Leading International Marathi News Daily
रविवार , ३ मे २००९
(सविस्तर वृत्त)

अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते ‘माय रत्नागिरी’चे आज उद्घाटन
रत्नागिरी, खास प्रतिनिधी :
रत्नागिरी शहर व जिल्ह्यातील विकासविषयक विविध विषयांबाबत जनजागृती आणि कृती कार्यक्रम राबवण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या ‘माय रत्नागिरी’ या अभिनव व्यासपीठाचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेता अतुल कुलकर्णी

 

यांच्या हस्ते रविवार, ३ मे रोजी करण्यात येणार आहे.
पूर्णत: बिगर राजकीय असलेल्या या व्यासपीठाची संकल्पना शहरात निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी एकत्र येऊन विकसित केली आहे. यामध्ये बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. श्रीरंग कद्रेकर, विधिमंडळाचे निवृत्त सचिव भास्कर शेटय़े, आर्ट सर्कलचे संस्थापक नितीन कानविंदे, प्रसिद्ध उद्योजक दीपक गद्रे, उदय लोध, मरीनर दिलीप भाटकर, कुणबी सेवा संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र गीते, नीला पालकर, जनता सहकारी बँकेचे संचालक मनोहर भिडे, आंबा व्यावसायिक आनंद देसाई, अ‍ॅड. दीपक पटवर्धन, ज्येष्ठ पत्रकार रशीद साखरकर, प्रमोद कोनकर, शिरीष दामले, सुकांत चक्रदेव आणि सतीश कामत यांचा समावेश आहे.
सुरुवातीला बालविकास, आरोग्य, जलसंवर्धन व पर्यावरण आणि नागरी सुविधा या चार क्षेत्रांमध्ये काम केले जाणार असून त्यासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आले आहेत. सुकांत चक्रदेव (बालविकास), नीला पालकर (आरोग्य), डॉ. श्रीरंग कद्रेकर (जलसंवर्धन व पर्यावरण) आणि नंदू परांजपे (नागरी सुविधा) यांची या कक्षांचे समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच प्रत्येक कक्षामध्ये चार ते पाच व्यक्तींचा सदस्य म्हणून सहभाग आहे.
यापैकी बालविकास कक्षातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. जलसंवर्धन व पर्यावरण कक्षातर्फे संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी येथे जलसंवर्धनाचे आदर्श मॉडेल निर्माण करण्याच्या दृष्टीने प्राथमिक पाहणी करण्यात आली असून त्यानुसार नियोजनाला सुरुवात झाली आहे. भू-जल सर्वेक्षण, कृषी आणि पाणी पुरवठा विभाग यांच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांचा त्यामध्ये सहभाग आहे. तसेच शहरातील विविध जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि सबलीकरणाच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत.
शहर आणि जिल्ह्यातील आरोग्यविषयक दर्जेदार सुविधांसाठी प्रयत्न, त्याचप्रमाणे आरोग्यविषयक समस्यांबाबत जनजागृती करण्याचा आरोग्य कक्षाचा मनोदय आहे. या उपक्रमामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना अर्ज भरून या चार कक्षांपैकी आपल्या आवडीच्या कक्षामध्ये काम करता येईल. रत्नागिरी जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यालयामध्ये (जयस्तंभ) दुपारी १२ ते संध्याकाळी ६ या वेळात हे अर्ज उपलब्ध होऊ शकतील. रशीद साखरकर (९४२३२९०७८६) यांनी संपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. तसेच या व्यासपीठाचे निमंत्रक म्हणून सतीश कामत (९८६०८३७३९७) व दीपक गद्रे काम पाहणार आहेत. इच्छुकांना aamchiratnagiri@gmail.com येथेही संपर्क साधता येईल.