Leading International Marathi News Daily
रविवार , ३ मे २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

डेक्कनला धक्का
पोर्ट एलिझाबेथ, २ मे / वृत्तसंस्था

कर्णधार शेन वॉर्नने दाखविलेल्या विश्वासाला जागत अभिषेक राऊतने केलेल्या २३ चेंडूंतील नाबाद ३६ धावा व आपल्या तडाखेबंद फलंदाजीने चाहत्यांची मने रिझविणाऱ्या युसूफ पठाणची १४ चेंडूतील २ चौकार व २ षटकारांसह सजलेली २४ धावांची खेळी यामुळे राजस्थान रॉयल संघाने इंडियन प्रीमियर लीगमध्ये आघाडीवर असलेल्या डेक्कन चार्जर्सला पराभवाचा धक्का दिला. डेक्कनचा हा या स्पर्धेतील सलग दुसरा पराभव होता. याआधी, दिल्ली डेअरडेव्हिल्सने त्यांना पराभूत केले होते.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या डेक्कन चार्जर्सला केवळ १४१ धावांवर रोखण्यात राजस्थान रॉयलला यश आल्यामुळे सामन्यात राजस्थानला झटपट यश मिळविता येईल, असा एक अंदाज होता. पण राजस्थानचे सहा फलंदाज धावांचे शतक धावफलकावर लागण्यापूर्वीच माघारी परतल्यामुळे डेक्कनचे पारडे जड झाले होते. मात्र शेन वॉर्नची २१ धावांची खेळी आणि त्यानंतर अभिषेक राऊतचा सावध खेळ आणि युसूफ पठाणचा तडाखा यामुळे डेक्कनच्या हातून विजयाची संधी निसटली. या विजयामुळे राजस्थान संघाने गुणतक्त्यात चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे.
डेक्कनला आज प्रथम फलंदाजी करताना सूर सापडला नाही. त्यांच्या धावसंख्येला वेसण घालण्याची कामगिरी राजस्थानच्या गोलंदाजांनी अचूक बजावली. विशेषत: युसूफ पठाणने अष्टपैलू कामगिरी करताना गोलंदाजीतही ४ षटकांत केवळ १९ धावा देत १ बळी मिळविला. त्याच्या या अष्टपैलू कामगिरीमुळेच तो सामन्यात सर्वोत्तम ठरला. रवींद्र जडेजा, हारवूड, त्रिवेदी यांनी डेक्कनच्या धावसंख्येला आवर घालण्याची कामगिरी चोख बजावली. टी. सुमनच्या नाबाद ४१ धावा, रोहित शर्माची ३८ धावांची खेळी आणि कर्णधार गिलख्रिस्टची ३९ धावांची खेळी वगळता डेक्कनला फार मोठी वैयक्तिक धावसंख्या गाठता आली नाही.
डेक्कन चार्जर्स : हर्शेल गिब्ज पायचीत गो. पठाण ८, अ‍ॅडम गिलख्रिस्ट झे. पठाण गो. जडेजा ३९, अझर बिलाखिया झे. त्रिवेदी गो. हारवूड १, रोहित शर्मा झे. वॉर्न गो. त्रिवेदी ३८, टी. सुमन नाबाद ४१, ड्वेन स्मिथ झे. वॉर्न गो. त्रिवेदी ७, वेणुगोपाल राव नाबाद ०, अवांतर ७ (लेग बाइज ३, वाइड ४), एकूण २० षटकांत ५ बाद १४१
बाद क्रम : १-३४, २-३५, ३-५८, ४-११७, ५-१३५.
गोलंदाजी : पठाण ४-०-१९-१, पटेल २-०-२३-०, जडेजा ४-०-२२-१, हारवूड ४-०-२५-२, वॉर्न ३-०-२९-०, राऊत १-०-७-०, त्रिवेदी २-०-१३-१
राजस्थान रॉयल्स : गॅ्रमी स्मिथ झे. शोएब गो. एडवर्ड ०, स्वप्निल अस्नोडकर धावचीत (गिब्ज/सिंग) ०, ली कार्सेलिडन पायचीत गो. राव ३९, नमन ओझा झे. गिब्ज गो. सिंग ०, रवींद्र जडेजा ढे. स्मिथ गो. राव १२, शेन वॉर्न झे. गिलख्रिस्ट गो. ओझा २१, अभिषेक राऊत नाबाद ३६, युसूफ पठाण झे. गिब्ज गो. सिंग २४, शेन हारवूड नाबाद ३, अवांतर ७ (बाइज १, लेग बाइज २, वाइड ३, नोबॉल १), एकूण १९.४ षटकांत ७ बाद १४२
बाद क्रम : १-०, २-१, ३-३, ४-५४, ५-५७, ६-९३, ७-१३१
गोलंदाजी : एडवर्डस् ३.४-०-१७-१, सिंग ४-१८-२, स्मिथ २-०-२१-०, शर्मा २-०-१४-०, ओझा ४-०-२७-१, राव २-०-२३-२, शोएब २-०-१९-०