’चे प्रसाद महाडकर व ‘स्वरगंधार’चे मंदार यांनी केले आहे. विलेपाल्र्याचे नगरसेवक शशिकांत पाटकर यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. अधिक माहितीसाठी नितीन डिचोलकर यांच्याशी मो. क्र. ९३२३२८६९१७ वर संपर्क साधावा.

‘प्रेमानंद गज्वी यांची कथा आश्वासक!’
‘प्रेमानंद गज्वी मुळात नाटककार आहेत. जे नाटकातून व्यक्त करता आले नाही, ते त्यांनी कथेतून व्यक्त केले. परंपरेचे शब्द बदलण्याची ताकद त्यांच्या लेखणीत आहे. त्यांनी लेखन- माध्यम बदलले, कारण त्यांच्या अनुभवाच ती मागणी होती. त्यांची कथा आश्वासक आहे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांनी केले. प्रेमानंद गज्वी यांच्या ‘ढीवर डोंगा’ या कथासंग्रहाचे प्रकाशन नुकतेच नागपूरला सवरेदय आश्रम येथे झाले. त्यावेळी बोलताना महेश एलकुंचवार पुढे म्हणाले, ‘नाटककार असो वा कथाकार, प्रत्येकाची लेखनशैली स्वतंत्र असते. गज्वींच्या प्रत्येक कथेचा बाज वेगळा आहे. मी मात्र कथा-कादंबऱ्यांच्या वाटेला अजून गेलो नाही. मराठी कथेला परंपरा असून, कथा या वाङ्मयप्रकारात काहीतरी नवं करू पाहणारा लेखक म्हणून गज्वी यांचे नाव पुढं आलेलं आहे.’ प्रा. डॉ. सुरेश मेश्राम ‘ढीवर डोंगा’विषयी म्हणाले की, ‘गज्वींची कथा मानवी जीवन सुंदर करण्याच्या ध्यासाने झपाटलेली असून, त्यांच्या कथेचं नातं ग्रेस यांच्या ललित निबंधांशी आहे.’ तर कवी ह. मो. नारनवरे म्हणाले, नाटकाइतकीच गज्वींची कथा समृद्ध असून ती वाचकाला सतत जागरूक राहण्याचे आवाहन करते.’ ‘गज्वींची कथा गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले यांच्या कथेशी नातं सांगणारी असून, दुखाकडे बघतानाही निरामय आणि निर्भीड अशी आहे,’ असे प्रतिपादन डॉ. रवींद्र शोभणे यांनी केले. चर्चेतील आणखी एक वक्ते डॉ. मदन कुलकर्णी म्हणाले, ‘गज्वींची कथा काव्यातून पुढं सरकते. स्वतचा स्वतंत्र सूर असणारा हा लेखक स्वतवर कुठलाच शिक्का मारून घेत नाही.’

नेहरू सेंटरच्या कथ्थक व तबला कार्यशाळा
नेहरू सेंटरच्या सांस्कृतिक विभागाने १ ते ५ जून या कालावधीत प्रख्यात नृत्यगुरू पं. बिरजूमहाराज यांची कथकदर्पण ही कथक नृत्यप्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेस दिल्लीच्या ‘कलाश्रम’ संस्थेचे साहाय्य लाभणार असून, शाश्वती सेन याही कार्यशाळेत मागदर्शन करणार आहेत. उस्ताद फझल कुरेशी हे तबलावादनाची कार्यशाळा घेणार आहेत. ही कार्यशाळाही १ ते ५ जून दरम्यान होणार आहे. सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी तबलावादनाची प्रथमा किंवा त्यावरील परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या कार्यशाळेत ५० जणांना सहभागी करून घेण्यात येणार आहे, या दोन्ही कार्यशाळेचे अर्ज २५ मेपर्यत नेहरू सेंटरच्या सांस्कृतिक विभागात उपलब्ध होतील. संपर्क : नेहरू सेंटर सांस्कृतिक विभाग, डिस्कव्हरी ऑफ इंडिया बिल्डिंग, डॉ. अ‍ॅनी बेझंट रोड, वरळी, मुंबई- ४०००१८. दूरध्वनी २४९६४६७६-८० विस्तारित क्र. ११९/१६९.