Leading International Marathi News Daily
रविवार , ३ मे २००९
(सविस्तर वृत्त)

थंड हवेचे ठिकाण तापले
बुलढाणा, २ मे / प्रतिनिधी

एकेकाळी थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले बुलढाणा शहर भयावह

 

तापमानाच्या विळख्यात सापडले आहे. बुधवारी बुलढाण्याचा पारा ४३ से. तर गुरुवारी ४२.०२ से. वर पोहोचला. एप्रिलच्या शेवटी जर अशी परिस्थिती आहे, तर मे ‘हीट’ मध्ये बुलढाणा शहर व जिल्ह्य़ाची जनता चांगलीच होरपळून निघण्याची भीती व्यक्त होत आहे.
विदर्भात समुद्र सपाटीपासूनच्या उंचीच्या तुलनेत चिखलदऱ्यानंतर बुलढाण्याचा क्रमांक लागतो. पूर्वी गमतीने चिखलदऱ्याला विदर्भाचे महाबळेश्वर तर बुलढाण्याला विदर्भाचे पाचगणी संबोधले जायचे. इंग्रजांना प्रसन्न गारवा देणारे थंड हवेचे ठिकाण बुलढाणा भावून गेले आणि त्यांनी येथे जिल्ह्य़ाचे मुख्यालय वसवले. गेल्या दोन-तीन वर्षांत थंड हवेचे ठिकाण ही बुलढाण्याची ओळख पुसू लागली आहे. यंदाच्या उन्हाळ्यात तर हे शहर वार्मिग सिटी झाले आहे. शहराचे तापमान कडक उन्हाळ्यात ३९ से.च्या वर जात नसे. मात्र, आता ४४ से.पर्यंत पोहचू लागले आहे. शहर व परिसरात पर्यावरणीय असंतुलन निर्माण झाले आहे. शहर व परिसरात संरक्षित वनांसहित खाजगी मालमत्तेच्या सुमारे एकलाखाहून अधिक वृक्षांची झालेली तोड हे या पर्यावरणीय असंतुलनाचे प्रमुख कारण आहे. एक लक्ष वृक्षांची तोड झाल्यामुळे जैवविविधता सुद्धा नष्ट झाली आहे. बुलढाणा शहर व परिसर नैसर्गिक दृष्टय़ा संतुलन राखण्यास वनखाते व पर्यावरण खाते संपूर्णत: अपयशी ठरले आहे.