Leading International Marathi News Daily
रविवार , ३ मे २००९
(सविस्तर वृत्त)

१० वीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना अनावृत्त पत्र
प्रिय,

मेघना, संध्या, स्वाती, दीपक, संजय.. वगैरे वगैरे.. सर्वाना, ज्यांची मुलं आता नववी

 

पास करून दहावीला प्रवेश घेत आहेत.. त्या सर्व प्रिय मित्रांना,
घरोघरी दहावीचा जो बागुलबोवा उभा केला जातो तो बघून, बघणाऱ्याच्या उरात धडकी भरते. या संदर्भात मला आपलं बालपण आठवतं, आपण गावी जातो, तिथे प्रचंड फांद्यांचा पसारा असलेली झाडे असतात. संध्याकाळ सरून अंधार पसरू लागतो आणि त्या झाडांच्या सावल्या विविध आकार धारण करू लागतात, आपल्याला घाबरवू लागतात. वास्तविक आपल्याला काहीच स्पष्ट दिसत नसते, काही ठाऊक नसते परंतु कोणत्या तरी ऐकीव कहाण्या स्मरून आपण त्या सावल्यांमधून गूढ भयंकर विश्व रचतो आणि स्वत:च स्वत:ला घाबरवतो. सकाळच्या प्रकाशात मात्र तीच झाडे सुंदर, शांत-निरागस होऊन सामोरी येतात कारण आता अंधार सरून सारे प्रकाशमान झालेले असते. दहावीच्या पालकांचेही काहीसे असेच होते, केवळ कोणीतरी सांगितले म्हणून त्या गावातल्या गूढ विश्वासारखे विश्व हे पालक स्वत:च निर्माण करून त्याच्या गुंत्यात गुंतत जातात. अगदी आठवीपासून कोणता किंवा कोणकोणते (एकापेक्षा अधिकच) क्लास लावायचे याचे चक्र सुरू होते, नववीला ते अधिक वर जाते व दहावीला तर भोवळ येईल अशा तऱ्हेने फिरू लागते.
मी स्वत: नुकतीच लेकीच्या ‘दहावीमधून’ गेले आहे, त्यामुळे ठामपणे सांगू शकते दहावीचा अभ्यास खूप छान आहे, सुसह्य आहे आणि नववीचा अवघड डोंगर चढून गेलेल्यांना तर दहावीची टेकडी पार करणे सहज साध्य व आनंददायी वाटू शकते. अगदी विषयवार विचार करता इंग्रजीचा अभ्यास मजेदार आहे. कोणत्याही प्रश्नोत्तरांचे पाठांतर नाही. दिलेल्या उताऱ्यावरून किंवा कवितेवरून प्रश्नोत्तरे देणे. व्याकरण बरेचसे मागील वर्षांमध्ये झालेले आहे. निबंध, पत्र, संवाद लेखनी इत्यादी सहज व उपयुक्त आहेत. केवळ पोपटपंची नसून, पुढील आयुष्यात प्रत्यक्ष उपयोगी पडतील असे आहेत म्हणजे Practical knowledge म्हणतात तसे आहे.
भूगोल फक्त भारताचा आहे. रचना व राज्यवार भारताचा नकाशा, किनारपट्टी, वगैरे एकदा डोक्यात बसला तर भूगोलाचे आकलन खूप सोपे होऊ शकते. अर्थशास्त्र बरंचसं common sense आहे. इतिहासातील घटना आपण चित्रफितीच्या रूपात रूपांतरित करून घेतल्या तर पहिले-दुसरे महायुद्ध, औद्योगिक क्रांती, युरोपातील हुकूमशाही वगैरेची उत्तरे अक्षरश: दृश्य स्वरूपात आपल्या नजरेसमोर उलगडत जातात. संस्कृत, गणित, विज्ञानात पाठांतरावर बाजी मारता येते.
कोणताही विषय खूप अवघड किंवा परका वाटावा असा नाही. थोडेसे नियोजन, आखणी असेल तर गोष्टी आवाक्यातल्या वाटतात. साधारणत: डिसेंबपर्यंत पूर्ण अभ्यासक्रम शाळेत शिकवून झालेला असतो. आपल्याला एकूण धडे आणि उपलब्ध दिवस याचे समीकरण मांडायचे असते, म्हणजे रोज किती अभ्यास करावा लागेल याचा अंदाज येतो. दिवसाचा अभ्यास निश्चित झाल्यावर दिवसाचेही ढोबळ चार भाग आपण करू शकतो आणि त्या त्या भागात काय अभ्यास करायचा ठरवू शकतो. सहामाही, प्रिलीम १, प्रिलीम २ वगैरे करताना साधारण तीन ते चार वेळा सहजच सगळा अभ्यास नजरेखालून जातो, त्यामुळे बोर्डाच्या परीक्षेपूर्वी केवळ Final revision करायची उरते व त्याचा कोणताही भार वाटत नाही.
कोणताही विषय घेतला तरी प्रत्येकात काही अवघड तर काही सोप्या गोष्टी असायच्याच. मग थोडय़ा थोडय़ा छोटय़ा अवघड गोष्टींचा ताण घेऊन मन:स्वास्थ्य घालवण्यापेक्षा मोठय़ा आणि सहज-सोप्या गोष्टी पूर्ण करून आपण आत्मविश्वास बळकट करू शकतो. आणि जेव्हा बराचसा सोपा अभ्यास झाल्याची जाणीव होते तेव्हा अवघडही सोडवून पाहण्याचा हुरूप आपोआपच येतो.
आपण बघतो पालक बरेचदा मुलांमागे ‘अभ्यास कर’चा धोशा लावतात. मुलं क्लास, शाळा, गृहपाठाच्या व्यापात गुरफटलेली असतात. घरातील व बाहेरील अनावश्यक ताणतणाव त्यांच्यावर लादले जात असतात. त्यांचे त्यांना उमगत नसते, अभ्यास कर म्हणजे मी नक्की कधी काय करू. अशा वेळी आपण पालकांनी ‘अभ्यास कर’ किंवा केलाच पाहिजे असे आदेश न सोडता ‘आपण करूया’ या शब्दांचा वापर केल्यास निश्चितच खूप छान परिणाम दिसून येतात. आपण संपूर्ण अभ्यास घेत नसलो तरी प्रत्येक विषयावर किमान नजर तरी टाकू शकतो व त्याप्रमाणे मुलाला अभ्यासाच्या आखणीत मदत करू शकतो. उदा. धडय़ाखालील प्रश्नोत्तरे रोजची रोज केल्यास शनिवार-रविवार निबंध, पत्रलेखन, व्याकरण, गणित सराव, सूत्र पाठांतर अशा गोष्टींसाठी ठेवू शकतो. ‘आपण करूया’मुळे मुलांना आत्मिक आश्वासन मिळते की माझे आई-वडील माझ्यासोबत आहेत व माझ्या अभ्यासातही त्यांना पुरेसा रस आहे, याचे खूप चांगले परिणाम मिळू शकतात. अभ्यासाच्या विषयाशी तोंडओळख करून घेतल्याने नकळत पण खरंच आपणही अभ्यासाशी जोडले जातो. बोर्डाच्या परीक्षेपैकी २० टक्के गुण पूर्णपणे शाळा देते. बाकी ८०% बोर्ड देते, याचीही पूर्ण माहिती आपण करून घ्यायला हवी.
एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे एवढे वर्ष घराचे इंटिरीअर, भिंती, रंग, दिसणे थोडे बाजूला ठेवायचे. मुलाला त्याच्याच हाताने ठळक अक्षरात, रंगीत स्केच पेन्स, वापरून गणिताची-विज्ञानाची सूत्रे, तक्ते वगैरे बनवायला सांगायचे, संस्कृतची रूपे, विज्ञानाच्या आकृत्याही ठळकपणे मोठय़ा शीटस्वर काढून खुशाल भिंतीवर लावू द्यायच्या. केवळ भिंतीच नव्हे तर ज्या ज्या ठिकाणी त्याचा वावर असेल अशा कपाटांवर, दारांवर, स्टडी टेबलजवळ, स्वयंपाकघराच्या दारांवर, फ्रीजवरसुद्धा हे लावून ठेवायचे. म्हणजे जाता येता त्यावर नजर जाते, सर्वाना दहावीची जाणीव होत राहते, पण टेंशन मात्र येत नाही. दहावीचा अभ्यास किंवा उत्तरांचा Pattern A¦FQe machanical आहे. बोर्डाला अगदी साचेबद्ध उत्तरे हवी असतात. गणितातही प्रत्येक पायरीप्रमाणे मार्क दिले जातात. बोर्डाच्या तपासणी पद्धतीचा एक मजेदार किस्सा ऐकला. कोणत्या तरी बोर्डाच्या परीक्षेला ‘चहा बनविण्याची कृती’ असा प्रश्न होता, विद्यार्थ्यांने सर्व घटक व कृती बरोबर एक शब्दाचाही फरक न करता लिहिली. फक्त आवश्यक घटकांमध्ये तो ‘चहा पावडर’ लिहायला विसरला. तुम्ही आम्ही म्हणू मग हा चहा, चहा नाहीच मुळी. पण बोर्डाने त्याला दहापैकी नऊ मार्क दिले. कारण उत्तरातील फक्त एक शब्द लिहायचा राहिला होता. असो. तर एकून दहावी हा issue करण्याचा विषय नाहीच मुळी. केबल वगैरे काढण्याचा वेडेपण तर अजिबात करायचा नाही. (बरेचदा घरातील केबल काढल्यावर मुले शेजारी जाऊन, त्यांना हवे ते कार्यक्रम बघून येतात, शिक्षा होते घरातल्या इतर सदस्यांना) काही वेळ विरंगुळा सर्वानाच हवा असतो. खरंतर दहावीचं वर्ष म्हणून घरात कोणतेही विशेष बदल करू नये. खाणंपिणं, हास्यविनोद, नाचाचा- गाण्याचा- कराटेचा वगैरे क्लास असेल त्यात काहीही कमी जास्त करू नये, कारण हे क्लास जर मुलांच्या आवडीचे असतील तर तेही एक relaxation ठरेल.
दोन गोष्टींकडे मात्र आईने विशेष लक्ष द्यायला हवे. मुलाची सहा ते सात तास शांत समाधानी झोप होते की नाही? अजिबात जागरण न करताही दहावीचा अभ्यास व्यवस्थित होऊ शकतो. प्रिलीमनंतरच्या सुट्टीत दुपारच्या अभ्याससत्रात मुलांनी एखादी अध्र्या तासाची डुलकी काढली तरी हरकत नाही. दुसरा मुद्दा आहे मुलांचा आहार. वेळ थोडा आणि धावपळ जास्त असा सारा मामला असल्यामुळे आहाराकडे दुर्लक्ष होऊ शकतं, म्हणून आईने मुलांना नाश्ता ताजा व पोटभर द्यावा. एखाद्या ठोस डीशबरोबरच दूध+अंडे+फळ+प्रोटीनयुक्त काहीतरी असा भक्कम नाश्ता व्हायलाच हवा, तर मग दिवसभर गाडी आवाज न करता धावेल. या नाश्त्याव्यतिरिक्त (मुलं नाही म्हणाली तरीही) बाहेर पडताना भाजीपोळीचा एक व कोरडय़ा खाण्याचा एक असे दोन डबे विचारपूर्वक व वैविध्यपूर्ण पदार्र्थासोबत दिलेच पाहिजेत. जर पोट मजेत असेल तरच मेंदू मजेत राहील व ग्रहणशक्ती ‘तरोताज/तेजा’ जाहिरातीत दाखवतात तशी टिकेल. झोप आणि आहार उत्तम असेल तर मुलं थोडा जास्तीचा ताणही सहजपणे पेलू शकतील, थकवा येणार नाही.
बरेचदा पालक आपली अपूर्ण स्वप्नं मुलांच्या माध्यमातून पूर्ण करू पाहतात, वास्तविक हा त्या मुलांवर अन्याय आहे. त्यांना त्यांचे आयुष्य जगण्याचा, त्यांचे निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. मुलांना अगदी वाऱ्यावर सोडू नये पण त्यांच्यावर संपूर्णत: आपले निर्णयही लादू नये, या दोहोंमधला मध्यम मार्ग आपण निवडू शकतो. मुलांचा कल बघून त्यांना त्या दिशेने पुढे जाण्यास मदत तर करू शकतो.
याच संदर्भात दुसरा मुद्दा म्हणजे मुलाने डॉक्टर, इंजिनीयर, डिझायनर, फिल्ममेकर वगैरे वगैरे व्हावे असे जू त्यांचा मानेवर ठेवून त्यांची मति कुंठित करू नये. आपल्या मुलाची कुवत आपल्यालाच जास्त ठाऊक असते. तर त्या दृष्टीने त्याच्या भविष्यासंबंधी काही योजनांची तयारी कच्च्या स्वरूपात डोक्यात असावी मात्र त्याचे मुलाला जोखड वाटू नये. तसेच आम्ही तुला एवढे अमूक दिले, आता तरी तू ९०, ९२, ९५ टक्के आणले पाहिजेत, अशी निष्ठुर सौदेबाजीही अवाजवीच आहे. तुम्ही दिलेल्या सोयी-सवलतींचा मार्काशी थेट संबंध कसे बरं जोडला जाईल? मुलांना त्याच्या क्षमतेप्रमाणे फुलू द्यावे, सुकर वाटेल अशा वाटेने पुढे जाऊ द्यावे, फारच पाय लटपटले वाटेल तेव्हा मदतीचा हात पुढे करावा.
हे सगळं मी एवढय़ा कळकळीने लिहिण्याचे कारण म्हणजे एरवी सुज्ञ, शांत भासणारे पालकही बरेचदा दहावीच्या चक्रात आपला मूळ समंजसपणा विसरतात, कारण आसपासचे घटक त्यांना या भूलभुलैयामध्ये अधिकाधिक लोटण्याचा प्रयत्न करतात. प्रश्नांचे तर डोंगर असतात. ‘‘काय मग आता दहावी ना’’, ‘‘मग काय ठरवलंय रोहनने पुढे’’, ‘‘किती टक्क्यांची अपेक्षा आहे’’, ‘‘अरे, तुम्ही हा क्लास कशाला लावला त्यापेक्षा तो क्लास भारी आहे, त्याची खूप मुलं मेरिटला येतात’’, ‘‘मग किती दिवस सुट्टी टाकली ऑफिसला’’ आणि काही तर ‘‘अमुक अमुक गोळ्य़ा-टॉनिक सुरू करा’’ वगैरेपर्यंत प्रश्न/ सूचना/ धमक्या देणारी भाई मंडळी अवतीभवती वावरत असते. शेवटी आपण काय करायचं ते आपण ठरवायचं आणि त्याच्याशी ठाम राहायचं. ऐकायचं जनांचं, पण करायचं शेवटी मनाचं. आपण आपली शांत, विवेकी, हिशेबी योजना आखावी आणि निश्चयाने त्याची विचारपूर्वक अंमलबजावणी करावी. उद्दिष्ट, निश्चित ठरवावे अर्थात आपल्याला झेपेल या बेताने, असे अतिरेकी ध्येय नको की जे गाठता गाठता साऱ्या घरदाराचा श्वासच संपून जाईल. ते सहजसाध्य असावे, आवाक्यातले असावे आणि अर्थात आनंददायक असावे. पूर्ण कुटुंबाने जर या योजनेत हातभार लावला तर सारे सोपे होऊन जाऊ शकते मग कोणी वरील प्रश्न/ सूचना/ धमक्या दिल्याच तर उत्तरादाखल एक मंद (पण आतून बेफिकीरीचे) हास्य द्यावे, आणि चेहऱ्यावर ‘हर फिक्र को धुँएँ में उडाता चला गया’चे भाव असावेत.
खरे तर तू आणि मी साधारण एकाच वयाचे त्यामुळे हा सारा पत्रप्रपंच उपदेश म्हणून न घेता केवळ एक हितचिंतकाचे अनुभवाचे बोल म्हणून मानून घे. काही गोष्टी अगदी हृदयाच्या गाभ्यातून सांगाव्या वाटल्या म्हणून घेतली लेखणी आणि उतरवले मनातले सारे. या वरील छोटय़ा छोटय़ा दिसणाऱ्या गोष्टींची खरंच अंमलबजावणी केली ना तर कळणारही नाही. दहावीचे वर्ष आले कधी आणि सरले कधी ते. कारण त्याने सोप्या गोष्टी अधिकच सोप्या होऊन जातील. करून तर बघ!
आपली,
स्मिता जोगळेकर