Leading International Marathi News Daily
रविवार , ३ मे २००९
(सविस्तर वृत्त)

निसर्गसंपन्न कोस्टारिका
भाग १

कोस्टारिका म्हणजे रिच कोस्ट. अर्थात संपन्न, समृद्ध किनारा. १५०२ साली ख्रिस्तोफर कोलंबस जेव्हा इंडियाच्या शोधात निघाला असता वाटेत वादळाने त्याचे जहाज भरकटले गेले आणि तो द्वीप समूहावर आला. त्याला वाटले आपण इंडियात आलो, पण त्याला कळले की तो इंडिया नव्हताच.

 

त्या द्वीप समूहाला वेस्ट इंडिज नाव दिले हे सर्वश्रुतच आहे. तसेच पुढे गेल्यावर त्याला एका किनाऱ्यार स्थानीय लोक अंगावर मौल्यवान अलंकार घालून नाचत समारंभ साजरा करताना दिसले. आजूबाजूला हिरवीगार झाडी पाहून तो तिथे उतरला. तिथल्या वास्तव्यात त्याला आढळून आले की फक्त किनाऱ्यावरच नाही तर आतला भागदेखील हिरव्यागार वनश्रीने व खनिज संपत्तीने समृद्ध आहे. त्याने त्या भागाला कोस्टारिका हे नाव दिले. अजूनही तो भाग तसाच संपन्न आहे. येथील भौगोलिक विविधता अमेरिका, कॅनडापेक्षा जास्त आहे.
मध्य अमेरिकेतील पनामा-निकुरागवा यांच्यामध्ये असलेला कोस्टारिका देश उजवीकडे पॅसिफिक महासागर तर डावीकडे कॅरेबियन समुद्राने बंदिस्त आहे. भूगर्भातील कोको प्लेट व कॅरेबियन प्लेट जवळजवळ असल्याने समुद्राचे प्रवाह, पाण्याचे तापमान, शिवाय भूगर्भातील तापमान वरील प्लेटस्च्या हालचालींना कारणीभूत होते. त्यामुळे ज्वालामुखीच्या उद्रेकासाठी हा भाग अति संवेदनशील आहे. मध्य अमेरिकेतील एकूण ४२ ज्वालामुखींपैकी ७ कोस्टारिकात आहेत. पैकी पोआस, इराजू, आरेनाल हे प्रसिद्ध आहेत. येथे नॅशनल पार्कसाठी देशातील २५ टक्के भाग तर १० टक्के इंडियन (रेड इंडियन) संस्कृतीसाठी राखून ठेवण्यात आला आहे.
कोलंबसाच्या भेटीपासून मध्य अमेरिकेत स्पॅनिश राजवट होती. सन १८२१ मध्ये स्पॅनिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले; परंतु आजही स्पॅनिश ही मायबोली आहे. सात जिल्ह्यांपैकी सॅन होजे, पुंतरेना, कार्तागो आणि अ‍ॅलेक्विला हे प्रमुख आहेत. सॅन होजे राजधानी आहे. कॉर्डिलेरा व तालामांका पर्वतांमुळे झालेल्या दरीत सॅन होजे असल्यामुळे तेथे हवामान नेहमीच आल्हाददायक असते. १९४४ मध्ये राष्ट्रपतींच्या हुकूमशाहीविरुद्ध येथील जनता व विद्यार्थी यांनी मिळून दिलेल्या लढय़ात यश मिळवले. त्यावेळी बरेच आर्थिक नुकसान, जीवितहानी झाली. राष्ट्रपती सुसिमोया यांनी लष्करावर खर्च करण्यापेक्षा जनतेच्या शिक्षणावर आणि आरोग्यविषयक सेवांवर जोर दिला. जनतेला विनामूल्य सेवा मिळण्याची सोय केली. यामुळेच कोस्टारिकात साक्षरतेचे प्रमाण ९६ टक्के आहे, बालमृत्यूचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. जगातील हा एकमेव देश आहे की जेथे कोणत्याही प्रकारचे लष्कर नाही. म्हणून इथले जीवन स्पॅनिश बोलीप्रमाणे ‘पुरा विदा’ म्हणजे तणावरहित, आरामदायी आहे.
भरपूर जंगलसंपत्ती असल्यामुळे लाकडी सामान उच्च प्रतीचे असते; परंतु ठराविक भागातीलच झाडे तोडता येतात, पण एक झाड तोडल्यास दुसरे वृक्षारोपण करण्याचा कायदा आहे. पूर्वी आपल्यासारखेच इथले लोक बैलगाडीचा सर्रास उपयोग करीत, पण जसजशी सुधारणा होत गेली तशी ती मागे पडली. पण आठवण म्हणून सारची या गावात एक भली मोठी बैलगाडी खास पद्धतीने रंगवून ठेवलेली आहे. तसेच सॅन होजे येथे पब्लिक स्क्वेअरमध्ये रंगीबेरंगी गाईंचे लाकडाचे पुतळे करून ठेवलेले आहेत. १९४४ मध्ये झालेल्या युद्धाची निशाणी म्हणून सरकारी इमारतींवर तोफेमुळे झालेली भगदाडे तशीच ठेवलेली आहेत. खालच्या मजल्यावर नॅशनल म्युझियम आहे. जवळच गोल्ड म्युझियम जरूर पाहण्यासारखे आहे. इराजू ज्वालामुखी सॅन होजेपासून जरा जवळच आहे. हे विवर पाहण्यासाठी आपल्याला पठारावर जावे लागते. पण पोआसला जाताना मात्र चढण चढतानाच सल्फरचा वास येऊ लागतो. मैलभर परिघाच्या विवरात असलेल्या पाचूच्या सरोवराचे दर्शन होण्यास मात्र निसर्गाची कृपा असावी लागते. इराजूचे पठार आणि उघडेबोडके, पण पोआसच्या चढणीवर मात्र झाडी, फुले आणि लहान-मोठे कीटक भरपूर. कधीही न पाहिलेली लेडीज छत्रीच्या आकाराची पाने असलेली झुडुपं पाहिली. त्यांना पुअर मॅन्स अंब्रेला म्हणतात. पण गंमत म्हणून ती पाने तोडून टाकून देण्याचे काम कुणीही करत नाहीत. आपण शिकण्यासारखी गोष्ट आहे. शंकूसारख्या आरेनालचे दर्शन खरोखरच विलोभनीय. या पर्वतावर तीन शिखरे आहेत. पैकी दर्शनीय भागातील दोन शिखरांवर काही वर्षांपूर्वी उद्रेक झाला होता. त्या लाव्हाने डोंगरउतारावरील अर्धीअधिक जमीन खडकाळ व नापीक करून ठेवलेली आहे. पण मागच्या बाजूस असलेल्या शिखरावर आजही तो जागृत आहे. वरुणराजांची कृपा असेल तर संध्याकाळी आपल्याला डोंगरावरून वाहणारा लाव्हा पाहावयास नेतात. चार-पाच किलोमीटरच्या अंतरावरून खाली येणारा लाव्हा मुशीतून काढलेल्या सोन्याच्या रसासारखा दिसतो, तर विवरातून तडतडी फुलबाज्याच्या ठिणग्यांप्रमाणे उडणारे मोठमोठे धोंडे इतक्या दुरून टोमॅटोसारखे दिसतात. हा अनुभव पर्यटकांनी कधीही गमावू नये. ज्वालामुखीसभोवतालचा हजारो हेक्टरचा परिसर नॅशनल पार्क म्हणून राखून ठेवलेला आहे. कोणत्याही प्रकारच्या अतिक्रमणाला मज्जाव आहे.
गौरी बोरकर
gauri@borkar.net