Leading International Marathi News Daily
रविवार , ३ मे २००९
(सविस्तर वृत्त)

दक्षिण आशियातील देशात विश्वासार्हता वाढली पाहिजे - बिशंभर
प्रतिनिधी

‘दक्षिण आशियातील सर्व देश हे एकमेकांचे शेजारी असल्याने त्यांच्या समस्या या एकसारख्याच आहेत. या प्रदेशातील राष्ट्रांमध्ये विश्वासार्हता वाढली पाहिजे,असे प्रतिपादन ‘ग्लोबल ह्युमन राईट्स डिफेन्स’ या नेदरलॅण्डस्थित स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष निझाद

 

बिशंभर यांनी केले.
मानवी हक्कांची पायमल्ली होते म्हणजे नक्की काय होते याची प्रत्यक्ष त्या भागात जाऊन माहिती घेणे, या हक्कांसाठी काम करणाऱ्या स्थानिक संस्थांशी संपर्क साधून त्यांच्यामार्फत स्थानिक समस्या समजून घेणे व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची दखल घेतली जावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. बेकायदेशीर मानवी व्यापार, स्थलांतरीतांचे प्रश्न, आरोग्य, बालमजूरी, महिला सक्षमीकरण आदी दक्षिण आशियातील शेजारी राष्ट्रांना भेडसावणाऱ्या या समस्यांवर चर्चा करुन, त्यांची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जावी या उद्देशाने २९ एप्रिल ते १ मे दरम्यान रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे ‘सेंटर फॉर ह्युमन राईट्स स्टडिज अ‍ॅण्ड अवेअरनेस’ व ‘ग्लोबल ह्युमन राईट्स डिफेन्स’ या नेदरलॅण्डस्थित स्वयंसेवी संस्थेने मुंबईत एक परिषद भरविली होती. मानवी हक्क, ज्यांना हे हक्क डावलले गेले आहेत अशांना मदत आणि मानवी हक्कांवर काम करण्यासाठी आवश्यक असलेले शिक्षण या तीन प्रमुख मुद्यांवर या परिषदेदरम्यान चर्चा झाली. दक्षिण आशियाई देशांतील ६० प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले होते. तीन दिवसांच्या या परिषदेनंतर शुक्रवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना निझाद बिशंभर म्हणाले, मानवी तस्करी संदर्भात प्रामुख्याने आमची संस्था काम करीत आहे. त्यासाठी प्रत्येक देशातील परिस्थितीचा आढावा घेऊन, त्यावर कोणत्या प्रकारे काम करता येईल याचा अभ्यास केला जातो.
या संस्थेच्या स्थापनेबद्दल बोलताना ते म्हणाले की, १९ सप्टेंबर २००३ रोजी नेदरलँडमध्ये या संस्थेची स्थापना झाली. भारतात गेली तीन वर्षे ही संस्था जम्मू-काश्मीर, दिल्ली आणि महाराष्ट्र या भागात कार्यरत आहे. महाराष्ट्रात पुणे येथे ही संस्था काम करीत आहे. सध्याच्या तीन दिवसांच्या परिषदेबद्दल बोलताना ते म्हणाले की, या क्षेत्रात काम करणाऱ्यांना शिक्षण देण्याची गरज आहे. त्याचबरोबर प्रसारमाध्यमांशी कसे बोलायचे याचेही प्रशिक्षण या कार्यकर्त्यांना देण्याची गरज आहे. विविध विषयांवर प्रकल्प कसे करायचे, एखाद्या प्रकरणाचा अभ्यास कसा प्रकारे करायचा याबाबत या परिषदेत चर्चा करण्यात आली. या संस्थेच्या भविष्यात काय योजना आहेत याबद्दल बोलताना रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे समन्वयक अ‍ॅड. गणेश सोवनी म्हणाले की, या विषयावर अधिकाधिक परिषदांचे आयोजन करुन जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. त्यासंदर्भात भविष्यात काही पावले उचलण्यात येतील. त्याचबरोबर एका देशातील कार्यकर्त्यांना दुसऱ्या देशात जाऊन तेथील समस्यांचा अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येईल.