Leading International Marathi News Daily
रविवार , ३ मे २००९
(सविस्तर वृत्त)

बोधी नाटय़महोत्सव
बोधी म्हणजे ज्ञान..! बोधी रंगभूमी म्हणजे ज्ञान-रंगभूमी! वेगळे रंगभान, वेगळे जीवनभान देण्याच्या हेतूने ‘बोधी नाटय़ परिषद’ (स्थापना : २२ नोव्हेंबर २००३)

 

स्थापन झाली. शहरी-ग्रामीण, नवे-जुने, गरीब-श्रीमंत असा कुठलाही भेद न करता मुंबई-पुण्यासारख्या ‘ग्लोबल’ शहरांबरोबर व कणकवली, येवला यांसारख्या ग्रामीण भागांतही बोधी नाटय़ परिषदेने आजवर एक-दोन नव्हे, तर तब्बल पंधरा नाटय़लेखन कार्यशाळा घेतल्या. अनेक रंगकर्मीच्या साक्षीने ७९ नाटय़संहितांचं वाचन आणि चर्चा झाली. यातील निवडक पाच नाटकांचा पहिला बोधी नाटय़महोत्सव २००७ साली झाला. ‘कु. सौ. कांबळे’ (महेंद्र सुके, नागपूर), ‘जाता नाही जात’ (सिद्धार्थ तांबे, वसई), ‘निष्णाण’ (अरुण मिरजकर, सांगली), अशी नाटकं आणि नाटककार त्यातून समोर आले. पुन्हा असाच एक प्रयत्न उर्वरित ७४ नाटकांमधील निवडक आणखी पाच नाटकांचा दुसरा ‘बोधी नाटय़ महोत्सव’ ११ ते १६ मे या कालावधीत शिवाजी मंदिर (दादर) येथे दररोज सायंकाळी ७.३० वाजता होणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन भालचंद्र मुणगेकर (सदस्य, योजना आयोग, भारत सरकार) करणार असून प्रमुख पाहुणे म्हणून गिरीश गांधी हे उपस्थित राहणार आहेत.
११ मे रोजी ‘जाता नाही जात’ (सिद्धार्थ तांबे) हे नाटक या महोत्सवात पुन्हा सादर केलं जाणार आहे. सिद्धार्थ तांबे यांचे आकस्मिक निधन झालं, त्यांना अभिवादन म्हणून! १२ मे रोजी नागपूरच्या बोधी फाऊंडेशनचे महेंद्र सुर्वे लिखित, अशोक तराळ दिग्दर्शित, ‘या अल्ला! हे राम!’ १३ मे रोजी नालंदा कलादालन, कल्याण निर्मित, अशोक हंडोरे लिखित-दिग्दर्शित ‘एतं बुद्धानं सासनं’, १४ ने रोजी आष्टीच्या एकता ग्रुपचं ‘खेळ’ (लेखक-दिग्दर्शक गौतम निकाळजे), १५ मे रोजी डॉ. बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठ नाटय़शास्त्र विभागाचं, ‘कॅम्पस’ (लेखक वामन तावडे, दिग्दर्शक किशोर शिरसाट आणि रमाकांत मुळे) १६ मे रोजी ‘मराठी रंगभूमी : नवी स्पंदने’ हा चर्चात्मक कार्यक्रम होईल. त्यात डॉ. हेमू अधिकारी, कमलाकर नाडकर्णी, प्रा. वामन केंद्रे, प्रा. शफाअत खान, प्रा. डॉ. अनिल सपकाळ, जयंत पवार, अतुल पेठे, गिरीश पतके, इरावती कर्णिक, प्रा. डॉ. सुरेश मेश्राम हे सहभागी होतील. या कार्यक्रमाच्या शेवटी प्रेमानंद गज्वी लिखित, प्रदीप सरवदे दिग्दर्शित ‘बेरीज-वजाबाकी’ ही एकांकिका प्रदीप सरवदे आणि यशवंत मल्हार सादर करतील. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमानंद गज्वी : ९८२१७७१८८४, अशोक हंडोरे : ९८६९३३३२२२.