Leading International Marathi News Daily

रविवार , ३ मे २००९

गृहसंकुलांनाही मिळणार टीएमटीची ‘सौजन्य सेवा’
संजय बापट

बेस्टच्या आगमनानंतर अडचणीत आलेल्या ठाणे परिवहन सेवेला (टीएमटी) अधिक सक्षम करण्यासाठी पालिका आणि परिवहनने आता युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. जेएनयूआरएम अंतर्गत नव्या बसेस घेण्याबरोबरच शहरातील मोठमोठय़ा गृहसंकुलांनाही तेथील बिल्डरांच्या सौजन्याने टीएमटीची सेवा देण्याची महत्त्वाकांक्षी योजना प्रशासनाने आखली आहे. टीएमटीच्या ताफ्यात सध्या २८६ बसेस असून, त्यापैकी १९० बसेस १० ते १५ वर्षांहून अधिक वयोमानाच्या असल्याने त्या स्क्रॅप केल्या जाणार आहेत. आधीच लोकसंख्येच्या मानाने टीएमटीकडे तुटपुंज्या बसेस असून, त्यातच जुन्या गाडय़ा स्क्रॅप कराव्या लागणार असल्याने टीएमटीचा डोलाराच कोसळण्याची परिस्थिती उद्भवू शकते.

चित्रकलेतील ‘दादा’ डोंबिवलीत
भगवान मंडलिक

चटके देणारी परिस्थिती माणसाला एक तर सुंस्कारित करते, घडविते, नाहीतर फुकट तरी घालविते, या दोन गोष्टी परिस्थिती शिकवत असते. केतकर कुटुंबीय हे पिढीजाद श्रीमंत कुटुंब. जगद्विख्यात चित्रकार, ज्येष्ठ कलाशिक्षक स्व. कृष्णराव केतकर हे या घराण्यातील. केतकर कुटुंबियांचा पिढीजात मिठागरांचा व्यवसाय होता. पण आपत्ती आली आणि सगळा व्यवसाय बुडाला. कधी नव्हे इतकी आर्थिक परिस्थिती दुबळी झाली. मोठं कुटुंब, त्यात आर्थिक दारिद्रय़ घुसले. या आपत्तीमध्ये अख्खे केतकर कुटुंब होरपळून निघाले.

गिर्यारोहणापलीकडची जाणीव
नुकतेच २६ एप्रिलला थोर गिर्यारोहण गुरू कै. शरद ओवळेकरांच्या तृतीय स्मृतिदिनाच्या निमित्ताने एका कृतज्ञता सोहळ्यास उपस्थित राहता गिर्यारोहणातील एका अनोखी पैलूची जाणीव झाली. दऱ्या, डोंगराळ, गडकिल्ल्यांवर मनसोक्त भटकंतीचा आनंद तर सर्वानाच हवा असतो. कुणी येथील साहसासाठी, कुणी इतिहासाचा मागोवा घेत गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी अशा अनेक गोष्टींचा आनंद घेत असतो. मात्र याच भटकंतीत गिर्यारोहणाच्या पलीकडचेही बरेच काही असते.

..त्यांच्या व्यवसायातून ५० कुटुंबांचे घर चालते
प्रतिनिधी

जीवनात अनेक प्रसंग असे येतात की पुढे काय करायचे, याचा निर्णय घेता येत नाही. पण त्या परिस्थितीतून मार्ग काढत स्वत:च्या जीवनाचा मार्ग स्वत: शोधणारे लोक आयुष्यात यशस्वी ठरत असतात. स्वत:च्या आयुष्याचा मार्ग आखताना इतरांनाही रोजगाराची संधी देत पुढे जाणाऱ्या व्यक्तींपैकी एक व्यक्ती आहे ठाण्यातील चरई भागात राहणाऱ्या प्रतिभा प्रकाश प्रधान. मागील २०-२२ वर्षांपासून प्रीती सव्र्हिसेसच्या माध्यमातून अनेकांनी त्यांच्या हातच्या जेवणाची चव चाखली आहे.

आता तरी घोळ थांबवा
मुंबईतल्या ५६ म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास सध्या पार रखडला आहे, हे या स्तंभातून बऱ्याचवेळा लिहिले आहे. आज पुन्हा या विषयावर लिहिण्याचे कारण म्हणजे बुधवारी म्हाडा वसाहतीतील काही रहिवाशांनी गृहनिर्माण विभागाचे सचिव सिताराम कुंटे यांची भेट घेऊन रखडलेला पुनर्विकास जोमाने पुढे रेटण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी केली. अन्यथा लोकसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचाही इशारा दिला आहे.
म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासाबाबत भिजत पडलेल्या प्रश्नाकडे शासनाने वेळीच लक्ष पुरविले असते तर आज ही पाळी रहिवाशांवर आली नसती.

ब्रॉड बॅण्ड सेवेची गुणवत्ता
इंटरनेटद्वारे माहिती मिळविणे, ई-मेल पाठविणे, ऑनलाईन अर्ज भरणे इत्यादी गोष्टी तरुण पिढीच्या अंगवळणी पडल्या आहेत. इंटरनेट सेवा दोन प्रकारे पुरविली जाते. पहिल्या प्रकाराला डायल-अप सेवा म्हणतात. यामध्ये इंटरनेट वापरू इच्छिणारा ग्राहक इंटरनेट सेवक कंपनीचा टेलिफोन नंबर फिरवितो आणि त्यांच्याशी संपर्क प्रस्थापित झाल्यावर त्याला इंटरनेट सेवा प्राप्त होते. दुसऱ्या प्रकाराला ब्रॉड बॅण्ड सेवा म्हणतात.

कलाभवनातील तीन तास
संपदा वागळे

आपल्या गावात फुलांचं किंवा रांगोळ्यांचं प्रदर्शन भरलं असेल तर आपण वाकडी वाट करून कधीमधी तिकडे डोकावतोही, पण ते प्रदर्शन जर चित्रकला, शिल्पकला या विषयातलं असलं तर तिथे हजेरी लावणारी डोकी फार थोडी असतात. या सर्वसाधारण नियमामागे बहुधा ‘आम्हाला त्यातलं काय कळतंय’ हा भाव असावा. मात्र या समजुतीला छेद देत आम्ही चार-चौघी अलीकडेच ठाण्याच्या कापूरबावडी नाक्याजवळील कलादालनाकडे वळलो, फक्त वळलो एवढंच नव्हे तर तिथे गेल्यावर चित्रकारांच्या नजरेतून त्यांच्या कलाकृतींचा आनंद लुटताना चक्क तहानभूक विसरलो. त्याचं असं झालं. आमचे स्नेही चित्रकार विजयराज बोधनकर यांचं अगत्यपूर्वक निमंत्रण आणि ठाणे शहराच्या वैभवात भर टाकणारं नवं कलादालन बघण्याची उत्सुकता हे मोह टाळण्यासारखे नव्हतेच. प्रदर्शनाची वेळ होती सकाळी अकरा ते सायंकाळी सात. आम्ही अकराच्या ठोक्याला म्हणजे तिथली साफसफाई सुरू असतानाच जाऊन थडकलो. ठाणे महानगरपालिकेने बांधलेली ही कलाभवनाची देखणी वास्तू पाहता प्रेमात पडावं अशी आहे. दर्शनी भागात टांगलेला नंदादीप तर जणू एखाद्या राजमहालातून आणल्यासारखा वाटला. आत शिरताच रिसेप्शन काऊंटरमागे, लाल केशरी, पिवळ्या रंगांची उधळण मांडलेलं भव्य चित्र पाहताक्षणी नजरेत भरतं. या कलादालनातील एकावर एक अशी रचना असणाऱ्या चार दालनांना ठाणे जिल्ह्याला सुजलाम् सुफलाम् करणाऱ्या उल्हास, भातसा, तानसा आणि वैतरणा या नद्यांची नावं दिली आहेत. साहजिकच प्रथम खुणावतं, ते तळमजल्यावरील उल्हास कलादालन या ठिकाणी ठाण्याच्या इतिहासातील ठळक खुणा, भव्य फोटोप्रतिमांच्या सहाय्याने कायमस्वरूपात मांडल्या आहेत. त्याखाली मोठय़ा अक्षरात मराठी व इंग्रजी भाषेत लिहिलेली माहिती वाचताना आपण अपडेट होत जातो. उदा. सेंट जॉन बाप्टिस्ट या ख्रिस्ती बांधवांच्या प्रार्थनास्थळाचं पहिलं बांधकाम फार पूर्वी म्हणजे १५४० साली करण्यात आलं होतं किंवा ठाण्यातील प्रसिद्ध कौपिनेश्वर मंदिर हे मासुंदा तलावात सापडलेल्या कौपिनेश्वराच्या मूर्तीच्या सन्मानार्थ सरसुभेदार रामाजी महादेव बिवलकर यांनी १७६० मध्ये बांधलं. इ. इ. या गॅलरीतून पुढे पुढे सरकताना ठाण्याचं सेंट्रल जेल, पारशी अग्यारी, संत जेम्स चर्च, ज्यू धर्मीयांचं सिनगॉग.. अशा प्राचीन वास्तूंचा समग्र इतिहास सनावलीसकट आपल्यासमोर उलगडत जातो. १६ एप्रिल १८५३ रोजी धावलेल्या मुंबई- ठाणे रेल्वेगाडीचा पहिला प्रवास वाचताना दोन गमतीशीर विरोधाभास जाणवले. एक म्हणजे त्या गाडीला १४ डबे होते. (आज १२ डब्यांच्या गाडीचं कोण कौतुक!) दुसरं म्हणजे दीडशे वर्षे उलटूनही प्रवासाच्या वेळात फारसा फरक पडलेला नाही. (इंधन भरण्यासाठी थांबूनही त्यावेळी लागलेला एकूण वेळ ५७ मिनिटे) याशिवाय ठाण्याचा काही शतकांपूर्वीचा (कसबा ठाणे) आणि आताचा नकाशा, झालंच तर ठाण्याचं आजचं चकचकीत रूप व त्याच्या शेजारीच भविष्यातील ठाण्याचं विलोभनीय रेखाटन.. हे सारं बघताना आपलं मन अभिमानाने उचबंळून येतं. तरीही चटकन जाणवणारी एक उणीव म्हणजे ठाण्याचे ख्यातनाम चित्रकार स्व. ल.ना. तासकर यांच्या प्रतिमेला इथे एक कोपराही मिळालेला नाही. इ. स. १८०० च्या सुमारास वॉटर कलरमध्ये चित्र रंगविणाऱ्या या एकमेव चित्रकाराची अदाकारी बघण्यासाठी बाबूराव पेंटर, धुरंधर यासारखे दिग्गज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येत. या महान कलाकाराच्या अस्तित्वाच्या खुणांशिवाय हे दालन अपूर्ण वाटते. तरीही बाहेरगावच्या पाहुण्यांनाच नव्हे, तर आपल्या मुलाबाळांनाही आवर्जून दाखवावी, अशी ही जागा आहे. एवढं मात्र निश्चित. भातसा, तानसा आणि वैतरणा ही वरची तीन दालनं, कलाकारांना आपल्या कलाकृती मांडण्यासाठी अल्पभाडय़ात उपलब्ध आहेत. वरखाली करण्यासाठी चकाचक लिफ्ट आहे. त्यादिवशी आमचं नशीब जोरदार होतं. एकावर एक फ्री या आजच्या घोषवाक्याप्रमाणे चित्रांची रंगत आणि चित्रकारांची संगत असी दुहेरी मेजवानी आमच्या पदरात पडली. १६ चित्रकारांच्या एका ग्रुपने वेळोवेळी, ठिकठिकाणी भटकंती करून काढलेली निसर्गचित्रं, व्यक्तिचित्रं तसेच मुक्तचित्रं यांनी वैतरणा दालन सजलं होतं. सकाळच्या प्रहरातील खेडय़ातील घराच्या मागच्या दाराची हालचाल टिपणाऱ्या चित्राजवळ आमचे पाय थबकले. श्रुतीने रेखाटलेले ते बेळगाव परिसरातलं घर, आम्हाला क्षणात त्या गावी घेऊन गेलं. चित्राच्या बाजूला लिहिलेली माहिती वाचताना या युवा चित्रकर्तीच्या बोटात जशी जादू आहे, तशी गळ्यातही (संगीत विशारद) आहे हे समजलं. चित्रकाराची वृत्ती त्याच्या कलाकृतीतून प्रकट होते. याचा प्रत्यय बोधनकरांचा वासुदेव न्याहाळताना आला. या आर्टिस्टचा जन्मच मुळी देवळातला. भजन-कीतर्न ऐकत बालपण गेलेलं, त्यामुळे आळंदीला देवळाच्या पायरीवर बसून तल्लीनपणे भूपाळी म्हणणारा वासुदेव त्यांच्या कुंचल्यातून साकार झाला नाही तरच नवल! बघता बघता आमच्याही कानात त्या वासुदेवाचे सूर गुणगुणायला लागले. प्रत्येक चित्र सर्वसामान्यांना सहज रसग्रहण करता यावं असं. देवळाच्या बाहेर हातभर माळा घेऊन ग्राहक हेरणारा फेरीवाला, बुगु-बुगु आवाज करीत नंदीबैलाला घेऊन फिरणारा दरवेशी, बाळाला झोळीत अडकवून उभी असलेली लमाणी स्त्री.. अशी अनेक व्यक्तिचित्रं पाहणाऱ्याशी जणू बोलत होती. एका ‘तिबेटीयन’ स्त्रीच्या स्केचवरचे भाव तर असे की, ती जणू विचारतेय, ‘माझा फोटो काढताय?’ या चित्राचे जनक किशोर नादावडेकर म्हणाले की, ही स्त्री त्यांना लेह- लडाखच्या आसपास दिसली. ज्या ठिकाणी मोज्यातल्या हातांची देखील लाकडं होतात, अशा ठिकाणी तिची छबी कॅमेऱ्यात बद्ध करून खाली बेस कॅम्पवर आल्यावर रेखाटलेलं ते चित्र आपल्या मनात रेंगाळत राहतं.
कॅलिग्राफी ही विद्या घराघरात पोहोचण्याचं श्रेय अच्युत पालव यांचे. हेच वळण पकडून प्रकाश खारकर यांनी उभ्या फ्रेममध्ये रंगवलेली ‘आयुष्य’ही अक्षरं आणि त्यापाठी ‘हे आयुष्य कसं जगावं’ हे सांगणारा पुलंचा संदेश हे कॉम्बिनेशन एकदम भन्नाट.
असं म्हणतात की पॅरीसच्या म्युझियममधलं जगप्रसिद्ध मोनालिसाचं चित्र कुठूनही पाहिलं तरी पाहणाऱ्याला आपल्याकडे बघून हसतंय असं वाटतं. जयंत कोळेकर यांच्या लोकल या चित्राने अगदी मनातल्या मोनालिसाच्या प्रतिमेच्या हातात हात गुंफले. पाहावं तिकडून ती अंगावर येत होती. हा पाठशिवणीचा खेळ मग आम्ही बाहेर पडेपर्यंत सुरू होता.
कलाभवनाचा निरोप घेताना आम्ही अगदी भारावून गेलो, एका आगळ्या-वेगळ्या अनुभवाने समृद्ध झालो. परतताना आम्ही एकमुखाने निर्णय घेतला तो असा.. ‘जसं सारेगमपा या कार्यक्रमातील परीक्षकांच्या कॉमेंटस् ऐकून (आवाज पातळ लागला.. श्वास पुरला नाही.. स्वरातून भावना पोहोचल्या पाहिजेत..) आपला कान जसा तयार होतोय.. तसंच आता अशा प्रदर्शनांना भेटी देऊन निर्मात्यांना मनातले वेडेबागडे प्रश्न विचारून त्या-त्या कलेतलं आपलं ज्ञानही एकेक पायरी वर सरकवायचं.