Leading International Marathi News Daily
रविवार , ३ मे २००९
(सविस्तर वृत्त)

अंदमान पदौक
किंग्ज सर्कलहून शीवकडे जाताना उड्डाणपुलाच्या साधारण मध्यावर डावीकडच्या पदपथावर (अरोरा सिनेमाच्या समोर) दोन अजस्र महाकाय वृक्ष दृष्टीस पडतात. त्याचा भव्यपणा पुलावरून येताना किंवा रस्त्यावरून, पण जरा दुरूनच नजरेत भरतो. कारण अगदी जवळून हे वृक्ष एका नजरेत मावूच शकत नाहीत इतके भव्य आहेत. ७०-८० फूट उंचीचे व सहा-सात फूट बुंधा असलेले हे महाकाय वृक्ष आहेत अंदमान पदौकचे. शास्त्रीय नाव Pterocarpus indicus. त्यांना अंदमान रेडवूड किंवा बर्मीज रोजवूड असंही म्हणतात. दक्षिण आशियात उगमस्थान असलेला हा वृक्ष ब्रह्मदेश, अंदमान या ठिकाणी आढळतो. फिलिपिन्सचा तर हा राष्ट्रीय वृक्ष आहे आणि सिंगापूर शहराची,

 

तेथील बागांची एक ओळख म्हणून प्रसिद्ध आहे.
पदौक एक पानगळीचा वृक्ष आहे. हिवाळ्यात त्याची सर्व पाने गळून पडतात आणि पाठोपाठ येणाऱ्या वसंतात, म्हणजे साधारण मार्चमध्ये नवीन, पोपटी हिरव्या नाजूक पानांनी वृक्ष पुन्हा नवीन हिरवा साज लेवून तयार होतो, नंतर येणाऱ्या पुष्पराशीसाठी. पण आधी त्याच्या पानांची थोडक्यात ओळख करून घेऊया. याची पाने संयुक्त असून ६-१२ पर्णदलांनी बनलेली असतात. पर्णदलाचा आकार साधारण लंबगोल असून प्रत्येक पर्णदल ७-११ सें.मी. लांब व ३.५-५.५ सें.मी. रुंद असते. खाली झुकलेल्या नवीन पालवीने संपूर्ण झाड झाकून जाते. या नवपल्लवीच्या संगतीने फांद्याच्या टोकावर इवल्या इवल्या कळ्यांचे घोस लगडतात. बरेच दिवस कळ्या येत राहतात. पण या वृक्षाची खासियत हीच की पूर्ण पक्व झाल्यावरही या कळ्या न फुलता स्तब्धच राहतात. तेव्हा आठवण येते, ‘‘स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा, गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा’’ या काव्यपंक्तींची. मात्र ही स्तब्धता जोपर्यंत या वृक्षाला येणाऱ्या पावसाची संवेदना होत नाही तोपर्यंत आणि अचानक, एक दिवस जादुगाराने छडी फिरवावी तशा सगळ्या कळ्या उमलून संपूर्ण वृक्ष नाजूक, सुगंधी, पिवळ्या फुलांनी बहरून जातो. मात्र असा हा अतिशय नजाकती, सुंदर बहर केवळ एक दिवसच टिकतो. दुसऱ्या दिवशी वृक्षाखाली असंख्य फुलांचा सडा पडतो. दोन्ही दिवसांची ही दृश्ये तितकीच संस्मरणीय असतात. सध्या सोनमोहराच्या पिवळ्या फुलांचा आणि नदीकाठच्या तिवराच्या लाल तंतूमय फुलांचा असाच सडा मुंबापुरीच्या काही रस्त्यांवर पडलेला अनेकांनी अनुभवला असेल. नसल्यास दादरच्या पारसी कॉलनीत जरूर या. महत्त्वाचं सांगायचं म्हणजे पदौक, फुलण्याच्या या घटनेनंतर साधारणपणे तीन-चार आठवडय़ांत मुंबईत पावसाची पहिली शिरशिरी येते असा अनुभव आहे. आताच्या कळ्यांच्या परिस्थितीनुसार आणि शहरातल्या वातावरणात होणारे सूचक बदल बघून येत्या आठवडय़ात पदौक फुलण्याची शक्यता आहे. मात्र हा आपला अंदाज आहे. निसर्गाच्या मनात काय आहे हे मात्र काळच सांगू शकेल. पहिल्या बहरानंतर पावसाळ्याच्या सुरुवातीला कमी प्रमाणावर आणखी एक-दोन बहर येतात. तेव्हाही फुलणारी फुले दुसऱ्या दिवशी गळून पडतात. सिंगापूरमध्ये ही झाडे मोठय़ा प्रमाणावर लावली आहेत. तिथल्या स्थानिक वाहनचालकांना या प्रसंगाची इतकी जाणीव झालेली आहे की वाहने चालविताना ते पडलेल्या फुलांवरून वाहन घसरू नये म्हणून पुरेशी काळजी घेतात. सतत येणाऱ्या पावसामुळे तिथले पदौक वृक्ष हे सदाहरित असतात.
बहर येऊन गेल्यावर यशस्वी परागसिंचन झालेल्या (मुख्यत्वे मधमाश्यांकरवी) थोडय़ा फुलांना फळे धरतात. मध्ये एक बी आणि सभोवती दोन-तीन सें.मी. व्यासाचा कागदी
पापुद्रा अशी त्यांची रचना असल्यामुळे Pterocarpus
हे नाव प्राप्त झाले आहे. इतका भव्य शाकार सांभाळण्यासाठी लांब पसरलेली आधारमुळे, जणू काही ‘पादप’ म्हणून बहुधा त्याचा अपभ्रंश होऊन ‘पदौक’ हे नामाभिधान प्राप्त झाले असावे. या वृक्षाचे गाभ्याचे लाकूड लाल असते म्हणून नाव ‘रेडवूड.’ अतिशय कठीण असे हे लाकूड उत्तम फर्निचर बनविण्यासाठी उपयोगात आणले जाते. तसेच याचे काही औषधी गुणही असून तोंड येणे, व्रण, उष्म्याचे विकार, ताप इत्यादीसाठी त्याचा उपयोग होतो. शिवाय याची मुळे जमिनीतील नत्राचे (नायट्रोजन) प्रमाण वाढविण्याचे बहुमोल कार्यही करतात. मुंबईत या दोन वृक्षांच्या व्यतिरिक्त राणीच्या बागेतील असाच मोठा वृक्षही आपली शान टिकवून आहे. मंडळी, आता वाट बघूया पदौक फुलण्याची.
डॉ. विद्याधर ओगले