Leading International Marathi News Daily
रविवार , ३ मे २००९
(सविस्तर वृत्त)

अकोल्यात भाजप पदाधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू
घातपाताचा आरोप
अकोला, २ मे / प्रतिनिधी

भाजपचे अकोला शहर सचिव श्याम गुरबानी (३५) यांचा शनिवारी संशयास्पद मृत्यू

 

झाला. हिंगणा फाटय़ाजवळ कारमध्ये गुरबानी मृतावस्थेत आढळले. त्यांचा घातपाताने मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबातील सदस्यांनी केला असून या घटनेमुळे अकोला शहरात खळबळ उडाली आहे.
भारतीय जनता पक्षात गेली अनेक वर्षे सक्रिय असलेल्या श्याम गुरबानींच्या मृत्यूने राजकीय व व्यापारी वर्तुळ हादरले आहे. बालाजी नगरातील श्याम गुरबानींनी शेंगदाण्याच्या व्यवसायात चांगलाच जम बसवला होता. धर्मेद, सुनील व अन्य गुरुबानी बंधूंचाही अकोल्यात ऑईल मिल, किराणा व्यवसायात नावलौकिक आहे. शुक्रवारी सायंकाळपासून ते घरी नव्हते. शनिवारी सकाळी ७ वाजता जुने शहर पोलिसांना हिंगणा फाटय़ाजवळ मृतदेह असल्याची माहिती मिळाली. पोलिसांना तेथे एमएच ३० पी- २४१० क्र मांकाच्या कारमध्ये श्याम गुरबानी मृतावस्थेत आढळले. गुरबानींचे शरीर काळे पडले होते. तातडीने पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह सवरेपचार रुग्णालयात हलवण्यात आला. पंचनामा केल्यानंतर ‘व्हिसेरा’ तपासणीसाठी नागपूरला पाठवण्यात आला.
गुरबानींच्या मृत्यूचे तीव्र पडसाद शहरात उमटले. भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण पडवळ यांची भेट घेऊन गुरबानींच्या मृत्यूची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली. पोलीस अधीक्षक पडवळ यांनी चौकशी करण्याचे आश्वासनही दिले. आमदार गोवर्धन शर्मा यांच्यासह डॉ. अशोक ओळंबे, अशोक दालमिया, राजेश मिश्रा, रमेश कोठारी, गिरीश जोशी, युवराज देशमुख, गोपी ठाकरे, सुरेंद्र विसपुते, संजय बडोणे तसेच गुरबानींचे आप्तमित्र यावेळी उपस्थित होते. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता हरिभाऊ कानडे यांचीही त्यांनी भेट घेतली. कानडे यांनी गुरबानींच्या मृतदेहाची पाहणी केली. हृदयविकाराने गुरबानींचा मृत्यू झाल्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. हृदयविकाराने मृत्यू झाल्यानंतर आठ, दहा तास मृतदेह पडून राहिला तर काळसर पडतो, असेही त्यांनी सांगितले.
‘व्हिसेरा’च्या तपासणीनंतर येणाऱ्या अहवालावरून चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. दरम्यान, श्याम गुरबानींचे लहान बंधू धर्मेद्र गुरबानी यांनी या घटनेमागे घातपात असल्याचा आरोप ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केला. पोलिसांकडून तपासात दिरंगाई केली जात असल्याचा आक्षेपही त्यांनी घेतला. गुरबानींजवळ तीन मोबाईल होते. त्यापैकी एकच सापडला, अन्य दोन गहाळ झाले आहेत. हिंगणा फाटय़ाजवळ त्यांना कुणी बोलावले, त्यांना हृदयविकार आला असेल तर त्याला कारणीभूत असणाऱ्या घटकांचाही तपास केला जावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.