Leading International Marathi News Daily
रविवार , ३ मे २००९
(सविस्तर वृत्त)

‘शिंदी’ कत्तलीकडे सरकारचे दुर्लक्ष
नंदन कलबाग

लॅण्डस्केपिंगसाठी सुंदर दिसते म्हणून आणि त्याला मागणी असल्याने निसर्गत:च वाढत असणारी ‘शिंदी’ची झाडे उपटण्याची सर्रास बेकायदेशीर प्रक्रिया वाढत चालली आहे.

 

इतकेच नव्हे तर त्याला बेकायदेशीरपणे पुनर्लागवड करण्याच्या प्रयत्नात अनेक ‘शिंदी’ची झाडे नष्ट झाल्याने सरकारी यंत्रणेने त्वरेने पावले उचलून कारवाई केली नाही तर ही नैसर्गिकरीत्या वाढलेली झाडे नामशेष होण्याची वेळ आल्याचे चित्र दिसले. विशेष म्हणजे विकासकांकडून संकुले, मॉल येथील सौंदर्य वाढविण्यासाठी या झाडांचा वापर होत असल्याने झाडांना ३० ते ४० हजार रुपये इतकी किंमत मिळत आहे, परंतु, ही झाडांची तोड व अयोग्यरीत्या, बेकायदेशीरपणाने केलेली ‘शिंदी’ची पुनर्लागवड आता या ‘शिंदी’च्या अस्तित्वावरच घाला घालणारी ठरू लागली आहे. ‘शिंदी’ला प्राप्त होणाऱ्या या मूल्यामुळे त्याला खऱ्याखुऱ्या ‘मनीप्लांट’चे स्वरूपच प्राप्त झाले आहे.
घरात ठेवल्या जाणाऱ्या Scindapsus Aureus या वेलीला मनीप्लांट का म्हणतात माहीत नाही, परंतु आपल्याला सर्वत्र आढळणाऱ्या शिंदी किंवा खजुरी या झाडाला आता ‘मनीप्लांट’ हेच नाव सुयोग्य वाटते. शिंदीचे शास्त्रीय नाव 'Phoenix sylvestris' असून त्याला 'ह्र’ 'Wild date palm' असेही म्हणतात. या पाम कुळातील झाडापासून निरा काढली जाते. जसे माडापासून माडी, ताडापासून ताडी, तसेच िशदीपासून ‘शिंदी’ ही बनवली जाते. बंगाल राज्यात निरेपासून एक प्रकारचा पौष्टिक व स्वादिष्ट गूळही बनवला जातो. हे सर्व बनविण्यास सरकारी परवाना लागतो. यातून सरकारी खजिन्यात भर पडतेच आणि निरा व गूळ बनविणाऱ्यांनाही आर्थिक फायदा असतो आणि यावरून त्याला मनीप्लांट असे म्हणणे अयोग्य होणार नाही. हे उद्योगही वैध असतात. या उद्योगातून शिंदीचे झाड जरी व्यंगयुक्त होत असले तरी त्याच्या जिवाला धोका नसतो.
या झाडाला आता सोन्याचा भाव आला असून यामुळेच शिंदीला मनीप्लांटही म्हणता येईल. याच कारणाने त्याचा नायनाट होण्याची वेळही येऊन ठेपली आहे. या बाबतीत संबंधित यंत्रणांनी त्वरित पावले उचलली नाहीत तर ही झाडे नामशेष व्हायला वेळ लागणार नाही. शिंदीच्या झाडापासून ‘सोने’ मिळविण्याच्या उद्योगात अनेक नामांकित रोपवाटिका (नर्सरीज) सर्वात पुढे आहेत. हा अवैध धंदा सरकारी वरदहस्ताशिवाय चालणेच शक्य नाही, हेही तितकेच खरे!
हे सर्व गौडबंगाल काय आहे हे समजून घेण्यासाठी प्रथम आपल्याला ‘वृक्ष संरक्षण कायदा’ काय आहे ते समजून घ्यावे लागेल. या कायद्यानुसार कुठलेही झाड कापण्यास, छाटण्यास किंवा पुनर्लागवड (transplant)करण्यास वृक्षप्राधिकरणाची लेखी परवानगी आवश्यक असते; मग ते झाड तुम्ही स्वत: तुमच्या अंगणात लावलेले असले तरीही परवानगी आवश्यक असते. हेही लक्षात घ्यावे की, शिंदीची झाडे कोणीही लागवड करून तयार केलेली नसतात. बिया पडून आपोआप ही झाडे वाढलेली असतात. त्यामुळे या झाडांबाबत कसलेही व्यवहार करण्यासाठी वनखात्याची परवानगीही आवश्यक असावी.
आज लॅण्डस्केप आर्किटेक्टस्, लॅण्डस्केप कॉण्ट्रॅक्टर्स, नर्सरीवाले, शिंदीची झाडे उपटून देणारे उचले, सरकारी यंत्रणा हे सर्वचजण आपापले उखळ पांढरे करून घेण्याच्या उद्योगात गुंतले आहेत. निसर्गातून ही झाडे उपटून ती बागबगिच्यात, रस्त्यांच्या कडेला, मॉलच्या सभोवार लावण्याचा सपाटा लागला आहे. एका एका झाडाची किंमत ३० ते ४० हजारांपर्यंत असते.
आमच्या सोसायटीतील (बिल्डरने अविचाराने लावलेली) निलगिरीची उंच वाढलेली झाडे दर पावसाळ्यात उन्मळून पडत. राहिलेली झाडे पडू नयेत म्हणून त्यांची छाटणी करताच वनखात्याचे लोक दमदाटी करण्यास हजर. झाडे वाचविण्यासाठी केलेली जुजबी छाटणी अवैध असेल तर निसर्गात आपोआप वाढणारी शिंदीची झाडे उपटण्यास कशी काय परवानगी मिळते? सर्वात वाईट गोष्ट ही की, पुनर्लागवड केलेली शिंदीची ७० ते ८० टक्के झाडे मरून जातात. अनेक नर्सरींतून अवैध रीतीने मिळवलेली- काही जेमतेम तगलेली, मरणपंथाला लागलेली किंवा मरून पडलेली दिसतात. वृक्षमित्र संस्थांचे सभासद असलेल्या काही रोपवाटिकाही या अवैध धंद्यात आहेत. हे सर्व कोण थांबवणार? असा प्रश्न वृक्षमित्रांना पडला आहे.