Leading International Marathi News Daily
रविवार , ३ मे २००९
(सविस्तर वृत्त)

गल्लीतलाच काल्पनिक गोंधळ
सुनील डिंगणकर

या चित्रपटाची कथा काल्पनिक आहे. कथेतील पात्रांचा किंवा प्रसंगांचा वास्तवातील व्यक्तींशी किंवा घटनांशी तीळमात्रही संबंध नाही, अशा प्रकारची सूचना चित्रपटाच्या सुरुवातीलाच दाखविण्यात येते. असे असले तरी चित्रपटातील पात्रे आणि घटना वास्तवाच्या जवळ गेल्या तर प्रेक्षक त्या चित्रपटाशी अधिक जोडला जातो. किंवा ‘या चित्रपटात जे दाखविण्यात आले आहे तसे वास्तवात घडले तर खूप मजा येईल’, असे

 

प्रेक्षकाला वाटल्यास चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचला असे समजावे. ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ या चित्रपटाआधीही ही सूचना दाखविण्यात आली आहे. त्यानुसार चित्रपटातील पात्रे पूर्णपणे काल्पनिकच आहेत. ती पात्रे पडद्यावर अडीच तास गोंधळ घालतात, हसवतात. पण वास्तवाच्या जवळ जात नाहीत. टायटल्सचा अपवाद वगळता याला ‘पोलिटिकल सटायर’ नाही म्हणता येत. हा एक विनोदी चित्रपट आहे. ती अपेक्षा तो पूर्ण करतो.
कोळसेवाडीतील आमदार चंद्रकांत टोपे (सयाजी शिंदे) आणि सरपंच बाजीराव डोळे (नागेश भोसले) हे राजकारणातील प्रतिस्पर्धी आणि (अर्थातच) विकास कामांकडे दुर्लक्ष करणारे नेते. निवडणुकीचे तिकिट मिळविण्यासाठी आणि आपले राजकारणातील वजन दाखविण्यासाठी येनकेनप्रकारेण ते एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत असतात. त्याच गावातील नारायण वाघ (मकरंद अनासपुरे) हा त्या दोघांनाही मदत करून त्यातून आपले कमिशन काढत असतो. चंद्रकांत टोपेंच्या मदतीने बाजीरावांना खाली पाडणे आणि बाजीरावांच्या मदतीने चंद्रकांत टोपेंविरुद्ध कट रचत नारायण वाघ आपला स्वार्थ साधून घेतो. ही या चित्रपटाची कथा आहे.
विनोदी चित्रपटाची कल्पना शीर्षकांपासूनच येऊ लागते. तीन राजकारणी एक खुर्ची मिळविण्यासाठी एकमेकांचे पाय खेचताहेत आणि खालून जी खुर्ची दिसते ती खरे तर एक ‘कमोड’ किंवा ‘पॉट’ आहे, असे अ‍ॅनिमेशन तंत्राच्या सहाय्याने अप्रतिमपणे दाखविण्यात आले आहे. राजकारण्यांना शालजोडीतून हाणणारे हे भाष्य पाहून विनोदाचा हाच बाज पुढे पाहण्याच्या अपेक्षेने प्रेक्षक अस्तन्या सावरून बसतो. पण चित्रपटात नारायण वाघ या व्यक्तिरेखेलाच जास्त फुटेज देण्यात आले आहे. चंद्रकांत टोपे आणि बाजीराव डोळे यांचे डावपेच क्वचित प्रसंगात दिसतात. त्यामुळे हा थोडासा ‘वन मॅन शो’ झाला आहे. या तीनही व्यक्तिरेखा इरसाल असत्या तर चित्रपटात लज्जत आली असती. चंद्रकांत टोपेची ही थोडीशी आततायी व्यक्तिरेखा आहे, तर बाजीराव डोळेला इंग्रजी भाषा समजत नाही. चंद्रकांत टोपेचा सेक्रेटरी बावळट दाखविण्यात आला आहे. विनोदनिर्मितीसाठी व्यक्तिरेखांना असे स्वभावविशेष दिल्यासारखे वाटते. काही प्रसंगांसाठी मात्र दिग्दर्शकाला शाबासकी द्यावी लागेल. गावात आपल्या जुन्या प्रेयसीला पाहण्यासाठी आलेल्या तरूणाला ‘बुवा’ करणे, निवडणुकीचा अर्जासोबत भरावे लागणारे शुल्क चिल्लरच्या स्वरूपात देणे असे काही प्रसंग मस्तच घडवून आणले आहेत. या प्रसंगात, चिल्लरविषयी सांगताना नारायण वाघचा हात मोजलेल्या सुटय़ा पैशांना लागून ते विखुरतात आणि निवडणूक अधिकाऱ्याला ते पुन्हा मोजावे लागतात, अशा सहज घडणाऱ्या विनोदाची शैली चित्रपटभर असायला हवी होती. प्रत्येक प्रसंग वास्तववादी वाटावा यासाठी लहान लहान घटकांवर लक्ष ठेवणेही गरजेचे असते. चित्रपटाच्या सुरुवातीलाच दिसणारी वाडय़ाबाहेरील दगडी भिंत कृत्रिम वाटते. याच दृश्यापासून ‘असं कुठे असतं का?’ हा प्रश्न प्रेक्षकाला पडायला सुरुवात होते. ही क्षुल्लक बाब आहे, पण दृश्य स्वरूपात प्रत्येक घटक प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे परिणाम करीत असतो, हे दिग्दर्शकाने विसरू नये. शाब्दिक, प्रासंगिक विनोदनिर्मिती करण्यात मात्र दिग्दर्शकाला यश आले आहे. परदेशातील मुलीने गावात सादर केलेली लावणी या ‘अ‍ॅडेड अ‍ॅट्रॅक्शन’चा ‘आयटम नंबर’ आणि कथेच्या दृष्टीनेही चांगला वापर केला आहे.
राजकारणी व्यक्तीची भूमिका रंगवणे सयाजी शिंदेंसाठी नवीन नाही. त्यात विनोदीपणाचा बाज आणण्यात त्यांना यश आले आहे. नागेश भोसलेंनीही सरपंच चांगलाच रंगवला आहे. मकरंद अनासपुरेची शैली तयार झाली आहे. तीच ओळखीची शैली याही चित्रपटात दिसते. ‘अनासपुरी टच’ प्रेक्षकाला हसवतो. आता मात्र त्याच्याकडून वेगळ्या प्रकारच्या व्यक्तिरेखेची अपेक्षा आहे. सुहास परांजपे, नूतन जयंत, ज्योती जोशी यांनीही आपापल्या लहानशा भूमिकांना न्याय दिला आहे. एकूण, चित्रपटभर गल्लीतला गोंधळ दिसतो, पण दिल्लीतला मुजरा मात्र कुठेच दिसत नाही. हा गोंधळ दोन घटका मनोरंजन करतो हे समाधान.
झी टॉकिज प्रस्तुत
गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा
निर्माते :
सयाजी शिंदे, मकरंद अनासपुरे, नागेश भोसले, सुरेश सुवर्णा, लक्ष्मीकांत खाबीया
दिग्दर्शक : नागेश भोसले
कथा/पटकथा/संवाद : अरविंद जगताप
संगीत : शैलेंद्र बर्वे
कलाकार : मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे, नागेश भोसले, सुहास परांजपे, नूतन जयंत, ज्योती जोशी, सुझान बर्नेट इत्यादी.