Leading International Marathi News Daily
रविवार , ३ मे २००९
(सविस्तर वृत्त)

बल्लारशाह प्लायवुड कारखाना पूर्ववत सुरू होण्याची चिन्हे
चंद्रपूर, २ मे / प्रतिनिधी

सहा महिन्यांपासून बंद असलेल्या बल्लारशाह प्लायवुड कारखाना व्यवस्थापन आणि

 

कामगारांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याने आता हा कारखाना पूर्ववत सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे.
चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर असलेला बल्लारशाह प्लायवुड कारखाना गेल्या १२ नोव्हेंबर रोजी बंद करण्यात आला होता. यामुळे या कारखान्याच्या स्थायी व अस्थायी स्वरूपात नोकरीवर असलेल्या ४०० कामगारांच्या कुटुंबीयांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. गेल्या १३ एप्रिल रोजी व्यवस्थापन व कामगारांमध्ये झालेल्या चर्चेनंतर एक करार करण्यात आला असून त्यावर स्वाक्षऱ्याही झाल्या आहेत. त्यामुळे कारखाना पूर्ववत एक ते दीड महिन्यांत सुरू करू, असे सांगण्यात आले आहे.
कंपनीच्या हजेरीपटावर असलेल्या सर्व स्थायी कामगारांना कामावर घेतल्या जाईल आणि त्यानंतर कंत्राटी कामगारांना कामावर रुजू केले जाईल, असे लेखी आश्वासन व्यवस्थापनाने दिल्याचा दावा बल्लारशाह प्लायवुड कामगार संघाचे सरचिटणीस प्रकाश दुबे यांनी एका पत्रकाद्वारे केला आहे.
या कराराला ८० टक्के कामगारांनी सहमती दर्शविली असून याोुळे लवकरच कारखाना सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे. संघटनेत असलेल्या दोन गटांचा वाद कामगारांची आशा पूर्ण न होण्यासाठी कारणीभूत ठरला असून, या वादातच गेली तीन महिने व्यवस्थापनाशी चर्चा होऊ शकली नाही. आम्ही कुणाशी चर्चा करावी, असा प्रश्न उपस्थित करून व्यवस्थापनाने कारखाना बंद करण्याची नोटीस संबंधित विभागाला दिली होती. या पाश्र्वभूमीवर ९ फेब्रुवारी रोजी कारखान्याच्या परिसरातील हनुमान मंदिराच्या आवारात कामगारांची सभा बोलावून कारखाना पूर्ववत सुरू करण्यासाठी चर्चा करण्याचा अधिकार कामगार संघाचे अध्यक्ष रमेश कोतपल्लीवार यांना देण्यात आला. त्यानंतर कोतपल्लीवार यांनी अनेक बैठका घेऊन कारखाना पूर्ववत चालू व्हावा, यासाठी प्रयत्न केले. अखेर १३ एप्रिल रोजी या चर्चेला यश आले. या चर्चेत व्यवस्थापनाच्या वतीने कंपनीचे उपाध्यक्ष टी.एन. राव, सी.एस. मूर्ती, व्ही.जी. सोनार, सी.बी. कडगी, जी.बी. राऊत, एन.के. मोरे आणि कामगार संघाच्यावतीने रमेश कोतपल्लीवार, उपाध्यक्ष शंकर पटकोटवार, दिलीप वैरागडे, प्रकाश दुबे, गजानन पाटणकर, विनायक लिंगायत, लक्ष्मण जोशी आदींनी भाग घेतला.
सहाय्यक कामगार आयुक्त अ.त्र. माडीवाले यांच्या उपस्थितीत उभय पक्षाने करारावर सह्य़ा केल्या. यानंतर आता हा कारखाना केव्हा सुरू होईल, याकडे सर्व कामगारांचे लक्ष लागले आहे.