Leading International Marathi News Daily
रविवार , ३ मे २००९
(सविस्तर वृत्त)

एक स्ट्रीट-स्मार्ट नाटक!
‘प्रेम नाम है मेरा.. प्रेम चोप्रा’
पुरुषजातीला स्त्रीबद्दल वाटणारं आकर्षण हा विषय तसा आदिम, सनातन अन् चिरंतन विषय! वय, मानसिकता, जातपात, आर्थिक-सामाजिक स्तर, शिक्षण, नोकरी-व्यवसाय असे कुठलेच अडसर त्याला आड येत नाहीत. म्हणूनच अनेकदा सकृतद्दर्शनी विजोड वाटणारी जोडपीही सुखेनैव संसार करताना दिसतात. त्यातही अलीकडच्या व्यक्तिकेंद्री युगात तर विवाहपूर्व आणि विवाहबाह्य संबंधांत प्रचंड वाढ झाली आहे. अशा संबंधांत कुणालाच काही गैर वाटेनासं झालं आहे. हल्ली अशा ‘प्रकरणां’चं प्रमाण दिवसेंदिवस

 

वाढत आहे. लफडेखोर पुरुषांच्या दृष्टीनं तर विवाहित स्त्री ही ‘प्रेम’ प्रकरणात सगळ्यात ‘सेफ’ मानली जाते. एकतर ती सर्वच बाबतींत अनुभवी असते. त्यामुळे आवश्यक ती गुप्ततेची खबरदारी ती स्वत:च घेत असल्यानं पुरुषाला त्यासाठी फार काही करावं लागत नाही. अशा विवाहितेबरोबरच्या प्रकरणात कोणतीही जबाबदारी न घेता सगळं काही करता येतं, निभावता येतं. परत गुंतलेपणही मर्यादितच; त्यामुळे त्यातून बाहेर पडणंही तुलनेनं सोपं. बरं, त्या स्त्रीलाही ‘या’ बाबतीत तिनं आवश्यक ती खबरदारी घेतलेली असल्यानं पुन्हा आपल्या संसारात परतता येतं. कारण तीही मनानं या प्रकरणात फारशी गुंतलेली नसतेच. रुचीपालट वा थ्रिल हाच बऱ्याचदा अशा प्रकरणांत हेतू असल्यानं कुणाचंच फारसं त्यात नुकसान नसतं. याबाबत स्पेशल टय़ुशन देणारं ‘प्रेम नाम है मेरा.. प्रेम चोप्रा’ हे रंगनील निर्मित, संजय मोने- किरण पोत्रेकर लिखित व संजय मोने दिग्दर्शित नाटक नुकतंच रंगमंचावर आलं आहे. संजय मोने यांच्या ‘हम तो तेरे आशिक है’सारखीच याचीही धाटणी असल्यानं त्याची आठवण हे नाटक पाहताना ताजी होते.
नाटककार चं. प्र. देशपांडे यांनी त्यांच्या ‘बुद्धिबळ आणि झब्बू’ या नाटकात हाच विषय अत्यंत अप्रतिमरीत्या हाताळलेला आहे. स्त्री-पुरुष आकर्षण हाच सनातन विषय त्यांनी त्यातील मानसिक-भावनिक गुंत्यांसह, त्यातल्या आडनिडय़ा पेचांसह अतिशय सखोलतेनं त्या नाटकात मांडलेला आहे. संजय मोने यांचं हे नाटक मात्र त्या खोलीत शिरत नाही. ते तितक्या खोलात जाऊही इच्छित नाहीत. चार घटका प्रेक्षकांचं करमणूक करणारं धंदेवाईक नाटक देणं, एवढाच त्यांचा स्पष्ट व स्वच्छ हेतू असल्यानं आणि त्यासाठी आवश्यक तो स्मार्टपणा त्यांच्या लेखणीत असल्यानं हे नाटक प्रेक्षकांना आवडायला हरकत नसावी.
निलकांती आणि निरंजन या प्रेमविवाह केलेल्या जोडप्याचं आयुष्य लग्नानंतर नेहमीच्या रुटिन ‘नवरा-बायको’सारखं होतं. म्हणजे त्यांच्या लग्नात आता गंमत उरलेली नाही, असंही नाही. परंतु निरंजन आपल्या करीअरमध्ये इतका गुंतला गेलाय, की निलूकडे हवं तेवढं लक्ष द्यायला त्याला वेळ नाही. त्यामुळे निलू काहीशी अपसेट आहे. निरंजनचा मित्र प्रेम याच्या ही गोष्ट लक्षात येते. प्रेम हा विवाहित स्त्रियांना (जमल्यास लग्नाळू तरुणींनासुद्धा! परंतु शक्यतो विवाहित स्त्रियाच बऱ्या. कारण त्यांची व आपली ‘गरज’ भागली की त्यातून बाहेर पडणं उभयतांना सोपं जातं, हे त्याचं तत्त्वज्ञान!) घोळात घेऊन त्यांच्याशी काही दिवस फ्लर्टिग करण्याचा ‘थरार’ अनुभवण्यात माहीर गडी. या विषयात त्याची पीएच.डी. झालेली! त्यामुळे अशा ‘प्रेम’ प्रकरणांचा सखोल अभ्यास करून त्यानं त्याचं स्वानुभवांवर आधारित सिलॅबसही बनवलंय. त्यातल्या विशिष्ट क्लृप्त्या लढवून कुठल्याही स्त्रीला वश करता येतं, यावर त्याचा ठाम विश्वास. त्यामुळे निलूचं असं अपसेट असणं म्हणजे आपल्यासाठी नामी ‘संधी’ असल्याचं तो मानतो. त्याप्रमाणे तो कामाला लागतो.
ओळख, परिचय, मैत्री, जवळीक, परस्परांत गुंतणं आणि नंतर आपला कार्यभाग साधणं.. अशा चढत्या क्रमानं हे जमवून आणायचं असतं. त्यासाठीचं तंत्रही त्यानं स्वत: विकसित केलेलं आहे. त्यात क्वचितप्रसंगी परिस्थितीचा अंदाज घेऊन यशस्वी माघारीचं धोरणही त्याला अजिबात वज्र्य नाहीए. त्याप्रमाणे तो निलूभोवती जाळं टाकतो. प्रारंभी त्याला ‘मवाली’ म्हणून त्याच्यावर कोरडे ओढणारी निलू हळूहळू त्याच्या जाळ्यात अडकत जाते. निरंजन या साऱ्याबद्दल अनभिज्ञ असतो. कधी तोच त्या दोघांना एकत्र येण्याची संधी मिळवून देतो. त्या संधीचं प्रेम सोनं न करता तरच नवल! परंतु निलूची मैत्रीण मधू तिला प्रेमसारख्या ‘चालू’ माणसापासून सावध करू बघते. तो निलूला घोळात घेऊन फसवत असल्याबद्दल तिची शंभर टक्के खात्री पटलेली असते. पण निलूला मात्र प्रेमचं आपल्यावर खरोखरच निरतिशय प्रेम आहे, याबद्दल पक्का विश्वास असतो. तेव्हा मधूच मग प्रेमचं भांडं फोडण्यासाठी त्याची एकदा भेट घेते आणि नकळत ती स्वत:च त्याच्या जाळ्यात फसते..
दरम्यान, निरंजनलाही निलूच्या वर्तनात काहीतरी खटकायला लागलेलं असतं. त्याच्या लक्षात येतं की, प्रेम निलूला आपल्या जाळ्यात ओढून फसवत आहे. निरंजन तिला काहीही न बोलता तिची चूक तिच्या लक्षात आणून देतो. त्यानं निलूचे डोळे उघडतात. आपला नवरा किती मोठय़ा मनाचा आहे, हे तिला कळतं. ती प्रेमला त्याच्या या ‘खेळा’बद्दल चांगलंच सुनावते. पण कधी नव्हे तो प्रेमही काही अंशी का होईना, यावेळी निलूमध्ये खरोखरच गुंतलेला असतो. त्याला हे ‘प्रकरण’ संपवणं जड जातं. परंतु मधूच्या रूपानं एक नवं पाखरू आयतंच त्याच्या जाळ्यात अडकलेलं असतं. त्यामुळे निलूला गमावल्याचं दु:ख मागे टाकून तो नव्या हुरूपानं कामाला लागतो..
संजय मोने यांनी त्यांच्या नेहमीच्या स्टाईलनं चटकदार संवादांतून नाटक फुलवलं आहे. पण नाटकात मध्ये मध्ये पेरलेलं त्यांचं भाष्यवजा निवेदन (हा त्यांच्या दृष्टीनं लेखणीचा फुलोरा असला तरी) हा एक अत्यंत बोअरिंग मामला आहे. त्यांची ही बडबड नाटकातील रस उणावते. ‘हम तो तेरे आशिक है’मध्ये यशस्वी ठरलेला हा फॉम्र्युला त्यांनी इथंही जसाच्या तसा वापरला आहे. त्यांचं हे निवेदन कम् टीका-टिपणी भाषेच्या फुलोऱ्यासाठी थोडा वेळ सहन केली तरी नंतर नंतर ती तापदायक वाटू लागते. त्यातली गंमतही संपते. नाटकाचं कथाबीज मात्र त्यांनी छान फुलवलंय. त्यात प्रेझेन्टेशनचा ताजेपणा आहे. काही संवादही चटपटीत व चपखल आहेत. विशेषत: विवाहित स्त्रीला घोळात घेण्याची त्यांची थिअरी ‘जुनी’च असली, तरीही त्यांनी ती नव्या बाटलीत घालून पेश केल्यानं प्रेक्षकांना आकर्षित करते. अशा ‘प्रेम’प्रकरणांत शह-काटशह, कात्रजचे घाट, मधेच पतंग ढिला सोडण्याची युगत, संधी निर्माण करण्यासाठीच्या युक्त्या-प्रयुक्त्या.. अशा चढत्या भाजणीनं नाटक रंगत जातं.
दिग्दर्शक म्हणून त्यांनी त्यांना लिखाणात ‘दिसलेलं’ नाटक रंगमंचावर प्रयोगबद्ध केलेलं आहे. त्यामुळे नाटकातील धक्कातंत्रं, पीजे, विनोद, त्यातली वाकणंवळणं प्रयोगातही तितकीच प्रभावीरीत्या आली आहेत. आणि हेच या नाटकाचं मोठं यश आहे. कलाकार निवडीतही हा फ्रेशनेस जाणवतो. जितेंद्र जोशी यांनाच त्यातल्या त्यात थोडंसं ‘डावं’ काम मिळालं आहे. बाकी सगळ्यांना बॅटिंग करायला पुरेपूर वाव आहे. मात्र, ज्या पीएच.डी.वर प्रेम विवाहित स्त्रियांना जाळ्यात ओढण्यात आपण माहीर असल्याची फुशारकी मारतो, ते तंत्र प्रत्यक्षात वापरताना तो ज्या प्रकारे निलूला ‘इम्प्रेस’ करायचा प्रयत्न करतो, त्यानं एखादी मूर्ख किंवा घायकुतीला आलेली स्त्रीच फक्त वश होऊ शकते. इतक्या कृत्रिमपणे आपली स्तुती करणाऱ्या माणसाचा अंतस्थ हेतू न ओळखण्याइतक्या स्त्रिया उल्लू नसतात. इथे निलू मात्र प्रेमच्या खुशामतीनं गारेगार होते. ही लेखकाची सोय झाली; त्याच्या प्रेम-तंत्राचा विजय खचितच नव्हे. दुसरी खटकणारी गोष्ट म्हणजे आपल्या बायकोला द्यायला ज्याच्यापाशी वेळ नाही, असा निरंजन प्रेमला मात्र सतत भेटतो. हा विरोधाभास नाही का? आणि त्याच्याचकरवी प्रेम आपलं ‘प्रेम’ निलूपर्यंत पोहचवतो. निरंजन एवढा माठ असतो? त्याला जराही संशय येऊ नये? त्यातही प्रेमसारखा बदनाम माणूस ही गोष्ट करत असेल तर त्याच्या सख्ख्या मित्रालाही संशय येईलच येईल. असो. अशा काही न पचणाऱ्या गोष्टी असल्या, तरी एकंदरीत नाटक प्रेक्षकांना खिळवून ठेवतं, हे निर्विवाद. त्यात काहीसा चावटपणाचाही वाटा आहे. प्रेक्षकांच्या भावनांशी खेळत त्यांना बांधून ठेवण्याचा हेतू नाटकात उघडपणे जाणवतो. अर्थात धंदेवाईक नाटकाच्या बाबतीत ते गैरही नाही.
राजन भिसे यांचं नेपथ्य नावीन्यपूर्ण असलं तरी ते पाहताना ‘सुयोग’च्या एका नाटकाच्या नेपथ्याची आठवण येते. रंगीबेरंगी फ्रेम्सचं हे नेपथ्य नेत्रसुखद आहे. अशोक पत्की यांचं पाश्र्वसंगीत कळीच्या जागा गडद करतं. शीतल तळपदे यांनी प्रकाशयोजनेतून नाटकातील संघर्ष उठावदार केला आहे. सुमुखी पेंडसे यांची वेशभूषा लक्षवेधी आहे. संजय मोने यांनी शिकारी प्रियकराची- प्रेमची मध्यवर्ती भूमिका यात साकारली आहे. त्यांचं व्यक्तिमत्त्वही या भूमिकेला पोषक असंच आहे. विशेषत: त्यांचं नेहमीचं खोचक-भोचक, तिरकस बोलणं आणि एखाद्या गोष्टीबद्दल अनपेक्षित अभिप्राय देणं, तसंच अविश्वसनीय कृती करण्याचा त्यांचा स्वभाव- या बाबी या भूमिकेला बरंच काही देऊन जातात. मात्र, फाजील आत्मविश्वासामुळे ते कधी कधी डोक्यातही जातात. मधूला पटवतानाचं त्यांचं कवितेचं सादरीकरण मात्र लाजवाब! श्वेता शिंदे यांनी बोअरिंग वैवाहिक आयुष्यामुळे प्रेममध्ये आसरा शोधणारी प्रेमिका छान उभी केली आहे. त्यांचा मुक्त मोकळा वावर आणि निरंजनच्या व्यग्र दिनक्रमामुळे त्याच्याबरोबरचं कोरडं, शुष्क सहजीवन, त्यातून निर्माण झालेलं प्रेमासाठीचं तिचं आसुसलेपण, प्रेम तिच्या आयुष्यात आल्यावर तिचं त्याच्यात सहज गुंतत जाणं- आणि शेवटी सत्याचं दर्शन घडल्यावर त्यातून बाहेर येणं.. हे सहज-स्वाभाविकपणे घडत जातं.
जितेंद्र जोशी यांच्या निरंजनला काहीच शेड्स नाहीत. त्याचं सतत बिझी असणं- हीच त्यांची भूमिका! तथापि, त्यानं अखेरीस आडवळणानं निलूला केलेला हितोपदेश मात्र आवश्यक तो परिणाम घडवितो. मानसी कुलकर्णी यांची मधू झणझणीत! ती ‘प्रेम’ प्रकरणात ज्या प्रकारे निलूला निरुत्तर करते, ते बघत राहण्यासारखंचं. तसंच प्रेमच्या हिप्नॉटाइझ करणाऱ्या कवितेत तिचं वाहवत जाणंही तितकंच सच्चं वाटतं.