Leading International Marathi News Daily
रविवार , ३ मे २००९
(सविस्तर वृत्त)

टाकळघाटात दारूबंदीची मागणी
हिंगणा, २ मे / वार्ताहर

बुटीबोरी औद्योगिक वसाहतीला लागून असणाऱ्या हिंगणा तालुक्यातील टाकळघाट

 

परिसरात सध्या अवैध व्यवसाय तेजीत आहेत. ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभेत गावातील दारूची दुकाने हटविण्याचा ठराव मंजूर केला पण, प्रशासनाने याबाबत कार्यवाही मात्र केली नाही.
भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन समितीने गावातील दारूची दुकाने गावाबाहेर हटविण्यासाठी पुढाकार घेतला. गेल्या २६ जानेवारीला सरपंच मनोज जिवणे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा घेऊन याबाबत ठराव मंजूर करण्यात आला. व ठराव जिल्हाधिकारी यांच्यासह तहसीलदार संवर्ग विकास अधिकारी, शिक्षण सभापती, उपसभापती पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यपाल अधिकारी आदींना पाठवण्यात आला. मात्र, तीन महिन्यांवर कालावधी उलटूनही अधिकाऱ्यांनी अद्यापही कोणतीही कारवाई न केल्यामुळे गावकऱ्यात रोष व्यक्त होत आहे. १५ हजार लोकसंख्येच्या टाकळघाटात लग्न, वाढदिवस, नामकरण, वास्तुपूजन आदींसह इतर कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बाहेरगावावरून पाहुणे येतात. गावातच त्यांच्यासाठी दारू उपलब्ध होत असल्याने वादावादीचे प्रकार घडत असल्याने वातावरण दूषित होत आहे. कधी हाणामारीचीही पाळी येते. यामुळे नाराज गावकऱ्यांनी दारूची दुकाने हटवण्याचा निर्णय घेतला आहे. बुटीबोरी औद्योगिक वसाहतीला लागून असल्याने टाकळघाट येथे कामगारांची संख्या अधिक आहे. यात ३५ ते ४० टक्के कामावर उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान, पंजाब, हरियानासह देशाच्या अन्य राज्यातील आहेत. यातील अनेक कामगारांना भंगार विक्री, चोरी, जुगार, सट्टा, गांजा व दारू आदींची सवय जडली आहे. या कामगारांची अर्धा अधिक कमाई अवैध व्यसनावर खर्च होत आहे.
गावात एक बिअरबार व दोन देशी दारूची दुकाने मुख्य मार्गावर असल्याने शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनाही याचा त्रास सहन करावा लागतो. महिलांना व विद्यार्थिनींना याचा सर्वाधिक त्रास होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देऊनही काहीच कारवाई होत नसल्याने नागरिक आता आंदोलनाच्या तयारीत आहेत.