Leading International Marathi News Daily
रविवार , ३ मे २००९
(सविस्तर वृत्त)

संगीतातील महापाटील
'जो तपस्वी स्वरांची साधना करतो त्याचे आयुष्य हे एक सुंदर गाणे होते, पं. शिवानंद पाटील यांचे आयुष्य हे असे स्वरसुंदर आयुष्य आहे, त्यांच्या आयुष्यातले एक नवे वर्ष म्हणजे स्वरांचा एक नवा साक्षात्कार आहे'.. 'शिवानंद हा संगीतातला महापाटील आहे, ही पाटीलकी त्याने खूप छान पेलली आहे'.. 'तानपुरा पूर्णपणे स्वरात जुळल्यानंतर त्याच्या खर्जाच्या षडजातून गंधार अनुध्वनित होतो, तो गंधार बुवांच्या गळ्यात आहे, गायनात आहे, त्या शिवगंधाराला माझे अभिवादन'.. हे उद्गार आहेत अनुक्रमे कविवर्य

 

मंगेश पाडगावकर, मोहन वाघ आणि अनिल मोहिले यांचे..
अभिजात संगीतातील ख्यातनाम गायक पं. शिवानंद पाटील येत्या शनिवारी, ९ मे रोजी ५० व्या वर्षांत पदार्पण करीत आहेत, त्या निमित्ताने प्रकाशित होत असलेल्या शिवगंधार या गौरविकेत या व अशा आणखी काही मान्यवरांनी शिवानंद पाटील यांच्याविषयीच्या ज्या भावना प्रकट केल्या आहेत, त्यात यांचा समावेश आहे. शिवानंदबुवा हे मूळचे इचलकरंजीचे. आई हिराबाई पाटील आणि वडिल पं. शंकरबुवा पाटील यांच्याकडूनच शिवानंदबुवांना संगीताचे प्राथमिक शिक्षण मिळाले. आईवडिल दोघेही कर्नाटक संगीतनाटकात काम करणारे कलावंत. रात्री उशीरापर्यंत नाटके चालत, ती संपली की मग तालीममास्तर संगीत शिकणाऱ्यांना शिकवत असत. मल्लिकार्जुन मन्सूर यांचे बंधू बसवराज मन्सूर हे शिवानंदजींच्या आईवडिलांच्या नाटक कंपनीत तालीम मास्तर होते.
नाटकात भूमिका करण्याची आणि स्टेजवर गायची आवड शिवानंदना होतीच, पण त्याहीपेक्षा आधिक काही शिकावे असे मनात असल्याने त्यांनी बसवराज राजगुरू आणि गंगुबाई हनगल यांचेकडून तालीम घेण्यास सुरूवात केली. गंगुबाईंनी तर त्यांना मुलासमानच वागवले. आकाशवाणीवरून गाणे सादर करण्याची पहिली संधी शिवानंदजींना मिळाली ती १९७६ साली धारवाड आकाशवाणी केंद्रावर.
ते गाणे ऐकून आप्पासाहेब पांगेरीकरांनी शिवानंदजींना काणेबुवांकडे जाण्यास सुचवले. काणेबुवा आग्रा घराण्याचे ज्येष्ठ गायक होते. प्राणप्रिय या टोपण नावाने ओळखले जाणारे पं. विलायत हुसेन खॉँसाहेब यांचे ते शिष्य होते. काणेबुवांनी शिवानंदजींचे गाणे पूर्वी ऐकलेले होतेच, पण एका स्पर्धेत बुवांच्या हस्ते त्यांना पारितोषिकही मिळालेले होते. जगण्यासाठी हातपाय हलवणे आवश्यक होते. काही किरकोळ कामे करून त्या पैशांच्या आधारे शिवानंदांनी काणेबुवांकडे तालीम घेतली. तुला उत्तम गायक बनवायचे तर तुझ्या गळ्यावर आधी झालेले कुसंस्कार मला काढून टाकावे लागतील, तसे झाले तरच तू आयुष्यात मोठा गायक बनू शकशील,या काणेबुवांच्या सूचनेनुसार ही तालीम चालली. रात्री ८ वाजता गाणे सुरू होत असे आणि पहाटे ४ वाजेपर्यंत काणेबुवा शिवानंदांना शिकवीत असत.
जवळपास पाच वर्षे काणेबुवांकडे गाणे शिकल्यानंतर मुंबई गाठली पाहिजे असे शिवानंदांना वाटू लागले. काणेबुवांनी त्यांना पं. जितेंद्र अभिषेकींकडे जाण्यास सुचवले. शिवानंदांना इचलकरंजीतच अभिषेकींना तानपुऱ्यावर साथ करण्याची संधी मिळाली होती. ८४ ते ८७ अशी तीन वर्षे ते बुवांकडे शिकले. तू उत्तम गायक आहेस, माझी नक्कल करू नकोस, तू गाशील तेव्हा शिवानंद पाटील गातो आहे असे वाटले पाहिजे, जितेंद्र अभिषेकी गाताहेत असे वाटता उपयोगी नाही हे अभिषेकीबुवांनीच त्यांना सांगितले.
अभिषेकी पुण्याला शिफ्ट झाल्यानंतर शिवानंदजी यशवंतबुवांकडे गेले. यशवंतबुवा आणि काणेबुवा हे दोघेही मिराशीबुवांचे शिष्य. काणेबुवांकडून यशवंतबुवांकडे जाण्याचा तसा कोणताच विपरित परिणाम शिवानंदाच्या उभयतांशी असणाऱ्या संबंधांवर पडला नाही. शिवानंदजी मुंबईत आले ते दोन झब्बे आणि एक लेंगा एवढय़ाच कपडय़ांनिशी. रहायचे कुठे हा प्रश्न होताच. शिवाजी पार्कच्या कट्टय़ावरच बुवा काही काळ राहिले. शिवाजी मंदिर नाटय़गृहाच्या स्वच्छतागृहाचा आधार अंघोळीपांघोळीसाठी होता. एका हॉटेलात नोकरी करायची, बुवांकडे शिकायचे अशी काही वर्षे गेली. पण हिंमत न हरता शिवानंदजी शिकत राहिले, आजये यश हे त्यातून आले आहे, अशी त्यांची धारणा आहे. शनिवारी होणाऱ्या सुवर्णस्पर्शी समारंभात शिवानंदजींच्याच शास्त्रीय गायनाची शिवगंधार मैफल होणार असून पं. ओंकार गुलवाडी व अजय जोगळेकर त्यांना साथसंगत करणार आहेत. रवींद्र नाटय़मंदिरात रात्रौ ८ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात शिवगंधार या गौरविकेचे प्रकाशन होणार असून त्यात संगीत क्षेत्रातील ३०मान्यवर गायक वादकांचे सदिच्छा संदेश, शिवानंदजींच्या सांगितीक कारकीर्दीचा आढावा इत्यादीचा समावेश आहे. वर उल्लेख केलेल्या मान्यवरांव्यतिरिक्त पं. यशवंतबुवा जोशी, पं. राम नारायण, झरिन शर्मा, अशोक शर्मा, उस्ताद अब्दुल हलीम जाफरखान, हृदयनाथ मंगेशकर, अरविंद पारिख, ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर, बाबुराव हनगल, माणिक भिडे, श्रीकांत देशपांडे, श्रीनिवास जोशी, विद्या अभिषेकी आणि भारती राजगुरू यांच्या उपस्थितीत शिवानंदजींचा सन्मान सोहळा होणार आहे.
प्रा. केशव परांजपे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार असून प्रसाद महाडकरांचे विशेष सहकार्य कार्यक्रमाला लाभले आहे.
प्रतिनिधी