Leading International Marathi News Daily
रविवार , ३ मे २००९
(सविस्तर वृत्त)

इंग्रजी शिकलात तर देशाचे राजे व्हाल- डॉ. कांचा इलाया
‘समता पर्व २००९’ची सांगता
यवतमाळ, २ मे / वार्ताहर

‘इंग्रजी शिकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्ही जर इंग्रजी शिकलात तर देशाचे राजे

 

व्हाल! संपूर्ण देशात इंग्रजी माध्यमांच्या आणि केवळ सरकारच्याच शाळा असाव्यात. त्यात सर्वानाच मोफत शिक्षण मिळावे, असे मत हैदराबाद येथील विचारवंत डॉ. कांचा इलाया यांनी ‘समता पर्व २००९’च्या समारोपीय सत्रात अध्यक्ष म्हणून बोलताना व्यक्त केले.
देशात खाजगीकरण, सेझ येत आहे. सेझसाठी शेतकऱ्यांच्या शेकडो एकर सुपीक जमिनी भांडवलदाराकडे जाणार असून या सेझच्या क्षेत्रात राज्य घटनाच नाकारली जाणार आहे. वेळीच हा गंभीर धोका ओळखावा, असे आवाहन चंद्रपूरच्या अ‍ॅड. वैशाली डोळस यांनी याच विचारवेध सत्रात बोलताना केले.
आधुनिक काळातील बहुजनांची गुलामगिरी व फुले, शाहू, आंबेडकरी विचार या विषयांवरील या समता विचारवेध सत्रात बोलताना नाशिकच्या प्रा. इंदिरा आठवले यांनी बहुजनांची सर्वच क्षेत्रात गुलामगिरी आहे. त्यांनी अंधश्रद्धेतून बाहेर यावे व मानसिक गुलामगिरीची प्रतीके फेकून द्यावीत, असे आवाहन केले.
महिलांचे विकृत चित्रण दाखविणाऱ्या मालिका महिलांनी मुळीच बघू नयेत, असेही मत त्यांनी व्यक्त केले. दोन्ही निमंत्रित वक्तयांच्या विचारांचा आढावा घेत अध्यक्ष डॉ. कांचा इलाया यांनी महाराष्ट्रात सांस्कृतिक क्रांती व्हावी, असे मत व्यक्त केले.
जातीयवादाला नष्ट करण्यासाठीच बुद्ध जन्माला आल्याचे नमूद करीत बुद्ध, जीझस, महंमद, कार्लमार्क्‍स आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा त्यांनी मागोवा घेतला. समता पर्वाचे प्रणेते डॉ. हर्षदीप कांबळे यांनी आपल्या भाषणातून पुढील वर्षी ९ ते १४ एप्रिलपर्यंत समता पर्व होईल, असे सांगितले.
समता पर्वाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेणाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. प्रास्ताविक सम्राट वाघमारे यांनी केले तर संचालन प्रा. सागर गावंडे यांनी केले.