Leading International Marathi News Daily
रविवार , ३ मे २००९
(सविस्तर वृत्त)

इतिहास जागरण..
सुधीर जोगळेकर

इतिहासाच्या अभ्यासाचं वेड कसं कुणाला झपाटून टाकील ते सांगणं अवघड आहे. इतिहासात रममाण होणारी अशी व्यक्ती दुर्गप्रेमी तर असतेच; तिला पुराणवस्तूंचं आकर्षण असतंच, पण क्वचित कुणी पुरातत्त्व खात्याच्या उत्खननातही रस घेणारा असतो.. मकरंद

 

खटावकर अशापैकीच एक. खटावकर तसे सर्वसामान्य मध्यमवर्गीय संस्कृतीत वाढलेले. त्यांचे आई-वडील शिक्षक. त्यांनी शिकविलेल्या आणि वाचावयास दिलेल्या माहितीतून खटावकरांना इतिहासाची गोडी लागली. वाचन, भटकंती यातून इतिहासाचं अवलोकन होतंच होतं. पण हजारो वर्षांचा इतिहास असलेली आणि काळाच्या उदरात गडप झालेली मोहंजोदाडो-हडप्पाची सिंधु संस्कृती त्यांना खुणावत होती. सरस्वती नदी लुप्त होते, तिच्याखालची संस्कृती विस्मरणात जाते; भगवान श्रीकृष्णाचा स्पर्श झालेली द्वारका सागरतळाशी जाते आणि प्रभु श्रीरामांनी ज्या सेतूवरून श्रीलंका गाठली तो सेतूही खरा की खोटा याच्या वादात अडकतो, हे खटावकर पाहत होते. त्यामुळे अशा प्राचीन इतिहासकालीन स्थळांना भेट द्यावी, तिथल्या उत्खननातून निघालेल्या अवशेषांचं छायाचित्रण करून ठेवावं आणि पुढल्या पिढय़ांच्या दुर्लक्षातून ते नष्ट होऊ नये यासाठी त्याविषयीचं इतिहास जागरण करावं या वेडानं खटावकर झपाटून गेले.
डॉइश बँकेत मॅनेजिंग डायरेक्टर आणि ह्यूमन रिसोर्सेस विभागाची जबाबदारी सांभाळण्याच्या निमित्ताने खटावकरांना श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये जाण्याची अनेकदा संधी मिळाली. या प्रवासादरम्यान मोहंजोदाडो आणि हडप्पाला भेट द्यायची हे त्यांनी ठरवूनच टाकलेलं होतं. पहिल्या प्रवासावेळी त्यांची भेट संपूर्णपणे व्यावसायिक कारणांसाठी असतानाही त्यांचा व्हिसा नाकारला गेला. पाकिस्तानात जाण्यासाठी खाजगी व्हिसा मिळणे तसे सोपे नसतेच, याचा अनुभव खटावकरांना आला. पण झाल्या घटनेचे वाईट वाटून न घेता, उलट सिंधु संस्कृतीबद्दल आणखी काही करण्यासाठी वेळ उपलब्ध झाला, असे मनाशी ठरवत खटावकरांनी पुन्हा प्रयत्न करायचे ठरविले. २००५ च्या अखेरीस ती वेळ जुळून आली आणि ख्रिसमसच्या सुमारास खटावकर प्रथम पाकिस्तानात गेले. गेल्या चार वर्षांत एकूण पाच ते सहा वेळा जाण्याचा योग त्यांना आला. मनसोक्त छायाचित्रण करता आले. त्याचे सादरीकरण म्हणजे येत्या मंगळवारपासून वरळीच्या नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत सुरू होणारे त्यांचे ‘द माव्‍‌र्हल्स ऑफ हडप्पन सिव्हिलायझेशन’ हे प्रदर्शन.
मोहंजोदाडो हे कराचीपासून अवघ्या ११ किलोमीटर अंतरावर लारकानाजवळ असणारं पुरातनकालीन शहर. लारकाना ही भुत्तो घराण्याची जहागीर. तर हडप्पा हे लाहोरपासून दोन ते अडीच तास अंतरावर असणारं शहर. या दोन्ही ठिकाणी जाण्यासाठी खटावकरांनी स्थानिक बसेसचा वापर केला. कडाक्याचं ऊन असल्यानं एसी बसशिवाय पर्याय नव्हताच. पण स्थानिक ऊर्दू येत नसल्यानं कानावर पडणारी भाषा समजून घेत घेत खटावकरांचा प्रवास सुरू होता. हडप्पा आणि मोहंजोदारो ही एकेकाळची सिंधु संस्कृतीतली बहरलेली शहरं. भारतीय उपखंडाच्या फाळणीनंतर ती पाकिस्तानात गेली, तर सिंधु संस्कृतीचं अंग असलेली दुसऱ्या बाजूची धोलविरा आणि लोथाल ही शहरं भारतात राहिली. सवड काढून खटावकर लोथाल आणि धोलविरालाही गेले. एकाच संस्कृतीचं अंग असलेल्या या चारही ठिकाणांमधील साम्यस्थळंही त्यांनी शोधून काढली. या साऱ्यांचं एकत्रित चित्रण व सादरीकरण म्हणजे त्यांचं प्रदर्शन.
सिंधु संस्कृतीचा कालखंड नेमका कोणता याविषयी अभ्यासकांत नाना विचार आहेत. ती आर्यपूर्व होती आणि ती आर्यानी नष्ट केली असा एक विचारप्रवाह तर वेदांच्या अभ्यासात वैदिक संस्कृतीचा जो कालखंड सापडला, त्या काळातील अवशेष इजिप्त, मेसोपोटेमिया, चीनमध्ये जसे आढळले तसेच ते सिंधु नदीच्या खोऱ्यातही सापडल्याचे पाश्चात्त्य पंडितांचे म्हणणे होते. तांबे- कासे - पाषाणाची उपकरणे या उत्खननात मिळाली असल्याने सिंधु संस्कृतीचा कालखंड ताम्र-पाषाणयुगीन असावा अशी समजूत व मान्यता आहे. सनांच्या भाषेत बोलायचे तर तो इसवीसनपूर्व ३१०० ते २५०० असावा. हडप्पात झालेलं संशोधन तिथल्या संस्कृतीचा कालखंड इसवीसनपूर्व ३५०० च्याही पूर्वीचा असावा असं दर्शवित असतो.
खटावकरांना मोहंजोदडोत जी विहीर पाहावयास मिळाली तीच पाच हजार वर्षांपूर्वीची होती. आजही त्या विहिरीत जिवंत झरे आहेत. उत्खननाच्या त्या कामावर काम करणारे ते कामगार आजही त्या विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरतात. खटावकरांना त्या ठिकाणी जो गाईड भेटला तो जाणकार होता. मुंबईत गेटवे ऑफ इंडियाला जसे गाईड भेटतात तशातला तो नव्हता. त्याने तपशीलवार माहिती तर दिलीच, पण अनेक स्थानिक संदर्भही दिले. हडप्पात धान्य साठविण्यासाठीची गोदामंही सापडली. त्यांच्या तळाशी आणि वरच्या बाजूस छिद्रे होती. हवा खेळती राहावी आणि धान्य खराब होऊ नये हा हेतू त्यामागे असावा. लोथलमध्ये तर चक्क गोदीचेच अवशेष सापडले. त्या वेळी तेथपर्यंत समुद्र आलेला असावा किंवा खाडीचे पाणी घुसलेले असावे. तिथपर्यंत बोटी येत असाव्यात. त्यातून मालाची
ने-आण होत असावी. तिथल्या मातीचे जे पृथ्थकरण करण्यात आले त्यात क्षारांश तर सापडलेच, पण त्याकाळी वापरल्या गेलेल्या एका बोटीची डागडुजी करून ती ही तेथे मांडण्यात आल्याचे खटावकरांनी अनुभवले.
हडप्पा हे सुनियोजितपणे उभारलेले शहर असावे. पाच हजार वर्षांपूर्वीच्या त्या अवशेषांचा नुसता विस्तार ध्यानी घेतला तरी हे शहर ४० हजार वस्तीचे असावे, असे लक्षात येते. या चारही शहरांमधल्या विहिरी, रस्ते यांच्यातही बरेच साम्य आढळून येते. मोहंजोदडोत तर ३३ फूट रुंदीचे रस्ते होते आणि त्याच्या दुतर्फा दुकानेही होती. दोन फूट खोल असलेली टेराकोटा पाइपांनी बांधून काढलेली गटारे आणि त्यावरची विटांची फरसबंदी आजही पाहावयास मिळते. मणी बनवणाऱ्या भट्टय़ाही त्या काळात तेथे असाव्यात कारण त्याचेही अवशेष मण्यांसह उपलब्ध झाले आहेत.
याशिवाय मोहेंजोदारोतील सार्वजनिक स्नानगृहे, पाणीपुरवठा वितरण यंत्रणा, धान्य मळणीसाठीचे वीटकाम, परस्परांना काटकोनांत छेदणारे रस्ते, अशा अनेक गोष्टी खटावकरांनी टिपल्या आहेत. या चारही ठिकाणी विशेषत: पाकिस्तानातील दोन्ही ठिकाणी जाण्यासाठी, सिंध प्रांतातील वाळवंटातून व कच्छच्या रणातून खडतर प्रवास करावा लागला. प्रसंगी उष्माघातालाही सामोरे जावे लागले.
येत्या ५ मेपासून सुरू होणारे हे प्रदर्शन १९ पॅनेल्समध्ये विभागलेले आहे. त्यातल्या चित्रांना दस्तुरखुद्द डॉ. जामखेडकरांनी विवरणपर माहिती लिहिली आहे. ११ मेपर्यंत रोज सकाळी ११ ते सायंकाळी ७ पर्यंत ते सुरू राहणार आहे. इतिहासाचे वेड खटावकरांना स्वस्थ बसू देताना दिसत नाही, कारण आता आधुनिकीकरणामुळे लोप पावत चाललेल्या महाराष्ट्रातील वाडय़ांवर त्यांचे छायाचित्रण सुरू आहे. संधी मिळालीच तर इजिप्तमधली पिरॅमिड्स आणि चीनची भिंत विविधांगांनी अभ्यासून त्यावर काम करण्याचा त्यांचा विचार आहे. त्यांच्या उपक्रमांना शुभेच्छा! aamchiratnagiri@gmail.com